ऎसे तो ये जहान कहीं डूब जाएगा
हर शख्स कह रहा है, के बस नाखुदा हूं मैं
( शख्स : व्यक्ती,माणूस नाखुदा : नावाडी, कर्णधार )
सगळ्याच पक्षांचं एकमेव उद्दीष्ट असतं – जनतेचं कल्याण. सगळ्याच नेत्यांच्या तोंडी असतं, देशाचं भलं- जनतेचं भलं. मग असं ज्रर पक्कं असेल, तर भोळ्या जनतेला असं वाटणं स्वाभावीक आहे, की बुवा मग सगळेच एक का होत नाहीत ? बरं, नाही झाले एक तरी हरकत नाही; पण ही भांडणं का ? आरोप-प्रत्यारोप, चिखलफेक – हंगामा ! ( हा खमंग शब्द आता गुलाम अलीच्या तोंडातून निघून राज्य सभेत जावून बसला आहे. तिखट होवून बसला आहे !) का बरं; अन् ती ही आमचा हवाला देवून-जनतेचा ? आमच्या कल्याणाचं, कळवळ्याचं प्रयोजन पुढे करून ? बरं, प्रत्येकाचा आवेश,ती बोलण्याची तर्हा,ते वक्तृत्त्व अन् आमच्या अत्यंत खाजगी असलेल्या श्रध्देचा वारंवार उल्लेख करून तणाव उत्पन्न करायची त्यांची ती हातोटी पाहून थक्क व्हायला होतं.आपली अवस्था विचीत्र होवून जाते-
कदम कदम पे जहां बेशुमार राहबर है ( बेशुमार : असंख्य राहबर : मार्गदर्शक )
मुसाफिरों को वहां कैसे ऎतबार आए.. ( ए’अतिबार : विश्वास,भरवसा )
मार्गदर्शक- पथप्रदर्शक. आपण लहानपणापासून त्याच्याबद्द्ल वाचलं आहे. गुरू असतो तो – मार्ग दाखविणारा. यशाकडे घेवून जाणारा. आपणही त्याच्यावर श्रध्दा ठेवून त्याच्या मागे जाणारे.. अशा प्रकारचे काहीसे चित्र शाळकरी वयात मनात जपलेलं असतं. मग जीवनात पुढे एक एक अनुभव येत जातात, मतदानाचा हक्क प्राप्त होतो अन् ध्यानात येतं,की कुणी तरी तेज:पुंज (!) व्यक्ती आपल्याला मार्ग दाखविते आहे.. गुळगुळीत दाढी केल्यासारखा तो छान वळणदार रस्ता,मग तो डोंगर,तो सूर्योदय,ते मंदिर,तो ध्वज.. आ रा रा रा , असं काही नसतं, तसं काही समजणं हे बावळटपणाचं आहे हे आपल्याला ताबडतोब लक्षात आलेलं असतं. कारण-आपल्याला आलेले खडतर अनुभव. कारण आपल्या भोवती पावला पावला वर वाढलेल्या – असुरक्षिततेची हवा तयार करून सुरक्षेची खात्री देणार्या मार्गदर्शकांची संख्या. त्यांचा उपदेश.. नाही तर.. धमकी.
अशावेळेस भानावर यायला पाहिजे ते आपणच. आपणच निर्णय घ्यायला पाहिजे.
सय्याद म्हणजे पारधी,शिकारी.तो माणूसच. जमिनीवर चालणारा. आणि तो शिकार करतो आभाळात वावरणार्या पक्ष्यांची. कसं शक्य आहे ते. किती विचित्र. जमिनीवरच्या माणसाला-ज्याला पंख नसतात,त्याला आभाळातल्या, पंख सर्सावून उडणार्या पक्ष्यांना पकडता कसं येणार… पण कठोर वास्तव असतं- कटू, पण सत्य अशी स्थिती असते.. आणि पक्षी शिकार होवून जातो, त्या सय्यादची. सय्याद सगळीकडेच असतात- सगळ्याच क्षेत्रात असतात, जाळी लावून बसलेले, भुलविणारे.. दोष त्यांचा नाही, आपला आहे- पक्ष्यांचा. आपली प्रकृती आकाशात भरारी घेण्याची. तिथे सय्याद पोंचूच शकत नाही. .. मात्र आपली भरारीच जर कमी झाली, आपणच रेंगाळू लागलो, वेंधळ्यासारखे प्रभावीत होवू लागलो, सारासार विचारशक्तीचे पंख जवळ घेवू लागलो, तर…
‘ असगर ‘ हा शायर म्हणतो-
यहां कोताही-ए-जौके-अमल है खुद गिरफ्तारी (कोताही -ए- जौके -अमल : तीव्र इच्छा शक्तीची मर्यादा )
जहां बाजू सिमटते है, वही सय्याद होता है.
– ‘असगर्’ गौंडवी.
आपली इच्छा शक्ती प्रखर असायला हवी- तीच क्षीण झाली, की मग भरारीला मर्यादा येणार, मलूलपणा येणार. आणि असा रेंगाळणारा गोंधळणारा पक्षी- सय्याद तर त्याच्यासाठीच ट्पून बसलेला असतो.
… म्हणून परिस्थीतीचे, वास्तवाचे भान ठेवणारा तरून जातो. अशा माणसाची निर्णय शक्ती शाबूत असते. आपलं स्वत:चं भलं बुरं याची त्याला स्पष्ट जाण असल्याने तो गोंधळून जात नाही. आणि त्याला मार्गदर्शकांच्या गर्दीशी काही घेणं-देणं नसतं. .. ना त्यांच्यामुळे त्याची उत्तेजना वाढते.
अपनी मंजील के जो खुद राहनुमा होते हैं
राह से उनको भटकते कभी देखा न सुना
आपल्या कामावर ज्याची निष्ठा आहे, तो स्वत:च स्वत:चा मार्गदर्शक असतो. तो कधीही भरकटत नाही. त्याला तारतम्य येतं.अशा माणसाची राहनुमाई कोण करतं ? कशाच्या आधारे तो निर्णय घेत असतो ? अशा माणसाचं लक्ष परिणामाकडे असतं.त्याला परिणाम लक्षात येतात,आणि तो सावध होतो-
भली राहनुमाई है, भली नाखुदाईयां है
वही रुख करार पाया, जो बता दिया हवा ने ( -‘ हफिज ‘ मेरठी )
प्रतिक्रिया व्यक्त करा