Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

मंजिल-ए-मख्सूद…

गेली दोन वर्षं हा ब्लॉग लिहिला, याला बर्‍याच जणांचा छान प्रतिसाद मिळाला.

आता हे ब्लॉग लेखन पुस्तक रूपाने प्रसिध्द झाले आहे, त्याचा हा तपशील-

उर्दू शे’रचं आकर्षण प्रत्येक रसिकाला असतं. आणि हे शे,र आपल्याला कुठेही

भेटत असतात- निवेदनातून, गाण्यातून, लेखनातून, व्याख्यानातून किंवाअ साध्या

गप्पांतून. या शे’रचं वैशिष्ट्य असं, की जाता जाता आपण मुख्य विषय विसरून

त्यापाशी घुटमळतोच. एखाद्या वचनासारखं रूप असलेल्या या दोन ओळी काव्याची

प्रकृती जपून असतात. एखाद्या विषयावरचे शे’र घेऊन रमत गमत केलेला हा

आस्वाद-प्रवास; उर्दू शायरीबद्दल प्रेम आणि समज वाढविणारा….

प्रकाशक :: मीरा बुक्स ऍंड पब्लिकेशन,

2, साई कॉम्पलेक्स, न्यू एस बी एच कॉलनी,

सहकार नगर, औरंगाबाद 431005

दूरध्वनी : 0240 -2340414

मूल्य : रू 110/-

‘दाग’चं पत्रप्रेम

जुन्या जमान्यात, जेव्हा रेल्वे-बसा, दूरध्वनी काही काही नव्हतं तेव्हा दूरवर रहाणार्या, माणसाला निरोप देणं हे मोठं कठीण काम असायचं. त्यातही प्रेमातले निरोप देणं तर कठीणही आणि त्यात कमालीची जोखिमसुध्दा. महत्त्वाचं म्हणजे, पत्राची वाट पाहणं. ‘दाग’ हा शायर तर अगदी पत्रव्यवहाराची बाधा बाळगून असलेला. ( खरं म्हणजे, त्याने स्थानिक पोरीशीच सूत जमविलं असतं तर किती चांगलं झालं असतं, नाही का…) त्या दिवसात पत्र घेऊन जाणारा- आणणारा हा देवदूत- नामाबर, कासिद अतिशय महत्त्वाचा माणूस. प्रेमाच्या भावनेनं पुरेपूर भरलेलं ते संवेदनांचे फुलपाखरू या नामाबरच्या हवाली करायचं. मनातल्या कल्लोळांचे, शब्दांच्या नक्षीने मोहरलेलं फुलपाखरू काळजीपूर्वक त्या कासिदच्या हवाली करायचं.
पण पत्र लिहून हवाली केल्यावरही निश्चिंती कुठे रहाते ? काहीतरी आठवत राहतंच. मग तोंडी निरोप सांगायची घाई होते.
‘तू सांग तिला. पत्र तर देच; पण सांग तिला माझी अवस्था. म्हणावं, झोप नाही, जेवण नाही…डोळे लाल होवून गेले आहेत.’( दाढी वाढलीय हे मात्र सांगता येणार नाही- कारण बिनादाढीचा शायर असू शकतो का…) मग ‘दाग’ काय करतो-

आई है बात बात मुझे बार बार याद
कहता हूं दौड दौड के कासिद से राह में
शिवाय, तिने माझ्याबद्दल काही तपशील विचारले, तर सांग तिला-
कोई नामो-निशां पूछे तो ए कासिद बता देना
तखल्लुस ‘दाग’ है, और आशिकों के दिल में रहते हैं
आता हे पत्र धाडलं जातं. आता हातातून तो बाण निसटलेला आहे. आता हात चोळत बसणं आलं. पण त्याच्या मनात तिच्याबद्दलच्या भावना विचारांच्या कल्लोळात आता एक नवीन भर पडलीय, ती या कासिदची- हा नामाबर; अत्यंत उपयोगी, महत्त्वाचा असा माणूस. रुग्णाने वैद्यावर जेवढे अवलंबून रहावे, त्याहीपेक्षा जास्त असं, त्या नामाबरवर हे अवलंबून रहाणं. मग तो नाराज होवू नये, विश्वासाने त्याने काम करावं म्हणून त्याची सगळी बडदास्त ठेवली जाते. इतरांपेक्षा जरा जास्त ‘खुशाली’ दिली जाते.
आणि या अतिरिक्त बडदास्तीमुळे, तो नामाबरसुध्दा बावचळतो. तोसुध्दा मग अधिक उत्साहाने बोलतो. ‘तुम्ही काही काळजी करू नका- हा गेलो, की आलोच. सांगतो त्यांना सगळं सगळं.-अगदी सविस्तर; अन उत्तर घेऊनच येतो.’
पण नामाबरच्या तशा वागण्या बोलण्याचा ‘साईड इफेक्ट’, तो निघून गेल्यावर होत राहतो. त्याच्या तशा चापलुशीमुळे, लाडीगोडीमुळे ‘दाग’ला रास्त अशी शंका येते-
नामाबर चर्ब-जबानी तो बहोत करता है
दिल गवाही नही देता, के उधर जाएगा
…आणि दिवस रात्र त्या नामाबरच्या वाटेवर डोळे लावून बसणं. शंका कुशंकानी घेरून जाणं; उलटसुलट विचारांनी हैरान होणं नशिबाला येतं अशा प्रेम वेड्या शायरच्या.
मग एके दिवशी तो नामाबर दिसतो. याला उत्साहाचे उमाळे येतात. आणलं का उत्तर, काय आणलं, काय म्हणाली ती, रागात होते, का लोभात… अरे अरे अरे ! तो कासिद येतो आहे, अन इथे हे अवखळ मन कुठे स्वस्थ बसू देतं ? एका शायरने ही अवस्था अशी सांगितली आहे-
कसिद आया है वहां से, तू जरा थम तो सही
बात तो करने दे उससे, ए दिले-बेताब मुझे
माणूस प्रत्यक्ष प्रेमाच्या व्यवहारापेक्षा या पत्रव्यवहाराने जादा हैराण होवून जातो !

हातावरच्या रेषा

आपण दररोज आरशात पाहून भांग वगैरे पाडून कामाला लागतो; पण आपल्या चेहर्याेकडे खरंच आपलं लक्ष असतं की नाही कुणाला ठावूक ! हाताच्या रेषांचंही तसंच असतं. या हातांच्या रेषांचं गणित सोडवायचा आपला अधून मधून प्रयत्न होतो, पण केव्हा ? हतबल होवून जेव्हा हात चोळत बसायची वेळ येते तेव्हा. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, आपण आपल्या भविष्याशी निगडीत करून ठेवलेल्या आपल्या या हातच्या रेषा…आपलं भविष्य मूठीत धरून ठेवणार्याआ- आपलेच हात, आपलेच भविष्य; पण आपल्याला त्याचा पत्ता ? छे !
एखादी तीव्र इच्छा जेव्हा आपल्याला छळत असते, तेव्हा या हातच्या रेषांकडे आपण मोठ्या आशेने पाहात असतो. एक शायर म्हणतो-
तूम मेरी रूह में शामिल हो, रगों में रवां हो
मगर मेरी हाथों की लकिरों में कहां हो…
…माझ्या मनात- माझ्या आत्म्यात तू भरून आहेस, माझ्या नसानसात तू वाहते आहेस….पण खरंच, तू माझ्या नशिबात कुठे आहेस बरं… एखाद्या धुंदीने माणूस झपाटलं, की त्याच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने मोठं काम करून दाखवितो हा आपल्या सगळ्यांचाच अनुभव. ते काम हातून वेगळं झालं, की कधी आपल्याला आचंबा वाटतो, की अरे ! खरंच का हे आपल्या हातून झालेलं आहे…. आणि आयुष्यात असे कितीतरी प्रसंग येतात, की आपण हतबल होवून जातो. आपला आत्मविश्वास कमी होवून जातो. त्यावेळी आपल्या यशाच्या घटना आपण आठवतो…वाटून जातं-
बा-अमल चूम चुके चांद सितारों की जबीं
बे-अमल हाथ की रेखा में मुकद्दर देखे
बा- अमल, बे-अमल… अमल म्हणजे अधिकार, प्रभाव, परिणाम. आणि या शब्दासोबत ‘बा’ असलं की ते होतं प्रभावासहित, अधिकारवाणीने; आणि हाच अमल, बे-अमल झाला, की ती होते हाता बाहेर गेलेली- हाताच्या रेषेबाहेर गेलेली बाब. प्रभावहीन.
बा-अमल आणि बे-अमल ह्याच तर रेषा आहेत आपल्या हाताच्या आडव्या उभ्या.

प्रवचन ऎकताना आणि विशेषत: त्या प्रवचनात आपल्या वर्तणूकीबद्दल उपदेश असतील, तर त्यावेळी पुढे येऊन बसलेलं आपलं एक मन हळू हळू मागे जाऊन बसतं. पार मागे बसून राहतं. असं करण्यात आपल्या मनाची चूक किती आणि त्या प्रवचनात सांगितल्या जाणार्‍या उपदेशातली  बडबड कोणती असते ?…’तू पापी आहेस, तू पाप कबूल कर तो तुला निश्चित क्षमा करणार’, किंवा ‘आपलं मन षडरिपूंनी भरलेलं आहे’, ‘जग हे माया आहे’ वगैरे ऎकायला मिळालं, की आपली गडबड होते. अपराधीवृत्तीने आपण विचलीत होतो आणि मागे जाऊन बसतो.;नाही का ? आपल्या पापांच्या हिशोबाने अन पुण्याच्या तणावाने आपल्या मनावरचा  आपला विश्वास उडत जातो. आणि मग बर्‍याच कालानंतर आपण सावरून जातो. आपल्या लक्षात आलेलं असतं, की –

कही गीता का हवाला कही कुरान का था
उनकी हर बात में खतरा मेरी ईमान का था

धर्मग्रंथांचे हवाले देऊन आपल्याला ताळ्यावर आणण्याचे प्रयत्न होत असतात. आपली श्रध्दा, आपल्या सच्चेपणाबद्दल ते शंका घेतात, अन खरं म्हणजे, आपण बिघडलेलोच आहोत, हा पक्का विचार ठेऊनच त्यांचे उपदेशांचे डोस चालू असतात. ईश्वराची भावना आपल्या मनात दडपन तयार करते.

आणि आयुष्यभर प्रवचनं ऎकल्यावर,  पोथीपुराणं वाचल्यावर एका टप्प्यावर माणसाला कळून येतं, की एकमेकांबद्दलचा बंधुभाव हेच तर सार आहे, धार्मिक ग्रंथांचं. आणि हेच तर सांगायला हवं सगळ्या प्रवचनांतून-

चाहे गीता बाचिए, या पढीए कुरान
मेरा तेरा प्यार ही, हर पुस्तक का ग्यान
– निदा फाजली


हुस्न का पास…

हिंदी गाण्यांची आवड लहानपणापासून असली,की त्यात्या वेळी ती गाणी जशी ऎकली तशीच मनात रहातात,त्याच तर्‍हेने आयुष्यभर साथ देतात.तथापि, त्यावेळेस गाण्यांचे अर्थ,शब्दांचे अर्थ-आशय माहित नसतात. फक्त चाल. त्या गाण्याच्या चालीने गाणं मनात वावरत असतं.पुढे जसजसं वय वाढत जातं,समज वाढते, तसतसं गाणं समजत जातं. अर्थात सगळं गाणं समजतं असं कुठे असतं ? एखादा शब्द-एखादी ओळ समजून जाते,ते गाणं नव्याने झळाळून जातं- खुशी होते,पुढे जातो आपण.जीवन व्यवहारातील  सुख दु:खाच्या अनुभवांच्या अनुषंगाने गाण्यातला अर्थ कधी जाणवतो, ते गाणं अधिक अधिक  निकटचं होवून जातं.
गाण्यातले उर्दू शब्द तर या प्रवासात महत्त्वाचे धडे असतात.अर्थ माहित नसलेल्या कितीतरी उर्दू शब्दांना घेऊन आपण आपल्या तर्‍हेने त्याचा उच्चार करून सांभाळून ठेवलेले असतात हे शब्द! अशा एखाद्या शब्दाचा अर्थ जेव्हा आपल्याला लागतो,तेव्हा घरात दिवा लावल्यावर घर उजळून जावे तसं ते गाणं मनात उजळून जातं.
1958 चा लालारूख सिनेमा सुरूवातीला ‘है कली कली के लब पर,तेरे हुस्न का फसना’या मं.रफीच्या खुमासदार गाण्यामुळे लक्षात राहिला. त्यानंतर वयाच्या पुढच्या टप्प्यावर ‘प्यास कुछ और भी भडका दी झलक दिखला के‘ या गाण्याची ओळख झाली. मात्र ही ओळख कुणी करून दिली-त्या गाण्यातल्या लाडिक सतारीने. या सतारीनेच मला गाण्याकडे हळूवार तर्‍हेने आणलं. हे गाणं गायलं आहे, तलत महमूद आणि आशा भोसले यांनी; मात्र  सगळ्या गाण्यात सतारीच्या सुरावटी एवढ्या लाडीक तर्‍हेने  वावरतात,की असं वाटतं,हिवाच्या दिवसांत एखादं पाळीव गुबगुबीत मांजर आपल्या अंगाखांद्यावर रूळावं,लगट करावी असं…गाणं ज़णू काही तिघांचं आहे-तलत,आशा भोसले आणि ही सतार…
तेव्हा या गाण्याचा छंद लागला. मग उर्दू भाषेचा छंद लागला आणि जादू झाली. अर्थात ही जादू एका एका शब्दाने नशेचा खुमार वाढत जावी.गाण्यातले जूने  उर्दू शब्द-त्याचे अर्थ लावायचे गाणं उजळून घ्यायचं. असं चालू झालं.
या गाण्याच्या बाबतीतही असंच झालं. गंमत अशी झाली,की पूर्ण गाणं समजून घेतलं,आवडलं;मात्र एक शब्द कसा कोण जाणे निसटून गेला आणि कसा कोण जाणे त्याची दखल न घेताच ते गाणं अनुभवलं इतकी वर्षं ,याचं राहून राहून आश्चर्य वाटू लागलं..
एकदा सकाळी हे गाणं भुले बिसरे गीत  या कार्यक्रमात लागलं .नेहमी प्रमाणे त्या मांजरासारखा मी गाण्याभोवती घोटाळू लागलो…
प्यास कुछ और भी भडका दी झलक दिखला के
तुझको परदा रूखे-रोशन से हटाना होगा

इतनी गुस्ताख न हो इश्क की आवारा नजर
हुस्न का पास निगाहों को सिखाना होगा

या गाण्यातले उर्दू शब्दांचे मोहरे-त्यांचे अर्थ शोधून घेऊन गोळा करून घेताना एखादी  मोहर पडून जावी,राहून जावी  तसं झालं होतं. हा शब्द –हुस्न का पास…राहूनच गेला होता. हुस्न  म्हणजे,सौंदर्य-हे माहित होतं; पण
पास…हे पास  म्हणजे काय बुवा… या गोंधळात पडलो. खरं म्हणजे, या सिनेमाचं नाव विचित्र वाटल्यामुळे लक्षात राहिलं होतं-लालारूख ! लाल: -म्हणजे, लाल रंगाचे फूल. लालारुख  म्हणजे, लाल व नाजूक गाल,चेहरा असलेली(अर्थात प्रेयसी !)
-आणि पास  शब्दाचा अर्थ पाहिला,की गाणं उजळून निघालं ! हुस्न का पास  म्हणजे, सौंदर्याची मर्यादा,संकोच,भीड. संकोच,भीड,मर्यादा  हे जे सौंदर्याचे वैशिष्ट्य असते, त्याची जाणिव नजरेला (निगाह ) असणे गरजेचे आहे… असं अर्थात-तिचं सांगणं.

पडद्यामागे हा जो चेहरा तू लपविला आहेस,तो बाजूला सार,असं आर्जव तो करतो आहे आणि ती तितक्याच निग्रहाने पण संकोचाने-अंतर राखून प्रेमातल्या व्यवहारातली सभ्यता त्याला सांगते आहे. हा संवाद एवढा मोहक आहे…

चांद तारों को मयस्सर है नजारा तेरा
मेरी बेताब निगाहों से ये पर्दा क्यूं है

चांद आईना मेरा तारे मेरा नक्शे-कदम
गैर को आंख मिलाने की तमन्ना क्यूं है

                             तुझको देखा,तुझे चाहा,तुझे पूजा मैने
                             बस यही इसके सिवा मेरी खता क्या होगी

                            मैने अच्छा किया घबरा के जो मूंह फेर लिया
                            इससे कम दिल के तडपने की सजा क्या होगी

हा सगळा संवाद ही गुस्ताखी सगळं सगळं तिचा चेहरा-रूख पाहण्यासाठी आणि तिचा तो नकार. या सगळ्या गाण्यात एक प्रकारचा संकोच,भीड असं वातावरण आहे, हे सगळं ,हुस्न का पास ,या शब्दांचा टॉर्च हाती आला,आणि लक्षात आलं. एखाद्या व्यवहारात दोन फ्री गिफ्ट मिळाव्यात तसं,हे गाणं जेव्हा यू ट्यूब वर मी पाहिलं तसा अनुभव आला. एक म्हणजे, जसं हे गाणं तलत महमूद ने गायलं आहे, तसंच सिनेमात त्यानेच हे म्हटलेलं आहे. दुसरा लाभ म्हणजे, मोहक नजरेची ती नायिका-श्यामा. शारदा,बरसात की रात मधली तिची अदाकारी लक्षात राहिली आहे.

आणि दोन गफलतींचाही अनुभव मला आला. एक म्हणजे, हे गीत साहिर लुधियानवी  यांचं आहे, हा माझा झालेला समज-जो चुकीचा असून या गीताचे गीतकार आहेत, कैफी आजमी. संगितकार :खैय्याम.
दुसरी गफलत माझी नाही-सिनेमातली. गाण्यात सतारीची साथ आहे,तर इथे नायकाच्या हाती, मेंडोलिनसारखं  – का दिलरूबा? असं ते वाद्य आहे. ( अशीच गफलत नागीन  या जुन्या सिनेमातल्या लताच्या गाण्यात सुध्दा आहे-कौन बजाए बासुरीया असं लता म्हणते,आणि वाजविललं आहे ते भलतंच वाद्य) अर्थात ही गफलत दिग्दर्शकाला माहित असणारच…पण सतार घेऊन प्रेम करणं अवघड असल्याची जाणिव त्याला असावी !

15 नोव्हेबरच्या टिपणाच्या अनुषंगाने…
बुध्दी आणि भावना यांचे द्वंद्व माणसाची फार तारांबळ करतं. हो, याला तारांबळच म्हणावी लागेल. या तारांबळीध्ये अस्वस्थाता असते,उत्तेजना असते, मात्र केवळ भावनेमुळॆ ही तारांबळ नकोशी न वाटता हवीहवीशी वाटत असते. बरं, माणसाच्या प्रकृतीत कधी बुध्दीला प्राधान्य देण्याची वृत्ती असते, तर काहीजणांच्या बाबतीत भावनेच्या आधाराने वागायची-बोलायची सवय.
…हे द्वंद्व तारूण्याच्या उंबरठ्याशी तर अधिक होऊन जातं. प्रेमाच्या व्यवहारात कधी ही बुध्दी- अक्कल आपल्याला बजावीत असते तर कधी ही ओढ….आपल्याला स्थीर राहू देत नसते. ‘ताज महल’ मध्ये साहिरच्या एका गाण्यात ती नायिक म्हणते-
शर्म रोके है इधर, शौक उधर खिंचे है
क्या खबर थी, कभी इस दिल की ये हालत होगी
अगदी अशीच अवस्था ‘नौ बहार’ या जुन्या चित्रपटात शैलेंद्र ने मांडली आहे. ( ताज महल आणि नौ बहार चे संगितकार आहेत रोशन.)
बचपन जवानी जो मिलने लगे है
मौसम बिना फूल खिलने लगे है
छेडी किसीने मेरे मन की बिना-
गाऊं तो मुश्किल न गाऊं तो मुश्किल


ते गाणंच आपण पाहू या…बुध्दी आणि भावना यांची सुरेख दंगल असलेलं…

अकलेचा मूर्खपणा !

तत्कालीन भावनांच्या प्रभावाखाली येवून आपण तुरंत वागतो-बोलतो. त्या भावनांचा प्रभाव आपल्या शरीर-मनावर ऍलर्जी व्हावी, तसा होतो अन आपण वागून जातो,बोलून जातो.
आणि मग अडचणीत येतो. लक्षात येवून जातं,की काहीतरी बिघडलं गड्या आपल्याकडून. असं करायला-वागायला-बोलायला नको होतं आपण. हे असं वाटायला नेमकी केव्हा सुरूवात होते-जेव्हा आपल्याला याची जाणिव होते,की आपल्या त्या कृतीचे वेगळॆ परिणाम झालेले आहेत. परीसर-वातावरण; त्यात बदल झालेले आहेत. मग आपण सांभाळतो. पण आता तर वेळ निघून गेलेली असते.
आपल्या भावनांच्या अभिव्यक्तीमुळे बिघाड झाला, याची कल्पना आली,की आपण थबकतो. आपल्या त्या भावना आवरतो. पश्चात्तापाच्या विचारांचा अंमल मग चालू होतो. आणि इथूनच चालू होतो अकलेचा प्रभाव. भावना कैद होवून जातात. अकलेनं मनाचा ताबा घेतला असतो. आपलं चुकलं नाही, असं भावना वारंवार सांगत असते-बजावत असते,पण आता परिस्थीतीचा ताबा अकलेने घेतलेला असल्याने नाईलाज होत असतो. अक्कल बजावीत रहाते,डोळे वटारते,हात उगारते-तू दोषी आहेस ! …अपराधी मन ऎकत रहातं.गप्प रहातं.
अक्कल आणि भावनांचं नातं हे असं. शाळॆतली हुशार,व्यवस्थीत गृहपाठ करणारी,पुढच्या बाकावर बसणारी,नेहमीच गणवेशात रहाणारी पोरगी जशी,तशी ही अक्कल;तर तिच्याच मागच्या बाकावर बसणारी,शहाणी,पण गणवेषाचं भान नसणारी, नियमीत आभ्यासापेक्षा इतर बाबीत रमणारी पोरगी जशी,तशी भावना.
पुष्कळदा उचंबळून आलेल्या विचारांतून भावनांचा शुभ्र फेस तयार होतो अन शरीरावर त्याचा ताबा होतो. एका धुंदीत माणूस मग वागतो,बोलतो. त्यावेळेस अकलेची ती हुशार मुलगी असतेच बरं वर्गात; ती सांगत रहाते, बजावत रहाते, पण तिचं ऎकायला चित्त ठिकाणावर पाहिजे ना !
-अन प्रेमात पडलेल्या माणसाला-तिला पत्र लिहायच्या म्न:स्थितीत तर असं वाटतं,की अकलेला वर्गातच कोंडून टाकावं,आपण मैदानावर जावं,तिथं झाडाखाली बसून मस्त पत्र लिहावं तिला-

अक्ल कहती थी,न लिख दफ्तर-ए-मजकूर उसको
शौक ने एक भी मजमून बदलने न दिया

प्रेमाचा उमाळाच एवढा दाटून आलेला असतो,भावना एवढ्या गजबजलेल्या असतात, की तिला काय लिहू कसं लिहू किती लिहू या गोंधळात हे लांबलचक पत्र तयार झालं ! खरं म्हणजे, त्याच वेळेस ही अक्कल बजावीत होती, तिचा गहजब चालू होता- उगी काही बाही लिहू नकोस,थोडं आवर. काय वाटेल तिला,काय म्हणेल ती ? वेडा म्हणेल तुला…
पण भावनांचा तो भर-त्या भरात असलेल्या मनानं एकही मसूदा-मजकुर ना संक्षेप केला त्याचा, ना त्याची कपात केली,ना पत्र आवरलं.
आणि मग प्रेमाच्या त्या चार दिवसांतले ते अपरिहार्य क्षण येतातच आपल्या वाट्याला. चुटपुटीचे,अपराधी वाटण्याचे,निराशेचे. त्यावेळी या अकलेने दिलेल्या सुचनांची आठवण येत रहाते अन मन कसं मऊ मऊ होवून जातं. गरीब गरीब होवून जातं.
पण या अपराधी अवस्थेची-हतबलतेची पर्वा न करता, कसलीही सहानुभुती न ठेवता, ती अक्कल आपल्याला अधिक अधीक दोष लावीत रहाते-

अक्ल हर चीज को इक जुर्म बना देती है
बेसबब सोचना, बेसूद पशेमा होना…

अकलेचा हा स्वभावच. स्वभावातली खोडच म्हणा ना ! विनाकारणचे विचार,विनाकारणच्या भावना चुटपुट, हुरहुर, हे सगळं सगळं या मूर्ख अकलेच्या दृष्टीतून चक्क अपराध असतात-गुन्हे !

आकर्षणाचे प्रतिक

शमा परवाना यांच्या आकर्षणाच्या हकिकतींनी उर्दू शायरी उजळून गेलेली आहे. मैफिल मध्ये
शमा आहे, परिसरात अंधार आहे;त्यामुळे शमाचे भोवताल कसे उजळलेले आहे…आणि हा उजाळा परवान्यांना मोहक असं आकर्षण निर्माण करणारा आहे,आणि ते तिकडे झेप घेतातच.
तथापि उर्दू शायर लोकांनी या परवान्याला स्वत:चा नातेवाईक बनवून टाकलेले आहे. परवान्यामध्ये त्यांना आशिक-आशिकीचा खेळ दिसतो. सौंदर्याकडे झेप घ्यायची ती रोमॅंटिक वृत्ती वाटते.प्रेमाच्या व्यवहाराचे ते प्रतिक झालेले असते-परवान्याचे ते झेप घेणे. म्हणून तर एका शायरने परवान्याची पैरवी अशी केली आहे-

कुछ शमा की लौ ही में तासिरे-कशिश होगी
होता नही परवाना हर आग का शैदाई
( तासिरे-कशीश : ओढून घ्यायची शक्ती       शैदाई : वेडा )
शमाच्या त्या अंगठ्याभरच्या ज्योतीतच अशी काही ओढून घ्यायची शक्ती असेल,की ज्याच्या मुळे परवाना तिच्याकडेच आकृष्ट होतो-तो इतर आगीच्या आधीन होत नसतो. आकर्षीत करून घ्यायची ही जादू केवळ शमामध्येच असते, असं शायर म्हणतो.
शमा-परवाना यांच्या आकर्षणाच्या हजार गोष्टी प्रचलीत आहेत. तथापी हे आकर्षण केवळ त्यांच्याबाबतीतच नसून कला आणि कलेचे रसिक यांनाही तेवढेच लागू होते. इतकेच नाही, तर कलेचा केवळ एक रसिक नसतो,तर हजारो-लाखो रसिक कलेचे वेडे होवून गेलेले असतात. त्या कलाकृत्तीतच तशा प्रकारची ओढून घ्यायची शक्ती असते.
अर्थात चेहर्‍यावरचे सौंदर्य  हीसुध्दा एक और बाब असते. विशेषत: सौंदर्यपूर्ण चेहरा दिसला,की त्याबद्दलचं आकर्षण-त्या आकर्षणाने बध्द होतो माणूस. अशा आपल्या सौंदर्याचा अभिमान आणि आत्मविश्वास बाळगणारी एक सौंदर्यवती तर परवान्याला आवाहन करते:
रूखे-रोशन के आगे शमा रखकर ये कहते है
उधर जाता है देखें,या इधर आता है परवाना

आशिक या सिनेमात शमा-परवान्याचा कसा संवाद आहे पहा-

सत्त्याला सोसणं

जीएंच्या एका कथेत नायक गावाबाहेर असलेल्या जंगलात एका गोसाव्याला भेटतो. या गोसाव्याबद्दल त्याने ऎकलेलं असतं,की याला भविष्य स्पष्ट दिसत असतं. माणसाचं सगळं भविष्य तो स्पष्ट पाहू शकत होता. एका ठिकाणी बसलेला भल्या मोठ्य दाढी मिशा असलेला हा गोसावी; नायक त्याला विचारतो, तू भविष्य जर एवढे स्पष्ट सांगतोस तर गावातल्या लोकांनी तुला एवढ्या बाहेर का बरं आणून बसविलं…. गोसावी त्याला आपल्या छातीवरची दाढी बाजूला काढून दाखवितो-सगळ्या छातीवर डोळे असतात. गोसावी सांगतो, ‘माणसाला भविष्य हवं असतं, पण भविष्याकडे निर्देश करणारं फक्त. सरळ स्पष्ट भविष्य कुणालाच नको असतं.’ हे स्पष्ट भविष्य म्हणजे लखलखीत सत्य. कुणाला पाहिजे असतं… ते सोसणारं असतं का माणसाला… माणसाला सत्य पाहिजे असतं, ते गुळमट; विषेशत: त्याच्याबद्दल काही सकारात्मक असेल तरच. नसता सत्त्याचा गळा घोटायला तो मागे पुढे पहाणारा नसतो.
….एका उर्दू शायरने म्हटलं आहे-
मेरे हातों ही मेरा कत्ल होगा,
मेरी बातों में सच्चाई बहोत है

खरंच, आपल्याला सत्त्य-स्पष्ट असं पाहिजे असतं का बरं… आपण सत्त्याचा उदो उदो करतो, मी खरंच सांगतो, मी कधी खोटं बोलत नाही, असं आपण नेहमी म्हणतो, खरंच का बरं आपण सत्त्य तेच बोलत असतो..विशेष म्हणजे खरंच का आपल्याला निर्मळ सत्त्य असं हवं असतं… त्या सत्त्यात जर आपला अहंकार गोंजारणारं काही नसेल तर ते आपल्याला रूचेल का,पटेल का…
आणखी एका शायरने म्हटलं आहे-
मजा देखा मियां सच बोलने का
जिधर तूम हो उधर कोई नही है

थट्टेचं सोनेरी उन

माणसाला नेहमीच गंभीर-उदात्त अशा विचारात रहाता येत नसतं, असं मी वाटून घेतो याचं कारण मला तसं रहाता येत नाही. पुष्कळदा मनाची अशी हलकी फुलकी स्थिती तयार होते, त्यावेळी सोनेरी उन्हात खेळणार्‍या कुत्र्या-मांजरासारखी तबीयत होते. मग त्यावेळी ज्याची त्याची थट्टा करावी वाटते. हसावं वाटतं खुदुखुदु;कुणी सहभागी झालं तरी, नाही झालं तरी. ही सुचलेली थट्टा सहसा गंभीर-उदात्तपणाबद्दलची असते. मला जाणिव असते,पोराने बाबांच्या मिशा धरून ओढाव्यात, त्यांच्या नाकाचा शेंडा धरून ठेवावा-हसावं, तसं माझंही होत आहे- मोठ्यांच्या विचारांना आपण ओढत आहोत,तसं आपण करीत आहोत. पण नाईलाज असतो. मनात थट्टेचं सोनेरी उन पडलं असतं ना ! ज्या गोष्टींनी प्रभावीत झालो, हमखास त्याच गोष्टींकडे गमतीच्या नजरेने पाहताना मजाही येत असते आणि गांभीर्याचा अतिरीक्त असर हलका झालेला असतो,दडपन कमी झालेलं असतं.
डॉ.इक्बाल याचा एक शे’र आहे :
तू ने ये क्या सितम किया,मुझको भी फाश कर दिया
मैं ही तो एक राज था, सिना-ए-कायनात में.
आक्रोड फोडून गर खावा तसं हे अवघड उर्दू शोधून मी अर्थ समाऊन घेतला. कवी ईश्वराला उद्देशून म्हणतो, की तू मला प्रकट केलंस (जन्माला घातलंस ) हा केवढा अन्याय केलास; (कारण ) मी जगात आलो नसतो, तर या विश्वाच्या रहस्याचाच एक भाग बनून राहिलो नसतो का ! अशाच आशयाचा गालिबचाही एक शे’र आहे. तर हे शे’र अतिशय आवडलेले. त्यांचा प्रभाव मनात बाळगलेला.
एकदा मनात थट्टेचं ते सोनेरी उन पडलं होतं, त्या उन्हात मी खेळत असताना, या शे’रवर माझी नजर पडली. आणि या शे’रच्या अनुषंगाने मी चक्क एक व्यंगचित्रच काढलं की ! या व्यंगचित्रात काळा कुट्ट अंधारातला एक रस्ता दाखविला आहे. त्या रस्त्यावर लाईटचा खांब,तेवढ्या लाईटच्या प्रकाशात रस्त्याचा तेवढा भाग उजळलेला. या उजेडात एक पोलीस एका चोराला हाथकडी ठोकून घेऊन चाललेला. चोराचा टिपीकल पट्ट्या पट्ट्याचा टी शर्ट,टिपीकल गॉगल वगैरे… मागे अंधार गुडूप आणि हा चोर त्या पोलीसाकडे पाहून म्हणतो आहे-काय ? हाच शे’र; डॉ.इक्बालचा. खरंच की, पकडल्या जाईपर्य़ंत प्रत्येक चोर हा विश्वाच्या रहस्याचाच एक भाग बनलेला असतोच ना ! अशाच अर्थाचं एक कोटेशनसुध्दा वाचण्यात आहे- ए जंटलमन इज जंटलमन, अंटील ही मीट्स पोलीसमन !
माझी आणखी एक सवय: कोणतंही गाणं मनात म्हणताना, मी स्वत: रफी असतो,मुकेश असतो, धर्मेंद्र असतो, देव आनंदही.ते गाणं म्हणताना माझ्याच वतीने मी त्या हिरोईनला आवाहन करीत असतो. ईश्वराला उद्देशून केलेली कोणतीही रचना म्हणताना, माझा असा आव असतो, की मीच ईश्वराला खुलासा विचारीत आहे. …डॉ.इक्बाल यांच्या शे’रच्या थट्टेतून मी व्यंगचित्र तर काढलं; पण आता त्यानंतर मी जेव्हा जेव्हा हा शे’र उच्चारीत असतो, तेव्हा मला आतून कुठेतरी जाणवत असतं- मी डॉ.इक्बाल नाही, चित्रातला तो चोर आहे..लबाड.
डॉ.इक्बाल यांचाच आणखी एक शे’र आहे-
ढुंडने वाला सितारों की गुजरगाहोंका
अपनी अफकार की दुनिया में सफर कर ना सका.
…नक्षत्रांचे मार्ग शोधणारा माणूस स्वत:च्या मनात वावरू शकला नाही,आत्मपरीक्षण करू शकला नाही,असा या शे’रचा मतलब.थट्टेच्या उन्हात मी या शे’रच्या अनुषंगाने एक व्यंगचित्र काढलं : भली मोठी दुर्बीन घेवून तो शास्त्रद्न्य आकाशात नजर लावून बसला आहे आणि त्याच्या पाठीमागेच खुंटीला अडकविलेल्या त्याच्या पॅंटीतून त्याची बायको पैसे काढून घेते आहे-चोरते आहे; त्याला खबर नाही !
…अर्थात कोवळ्या उन्हात शिल्पकृती चमकून जावी तसं विसंगतीच्या नजरेतून इक्बाल यांच्या शे’रमधले आशय मनात भक्कम झालेले आहेत. त्या काव्याचं मोल ध्यानात आलं आहे.
******

सहमतीची विनंती

‘शगून’चित्रपटातलं जगजीत कौर हिने गायलेलं, ‘तूम अपना रंजो-गम ..’ हे गाणं ऎकताना काव्य-संगीत-आवाज यांची अनुभुती होत असतानाच मनात नकळत एक जादू होत जाते. ही जादू असते,एका अत्यंत खाजगी संवेदनांचे आपण साक्षीदार होत चालल्याची. ती आपल्या सहका-याला ( इथ पती म्हणण्यापेक्षा सहकारीच म्हणावे वाटते,एवढी उत्कटता,एवढी संवेदना त्या वातावरणात भरलेली आहे. ) त्याच्या दु:ख विवंचना आपल्याला सांगायला,त्यात सहभागी करून घ्यायला आर्जव करते आहे. तो बोलत नाही,सांगत नाही …आणि आपल्याला त्याचं तो गप्पपणा त्याचं स्वत:तच गुंतून बसलेपण जाणवत रहातं आणि आपण सुध्दा त्याच्या या सहचारीप्रमाणेच व्याकूळ होऊन जातो :

तूम अपना रंजो-गम,अपनी परेशानी मुझे दे दो
तुम्हे गम की कसम, इस दिल की विरानी मुझे दे दो

मुळात तिची अवस्था कशी आहे ? नाकारलेली,टाकून दिलेली.पण तरीही,आपल्या सोबत रहाणे त्याला स्विकारावे लागले,ही जाणिव मनात ती ठेवून आहे. असे असूनही अपमान विसरून त्याचं दु:ख कमी करायला ती तयार आहे-

ये माना मै किसी काबील नही हूं,इन निगाहों में
बुरा क्या है अगर, ये दुख ये हैरानी मुझे दे दो

..तुझ्या दृष्टीने माझ्यात एवढी पात्रता नसेलही…पण काय हरकत आहे,दु:खात सहभागी करून घ्यायला… कदाचीत समाजाच्या टीकेमुळे भीती,काळजीने त्याची कुचंबना झालेली असेल. अशावेळेस त्याला स्वत:बद्दल काळजी,दु:ख वाटत असते. आणि ती म्हणते-

मैं देखूं तो सही, दुनिया तुम्हे कैसे सताती है
कोई दिन के लिए,अपनी निगेबानी मुझे दे दो

या गीताचे गीतकार आहेत, साहिर लुधियानवी. साहिरच्या गाण्यात उर्दू शब्दांचा चपखल वापर असतो. या ओळीतसुध्दा ‘निगेबानी’शब्दामुळे अर्थाला आकार आला आहे. (निगाह-बान : संरक्षक,काळजी घेणारा)पुष्कळ वेळा असंही असतं,की बाहेरचे विश्व, स्पर्धा,चिंता हे घरात रहाणार्‍या सहचरीला माहीत नसतं. तिला एवढंच कळालेलं असतं,की याला काही दु:ख आहे, चिंता आहे. मग लहान मुलाला समजवावं तसं ती म्हणते-मी आहे नं इथं.तुमची काळजी माझ्यावर सोपवा.( कधी गमतीने वाटून जातं, लहानपणात मित्रांशी भांडल्यावर आई तावातावाने बोलायची, किंवा शाळेतल्या प्रश्नांची सोडवणूक मी करते, असं काही बोलायची,ते मला फार गैर वाटायचं,गैरजरूरी वाटायचं…आणि आईची तळमळही जाणवायची. खरंच अशा वेळी तळमळीच्या माणसाला सोबत घेता न येणं…किती कुचंबना म्हणावी ही…)

गाण्याच्या शेवटच्या ओळीत नायिकेच्या स्वत:च्या दु:खाची जाणीव आपल्याला होते. हे अपमानाचं दु:ख ती केव्हाच विसरलेली आहे. उलट, तुम्हाला वाटणारा अपमान, अपराधीपणा (पशेमानी)मला द्या,असे ती म्हणते-

वो दिल जो मैने मांगा था मगर, गैरो ने पाया था                                               
बडी शै है अगर, उसकी पशेमानी मुझे दे दो

सगळ्या गाण्यात ह्रदयाला थेट भिडणारा असा एक समजूतीचा सूर आहे. जणू दु:खाची जाणीव झाल्यानंतरचे सांत्वन आहे.गाणं ऎकलं,की असं वाटतं,आता त्याने तिच्या कुशीत आपला चेहरा लपविला असावा… सिनेमाच्या कथेनुसार गाण्याची रचना असते, अर्थाचा संदर्भ असतो हे खरे; पण इथे उत्कटताच एवढी आभळासारखी दाटून आलेली आहे, की आपण तिच्या त्या सुचीत केलेल्या दु:खाच्या वैशम्याच्या अनुषंगाने चार पावलं पुढे टाकीत जातो. सिनेमाच्या कथेची तशी गरज रहात नाही….

पियानोच्या स्वरांच्या माळेत खय्यामने हे गाणं गुंफलं आहे. पियानोचा असाच वापर, सी.अर्जूनने ‘सुशीला’ या चित्रपटात केला आहे .( बे मुरव्वत बे वफा…)

जगजीत कौरचं हे गाणं असं आहे…प्रसिध्दीच्या गजबजाटापासून दूर असणारं,आपलं,खाजगी…

( माझ्या ‘गीतमुद्रा’ या शब्दालय प्रकाशनाच्या वतीने प्रसिध्द झालेल्या संग्रहातल्या एका लेखावरून. )

मुल्लांची थट्टा !

कोणत्याही धर्मातले धर्मगुरू खरं म्हणजे, चांगले असतात. त्यांचा आपल्याला त्रास नसतो. ते काही घरी येवून आपला कान धरून तिकडे घेवून जात नसतात प्रवचनाला. किंवा प्रवचनादरम्यान प्रश्न विचारून उत्तर नाही आलं, तर ना आपल्याला छड्या मारतात ना रागावतात ना अपमानित करतात. शिवाय ते बिचारे काही गृहपाठही देत नाहीत,आभ्यास करून येण्याबद्दल दटावतही नाहीत. ते आपापलं सांगत राहतात बिचारे- दु:ख विवंचनांना टाळण्यासाठी तो आध्यात्माचा-देवाचा रस्ता.
मग असं असताना, आपण का बरं नावं ठेवावीत ? का बरं त्यांची टिंगल करावी ? का बरं ? याचं खरं कारण म्हणजे, हा जो धर्मगुरू-ज्याला आपण हौसेने आणलेलं असतं आपणच आपल्या मनात. त्याची त्याची प्रतिष्ठापना केलेली असते उत्साहाने,उतावीळपणाने; आणि मग गणेश चतूर्थीचा उत्साह दुस-या.-तिस-या दिवशी ओसरावा अन मग दररोजच्या आरतीचे टेंशन यावे असे होवून जावे. गणपती तर निघून जातो बिचारा आठ दहा दिवसात; पण मनात बसलेला हा धर्मागुरू- धार्मिक,आध्यात्मिक भावनांची समज- ती कुठे निघून जाते ? त्याच्यासोबत रहाणं शक्य नसतं आणि मग त्याच्याबद्दलच्या तक्रारी सुरू होतात. त्याला नावं ठेवणं सुरू होतं. पहाता पहाता त्या तशा थट्टेत माणूस रमून जातो. ती थट्टा रुचकर वाटायला लागते. विशेषत: ‘संध्याकाळ’ च्या सवयीचा माणूस तर या थट्टेत अधिक आक्रमक होत असतो. कुणी तर ईश्वराचीही थट्टा करायला मागे पुढे पहात नाही. एक विनोद आहे :
एक फकीर भीक (खैरात ) मागण्यासाठी मशिदीसमोर कटोरा घेऊन उभा रहातो. सगळे नमाजी निघून जातात त्याला कुणी काही टाकत नाही. मग तो फकीर मंदिरासमोर येऊन उभा रहातो. तिथेही कुणी त्याला भीक घालीत नाही. मग तो चर्चसमोर उभा रहातो. तिथेही तसाच अनुभव. मग तो शराबखान्यासमोर येऊन उभा रहातो; तर तिथून जे जे शराबी बाहेर पडतात ते त्याला काही ना काही देवून जातात. त्याचा कटोरा भरतो. फकीर मग आभाळाकडे पाहून म्हणतो- “वाह मेरे मौला ! रहते कहा हो, और पता कहा का देते हो !”
मिर्जा गालिब म्हणतो,
कहां मैखाने का दरवाजा गालिब और कहां वाईज
पर इतना जानते थे कल वो जाता था के हम निकले

‘अकबर’इलाहाबादी तर या शैखची गंभीरपणे थट्टा करतात
शैख जी रात को मस्जिद में नही जाते है
यानी डरते है के बैठा कही अल्लाह न हो
म्हणजे, माणूस आणि ( धर्मगुरू ?) भुताला अन ईश्वराला रात्री भीतो की काय ?
बिघडलेला माणूस अधिकाधिक बिघडत जातो, पिन्याच्या सवयीचा होत जातो, तसतसं त्याला आतून त्याची सदसद्विवेक बुध्दी सतावीत रहाते. मग तो आपला राग या धर्मगुरूवर काढतो. त्याला शिकवायलाही कमी करीत नाही-
जाहिद शराब पीने दे मस्जिद में बैठकर
या वो जगह बता दे, जहां पर खुदा न हो
अशा पिण्यामुळे वाईट कृत्यांमुळे माणसाला स्वर्ग लाभत नाही, तो नरकात जातो असं तो शैख वारंवार बजावत असतो. पण शराबखान्यात बसलेला शायर काय म्हणतो

खैर दोजख में शराब मिले ना मिले
शैख साहब से तो जां छूट जाएगी

शाळकरी वयात जेव्हा गाणी ऎकायचो, त्यावेळी ती काय सगळी बालगीतं थोडीच असायची ? छे ! उलट ती तशी गीतं आवडायची नाहीत. भक्ती गीतं,भावगीतं,चित्रपटातली गीत्ं ऎकल्या जायची. मोठ्या चवीनं ऎकल्या जायची. अर्थात त्या गाण्यांचा अर्थ समजण्याचं ते कुठं वय होतं म्हणा; पण गाणी मात्र मुखपाठ असायची.प्रश्नच नाही. मग शाळा ओलांडून जसजसं मोठं होत गेलो, तसतसं गाण्यांतल्या शब्दांचे अर्थ उजळू लागले, गाण्याचा अर्थ समजू लागला, गाणं कळू लागलं. अशी कितीतरी गाणी आहेत, जी शाळेत असताना वेगळ्या अर्थाची वाटली, त्याचा खरा अर्थ नंतर जाणवला. हिंदी गाण्यांच्या बाबतीत तर नेहमीच तारंबळ उडायची, ती शब्दांची. रेडिओवर ऎकलेलं ते गाणं- एक तर शब्द नीट ऎकायला यायचे नाहीत. नीट ऎकायला आले, तर त्याचा नेमका अर्थ समजायचा नाही.
मराठी गाण्यांच्या बाबतीत शब्दांचं तेवढं कोडं पडायचं नाही. ‘नववधू प्रिया मी बावरते..’ ( कवी : भा.रा.तांबे.)या गाण्यानं मात्र गंमत केली. शाळेत असताना हे गाणं आवडलं होतं, ते त्याच्या चालीमुळे. शिवाय आईला, मावशीला हे गाणं आवडायचं म्हणून मलाही आवडायचं. अर्थात त्या दिवसांतल्या सवयीमुळे ते गाणं मुखपाठ करून टाकलं होतंच. नव्या नवरीचं ते बावरणं, अडखळणं,लाजणं वगैरे सगळं सगळं त्यात आहे, हे शाळा ओलांडताना समजलं होतं फक्त. माहित असायचा प्रशनच नव्हता की. हे सगळं नवर्‍याला उद्देशून म्हटलेलं गाणं असून त्याच्यापुढे व्यक्त केलेल्या त्या भावना, आधारासाठी त्याने हात पुढे करावा हे आवाहन असलेलं ते गाणं जपून राहिलेलं होतं मनात. मग –
आता तूच भय लाज हरी रे
धीर देवूनी मी नवरी रे
भरोत भरतील नेत्र जरी रे
कळ पळभर मात्र खरे घर ते
हे कडवं ऎकलं की मनात चलबिचल व्हायची. काहीतरी वेगळं- उदासी ओलांडलेली हुरहुर,त्या प्रकारची अधीरता या गाण्यात आहे, हे तरूणपणात समजू लागलं. तथापि, हे कडवं तेवढं गांभीर्याने घेतलं नाही. का- कारण माझं तरूण वय आणि ती नववधू आहे, ही भावनाच एवढी तल्लख होती,की… अशावेळेस शरीरात गुंतलेल्या मनाला डोळ्यातला ओलावा जाणवत नसतो. तो कुणाचा दोष नसतो, बस- वय असतं ते.
…आजही त्या गाण्याची संगत सुटली नाही. आजही ते गाणं तितकंच आवडत आहे. मात्र त्या गाण्याच्या आवडीला आता कारण आहे माझ्या पन्नाशी ओलांडलेल्या वयाचं. ते शेवटचे कडवे जे मला फक्त समजले होते, ते आता अधिक अधिक जाणवत आहे. वय वाढू लागलं,व्याप-ताप वाढू लागले,मुलं मोठी झाली आणि कुणाच्याही लग्न समारंभाला गेलं, की आता मुलीचं ते निघणं मनात घर करू लागलं. लग्नाच्या घाईगर्दीचे साताठ दिवसांचे ते ताण तणाव, जाग्रणं, धावपळ,उत्साह, कष्ट सगळं सगळं गोळा होवून त्या निघण्याच्या वेळेला जणू पूर येवून जातो. अधीर झालेलं मन बावरून जातं….कुणाचंही लग्न असो, लग्नाच्या या शेवटच्या प्रसंगाने मनात चलबिचल होवू लागली.
दरम्यान केव्हातरी पूर्वीच या कडव्याचा अर्थ लागलेला होता.मागेच लक्षात आलं होतं,की हे गाणं ईश्वराला उद्देशून आहे. प्रियकराच्या रूपातला तो ईश्वर-तिकडेच जायचे आहे…खरं घर तेच आहे. आणि जाण्याची ओढही आहे- नदीच्या नैसर्गिक प्रवाहासारखी. आणि जाताना-निघताना होणारी थरथरही आहे. आता हे गाणं अधिक जिव्हाळ्याचं वाटू लागलं, अधिक जवळचं वाटू लागलं.
‘दिल ही तो है’ या चित्रपटातलं मन्नाडेचं गाणं अशाच नवथर तरूणीच्या अविचारी कृतीला पडलेला प्रश्न नमूद करणारं आहे-
लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे
चुनरी में दाग छुपाऊं कैसे घर जाऊ कैसे
या गाण्याचंही असंच झालं. शास्त्रोक्त संगीताचा साज-शृंगार असलेलं, लयदार,ढंगदार असं हे गाणं; या गाण्यातली पहिली ओळच तेवढी त्या वयात जाणवायची, आवडायची.चुनरीला लागलेला-बदनामीचा,लोकांच्या बोलाचा हा रंग आता कसा लपवायचा,कसा पुसयचा…
पण त्यातही गंमत अशी व्हायची,की मन्नाडेची ती ओळ ज्या तर्‍हेने म्हटल्या गेली-
वो दुनिया मेरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल
जा के बाबुल से नजरे मिलाऊं कैसे,घर जाऊं कैसे
त्याच तर्‍हेने मनात वैताग उमटून जायचा- ही कसली ओळ ? या ससुराल-बाबुलचा कुठे संबंध आला या झोकदार,रोमॅंटिक गाण्यात ? आं !
पण गाण्यातले पडलेले-पडणारे हे प्रश्न आभ्यासातल्या प्रश्नांसारखे नसतात : उत्तर दिलंस तर पास नाहीतर नापास, असे दटावणारे हे प्रश्न नसतात. आवडीच्या प्रांतात न समजणार्‍या गोष्टी,न सुटणारे प्रश्न हे सुध्दा आपलेच असतात; आपुलकीचे असतात,ते सुटले नसले तरी त्या प्रश्नांची संगत छानच वाटत असते. हिंदी गाण्यातल्या अशा कितीतरी कितीतरी अपरिचीत- न समज़लेल्या प्रश्नांच्या गाठी सोबत राहिल्या आणि पुढे आपोआप सुटून गेल्या.
साहिरची ही रचना मनात अशीच घर करून राहिली होती; त्या ससुराल-बाबुलच्या संबंधाची गाठ घेवून. पुढे वयाच्या पुढच्या टप्प्यात लक्षात आलं, हे गाणं रोमांचीत करणार्‍या भावनांचं जसं आहे, तस6 त्यात वेगळ्या जाणिवांचा वावरही आहे. आपलं आयुष्य, आपला या जगातला वावर,आपल्या आयुमर्यादेची जाणिव,आपल्यावरची जबाबदारी, आपल्याकडून अनाहूतपणे झालेल्या चुकांमुळे आता ईश्वराला- तिकडे गेल्यावर, काय सांगावे- त्याला कसं तोंड दाखवावं, या अशा भावना असलेलं हे गाणं आहे-जोरदार वाद्यवृंद आणि लयीत असलेलं.
पण गंमत आहे या दोनही गाण्यांत. लता मंगेशकरच्या त्या गाण्यात ईश्वराला नाथ म्हटलेलं आहे. तिकडेच आपल्याला नांदायचं आहे,ही जाणिव आहे. आणि मन्नाडेच्या या गाण्यात ईश्वराचं घर हे बाबूल आहे-माहेर. दोनही गाण्यत रोमांचीत करणार्‍या शारीर भावनांतून शरीरापलीकडचे जे अस्तित्त्व आहे, त्या अस्तित्त्वाची ओढ आहे.-तिकडली जाणिव आहे.
गाण्यातले-काव्यातले अर्थ आपल्याला समजतात; पण खरेदीला आलेला ग्राहक जसा आपापल्या रुचीनुसार त्यात्या दुकानांत रेंगाळतो, तसं आपल्या वयानुसार- आवडीच्या अनुरूप आपण त्यात्या शब्दांपाशी गुंतून रहातो. …पुढे दिवस बदलतात आणि तेच गाणं आपल्याला वेगळ्या स्वरूपात जाणवत रहातं. ‘फिराक’ गोरखपुरींचा एक शे’र कॉलेजला असताना वाचण्यात आला होता-
हजारबार जमाना इधर से गुजरा है
नईनई सी है कुछ तेरी राहगुजर फिर भी
अर्थ सरळच होता.प्रेमाच्या ऑळखीच्या वातावरणाचा. प्रेयसीच्या घराकडचा हा रस्ता वर्दळीचा असा. जाणारे येणारे लोक नेहमीच येत जात असतात. मीसुध्दा या रस्त्यावरून आलो-गेलेलो आहे. पण जेव्हापासून तुझी ओळख झाली आहे, तू मला आवडायला लागली आहेस, तेव्हापासून हाच रस्ता कसा नवीन वाटतो आहे….
या शे’रचा अर्थ सरळ असूनही मला तो एकदम वेगळ्या तर्‍हेने जाणवला एकदा. दवाखान्यात चार दिवसांकरीता ऍड्मिट होतो. ते सगळं तिथलं वातावरण ती औषधं, आजारपणाचे ते वातावरण आणि ती काळजी हे सगळं सगळं मी अनेक वेळा पाहिलेलं होतं. मित्रांच्या,नातेवाईकांच्या उपचारांच्या निमित्ताने. दवाखान्यात आलो होतो,मुक्कामही केला होता, काळजीही… नवीन नव्हतंच तसं काही. पण जेव्हा माझ्यावरच ही वेळ आली, जेव्हा मीच रूग्ण झालो, तेव्हा मला हाच दवखाना, हेच वातावरण, हाच परिसर कसा नवा नवा वाटू लागला.
वयाचा हा अनुभव ही अनुभुती…

मुजरा…

संवेदना जास्त उत्तेजीत झाल्या, की त्या संवेदनांची अभिव्यक्ती ठळकपणे होणं स्वाभावीक असतं. सुख दु:खाच्या भावना तीव्रतर झाल्यावर हळूवार तर्‍हेने,सूचक तर्‍हेने ते सुख दु;ख व्यक्त होणं कठीण होतं. अवख़ळपणाने त्या भावना व्यक्त होतात आणि असं व्यक्त होताना सरळ सरळ सांगितलं जातं किंवा जीवन व्यवहाराचे नियम भक्क शब्दांत आकाराला येतात. नशेचा अंमल वाढला की, असं हमखास होतं.

या भावना गडद तर्‍हेने व्यक्त होणार्‍या. कोल्हापूरी मटनाचा तांबडा-पांढरा रस्सा मनसोक्त ‘ओढताना’ डोळ्यात पाणी यावं अन मजाही यावी, तसं उत्तेजनेच्या मन:स्थितीत जीवन व्यवहाराबद्दल विचार-भावना-तत्त्वद्न्यान कसं तिखट आग असलं की पोट भरतं.

हिंदी गाण्यात मुजरा ही अशी भूक क्षमविण्यासाठी योग्य प्रकार. मुज्रा म्हणजे,  कलावंतिणीने बसून म्हटलेले गाणे असा त्याचा अर्थ आणि आणखी एक अर्थ म्हणजे, कमी केलेला-वजा केलेला. दोनही अर्थ सिनेमातल्या मुजर्‍याला लागू होतात. ‘ठुकरा रहा था मुझको कई दिन से ये जहां,आज मैं इस जहां को ठुकरा के पी गया’ असा साहिरचा नायक ( प्यासा ) म्हणतो,ते कलावंतिणीच्या बैठकीत येवूनच.मुजर्‍यातसुध्दा अशा भावना कशा रस्सेदार तर्‍हेने व्यक्त होतात पाहा –

जो लुटते मौत के हाथों,तो कोई गम नही होता 
सितम इस बात का है जिंदगी ने हमको लूटा है  

आणि गंमत म्हणजे याची अनुभुती येते ते तिथेच- तिच्या कोठ्यावर !अर्थात आपली कोठी म्हणजे थिएटर !

या मुजर्‍याची शब्द रचना अगदी त्या मन:स्थितीला योग्य अशी. साजेशी अशी. भडक शब्दांत सुख दु:ख-विशेषत: स्वत:च्या दु:खाचं उदात्तीकरण हे या मुजर्‍याचं वैशिष्ट्य.  ‘भरोसा कर लिया जिस पर उसी ने हमको लूटा है,’  किंवा  ‘सनम तू बेवफा के नाम पर ‘  ही अशी काही उदारहरणं..

कालच्या ब्लॉगवर श्री रणजित यांनी प्रतिक्रिया देताना, त्यांना ‘दो बूंदे सावन की’  या गाण्याची आठवण झाली. श्रावणात बरसलेली पावसाची दोन थेंबं… त्यांचं नशिब किती वेगळं असतं, एकाच झाडावरची दोन फुलं, आणि दोन लहानपणच्या मैत्रिणी…. दोघांना सोसावं लागलेलं वेगवेगळं आयुष्य… साहिर लुधियानवींची ही रचना असून संगितकार आहेत खय्याम.या गाण्यात आशा भोसलेंची संगत केली आहे ती बासरीने. त्या बासरीचे स्वर आणि आशाबाईंचा आवाज… दोन मैत्रिणीच या…

जाणिवेचे स्वरूप

लहानपणात कुणी घसरून पडलेलं पाहिलं की अगदी खळखळून हसू यायचं. माणसाची फजिती आणि त्याचं खजील होणं याच्या एवढं करमणूकीचं प्रकरण दुसरं काही नसायचं. पुढे जसजसं मोठं होत गेलो, तसतसं त्यातली करमणूक कमी कमी होत गेली-म्हणजेच हसू कमी कमी होत गेलं. आता जेव्हा असं वय आलेलं आहे-ज्या वयात हात पायाला फ्रॅक्चर झालं तर किमान दोन महिने ते जुळणार नाही, याची जाणिव झाली आणि कुणी समोर घसरून पडलं तर चटकन त्याच्या मदतीला धावावं वाटतं;त्याला काही जास्त तर लागलं नाही ना या विचाराने अस्वस्थ होत रहातो.
जीवनव्यवहारातले टक्के टोणपे खाल्ल्यावर आता हसण्याचे विषय बदलले आहेत;किंबहूना आता हसण्यासारखं काही आहे का राहिलं,याचा विचार येतो आहे. पक्ष्याला पिंजर्‍यात द्डपून ठेवणं,पिलाला बांधून ठेवणं हे सगळं आता अघोरी वाटत आहे. जाणिवांचं स्वरूप बदललं की कसा अनुभव येतो पहा : अंत्यविधीच्या वेळेस मुतदेहावर उदबत्ती लावलेली, साबणाने त्याला स्नान घालून अत्तर लावलेलं एकदा जवळून पाहिलं-ते अनुभवलं, त्या सगळ्यांचे वास मनात असे भरून राहिले होते, की पुढे किती तरी दिवस या वासांना संदर्भ लागायचा तो संपून जायचा. वस्तू त्याच, ज्यांचा नेहमी वापर होतो, मनाच्या उल्हासासाठी,भक्तीच्या-मंगल वातावरणासाठी; पण कधी संदर्भ बदलले की विपरीत होवून जातं. एक शायर सांगतो-
एहसास के अंदाज बदल जाते हैं वर्ना
दामन भी उसी तार से बनता है कफन भी

…एकाच सूताने-एकाच धाग्याने दोनही वस्त्रं विणली असतात; पदराचे ते वस्त्रच आणि मृतदेहावर पांघरायचं कापड;ते पण त्याच धाग्याने बनलेलं की ! पण जाणिवेचे पदर वेगळॆ झाले की भावना बदलून जाणार…
एकाच धाग्याने बणलेली वस्त्रं जशी वेगळी वेगळी असतात तसंच माणसांचं ही असतं. अगदी ‘फिल्मी’ भाषेत सांगायचं झाल्यास एकाच आईचं एक पोरगं चोर तर एक पोरगं पोलीस असतं. एक सभ्य तर एक वाईट मार्गाचा. एकाचा वावर अंधारात तर एक प्रकाशाकडे जाणारा…
डॉ. इक्बाल यांनी अशीच एक तफावत सांगितली आहे-
परवाज है दोनों की इसी एक फिजां में
करगस का जहां और है,शाहीं का जहां और
एकाच वातावरणात दोनही पक्षी वावरतात, एकाच आभाळाखाली झेप घेतात- ससाणा आणि कावळा;
पण दोनही पक्ष्यांची प्रकृती वेगळी, दोघांचं विश्व वेगळं…

कुणाची प्रतीक्षा करणं म्हणजे वाढत जाणारा ज्वर सोसणं. प्रतीक्षा सुरू केव्हा होते-जेव्हा नियत वेळ ओलांडली जाते. कधी कधी ही नियत वेळ जेव्हा आपण स्वत:होवूनच अलिकडे-अगदी अलिकडे आणतो अन वाट पहायला सुरूवात करतो,तेव्हा खरं म्हणजे त्यावेळी ती प्रतीक्षा नसते बरं, ती असते अभिलाषा. उतावीळपणा,उत्सुकता. प्रतीक्षा करणार्याीची नजर वाटेकडे केंदित होवून बसलेली असते आणि त्या नजरेसोबत सगळं शरीर,सगळ्या हालचाली इतकंच काय श्वाससुध्दा तिकडे-त्या तिकडे लागून राहिलेले असतात.
आ,के मुंतजिर है बज्मे-गुलिस्तां तेरे लिए
महकी हुई है देर से सांसे गुलाब की
( मुंतजिर : प्रतीक्षा करणारा. बज्मे-गुलिस्तां : बागेची मैफल )
…बागेची ही मैफल सजलेली आहे,प्रतीक्षा करीत आहे.कुणाची प्रतीक्षा आहे बरं या उपवनाला..उपवनातले गुलाबसुध्दा अगदी उत्सुक होवून वाट पहात आहेत,त्यांचे श्वास त्या आगमनाच्या प्रतीक्षेत घमघमू लागले आहेत. कुणाची बरं असावी ही प्रतीक्षा…उपवनाला प्रतीक्षा कुणाची असणार- वसंताची;नाही का! बाग आणि बहार हे नातंच असं आहे. त्यांना एकमेकांची ओढ असणारच.
पण हा प्रतीक्षेचा ज्वर जसजसा वाढत जातो, तसतसं अस्वस्थ वाटत जातं. चुळबुळ होत रहाते. आठवणी,विचार आणि कल्पना यांची मनात जणू दंगल सुरू होते. येण्याची खात्री असल्यावर तर मग काय- तो साक्षात झाला आहे याचेच भास होत रहातात. ‘जिगर’मुरादाबादी तर गाण्यासाठी,संगीतासाठी एकदा एवढा उत्सुक झाला होता,की त्याला त्या वाद्यातून गाणं चक्क ऎकायला येवू लागलं होतं की !
गोशे-मुश्ताक की क्या बात कहूं अल्लाह अल्लाह !
सुन रहा हूं मैं वो नग्मा,जो अभी साज में है
( गोश : कान, गोशे-मुश्ताक : उत्सुक,आतूरलेले कान)
आणि माणसाची ही अशी उत्सुकता जर त्याच्या प्रिय व्यक्तीशी निगडीत असेल तर मग काय विचारता! हा जो संघर्ष आहे-प्रियतमेसोबतच्या जवळीकतेचा,दुराव्याचा; त्यात ह्रदयाचं स्पंदन हे शारिरीक चलनवलनाची कृती न रहाता भेटीच्या धडपडींची हालचाल होवून जातं-जणू आजाराची बाधा होवून जाते.मिर्जा गालिब आपल्या या ह्रदयाचा (मनाचा) समाचार घेताना ( दिले-नादां तुझे हुवा क्या है,,,) विचारतो-
हम है मुश्ताक और वो बेजार
या इलाही! ये माजरा क्या है
(बेजार: उदास,नाखुश या इलाही : हे माझ्या परमेश्वरा! माजरा: मामला,भानगड )
आम्ही एवढे उत्सुक आहोत अन ती चक्क उदासीन-आं! देवा, हा मामला काय आहे ? काय झालं?
‘मिर्जा गालिब’सिनेमात या ओळी सुरैय्याच्या तोंडी असल्याने आपली ( हो, आपलीच, गालिबची नाही ) ‘मुश्ताकी’ अधिक होवून जाते !

तस्बीह

तस्बीह म्हणजे जपमाळ. ईश्वराचे स्मरण करण्यासाठी हाताशी असणारी मण्यांची माळ. अंगठा आणि तर्जनी यात धरून असलेली ती माळ- कधी डॉळे बंद असतात कधी अर्धवट उघडे असतात आणि मुंगी धावते तसा तो अंगठा मण्यांवरून सरकत रहातो. एकेक मणी तर्जनीवरून उतरत जातो,जपाचा संकल्प पुरा होत रहातो. ईश्वरनामाच्या आवर्तनाची संख्या जसजशी वाढत जाते-भक्तीभावाने मन ओथंबून जातं..एकेका मण्याच्या-क्षणाच्या मापाने ईश्वराच्या जवळीकीची भावना दाटत जाते.
पण माळ घेवून नाम जपताना मन तल्लीन असतंच असं नाही. मनातल्या त्या उच्चारांना कधी यांत्रिक स्वरूप येतं. आरती म्हणताना अन टाळ्या वाजवीत असताना नजर फिरत रहाते तसं आपलं मन त्या मण्यांवरून घरंगळून विचारांत-इतर विचारांत केव्हा नादाला लागतं पत्ता लागत नाही.
‘कामील’शुत्तारीचं मन असंच. माला जपताना त्याच्या मनात विचार येतो. पण हा विचार भलताच नसतो. अंगठ्याने मणी मागे मागे सारताना त्याच मार्गाने त्याचं मन पुढे धावतं आणि त्याला आचंबा वाटतो. स्वत:वर तो रागावतो अन् हे काय- हातातली माळ चक्क तोडून टाकतो !
कामील’ने इस खयाल से तस्बीह तोड दी
क्यूं गिन के उसका नाम ले, जो बेहिसाब दे

ईश्वर,जो आपल्याला भरभरून देतो-देताना कसला संकोच करीत नाही,काय दिलं,किती दिलं याचा हिशोब करीत नाही त्या ईश्वराचं आपण नाम घेतो, ते मात्र एकशे आठ, हजार आणि अशाच आकडेवारीच्या सहाय्याने ! तो देणारा दोन्ही हातांनी देतो अन् आपण त्याच्या नामाची मोजदाद करून हिशोबाने रहातो-केवढी विसंगती ही !
ईश्वर भक्तीमध्ये लबाडीची सरमिसळ फार बेमालूमपणाने कधी होत असते.लबाडी-चावटपणाला भक्तीच्या बेगडाचे वेष्टण लावून बसणारा एखादा बुवा ईश्वराला पुढे करून ‘मतलब’साधणारा असतो. भक्तीमार्गात स्त्रियांची दाटी असते आणि सुरेख चेहरे समोरून एकेकाने सरकत जाताना एकेकाने सरकत जाणार्‍या बोटांतल्या मण्यांवरून ईश्वर स्मरण आपोआप निसटून जातं…चेहर्‍यावर मन स्थीर झालेलं असतं आणि देवाच्या नावाच्या उच्चारांत लाडीगोडी आलेली असते-
तस्बीह की मूंगे होती है ये हसीन सूरत वाले
नजर से गुजरते जातें हैं,इबादत होती जाती है
( तस्बीह की मूंगे : माळेचे मणी इबादत : उपासना,आराधना )

 अशीच एक घटना आहे सिनेमतली :…तिच्या पायातलं घुंगरू वाजावं आणि माळेतल्या मण्यात गडबड होऊन जावी अशी घटना चित्रलेखा या चित्रपटात घडलेली आहे-ब्रह्मचारी असलेल्या महेमूदच्या बाबतीत.

बेखयाली

अत्यंतिक संवेदनशील मन:स्थिती ही अत्यंतिक ज्वालाग्राही पदार्थासारखी होवून बसलेली असते. निमित्ताची ठिणगी उद्भवली,की क्षणार्धात संवेदनांच्या ज्वाळा पेटतात. फरक एवढाच, की ज्वालाग्राही पदार्थाने पेट घेतला,तर परिणाम खाक होण्य़ात; तर पेटलेल्या संवेदनांमुळे- मन उजळून निघतं.
अर्थात ही अत्यंतिक संवेदना असते प्रेमाची-रोमांचीत करणार्‍या भावनांची संवेदना. ( द्वेषाची संवेदना,ज्वालाग्राही पदार्थापेक्षा बेकार) या संवेदनेनं तरूण मन जेव्हा भारावलेलं असतं, तेव्हा तिच्या हालचाली- तिचा कटाक्ष चक्क प्रतिसाद वाटून जातो. सहसा तिच्या त्या वागण्याबोलण्यात हालचालीत कसलंही आवाहन नसतं,ना सुचविणं- ती असते स्वाभावीक चलनवलनाची हालचाल. मात्र संवेदनांच्या धुक्यातून पहाताना,त्याच तिच्या हालचाली स्वर्गिय होवून बसतात. वेड लावतात. त्याला तो चक्क प्रतिसाद वाटत असतो-आपल्या संवेदनांसाठी दिलेला.
हिंदी सिनेमातल्या प्रेमव्यवहारात एवढ्या तरल संवेदना क्वचीत पहायला मिळतात. ‘मजरूह’सारखा निष्णात शायर सिनेमाचं गाणं लिहिताना कधी ही रेशमी-मुलायम भावना अलगद शब्दांत उतरवितो आणि मग आपण नकळत त्या संवेदनांच्या हवाली होतो.
‘तीन देवियां’ (1965) या चित्रपटात देव आनंदला एका पार्टीत फर्माईश केली जाते. सिनेमातला नेहमीचा -टिपीकल असा प्रसंग. आता भळभळ भरघोस प्रेम वहाणारं गाणं ऎकायला मिळणार अशा तयारीत आपण असतो आणि रफीच्या स्वरातून-शब्दांतून अलगद प्रकट होते, ती अत्यंतिक संवेदनशील मन:स्थिती…
कहीं बे-खयाल हो कर, यूंही छू लिया किसी ने
कई ख्वाब देख डाले,यहां मेरी बेखुदी ने

समारंभात भेटीगाठी होतात.हसणं-बोलणं होतं.कधी उपचार म्हणून, कधी ओळख म्हणून ,कधी नाईलाज म्हणूनसुध्दा. अशाच वेळी झालेला तो स्पर्श असतो. अगदी अनाहूत म्हणावा असा; पण त्या स्पर्शाच्या सुताने हा संवेदनेनं भरलेला माणूस चक्क स्वर्ग गाठतो की ! (बेखुदी : धुंदी,नशा ) तेवढ्याशा स्पर्शाने स्वप्नांची गर्दी होवून जाणं-दाटी होवून जाणं…केवढ्या तीव्र संवेदना म्हणाव्या त्या !
याच सिनेमात आणखी एक एका गाण्यात अगदी अशाच तर्‍हेने संवेदना कशा ‘ज्वालाग्राही’ बनलेल्या आहेत पहा-( गाणं आहे- ख्वाब हो तुम या कोई हकिकत…)
धडकनों ने सुनी इक सदा पांव की
और दिल पे लहराई आंचल की छांव सी

तीव्रता

‘अकबर’इलाहाबादी यांच्या शायरीत व्यंग असतं,विनोद असतो आणि व्रात्यपणाच्या जवळ जाणारा असा अवखळपणा असतो. शायर; अन तो सुध्दा शराबने किंवा आशिकीने एकदा का बेभान झाला की त्याच्या त्या बेभानवृत्तीला, ‘पिसाळला’ की काय ! असंही म्हणावं वाटतं. तशा कल्पना ‘अकबर’ यांच्या शायरीत उसळलेल्या असतात. आता याच शे’रचं उदाहरण पहा –
किस नाज से कहते हैं वो झुंझला के शबे-वस्ल
तुम तो हमें करवट भी बदलने नही देते

( नाज: हावभाव, नखरा    झुंझला के :वैतागून ) मिलनाच्या रात्री त्याच्य अवखळ उत्साहाची तीव्रता एवढी वाढलेली असते, की त्याच्या तशा वागण्याने वैतागून ती म्हणते,- अरे ! तू तर मला कूसही बदलू देत नाहीस !

….आणि जेव्हा नाराजी होते,माणूस मनात राग धरून असतं,तेव्हा हीच वागण्यातली तीव्रता टोकाला जाते. एवढी की त्याचा संपर्क तर दूरच राहिला,त्याच्या गल्लीतून जातानासुध्दा क्षणभर थांबायची तयारी नसते. ‘गालिब’ला अशा तीव्र नाराजीच्या वागण्याचा अनुभव आला-
पिनस में गुजरते हैं जो कुचे से वो मेरे
कंधा भी कहारों को बदलने नही देते

(पिनस : मेणा,डोली.    कुचा : गल्ली       कहार : मेणा वाहून नेणारी माणसं )
तीला जेव्हा लक्षात येतं,की आपण त्याच्या घराजवळून जातो आहोत, तर आपल्या माणसांना ती खांदा बदलायची उसंतसुध्दा घेऊ देत नाही.
-नाराजीची ही केवढी तीव्रता म्हणावी ही…

परभणी जिल्ह्यातले कै.गोपाळराव वांगीकर हे त्यांच्या जमान्यातले एक उत्तम कवी,विडंबनकार होते. तो काळ स्वातंत्र्याच्या पूर्वीचा. अर्थात मराठवाड्याचे हे जिल्हे हैद्राबादशी-निजामी अंमलचे होते. त्या पिढीतल्या माणसांचे शिक्षण उर्दू माध्यमातून होणे, पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाशी संवंधीत असणे हे स्वाभवीकच असायचं.
तर हे गोपाळराव वांगीकर, यांनी उर्दू भाषेचा वापर करून काही मराठी कविता एवढ्या सुरेख केल्या आहेत, की आपण म्हणावं- लाजवाब !
सप्टेंबर 1993 मध्ये औरंगाबाद च्या दै. तरूण भारत मध्ये गोपाळराव वांगीकरांबद्दल माहिती आणि त्यांच्या काही रचना प्रसिध्द झाल्या होत्या. तो लेख मला एवढा आवडला होता, की एका रचनेचा तेवढा कागद कापून मी माझ्या जवळ अद्याप बाळगून आहे. त्यातली एक रचना – रचनेची गंमतम्हणून  त्या गमतीदार रचनेचा समावेश मी या ठिकाणी करीत आहे.
जर समर्थ रामदास स्वामी निजामी अमदानीत असते, तर त्यांच्या, मनाच्या श्लोकांचं स्वरूप कसं उर्दू मिश्रित झालं असतं, ही कल्पना करून वांगीकरांनी ते श्लोक अशा तर्‍हेने मांडले आहेत –

प्रभाते मनी राम चिंतीत जावा / पुढे वैखरी राम आधी वदावा
                     अलसुबह राम खयालात घ्यावा / आगे राम कबलज जबानी पढावा
( कब्ल : पहिला, आधी ) 

सदाचार हा थोर सांडू नये तो / जनीं तोचि तो मानवी धन्य होतो

                    सदाचार तो यार तरकू   नये तो / मुबारक बशर तोच दुनियेत होतो
( तर्क : सोडून देणे       बशर : माणूस )  

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें / तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे
                    शरीफे दिला भक्ती राहेची जावे / पुढे श्रीहरी खुदबखुद राजि पावे

जनीं निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे / जनीं वंद्य ते सर्व भावे करावें
जहांला पसंद नाच तरकून द्यावे /जहांला पसंद तहेदिलाने करावे

देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी / मना सज्जना हेचि क्रीया धरावी
                    झाल्यावरी फौत शोहरत उरावी /शरीफे दिला रीत हेचि धरावी
( फौत : मृत्यू      शोहरत : प्रसिध्दी ,कीर्ती  ) 

मना चंदनाचे परी तां झिजावे / परी अंतरी सज्जना निववावें
                    दिला संदलाचे परी त्वा घिसावे /शरीफे दिला त्वा बहेलवावे

समर्थाचिया सेवका वक्र पाहे / असा सर्व भूमंडळी  कोण आहे
                    तिरछा गुलामे-समर्थास पाहे / असा कोण कमबख्त दुनियेत आहे

जयाची लिळा वर्णिती लोक तीन्ही / नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
                    जयाचा करिश्मा तिन्हीलोक गाती / न भुलो कभी रामदास उसके जो साथी

आणि लक्षात आलं, की ईश्वराबद्दल ठाम श्रध्दा असल्यावर आणि माणसाला तीव्र विनोदबुध्दी असल्यावर माणूस भक्तीमार्गात किती छान तर्‍हेने गमतीचे कारंजे उडवू शकतो !
थट्टा करणार्‍या माणसाचंही तसंच असतं. त्याच्या मनात एखाद्याबद्दल आस्था असली, प्रेम असलं तर अशा माणसाची थट्टा  ही निर्मळ होते. ती ऎकावी वाटते. त्या माणसाबद्दल, त्या विषयाबद्द्ल जिव्हाळा तयार होवून जातो. आजही मराठवाड्यात निजामी अंमलाचा परिणाम बोलीभाषेत जाणवतो, तो म्हणजे, बोलण्यात येणारा हिंदी-उर्दू भाषेचा असर. माणूस सहजच बोलून जातो – ‘फारच परेशानी झाली बुवा !’ किंवा ‘त्याची हैसियतच काय ?’ वगैरे. कार्यालयीन व्यवहारात तर पेशकार, इजलास, दाखल करणे, दाखला असे कितीतरी शब्द रूढ आहेत. आणि मग खरंच वाटून जातं,की रामदास स्वामी त्या जमान्यात असते, तर त्यांच्या भाषेत अशी गंमत झाली तर ? किंवा सर्वसाधारण जनतेला समजावं म्हणून त्यांनी अशा भाषेचा वापर करून काव्य रचले तर… ते स्वाभावीकच होईल की- अर्थात ही सगळी गंमतच. गमतीनेच पहायचं असतं याकडे.

याच निमित्ताने या विषयाशी संबंधीत वसंत सरवटे यांचे एक व्यंगचित्र आठवले. साप्ताहिक ‘माणूस’ मध्ये वर्ष 1968-70 या काळात सरवटे यांच्या व्यंगचित्रांचे सदर रहायचे. त्यात एकदा रामदास स्वामींबद्दल अनावश्यक वाद उपस्थित झाले होते, या घटनेची गंमत सरवटे यांनी उडवून दिली होती. ते व्यंगचित्र हे होते-( संदर्भ : रेषालेखक -वसंत सरवटे/ संपादन : दिलीप माजगावकर-मधुकर धर्मापुरीकर / राजहंस प्रकाशन,पुणे )

दु:खाचा परिसर…

आयुष्यात कधी असे अनुभव येतात,की आपण चक्रावून जातो. गोंधळतो,निराश होवून जातो. आभाळ दाटून यावं तसं निराशा दाटून येते.जिकडे तिकडे कसं मळभ साचून राहिल्यासारखं वाटतं. मग आपलंच हे शरीर आपलाच हा चेहरा आपल्या नेहमीच्या हालचाली- त्यावरही कशी मरगळ येऊन जाते. इतकंच काय, परिसरातल्या -निसर्गातल्या नेहमीच्या गोष्टी- आभाळ,चंद्र,चांदणे,रात्र हे सगळं सगळंच अपयशी – अपेशी वाटत रहातं,अशूभ वाटत रहातं.. केवळ आपणच नाही तर सगळी सगळीच जण एका दु:खाच्या निराशेच्या लाटेत सापडली आहेत असं होतं…

चांद इक बेवा की चूडी की तरहा टूटा हुवा
हर सितारा, बेसहारा सोच में डूबा हुवा
गम के बादल इक जनाजे की तरहा ठहरे हुए,
हिचकियों के साज  पर कहेता  है दिल रोता हुवा..

दु:खाचे आभाळ दाटून आल्यावर चंद्राची कोर विधवेच्या फुटलेल्या कांकणासारखी वाटावी-दिसावी, नेहमी चमचमणारे सितारे आता कसे वेगवेगळे-एकटे विचारात बुडून गेल्यासारखे वाटावेत एखादी प्रेतयात्रा थांबावी तसे ते ढग थांबलेले वाटावेत…दु:खाचा केवढा परिणाम होवून गेला आहे हा.. .

हसरत जयपुरी यांनी शब्दबध्द केलेलं हे दु:ख अभिनेता दिलीप कुमार,गायक तलत महमूद आणि संगितकार शंकर जयकिशन यांनी तेवढ्याच उत्कटतेनं मांडलं आहे…जणू एखादा  जनाजा चालला आहे…ही सगळी जण शोकमग्न होवून त्यात शामील झालेली आहेत…

दु:ख हे शरण…

आमचे दादा-आईचे वडिल परभणीला सरकारी दवाखान्यात कम्पाउंडर होते. आईची बाळंतपणं तिकडेच झाली दादांकडे. मी आईसोबत असायचो. मी असेन पाच सहा वर्षांचा. दादांचं भरलेलं घर,वाढता खर्च आणि तुटपुंजी मिळकत ही तफावत मला लक्षात यायची, पण माझं ते शाळकरी वय असल्याने तेवढी जाणवायची नाही. मनात सतत असायचं ते घरात आंबटवरणाचं जेवण. चहाचं काम दादाच करायचे. संगीत नाटक, संगीताचा छंद असलेले आमचे दादा.
नवरात्रात तर देवीच्या आरत्यांचा उरूस या घरी भरलेला असायचा. आमच्या घरचं दैवत होतं बालाजीचं-गिरी बालाजीचं.आमच्या घरी हे वातावरण नसायचं; त्यामुळे या देवीच्या सामूहीक आरत्या, हे वातावरण मला फार आवडायचं. लाकडी वेलबुट्टीदार मोठ्या आकाराचं ते जाळीदार देवघर. त्यात रेणूका माता. आरत्यांच्या तयारीत संध्याकाळपासूनच आजी,मामी वगैरे असायच्या. महातपुरीकरांच्या त्या वाड्यातली-गल्लीतली स्त्री-पुरूष मंडळी घरात जामायची. मामा,आजोबा संगितातले जाणकार असल्याने आरत्यांतून करण्यात येणार्यास त्या अवाहनांना स्वरांचं-ठेक्यांचं छान रूप लाभलेलं असायचं. पाटावर उभे राहून आरतीचं तबक घेवून दादा रेणूका मातेच्या आरत्यांत सहभागी व्हायचे आणि त्या समूह स्वरांत मी- गर्दीत वडिलांचं बोट धरून चालावं तसं दादांच्या स्वरांवर-त्यांच्या आवाजावरच लक्ष ठेवून असायचो.
-आणि दादांची मिळकत आणि वाढत्या खर्चाची ती तफावत मात्र मला त्या वेळी तीव्रतेने जाणवायची. अगदी तीव्रतेने. दादांनी आरतीतल्या ओळींचा स्वर धरलेला असायचा-
अजूनी अंबे तुजला माझी करूणा का येईना हो….
गर्दीत वडिलांचं बोट धरलेलं असताना कधी भीतीने अधिक गच्च व्हायचं,मुठीतला घाम जाणवायचा. …त्या ओळींतून दादांच्या स्वरातला ओलावा मला जाणवत रहायचा.समूह स्वरांतून एकटा-वेगळा असा त्यांचा आवाज,त्यांचं एकट्याचं ते देवीला केलेलं आवाहन. त्या दाटीतून गर्दीतून दादांच्या जवळ मी सरकायचो. मला वाटायचं,त्या आरतीतून दादा सांगत असावेत देवीला, आपल्या कर्जाबद्दल, दुकानांच्या वाढत जाणार्‍या उधार्‍यांबद्दल,पैशाच्या गरजेबद्दल,पैशा अभावी वाटत रहाणार्‍या अपराधी भावनेबद्दल…एकदा परभणीला ‘देव दीनाघरी धावला’ हे नाटक आलं होतं.(फिरता रंगमंच हे त्या दिवसांत अप्रूप होतं.) घरासमोरून जाहिरातीचा टांगा जात होता आणि महिन्याअखेरीच्या त्या आर्थिक विवंचनेत असलेले दादा…त्यांची चुटपुट आजही मनात भरून आहे…‘काय करावं रे.. एवढं चांगलं नाटक..’
आज दादा नाहीत. ते केव्हाच निघून गेले. आता सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती चांगली झालेली आहे. मातीची घरं जाऊन फ्लॅटमध्ये रहात आहेत सगळे. चाळीस पावरचा पिवळा बल्ब जाऊन भक्क लाईट आहेत; एवढे भक्क की घरात अंधाराचा कण-क्षण कुठे सापडणार नाही,शोधूनही.
आजही मामांकडे रूढीनुसार नवरात्रात आरत्या होतात. आजही मी एक दिवस का होईना जातो. मामांची नातवंडं आरत्यांची पुस्तकं हातात धरून उत्साहाने आरत्यांत सहभागी होत असतात-
विपुल दयाघन गरजे तव ह्रदयांबरी श्री रेणूके हो !
पण- माझ्या मनात आज- आजचे हे दिवस आणि ईश्वराचं स्मरण यांची सरमिसळ झालेली आहे. मनात करूणा आहे, पण या करूणॆत चंचलतेचा समावेश झाला आहे. विवंचना आहेत, पण या चंचलतेपायी त्या ईश्वरापुढे त्या मांडणं गैरजरूरी वाटत आहे. लहानपणात नाही का,आईनं काही विचारलं तर मी चिडून म्हणायचो तिला- अं! तुला काय माहित आहे गं- उगं गप्प बस !
आज दिवस उजेडाचे आले आहेत, महत्त्वाचं म्हणजे वडिलधार्‍यांचं अर्धं अधिक आयुष्य हाता तोंडाची मिळवणी करण्यातच गुजरलं, तसं आज नाही.
…म्हणून तर आज जाणवतो आहे तो शे’र… निघून गेलेले ते शायर जावेद नासेर यांचा-

   अंधेरा हो तो तुझको पुकारूं यारब !
   उजालों में मेरी आवाज बिखर जाती है

अंधारात,संकटात ईश्वराची तीव्रतेने आठवण व्हावी,दु:खामुळे आवाजात-आवाहनात आर्तता यावी आणि तेच आवाहन तीच, आठवण प्रकाशात केलेली असताना, भल्या दिवसांत केलेली असताना लक्ष विचलीत झालेलं… खोडकर पोराचा आभ्यास असावा तसं ते चित्त…
म्हणून तर ईश्वराचं अस्तित्त्व जाणवत रहातं –दु:खात,अंधारात.
     हम्द म्हणजे स्तोत्र,स्तुती. आरत्यांमध्ये ईश्वराची,देवीची स्तुती असते. तसंच हम्दमध्ये अल्लाहची स्तुतीच असते. अशीच एक हम्द संगीतकार उषा खन्नाने स्वरबध्द केलेली आणि गायलेली आहे; मै हूं अलादिन नावाच्या चित्रपटात….

छायाप्रकाश

रात्रीची रोषणाई.विविध दिवे,प्रखर दिवे,रंगीत दिवे-अंधाराची फजिती करणारे,अंधाराला पळवून लावणारी ही रोषणाई… आणि या रोषणाईच्या मदतीने सगळा अंधार उज़ळून टाकून दिल्याची माणसाची मस्ती,त्याचा तो अभिमान – वृथा अभिमान. अंधारात कितीही दिवे लावले,केवढाही प्रकाश केला तरी पहाटेच्या उजेडाची बरोबरी हा प्रकाश कसा करणार ?
गृहसौख्य,निर्मळ प्रेम,कर्तव्य भावना या सगळ्यांकडे पाठ फिरवून माणूस संपत्तीचा आधार घेतो आणि जीवनात सगळा झगमगाट करून टाकतो.अतिरिक्त श्रीमंतीमुळॆ माणूस अंधाराला हाकलून लावायच्या प्रयत्नात असतो का नेहमी… आणि खोट्या रूबाबात वावरत असतो का…
पण… उदो उदो करणारी,सभोवताली जमणारी माणसं,ती संपत्ती ओसरली की अंधारात गडप झाल्यासारखी निघून जातात. म्हणून साधेपणा, निर्मळपणा याचं मोल करताच येत नाही.

चिरागां लेके दिल बहला रहे हो दुनिया वालों
अंधेरा लाख रोशन हो,उजाला फिर उजाला है.

खरं म्हणजे अंधाराला अस्तित्त्वच नसतं. प्रकाशाचा अभाव म्हणजे,अंधार.(प्रकाशाची तिरीप येते,तशी अंधाराची तिरीप येत नसते) त्याच प्रमाणे उर्जेचा अभाव म्हणजे थंडी. थंडीला वेगळं अस्तित्त्व नाहीच.

…असं जरी असलं तरी,जुल्फोंका अंधेरा- त्याला मात्र अस्तित्त्व आहे !मनात घर करून रहाणारा घनदाट केश संभार. प्रकाशीत चेहर्‍याच्या आजूबाजूचा हा सावळा अंधार..ही सावली;प्रखर उष्णतेच्या प्रकाशात हाताच्या खोप्याची जशी सावली; तशी-त्यापेक्षा अधिक मोलाची. य अंधाराचे वॆड ज्याला लागले,तो प्रकाशासाठी राजी होणारच नाही की !राजेन्द्र कृष्ण यांचा, एक मुजरा आहे; ‘जहान आरा’ सिनेमातला. लता आशाने गायलेल्या या मुजर्‍यातला  हा शे’र दोघींनी एवढा घोळवून घोळवून गायला आहे, की मनाला त्या भावनेची सुरेख कल्हई होवून जाते…अंधाराचे आकर्षण वाटत रहाते…

छाए रहे नजर में तेरी जुल्फ के अंधेरे
कई आफताब चमके,कई चांद जगमगाए


Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

…रहेगा गम कहां तक

माणसाचं जीवन हे क्षणभंगूर असतं. आयुष्य त्याच्या हाती नसल्याने तो एका अर्थाने पाहिलं तर क्षुल्लकच की.पण माणूस स्वत:च्या सुखदु:खात गुंतून जातो, अन हैरान होतो.
रात्री आपल्याला झोप येत नसते,अवेळी जाग येते,अस्वस्थ होतं याची अनेक कारणं असतात. या अनेक कारणांपैकी एक असतं,मृत्यूच्या भयाचं कारण. झोपणं म्हणजे,संपून जाणं असं वाटतं की काय कोण जाणे, माणूस झोपायला तयार होत  नसतो, अन म्हणतो,की झोप का बरं येत नाही ?
अस्वस्थता असली,की झोप येत नसते-अस्वस्थता का येते-परिणामाची निश्चित माहिती नसते,नेमकं काय होणार आहे, कसं-कधी होणार आहे याचं उत्तर आपल्या विचारांच्या कक्षेबाहेर गेलं,की अस्वस्थता येते आणि-
झोप हरवते.
पण मिर्जा गालिबचं म्हणणं असं,की माणसाचा मृत्यू हा निश्चितच आहे. जावं तर लागणारच निर्विवाद; मग असं (आणि असंच) असल्यावर आता वाद कशाला ? निश्चिंत का रहाता येत नाही,झोप का बरं येत नाही…

मौत का एक दिन मुअय्यन है
निंद क्यूं रात भर नही आती

खरं म्हणजे, आपल्याला माहित असतं- त्याची स्पष्ट जाणिव असते,की आयुष्याचा हा कालावधी ठरलेलाच असतो,मर्यादितच असतो. आपल्याला मरायचं आहेच,मरणारच आहोत आपण. तो मृत्यू नको म्हटलं तरी येणार,ये म्हटलं तरी येणार. त्याचं स्वागत केलं तरी येणार,हाकलून लावलं तरी नाही जुमानणार. मग त्याला का भ्यावं बाबा… एक ना एक दिवस आपल्या घरात आपल्या मृत्यूचा तो ‘सोहळा'(हंगामा) होणारच आहे.

उम्र फानी है तो, फिर मौत से डरना कैसा     ( फानी : नाशिवंत )
इक न इक रोज ये हंगामा हुवा रख्खा है

पण ते वेगळं.आज आत्ता या क्षणाला-मत्यू आलेला नसतो.तो असतो काही अंतरावर. आपल्याला तशी एका अर्थाने ( आणि एकाच अर्थाने )खात्री असते,की आज तरी आपण मरणार नाहीत- खात्री नाही,आपला हिशोब म्हणा. मग आज जे आपण अस्वस्थ झालो असतो,ते आयुष्यातल्या असंख्य विवंचना,काळज्या,चिंतांनी. हा सगळा कोलाहल शरीर-मनात उद्भवतो. आपण हतबल होतो, हे सगळे त्रास संपून जायची इच्छा करतो अन शेवटी मृत्यूचाच आधार घेतो-

ये सब झगडे हैं जाने-नातवां तक ( जाने-नातवां : दुबळ्या जीवाचं अस्तित्त्व)
रहेगा दम कहां तक,गम कहां तक
( हे दु:खांनो-)मला तुम्ही त्रास  देता नं,द्या. केव्हापर्यंत तुम्ही मला त्रास द्याल…या दूर्बळ जीवाच्या अंतापर्यंतच ना?
…एकदा का दम निघून गेला, तर गम राहिलच कुठे…

Please visit :http://hasanyachaaakar.wordpress.com/

जर्रेगिरी !

(जर्रा : कण )
संगीताच्या मैफलीमध्ये तबल्याची संगत असते,संगतच. पण आपण कधी पहातो, गाणं किंवा ते वाद्य संगीत रंगात आलं,की हा आपल्या हरकती दाखवायला लागतो-तबलावादक. एवढ्या त्याच्या हरकती,की मुख्य कलाकाराचा खोळंबा व्हावा. कोणत्याही कार्यक्रमात सूत्र संचालक हा दुवा असतो,कलावंत आणि श्रोत्यांमधला. पण या हौशी गृहस्थाला त्याचं भान रहात नाही अन तो स्वत:च बोलत सुटतो,सांगत सुटतो. गुरू गौरव समारंभात शिष्याचाच रूबाब दिसत असतो.नेत्यापेक्षा त्याच्या कार्यकर्त्यांची वर्दळ आणि ‘हुशारी’ दिसत रहाते. हाताखालच्या कुणालाही, त्याची चूक दाखवायला गेलं-काही सांगायला गेलं, की ‘अन्याया’च्या भाषेची त्याची प्रतिक्रिया होवून जाते.उजळणी शिकण्याच्या आज के दौरवयात मुलाने आईबाबांना वर्तणूकीचे दाखले द्यावेत,देवासमोरच भक्तांची अरेरावी पहायला मिळावी…
ज्या गोष्टी मुळात लहान आहेत,त्यांना लहान संबोधणं हा अवमनाचा मुद्दा समजला जातो आहे. त्यामुळे कर्तुत्त्वाने उंची गाठणारा आणि त्या मार्गाला नुकतीच सुरूवात केलेला, यांचं नातं बिघडत आहे. …’समभावा’च्या वृत्तीची ‘भावकी’ होवून बसली आहे- मी पणाची. एक शायर हतबल होवून तिरकस तर्‍हेने सांगतो-
आज के दौर में कमतर को न कमतर कहिए
जर्रे कहते हैं,हमें  महरे -मुनव्वर कहिए
आज कुण्या लहानाला ‘लहान’ म्हणू नका रे बाप्पा! त्यांची चूक दाखवू नका. कारण आज चमकणारे कणसुध्दा, त्यांना सूर्य म्हणा-चमक नाही ही; असं बजावीत आहेत…दरडावीत आहेत…
जर्रा-एक कण या कणावर सूर्याचा-चंद्राचा प्रकाश पडतो अन तो चमकतो. चमचमतो. पौर्णिमेच्या रात्री तलावातल्या जललहरींवर चंद्राचा प्रकाश पडतो आणि असंख्य लहरींचा सुरेख चमचमणारा खजाना पाहून मन आनंदीत होतं. पाण्याच्या त्या कणांना-त्या थेंबांना लाभलेलं हे प्रकाशीत रूप हे त्यांच वैभव आहे,त्यांचं वैशिष्ट्य आहे- आणि हीच त्यांची मर्यादाही आहे. नेमकं याचंच भान दुर्देवाने हरपून जातं. मग जेव्हा तो कण स्वत:ला सूर्यच म्हणू लागला,चंद्रच असल्याचा आग्रह धरू लागला, तर त्या जललहरींचं कलहात रूपांतर व्हायला किती वेळ लागणार ? स्वत:ची मर्यादा बाळगून सहिष्णू वृत्तीने रहाणं-मोठ्याला मोठं म्हणणं,लहानाला लहान म्हणलं तर त्यात गैर काही नाही अशी समजूत बाळगणं हे नितांत गरजेचं आहे. ‘लहान’पणाची जी चमक आहे, तेच त्याचं वैशिष्ट्य असतं, त्याचं मोल- त्या मोलाचा विसर पडणं ही अन्यायाची बाब नाही,दुर्देवाची बाब आहे.
नुमाया जर्रे जर्रे में वो ही तस्वीरे-जानां है ही जाणिव आपल्या सगळ्यांना समृध्द करते. आणि हीच क्षणभर-कणभर समृध्दी आपलं सार्थक असतं. अकबर इलाहाबादी यांचा एक शे’र आहे-
हर जर्रा चमकता है अनवर-ए-इलाही से
हर सांस ये कहती है,हम है तो खुदा है.
( ज्रर्रा जसा चमचमतो,तसाच या शे’रचा आशयसुध्दा : ईश्वरी प्रकाशाने प्रत्येक कण उजळून निघाला आहे, प्रश्नच नाही;तथापि, एकदा वाटतं, प्रत्येक श्वासागणिक जाणिव होते, ती अशी,की आम्ही आहोत, ‘म्हणूनच’ ईश्वर आहे, म्हणावं, का आम्ही आहोत, ‘म्हणजेच’ ईश्वर आहे असं म्हणावं ! म्हणजे,ही कृतद्न्यतेची भावना आहे, की ‘जर्रेगिरी’च्या उध्दटपणावर ‘अकबर’ यांनी नेहमी प्रमाणे व्यंग केलं आहे !) असो.

प्रत्येकाने आपली मर्यादा बाळगून असणं हे संस्कृतीचं लक्षण आहे. त्यातच त्याचं मोल आहे आणि महत्त्वही आहे. ते स्वाभावीकही आहे.तसं जर नसेल, तर तपश्चर्या अन लक्ष लावून पहाणं सारखंच होवून बसेल की ! भक्ताने भक्तीच्या मार्गाने मोक्षाच्या प्राप्तीची इच्छा सोडून ईश्वरी अवताराचाच आग्रह ठेवावा हे विपरीत आहे.
प्रकाशाने विलक्षण चमकून उठणारा जर्रा-कण आणि अनुभुतीने विलक्षण जीवंत झालेला लम्हा-क्षण; तीच त्याची क्षमता आणि क्षणभराचं-कणभराचं अस्तित्त्व हेच त्याचं वैशिष्ट्य. माणूससुध्दा तसाचे की. कालप्रवाहाच्या दिर्घ व्यापापुढे त्याचं हे लहानपण,त्याचं हे मर्यादित आयुष्य;यातच खरी मौज आहे.
क्या गजब है के इंसा को नही इंसा की कद्र
हर फरिश्ते को ये हसरत है के इंसा होता
-दाग
देवदूताला माणसाच्या थोडक्या अस्तित्त्वाचा मोह होतो अन माणूस मात्र मोठेपणाचा आव आणतो-हाव धरतो.
क्षण एक पुरे प्रेमाचा असं,प्रेमाच्या प्रत्ययकारी क्षणाची अनुभुती घेणार्‍या कवीचं म्हणणंच एका शायरने असं मांडलं आहे-
इश्क फना का नाम है, इश्क में जिंदगी न देख
जल्वा-ए-आफताब बन, जर्रे में रोशनी न देख
प्रेम क्षणाचं असतं,त्याच्या कडून चिरंतनाची अपेक्षा ठेवू नको. ईश्वरी कृपा दृष्टीचं रूप हो,कृपा करणारा होवू नको.

(उर्दू शायरीतले हे शे’र.तसं पाहिलं तर गजलच्या या दोन ओळी. पूर्ण गजल,दिर्घ काव्यातल्या अनुभवाचं व्यापक स्वरूप शे’रमध्ये नसतं. आरशाच्या तुकड्यांत आभाळ दिसावं, तसा तो शे’र अन त्यातून जाणवणारं जीवन… …शे’रचे हे जर्रे चमकत असतात,भुरळ पाडीत जातात…)

Please visit my blog :http://hasanyachaaakar.wordpress.com/

असणं आणि दिसणं

माणसाच्या दिर्घ म्हणविल्या जाणार्‍या आयुष्यात अनेक टप्प्यांचे प्रवास असतात-
सुख,दु:ख,हसू-आसू,कष्ट-भोग,काय काय. सुखाच्या दिवसात शरीर मन कसं फुलून आलेलं असतं.पण कधी आकाशातून काळे ढग जातात,तेव्हा पठारावर त्यांची सावली पडावी,सगळा परिसर झाकोळून जावा तसं होतं अन संकटांना तोंड देता देता आपलं शरीर मन जणू कोळपून जातं. पण आयुष्य संपलेलं नसतं,प्रवास चालूच असतो. पण संकट-ते येऊन गेलेलं वादळ असं असतं,की आपला चेहरा मोहरा बदलून जातो-

चेहरे की चमक छीन ली हालात ने वर्ना
दो चार बरस में तो बूढापा नही आता

पण हे झालं, कष्टांशी प्रत्यक्ष लढण्यामुळे जी शरीर मनाची झीज होते,त्याबद्दल. गंमत अशी,की त्याच सोसलेल्या-भोगलेल्या दु:खाचं माणूस नंतर भांडवल करतो.कष्टी चेहरा करून वावरतो. सुखाचे दिवस आले, तरी त्याच्या चेहर्‍यावरचा तो कळंकलेपणा निघून जात नाही. शिवाय तिच सवय एकदा झाली,की माणूस एकांतातसुध्दा वाकड्या चेहर्‍यानेच रहातो.(-रहातो की काय! एकदा बघायला पाहिजे स्वत:कडे ) पण अशा कष्टी चेहर्‍याने अंतिमत: नुकसान कुणाचं होणार- आपलंच ना. कुणाला काय देणं घेणं असतं?

वक्त के पास न आंखे है न अहसास  न दिल
अपने चेहरे पे कोई दर्द न तहरीर करो ( तहरीर :लिहणे, दर्शविणे)

म्हणूनच ‘सिमाब्’ अकबराबादी हा शायर म्हणतो-

खुद किस्सा-ए-गम अपना कोताह किया मैने
दुनिया ने बहोत चाहा अफसाना बना देना ( कोताह : मर्यादित,सिमित)

माझ्या दु:खाची हकीकत मी स्व्त:च सिमित करून टाकली. गप्प राहिलो. लोकांना माझ्या दु:खाच्या हकिकतीमध्ये  भलतीच रूची दिसू लागली.. त्यांना ते ‘भलतंच’ चवदार वाटू लागलं, म्हणून…

Please visit :http://hasanyachaaakar.wordpress.com/

रूबाब

लताच्या एका जुन्या गाण्यात शेवटचे कडवे गाताना आवाज उंचावून ती गाते-
जो टूटता  है रूबाब, उसको टूट जाने दे
मेरे शबाब को जी भर के गीत गाने दे…

माझ्या तारूण्याच्या उत्साहाला आवर मी घालणार नाही. मी गात रहाणार. गाण्य़ाच्या साथीसाठी घेतलेला हा जो रूबाब आहे, तो तुटला तरी बेहत्तर,मी गातच रहाणार…
हा रूबाब. हे वाद्य. साथ संगतीचं वाद्य. आणि उत्साहाच्या मनाला संगत देणारं शरीर हेसुध्दा वाद्यच असतं ना. आणि रूबाब हा शब्द आणखी एका अर्थाने लागू होतोच की आपल्याला. उत्साहाने,तारुण्याने भरलेल्या शरीराचा रूबाबच वेगळा असतो.
आणखी एका अर्थाने हा शब्द लागू होतो. शरीर हे थकणारंच असतं.संपणारच असतं. मनाला आवर नसतो,मर्यादा नसते. म्हणून तर अनावर झालेलं मन शरीराची पर्वा न करता म्हणत रहातं-जो टूटता है रूबाब,उसको टूट जाने दे… शरीर जेव्हा थकायला लागतं,तेव्हा आपण म्हातारे होत चाललो,की काय अशी शंका येत रहाते; आणि एवढंच नव्हे तर ती शंका स्वस्थ बसू देत नाही. मग मागचे ते दिवस, तारूण्यातल्या त्या आठवणी येत रहातात, मन अनावर होतं; अन वाटतं, नाही….अभी तो मैं जवान हूं..
मुहंमद ‘अल्वी’हा शायर म्हणतो,
याद करता हूं पुरानी बाते
सोचता हूं,के जवां हू मै भी

पण ‘जोश’मलिहाबादी हा शायर मात्र मोठा आचंबीत झालेला आहे. त्याला आपल्या यौवनाचे ते दिवस आठवतात.ती मस्ती,तो जोम आठवतो आणि ते सगळं आत्ताच्या तबियतीच्या तुलनेत (बीपी,शूगर,कोलेस्ट्रोल?) विचार करता,एकदमच खोटं वाटून जातं- मीच होतो का तो ? छे!
‘जोश’ अब तो शबाब की बातें
ऎसा लगता है जैसे अफवा हो

गेलेल्या दिवसांच्या दु:खात सगळ्यात जास्त क्लेषकारक बाब म्हणजे- गेलेले यौवन.
अब इत्र भी मलो तो खुशबू नही आती,
वो दिन हवा हुए,जब पसिना गुलाब था

खरंच आहे ते. यौवनाचे,उभारीचे ते दिवस…त्या दिवसांचं वेगळं असं अस्तित्त्व त्यावेळेस कुठं जाणवत असतं ? ते जाणवतं,ते प्रकर्षाने लक्षात रहातं ते तो काळ सरल्यावरच.
…आणखी एक गंमत अशी,की त्यावेळ्च्या सुखामुळे आपल्याला किती छान वाटलं होतं,अन त्या वेळच्या दु:खामुळे आपण किती विचलीत झालो होतो, हे आता आठवतं.
… आज ते सुख काही एवढं मोठं नव्हतं,ते दु:ख काही एवढं घाबरून जाण्यासारखं नव्हतं हे लक्षात आलेलं असतं.
‘जज्बी’ या शायरला त्या  सुख दु:खाचाच आचंबा वाटतो-

ऎश से क्यों खुश हुए, क्यों गम से घबराया किए
जिंदगी क्या जाने क्या थी,और क्या समझा किए

….जाऊ द्या.नाईलाज को क्या इलाज ?

टीप : माझ्या या जानिबे-मंजिल बद्दल इ टिव्ही (उर्दू) चॅनल वर बातमी आली होती,
त्या बातमीचा हा अंश :

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

बेजूबानी…

प्रेम; आणि तक्रार नाही,हे असं कसं होईल ? प्रेमात तक्रार तर असतेच शिवाय या शिकवा-शिकायत मध्ये एक प्रकारची अवीट गोडीही असते.
पण हे कुणाला लागू होतं? जेव्हा दोघंही एकमेकांवर अगदी फिदा असतात त्यांनाच.
सहसा प्रेम हे एकतर्फी असतं. आणि मग अशा स्थितीत तक्रार करायला गेलं, की ऎकून तर घेतल्या जातच नाही,शिवाय नाराजी वाढत रहाते. अबोला बाळगल्या जातो. मग तो प्रियकर दिवस रात्र बेचैन होतो, ती भेटली की तेच तेच सांगत रहातो.तिला त्याच्या सांगण्याबोलण्यावर भरवसा रहात नाही आणि मग हळू हळू प्रेमाचं रुपांतर एका दाहक अशा अनुभवामध्ये होतं. त्याला गप्पपणा घेरतो. तो मग तिला म्हणतो-
हश्र के दिन मेरी चुप का माजरा,
कुछ न कुछ तुमसे भी पुछा जाएगा

त्याला ही खात्री आहे, की प्रलयाच्या दिवशी-ज्या वेळी पापा पुण्याचा हिशोब होईल, माणसाच्या कृत्यांचा जेव्हा पाढा वाचल्या जाईल, तेव्हा ‘हा का बरं गप्प आहे ?’ असा प्रश्न तुला विचारला जाईल. नक्कीच.
आयुष्यभर जिने त्याचं अजिबात ऎकलंच नाही, तो शेवटी आयुष्यातूनच निघून जातो. आणि ती जेव्हा त्याच्या अंत्यदर्शनाला येते, तेव्हा त्याच्या निष्प्राण चेहर्‍यावर जणू हेच उमटलेलं असतं-
सुने जाते न थे तुम से मेरे दिन रात के शिकवे
कफन सरकाओ,मेरी बेजूबानी देखती जाओ..

पण आता तिला याचा पश्चात्ताप होतो आहे. त्याला आपण प्रतिसाद दिला नाही याचं प्रचंड दु:ख सोसत ती आयुष्य काढते. तिचाही अंत होतो, आणि जगाचाही अंत होतो. मग प्रलयाचा दिवस (महशर) येतो. या दिवशी सर्व मृतात्म्यांच्या पापापुण्याचा हिशोब होतो. जीवनभराच्या कृत्यांचा हिशोब लावून त्या त्या नुसार माणसाला स्वर्गात पाठवायचं का नरकात-याचा निवाडा केल्या जातो.
पण हे काय ? ती इथे चक्क गप्प बसून आहे. इतकंच नाही, तर तिच्या चेहर्‍यावर प्रचंड अपराधीपणा दिसतो आहे.पश्चात्ताप ( पशेमानी ) दिसतो आहे. नेहमीच आनंदाने रहाणारी ती-आता अशा अवस्थेत पाहून तिचा तो प्रियकर-ज्याच्या सांगण्या बोलण्याला तिने आयुष्यभर जुमानले नाही- कमालीचा अस्वस्थ होतो. तिथेच तो एक ठरवून टाकतो-
अपने सर ले ली महशर में खताएं उनकी
मुझसे देखा न गया उनका पशेमां होना

निस्सीम प्रेम याहून काय उत्कट असू शकतं…

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

जाणं आणि…निघून जाणं

शायर लोकांचे प्रेमाचे व्यवहार फार जालिम असतात. सामान्य माणसासारखं त्यांचं प्रेम काही असं तसं नसतं. जीवन मरणाच्या नुसत्या बाता मारणारे ते वादे-इरादे नसतात,तर कृतीत उतरवून दाखवायची धमक त्यात असते.आणि या शायर लोकांना प्रेयस्या ( वा! काय छान अनेक वचन आहे !) तशाच अगदी जालीम-अगदी जीवघेण्या असतात. एका शायरच्या नशिबाला अशीच एक जीवघेणी प्रेयसी लाभली. तिच्या, ‘निघून जा !’अशा सांगण्याचा एवढा असर त्याच्यावर झाला,की दुसर्याज दिवशी मोठ्या बाका प्रश्नाला उत्तर द्यायची वेळ त्याच्यावर आली-
जनाजा रोक कर मेरा,कुछ इस अंदाज से वो बोले
गली तो हमने कही थी,तुम तो दुनिया छोडे जाते हो
आता हा प्रश्न आपल्यासाठी हसण्याचं निमित्त होतो,त्याच्यासाठी जिव्हारी लागणारा असा.(पण जीवच गेला तर जिव्हार कुठे रहाणार..) आणि माणसाचं जाणं-निघून जाणं असंच तर असतं-सांगणारा असतो,ऎकणारा मात्र निघून गेलेला असतो. ‘अमर’मध्ये म.रफीने गायलेलं एक आर्त असं गाणं आहे-‘ओ दूर के मुसाफिर हमको भी साथ ले ले..’ शकील बदायुनीच्या या गीतामध्ये सुरूवातीला एक शे’र आहे-
चले आज तुम जहां से,हुई जिंदगी पराई
तुम्हे मिल गया ठिकाना,हमे मौत भी ना आई
आलेला माणूस हा जाणारा असतोच. बुलावा आला की त्याला निघावं लागतं,जावं लागतं. पण हे त्याचं जाणं केव्हा असतं-जेव्हा त्याला बोलावणं आलेलं असतं तेव्हा.
पण जवळचा माणूस जातो,तेव्हा आपल्याला का कोण जाणे वाटत रहातं, त्याने इतक्या लौकर जायला नको होतं.त्याने जायची घाई केली…जसं काही त्याला बोलावणं आलं नव्हतं,तोच निघून गेला.आपण होवून निघून गेला.रुग्णाची विचारपूस करायला आपण जातो.त्याच्याशी बोलतो.त्याला बरंही वाटतं. चार सुख दु:खाच्या गोष्टी होतात. प्रकृतीबद्द्ल सांगताना तो सांगून जातो,की फार अशक्त वाटतं आहे, उठायलासुध्दा होत नाही,तेवढी शक्तीच नाही राहिली.त्याला धीर देवून आपण त्याचा निरोप घेतो.
आणि सकाळी निरोप येतो, तो गेल्याचा. आपण सुन्न होतो. कालची विचारपूस आठवत रहाते. आपलं एक मन मग राहून राहून त्याला उद्देशून म्हणत असतं-
कल तो कहते थे,के बिस्तर से उठा जाता नही
आज दुनिया से निकल जाने की ताकत आ गई…

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

खबरदार

नूतन वर्षाच्या शुभेच्छा !

Past is History.Future is Mystery and Present is Gift;that is why we call it as ‘Present’ !
कळतं पण वळत नाही अशी माणसाचे गत असते. सुखाच्या मागे बावळटपणाने आपण लागलेलो, दु:ख आलं की गडबडून जातो आणि अशाच तर्‍हेची धावपळ आयुष्यभर करणारे आपण : जेव्हा कुणी वडिलधारा, शहाणासुरता माणूस आपल्याला आपल्या अशा बालिशपणाची जाणिव करून देतो, आपल्या वागण्यातली विसंगती दाखवून देतो, तेव्हा आपण थबकतो. लाजतो-बुजतो. विचार करतो. आपल्याला ते पटून जातं.

आपल्या उर्जेचा-शक्तीचा बराचसा हिस्सा हा आपण आपल्या भूतकाळाभोवती तरी विणलेला असतो किंवा भविष्यकाळा कडे जाळं लावण्यात खर्च केला असतो. मग हाती जे लागतं ते बर्‍याच अंशी दु:ख, निराशा असंच असतं. वर्तमानात- या क्षणात रहायला शिकलं तर आपण आपली अनावश्यक खर्च होणारी शक्ती वाचवू शकतो.

आपल्या क्षणाबद्दल -आत्ताच्या क्षणाबद्दल सावध राहून जगायला संतांनी सांगितलं आहे,पश्चिमेच्या विचारवंतांनी सांगितलेलं आहे…पूर्वेच्या कलावंतांनी सांगितलेलं आहे-
तू अगर अपनी हकीकत से खबरदार रहे
न सिया-रोज रहे,फिर न सिया-कार रहे

– डॉ.इक्बाल

आपल्या वर्तमानाशीच तू जर संबंधीत राहिलास,वर्तमानाचं तुला स्पष्ट असं भान असेल,तर मग तुझ्यासाठी अशुभ दिवस रहाणार नाही, कसलंही पाप रहाणार नाही…

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

सुख दु:खाचा बाजार

‘साहिर’ लुधियानवी आणि ‘शकील’बदायुनी. उर्दू भाषेतले हे उत्तम कवी,साहित्त्यिक. मग ते सिनेसृष्टीत आले. सिमेमांसाठी त्यांनी गाणी लिहिली. असं गाणं लिहिताना, शायरपेक्षा थोडी वेगळी तबियत पाहिजे असते, ती त्यांनी आत्मसात केली. प्रसंगानुरुप, संगीत-चालीच्या अनुरूप शब्द रचना करताना, त्यांच्यातला शायर थोडा नाराजही होत असावा, त्याला गंमतही वाटली असावी.
सिनेमात मुजरा हा गाण्याचा प्रकार लोकप्रिय असतो. कोठीवर नायक आलेला असतो,नशेत असतो, त्या नशेत त्याला संसाराच्या विवंचना,अपराधी भावना अधिक भडक तर्‍हेने जाणवत असतात. आणि याच भडक संवेदनांना घेवून मुजर्‍याची शब्द रचना-संगीत रचना आयोजीत केलेली असते. आयुष्यातल्य़ा सुख दु:खाचा तो एक बाजारच मांडलेला असतो- रंजनाच्या,करमणुकीच्या रुपात.
आता आयुष्याबद्द्ल भाष्य करायचं तर असतं,पण ते कवितेच्या-नज्मच्या स्वरूपात न करता त्याला सादरीकरणाचं रूप द्यायचं असतं. अशावेळेस जातीवंत शायरला शब्दांची एकप्रकारची नशा चढते आणि तो व्यक्त होतो. एका अर्थाने सांगायचं झाल्यास सुख दु:खाचा झणझणीत रस्सा असलेलं हे गाणं असतं. सारंगी आणि तबल्याचा ठेका ही वाद्यं तर त्या तवायफसोबत असणार्‍या गडीमाणसांसारखी असतात. सुख दु:खाला सहमतीची, होकार-नकाराची संगत करणारी ही वाद्यं म्हणजे मुजर्‍याचे जीव प्राण.
‘गंगा जमुना’मध्ये शकीलने ‘माणूस’कसा धोकेबाज असतो, ते सांगितलं आहे-
जहां मे हो जिसे जीना, वो तुझसे दूर रहे,
जो मरना चाहे, वो आकर तेरे हुजूर रहे
आणि ‘बहूबेगम’मधल्या मुजर्‍यातली ही आर्तता पहा-

बरबादे वफा का अफसाना,हम किससे कहें और कैसे कहे
खामोश है लब, और दुनिया को अश्कों की जुबां मालूम नही

एवढं असलं तरी आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य लाभलेलं असतं या मुजर्‍याला-
मनात तीव्रतेने दाटून आलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी जोरदार तरीकाच हवा असतो. त्याच सोबत त्या दु:खाकडे हसून पहायची बेमुर्वत धुंदी.

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

जोरे-बाजू

माणसाचे बाहू म्हणजे त्याच्या कर्तृत्त्वाचे मह्त्त्वाचे साधन. या बाहूंचं बळ ( जोरे-बाजू) माणसाला,त्याचं ध्येय मिळवून देतं; यश मिळवून देतं. पण हे जे बाहू असतात-जोमदार बैलांसारखे, त्यांना सावरणारा ,हांकणारा गाडीवान तेवढाच जोमदार हवा. मनच भक्कम नसेल तर बाहूंकडे हात चोळण्याशिवाय दुसरं काय रहाणार ? एखादे संकट आले-अडचणींच्या पिंजर्‍यात  कधी आपण बंदिस्त झालेलो असतो; तेव्हा जोरे-दिल,जोरे-बाजू व्यवस्थितरित्या कार्यरत राहिले नाहीत तर आयुष्य कठीण होवून बसतं. माणूस पायाने कमी चालतो,मनाने जादा. बंदिस्त(सवयीचा?) माणूस तर स्वातंत्र्याच्या अफाट कल्पना करतो. विजयाच्या-उन्मादांच्या भावनांनी बेभान होतो, पण बसल्या बसल्याच. बसून केलेली अशी बगावत (बंड) निष्प्रभ असते.

खामोश बगावत से कटती नही जंजीरे
जुगनू से शबिस्तां का जादू कभी टूटा नही
( शबिस्तां : रात्री रहाण्याचे ठिकाण, शयनागार)
इथं,आपल्या मर्यादेच्या विचारांत एकदा का गुंतून पडलं,की आपल्या क्षमतांचा विसर पडत जातो. मागे पुढे पहाणे,काल्पनीक पराभवाच्या शंकेने मग नशिबाला दोष लावणे, तक्रार करणे-प्रार्थना करणे या चक्रात माणूस सापडतो.मान्य आहे संकट कठीण आहे ; पण त्याबद्दल तक्रार करायच्या ऎवजी जरा प्रयत्न करून पहा .आपल्या बाहूतलं बळ काय,हे तर आजमावून पहा गड्या-

जोरे-बाजू आजमां,शिकवा न कर सय्याद से
आज तक कोई कफस टूटा नही फर्याद से

मग या मन:स्थितीच्या-परिस्थितीच्या रेट्यातून असे काही क्षण येतात,त्यावेळी आपले बाहू फुरफुरतात ( पराभव-अन्यायाच्या कल्पनेत केलेल्या विचारांचा दाह असह्य होवू लागला तेव्हा) मग आपल्याकडून प्रयत्न केले जातात.या प्रयत्न-संघर्षात एक नाजूक वेळ येते. क्षणिक पराभवाची. जोरदार शत्रूला मारलेली धडक-पहिलीच धडक कामियाब कशी होईल ? फक्त छन्न ! आवाज होईल-हातोडा मागेच उचलला जाईल. पण इथे, ‘जमत नाही गड्या’असं म्हणणं मूर्खपणाचं नाही का? अहो,बंदूकीची प्रत्येक गोळी,धनुष्याचा प्रत्येक बाण हा लक्ष्याला लागावाच असा आग्रह धरणं,तो नाही लागला तर आयुध फेकून देणं… आततायीपणाचं नाही का ?

ये लाजमी नही के सभी तीर हो खता
फेंकी है अपने हाथ से तू ने कमान क्यूं

please visit another  blog :       http://hasanyachaaakar.wordpress.com/

खामोशी

मुझे इ न्कार ही कर दे मगर कुछ गुफ्तगू तो कर
तेरा खामोश सा रहना मुझे तकलीफ देता है .
..

गप्प रहाणं,गप्प बसणं  आणि मौनात रहाणं, स्तब्ध-शांत,निरवतेत रहाणं या दोनही अवस्थांत फरक आहे का नाही. आहे. सूक्ष्म असा फरक आहे. पण या दोनही अवस्थांना एकच मात्रा लागू आहे,एकच शब्द योजलेला आहे-खामोश.खामोशी…

संतापून जावून आपण एखाद्यावर ओरडतो-खामोश ! समोरचा माणूस गप्प होतो. खामोश होतो. पण खरोखरच का तो खामोश झालेला असतो ?
पण खरोखरची खामोशी ही खरंच खामोशी असते का बरं ? आपण खरंच शांत कधी असतो का- आतून आतून अगदी निरव अशी शांतता खरंच आपल्याला अनुभवता येते का बरं…
खामोश न था दिल भी,ख्वाबीदा न थे हम भी
तनहा तो  नही गुजरा, तनहाई का आलम भी
( ख्वाबीदा: – झोपलेला )

तनहाई-एकलेपण असलं की आपण तसं पाहिलं तर शांत असतो,खामोश असतो. पण असं असलं तरी ते खर्‍या अर्थाने एकलेपण नसतंच.
खामोशीचे कायदे कानून वेगळे असतात. नुसतं शांत रहाणं म्हणजे जसं खामोशी नसते, तसंच इथे कोणताही शोर,आरडा ओरडा ‘गैर कानूनी’असतो. दुसरी बाजू अशी,की आणीबाणीच्या परिस्थीतीत गप्प रहाणं आवश्यक असतं,तिथे आवाज उठविणं चुकीचं,आततायीपणाचं होवू शकतं. एका शायरने म्ह्टलं आहे-
खामोशियोंके दश्त में,क्यूं चिखते हो तूम
कानून सब यहां के सदा के खिलाफ है
( दश्त :  जंगल      सदा : आवाज,हांक  )

…पण दश्त म्हणजे आणीबाणी नाही. जंगलाची शांतता अनुभवायची असेल, तर इथले संकेत इथले नियम पाळायला हवेत. महत्त्वाचा आणि प्राथमिक नियम म्हणजे आपण कुणाला ही साद घालायची नाही, बोलवायचं नाही. आपण अनुभवायची  असते  ती  शांततेची वनराई….
पण या खामोशीचे अनेक अर्थ अनेक जण आपापल्या परीने लावीत असतात. ‘जिगर’मुरादाबादी म्हणतो-
उसे सैय्याद ने कुछ,गुल ने कुछ,बुलबुल ने कुछ समझा
चमन में कितनी मा’नीखेज थी, इक खामोशी मेरी
( सैय्याद : शिकारी       मा’नीखेज : अर्थपूर्ण  )

खामोशीने घेरलेल्या माणसाचं निकटचं माणूस त्याची खामोशी पाहून अस्वस्थतेनं घेरून जातं. जवळच्या माणसाचा गप्पपणा पाहून त्याला करमत नाही,राहून राहून मनात निरनिराळे विचार येत रहातात ;  आणि मग न रहावून त्याला सांगावं वाटतं,’मुस्कुराओ के जी नही लगता..’  खरंच, खामोश मुस्कुराहट किती बोलकी असते…आणि ते बोलणंसुध्दा पहात रहावं वाटणारं.
‘कंगन’ मध्ये निरूपा रॉय  हीच तर विनंती करते आहे, गीतकार राजेंन्द  कृष्ण यांच्या शब्दांतून संगीतकार चित्रगुप्तच्या चालीतून, …अशोक कुमारला

: अर्थपूर्ण )

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

रोना धोना

वो रुलाकर हंस न पाया देर तक
जब मैं रोकर मुस्कुराया देर तक

हम दोनो’मध्ये साहिरची एक गजल म.रफीने गायली आहे-कभी खुद पे कभी हालात पे रोना आया.. मनात रडू दाटून आलेलं असलं की त्याला निमित्तच पाहिजे असतं. मग कधी स्वत:वर, कधी परिस्थितीवर रडू येत असतं. या गजलचा एक शे’र आहे-
कौन रोता है किसी और की खातीर ऎ दोस्त
सबको अपनी ही किसी बात पे रोना आया

आपण इतरांची विचारपूस करतो,इतरांच्या दु:खाने आपण दु:खी होतो अशी आपली समजूत असते, केवळ समजूत. खरं म्हणजे,समोरचा माणूस आपलं दु:ख सांगताना आपण ते ऎकत असतो आणि आपण आपल्या तर्हेडने दु:खी होत असतो. स्वत:च्या बाहेर जायला तयार नसणारे आपण अशा रीतीने आपल्याच सुख द:खात मश्गूल होवून बसलेले असतो.
मोठ्या मनाची माणसं..त्यांचं सुख-दु:ख मात्र स्वत:पुरतं कधीच नसतं. त्यांनाही दु:ख असतं, पण त्यांचं दु:ख विस्ताराचं असतं. अपार करूणा भरलेली असली, की माणसाला रडू फुटतं ते अगदी वेगळ्या कारणामुळे. डॉ इक्बाल यांना रात्रीच्या चमचमणार्याम तार्यांतची शांतता,त्यांचं ते गप्प रहाणं फार अस्वस्थ करीत असतं.
रुलाती है मुझे रातों को खामोशी सितारों की
निराला इश्क है मेरा, निराले मेरे नाले है

रडणं हे वाईट,अशूभ असतं, ते नेभळ्या माणसाचं काम असतं असं सहसा म्हणल्या जातं. रडण्यापेक्षा हसत हसत संकटांना सामोरे जा-रडगाणं काय गात बसता असं रडणार्या वर वैतागणारे काही कमी नाहीत.
पण याला अपवाद प्रेमात पडल्यावरचा. प्रेमातलं सुख प्रेमातलं दु:ख त्यालाच कळतं, ज्याला त्या प्रेमाची झीज सोसावी लागते,जो स्वत:ला प्रेमात उगाळून घेत असतो. त्याला रडणं म्हणजे गैर आहे असं वाटत नसतं. उलट रडण्याचं तो समर्थन करीत असतो. त्याला सांगायचं असतं,की अरे बाबा,रडण्यामुळे तर माणूस धुवून निघतो,स्वच्छ होवून जातो.मोकळेपणाने रडायलासुध्दा आज कुणाला जमतं? उलट रडू आवरून,रडू लपवून माणूस कुढत रहातो, कुजत रहातो.
गालिब म्हणतो-
रोने से और इश्क में बेबाक हो गए
धोए गए हम ऐसे के बस पाक हो गए

धो धो रडून,आंघोळ केल्यासारखं स्वच्छ होवून जायची, पवित्र व्हायची कल्पनाच किती छान आहे. आणि प्रेम व्यवहारात सगळे राग लोभ,आशा निराशा, सुख दु:ख सांगून मोकळं होणारा माणूस… त्याचं रडणं जेवढं मोकळं असतं,तेवढंच त्याचं त्या रडण्यानंतरचं हसू… सूर्यप्रकाशासारखं निर्मळ असतं. हृदयनाथ मंगेशकर यांनी गालीबच्या या गजलला एवढी सुरेख चाल दिली आहे,लताने ही गजल एवढ्या निरागस आनंदाने म्हटली आहे, की-
रडण्याचा सुध्दा मोह पडावा…


please visit another  blog :       http://hasanyachaaakar.wordpress.com/

प्रेमातलं वेंधळेपण

प्रेम आंधळं असतं हे दुनियाला ठावूक आहे; पण प्रेम हे वेंधळंही ( किंवा वेंधळंच ) असतं याचे बरेच पुरावे आहेत. एक पुरावा पहा –

सरनामा मेरे नाम का और खत रकीब का
जालिम तेरे सितम  के है उन्वां अजब अजब
(सरनाम: -पत्रावरील पत्ता. सितम : जुलूम,अत्त्यचार .  उ न्वान : शैली,पध्दती
. रकीब : शत्रू,अर्थात प्रेमातला प्रतिस्पर्धी  )
…लिफाफ्यावर पत्ता तर माझा आहे. (त्याच्यामुळेच तर पत्र मला मिळालं ना ?) आणि आत उघडून पाहातो, तर काय ! च्यायला, ते तर माझ्या दुष्मनाच्या नावे लिहिलेलं ! म्हणजे,एकाच वेळेस दोन जुलूम झाले माझ्यावर- एक तर तिला दुसरा प्रेमी आहे हे कळालं  आणि आता ते पत्र वाचावं तर त्यातला मजकूर वाचता वाचता असं वाट्त आहे, की उन उन पदार्थ-अन तो पण तिखट आग !म्हणजे, ती भेटलीच समजा आणि समजा तिथेच तो ‘रकिब्या’ असला तर ती पाहणार माझ्याकडे अन बोलणार त्याच्याशी ?  वा रे वा !
पण हे असं वागणं वेंधळेपणाचं नाही का ? आधीच पत्राची वाट पहाणं म्हणजे अस्वस्थ करणारी बाब ; त्यात असं पत्र ?

मिर्जा गालिब आपल्या प्रेयसीच्या या वेंधळेपणाचा चतुराईने कसा उपयोग करून घेतो पहा –

जिस खत पे ये लगाई, उसका मिला जवाब
इक मुहर मेरे पास है, दुश्मन के नाम की
(मुहर :शिक्का,छाप ,सील )
म्हणजे वेंघळेपणाचा उपयोग-माणूस चतूर असेल तर किती चांगल्या तर्‍हेने करून घेतो पहा. रकीबच्या नावाचा शिक्का करून घ्यायचा,तो लिफाफ्यावर मारायचा अन द्यायचं पत्र पाठवून -आय लव्ह  यू ! आणि गंमत म्हणजे त्या पत्राला भरभरून उत्तर मिळालं की !

पण या दोनही शे’र मधून एक दुसरीच खबर मिळते. तिच्या वेंधळेपणाचा इथे संबंध नाही खरं म्हणजे; आणि अर्थात ते पत्र याला आहे, का याच्या रकीबला याचा ही संबंध नाही इथे. प्रेम कुणावर-याच्यावर का त्याच्यावर, छे!  नाही हो.

मुळात तिच्या मनात प्रेमच एवढं अपार भरून आहे, की ती पत्रातून धो धो व्यक्त होत असते. तिला काही तरी मनातलं लिहावं वाटतं, ती उत्तेजीत अवस्था मांडण्याची अनिवार ओढ आहे तिच्यात… मग तो वाचणारा कोण – हा मुद्दा किती किरकोळ -नाही का !

please visit another  blog :       http://hasanyachaaakar.wordpress.com/

मुबारकबादी !

 

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
***
वेदनेच्या भयाने विव्हळणारा माणूस पुढे भयाच्या वेदनेने विव्हळत रहातो असं कुण्या देशातल्या कुण्या भाषेतल्या माणसाने कुण्या काळात लिहून ठेवलेलं-अन् त्याचे प्रतिध्वनि माझ्या मनात उमटत जातात अन मी तपासाला लागतो- मी कशामुळे त्रस्त आहे…द:खाच्या काळजीने का काळजीच्या दु:खाने… एखादा मनोरूग्ण बसल्या बसल्याच थरथर कापावा,कण्हावा-कुंथावा तसं माझं मन दैनंदिन व्यवहारांच्या वर्दळीत उगीचच बाजूल होतं, उगीचच कण्हत रहातं.खरं म्हणजे, आत्ता-आत्ता काही घाबरण्यासारखं नसतं,काळजीचं नसतं.सगळं एका परीने आलबेल असतं.पण-

न राहे सख्त होती है,न मंजिल दूर होती है
मगर अहसासे-नाकामी,थका देता है राही को
( अहसासे-नाकामी : निराशेची भावना,पराभवाची जाणिव)

समस्या तेवढ्या अवघड नसतात.संकटं तेवढी घेरलेली नसतात.धैर्याने-धीराने तोंड दिलं, तर त्यातून सहज बाहेर पडूही शकतो…पण पडलो नाही बाहेर तर? …हा प्रश्न पाऊलच उचलू देत नाही ना. उत्साहाच्या ‘रिडींग’चा काटा झिरोच्या पुढे हटायलाच तयार नसतो की.
निराशेच्या,पराभवाच्या फाजील विचारांत गुंतून पडलं,की असं होतं. वाटतं,की शक्यच नाही,सगळीकडे अंधारच आहे.
पण हे सगळे मनाचेच खेळ. मन तशा विचारानं भारून गेलं,की शरीरावर मळभ साचणार.

आणि याच मनावर उत्साहाचा अंमल झाला-प्रकाशाच्या विचारांचा असर झाला,की ढगाची सावली जावून सगळ्या परिसरावर सोनेरी उन पडावं तसं शरीर मोहरून उठतं…

कुछ कफस की तिलीयों से छन रहा है नूर सा
कुछ फिजां,कुछ ताकते-परवाज की बातें करो
( कफस : सापळा,पिंजरा,देह.. नूर :प्रकाश. ताकते-परवाज : उड्डानाची इच्छा-शक्ती )

आणि खरंच,प्रकाशाचे स्वागत केले,की शरीर मनात तो उमटतोच उमटतो :

दिल रोशन,तेरा मन रोशन तो जहां ss रोशन !

Please visit another blog –http://hasanyachaaakar.wordpress.com

*******

 

 

 

शरीफ

फुलांसोबत काटे असतात,सुख-दु:ख सोबतीनेच असतं असं आपण म्हणतो, ऎकतो. पण फुलाचे-काट्यांचे परस्पर संबंध कसे असतात याचा क्वचितच विचार होतो. फुललेला चेहरा घेवून सगळ्यांना सदैव हसण्याचा संदेश देणारं फूल -त्याला मात्र सदैव संगत असते,ती काट्यांची. फुलाला स्पर्श करायला जावं,तर आपल्या बोटांना काटे रुततात. मग फुलांचं कसं होत असेल…त्यांना तर काट्यांचीच सोबत असते की. सदैव हसण्याचा फुलाचा संदेश हा जेवढा महत्त्वाचा;तेवढाच-किंबहुना अधिक महत्त्वाचा संदेश म्हणजे, नको असलेला,त्रासदायक असा तो सोबती-काटा; त्याच्या सोबतीने फूल गुण्यागोविंदाने रहातं… माणूस मात्र  माणसासोबत राहू शकत नाही.
फूल कर लेंगे निबाह कांटो से
आदमी ही न आदमी से मिले
– ‘खुमार’

खरं म्हणजे काट्यांचा हा त्रास फुलं सोसतात, त्याबद्द्ल तक्रारही करीत नाहीत; शिवाय चेहर्‍या वर समजूतीचं प्रसन्न असं ते हसू… त्यांना काय वाटत असतं काट्यांकडून होणार्‍या  छळाबद्दल ? ते का शिकायत करीत नाहीत काट्यांची ? काट्यांच्या त्रासाबद्दल फूल काहीच बोलत नाही, याचं कारण असतं फुलाचा सभ्यपणा. ते नुसतं हसरा  चेहरा घेवून जन्माला आलेलं नसतं,तर एक समजूतदार तबीयत घेवून ते वावरणारं असतं.काट्यांच्या उद्घटपणाकडे दूर्लक्ष करण्याइतका सोशीकपणा फुलाकडे असतो.  फुलाचा हा सभ्यपणा एका शायरला जाणवला. तो म्हणतो-
गुलोंने खारोंके छेडने पर सिवा खामोशी के दम न मारा
शरीफ उलझेंगे गर किसी से तो फिर शराफत कहां रहेगी
( खार : काटा )

ही शराफत. ही केवळ सभ्य रहाण्याशी संबंधीत नाही. सभ्य माणूस जाणून असतो. वाईटाला सरळ वाईट म्हणण्यापेक्षा  अशा वृत्तीचा आभ्यास त्याला आवश्यक वाटतो. म्हणूनच काट्यांचा बोचरेपणा फुलांना वेगळ्या तर्‍हेने  जाणवतो. काट्यांच्या त्या सवयीकडे क्षमाशील वृत्तीने फूल पहातं, आणि आपल्याला सांगतं-

बेकार शिकायत है कांटो से चमनवालों
चुभते है,तो ये उन की फितरत का तकाजा है

काट्यांच्या काटेरीपणा बद्दल शिकायत काय करायची? इश्वरानेच त्यांना ते रूप दिलं आहे. ती प्रकृती दिली आहे.
त्यांचा काय दोष… त्यांच्याशी निबाह करणं यातच आपली परीक्षा असते..

please visit another  blog :       http://hasanyachaaakar.wordpress.com/

तत्त्वाची थट्टा !

वर्गात शिकविणारे एखादे शिक्षक जरबेचे असतात.त्यांच्या विद्वात्तेचा,त्यांच्या शिकविण्याचा प्रभाव आपल्यावर असतो,त्यांच्याबद्दलचा आदर सदैव मनात भरून असतो. पण एक ढ आणि व्रात्य पोरगा आपल्या मनात सदैव मागच्या बाकावर बसलेला असतो.धडा समजून थेन्यापेक्षा न घेण्याकडेच त्याचा कल असतो. ..अतिरिक्त प्रभावाच्या दडपणापासून सुटका मिळविण्याची त्याची ही धडपड.समोरची मुलं अध्ययानात मग्न झालेली असताना,मागच्या बाकावरचा हा व्रात्य पोरगा अंगवळणी पडलेल्या त्याच्या सवयीत मश्गुल असतो-विडंबनाची त्याची सवय.
डॉ.इक्बाल यांची भरदार शायरी,भक्कम उपदेश,शब्दांतला तो दरारा त्याचबरोबर वर्गाताल्या मुलांबद्दल असावा, तसा ‘माणसा’बद्दल असलेला जिव्हाळा.त्यांच्या काव्याचा प्रभाव जीवनभर साथ देणारा. पण ते एवढ काव्य समजायला- पेलायला,’जज्ब’व्हायला आपली क्षमता तोकडी पडते की काय अशा भावनेचा अंमल कधी चढतो आणि मग त्याच वेळेस मनाच्या मागच्या बाकावर बसलेल्या त्या व्रात्त्य पोराच्या चाळ्यांकडे लक्ष जातं.
तरूण वयात तत्त्वांबद्दल-उपदेशांबद्द्लचं जे आकर्षण असतं,त्यात रोमांच असतो,तसा माझ्यातही होताच. त्याच दिवसांत डॉ.इक्बाल यांचे शे’र वाचून विलक्षण असा थरार मनात उमटायचा.त्या भरात,त्यांचे अवघड शब्दांचे अर्थ-अक्षरश: आक्रोड फोडून गर खावा,तसं शोधून घेवून समजावून घेतले-
तू ने ये क्या सितम किया मुझको भी फाश कर दिया
मैं ही तो एक राज था, सिना-ए-कायनात में

इक्बाल यांची ईश्वराबद्द्लची तक्रार मशहूर आहे. ईश्वराला उद्देशून ते म्हणतात, ‘ तू हा काय माझ्यावर अन्याय (सितम) केलास-मलासुध्दा प्रकट (फाश) केलंस !(जन्माला घातलंस !) या विश्वाच्या उदरातलं रहस्य म्हणून मीच होतो. (तू जन्माला घातलं नसतंस, तर विश्वाच्या रहस्याचाच एक भाग बनून मी राहिलो नसतो का?)

तरूणपणातल्या त्या दिवसांत जीवनव्यवहाराचे ट्क्के टोणपे खाण्यापूर्वीच मला या तत्त्वांचा परिचय झाला आणि कुशाग्र पोराच्या चेहर्‍यावर कधी मूढता वाढते, तसं झालं.तो-तो व्रात्य पोरगा.त्याच्या उच्छादाकडे लक्ष गेलं.त्याच्याबद्द्ल अजिबात तक्रार नसते. सत्त्याचं रूप थट्टेच्या अंगानं पाहिल्यावर हुशारीची ती अतिरीक्त मूढता कुठल्या कुठे पळून जाते. या शे’रची थट्टा मी नेहमीच ‘एंजॉय’करतो :

याच दिवसांत मला व्यंगचित्रं काढायचा छंद लागला होता. एकदा या ‘फाश’वाल्या शे’रसाठी मी एक व्य़ंगचित्र काढलं होतं- अंधाराची पार्श्वभूमी. रस्ता -त्यावर लाईटचा खांब,हॅट घातलेला बल्ब अन त्या प्रकाशात एक पोलीस एका चोराला हातकड्या घालून घेवून जातो आहे…नाराज झालेला तो  चोर, ( बहुदा इक्बाल यांचा वाचक असावा) हा शे’र ऎकवितो आहे त्या पोलीसाला !मध्य रात्रीचं वातावरण, अंधारात चोरी करून पळून जाणार्‍या त्या चोराला या पोलीसाने पकडून ‘प्रकाशात’आणले आहे,आणि चोराची ही नाराजी !
मी काढलेल्या या व्यंगचित्रामुळे मला त्या शे’रचा खरा अर्थ समजला,आणि कायम लक्षात राहिला.

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

घर

एका व्य़ंगचित्रात एक माणूस टेलिफोन बूथवरून फायर ब्रिगेडला फोन करून सांगतो आहे : तुम्हाला ताबडतोब सापडेल माझं घर- गल्लीतलं तेवढंच तर घर आहे,आग लागलेलं..
आपण रहातो,त्या घराचा पत्ता अशा तर्‍हेनं देणं यावरून आपलं अन घराचं नातं याबद्दल  एक गोष्ट लक्षात येते,ती म्हणजे आपली उपरोधाची तबियत. एका शायरने आपल्या प्रेयसीला घरी येण्याचं निमंत्रण देताना घराचा पत्ता असा दिला-
सारी बस्ती में फकत मेरा ही घर है बे-चिराग
तीरगी से आपको मेरा पता मिल जाएगा

( बे-चिराग : प्रकाश नसलेलं         तीरगी  : अंधार  )
‘गालिब’ ची प्रेयसी घरी भेटायला आली, तर गालिबला त्यावर विश्वासच बसेना. तिचं घरी येणं ही ईश्वराचीच कृपा आहे असं वाटतं त्याला अन त्याची अवस्था काय होते?
वो आए घर में हमारे,खुदा की कुदरत है
कभी हम उनको कभी अपने घर को देखते है

आपलं घर.. आपण चोवीस तास घरात रहातो, पण जेव्हा कुणी वेगळं माणूस घरात येतं,तेव्हा हेच आपलं घर आपल्याला वेगळं वाटत असतं. आपण त्या दुसर्‍याच्या नजरेतून आपल्या घराकडे पहातो, आणि घराचं एक वेगळं रूप आपल्याला जाणवत राह्तं…

अब तक न खबर थी मुझे उजडे हुए घर की
तुम आए तो घर बे-सरो-सामां नजर आया
(‘जोश’मलिहाबादी)
…तू घरात आलीस आणि लक्षात आलं माझं घर किती उजाड आहे…कसलंच सामान नाही घरात.

आपल्या या घरातल्या प्रत्येक निर्जीव वस्तू खरं म्हणजे आपल्याशी संवाद साधण्याच्या प्रयत्नात असतात. आपल्यालाच सवड नसते आणि म्हणूनच त्याची खबरही नसते. जिवाला जेव्हा लागतं,घरात जेव्हा आपण एकले असतो, तेव्हा आपल्याला घरातली प्रत्येक वस्तू जणू विचारीत असते, आपल्याला त्यांचं ते विचारणं जाणवत असतं-झोंबतही असतं…
घर की हर इक  शै पूछती है
कौन तुझको कर गया तनहा

…आणि मग एकलेपणा असह्य होतो. दारात उभं राहून तिच्या दिशेने आवाज द्यावा वाटतो,
तू जो आए तो इस घर को संवरता देखूं
एक मुद्दत से जो विरां है,वो बसता देखूं

please visit another  blog :       http://hasanyachaaakar.wordpress.com/

आयुष्याची लांबी

डॉ.इक्बाल यांनी म्हटलं आहे-

तू इसे पैमान:-ए-इमरोज व फर्दां से न नाप
जावेदां,पैहम रवां, हरदम जवां है जिंदगी
( पैमान: – मोजमाप,इमरोज : आज,   फर्दां : उद्या,   पैहम : निरंतर, र वां : प्रवाही )

दैनंदिन घटना, समस्या, काळजी ( आजाराची-मृत्यूची ?) अशा बाबीं कधी घ्रेरून येतात आणि मग गोमाशांनी एखादं जनावर त्रस्त होवून जावं तसं होवून जातं. काही खरं नाही गड्या.. असं वाटत जातं. कधी चिंतेचे एवढे काळे कुट्ट ढग जमा होतात, की वाटतं सरला आता खेळ सगळा, खल्लास ! हे खल्लास होणं केवळ शरीरानेच नाही तर अनेक अर्थांनी असतं. काही सुचत नसतं,संपून गेल्याची जाणिव अगदी रिकामं करून टाकीत असते.आयुष्याची निरर्थकता वगैरे तत्त्वांची आपण बडबड करीत असतो.  अशा वेळेस डॉ.इक्बाल सारखे विचरवंत आपल्याला समजावितात, की केवळ दिवस व रात्रीच्या फुटपट्टीने तू आयुष्याची लांबी-रूंदी मोजू नकोस…आयुष्य हे निरंतर आहे, प्रवाही आहे,सतत चालणारं आहे.

पण होतं असं, की हे पटून तर जातं मात्र मनात ती उदासी निर्थकता भरलेली असल्याने मनाला आलेला ओशटपणा काही जात नाही. हा ओशटपणा जातो, ते एखादं वडिलधारी माणूस जेव्हा तोच आशय सुरातून सांगतो, समोर येवून सांगतो तेव्हा. दिन और रात के हाथों नापी नापी एक उमरिया साँस की डोरी छोटी पड़ गई लम्बी आस डगरिया भोर के मन्ज़िल वाले उठ कर भोर से पहले चलते ये जीवन के रस्ते… ‘आशीर्वाद’ मधल्या या गीताचे गीतकार आहेत,गुलजार. दिवस-रात्रीच्या हातांनी हे आयुष्य मोजलं. श्वासाची दोरी तोकडी पडली. दीर्घप्रवास चालूच आहे… अशोक कुमारसारखा दिर्घ आयुष्याचा धनी, अभिनयाचा धनी हे सांगतो, आणि सांगता सांगता निघूनही जातो, तेव्हा आयुष्याचा हा प्रदीर्घ प्रवास आपल्याला जाणवत रहातो आणि दम खावून आपणही त्या प्रवासाची नव्याने तयारी करीत जातो. हे असं चालतच रहातं… डॉ.इक्बाल यांनी हे सांगितलं, ते 1938 मध्ये गेले ,तेव्हा गीतकार गुलजार  यांच्या आयुष्याची पहाट झालेली होती;त्यांचा जन्म 1934 चा.

 

please visit another  blog :       http://hasanyachaaakar.wordpress.com/

अहद की खुशियां…

हम अपने अहद की खुशियां खरीदते कैसे
हमारे पास पुरानी सदी के सिक्के थे

( अहद : क़ाळ,कारकीर्द, सत्ता )

हा शे’र वाचण्यात आला आणि सुरूवातीला सर्वसाधारणपणे शे’रचा मोह ज्या कारणामुळे पडतो, त्याच कारणामुळे या शे’रचा मोह पडला.’अहद’ – वर्तमान आणि ‘पुरानी सदी’ या परस्पर विरोधी शब्दांचा संकोच (स्पार्किंग?) हे ते कारण. पुढे अर्थाच्या नादाला लागलो.आजच्या जमान्यातली खुशी -आनंद आम्हाला खरेदी कसे करता येणार…आमच्या हाती तर जुन्या जमान्यातली-आता बाद झालेली नाणी आहेत.

म्हणजे, आज काळ बदलला आहे.रिती-रीवाज,मान-अपमान,सभ्यता,रहन सहन याबाबत सगळेच नियम,संकेत -ते मागचे,राहिले नाहीत. किंवा ते एवढ्या झपाट्याने बदललेले आहेत,की कालची गोष्ट आज जुनी झालीय.रद्द झालीय. आज तुम्हाला जगायला हवं, तर आजचंच चलन हवंय,नाही का? (‘नाही का?’ असं आपण म्हणतो-‘जुन्या नाणी’ वाले; आजचे लोक विचारतात-‘माहिताय का?’ )

तर गडबड अशी झाली आहे, की मागच्या पिढीला ही जाणिव झाली आहे,की आमच्याकडे आमच्या पिढीच्या संवेदना आहेत;त्या संवेदना घेवून आम्ही आनंदाची खरेदी करण्यासाठी आजच्या पिढीच्या बाजारात फिरलो आणि हात हलवीत परतलो. आज ती उत्कटता नाही, ती सवड नाही,त्या संवेदना नाहीत,श्रध्दा नाहीत. म्हणून आम्हाला खुशियां लाभल्या नाहीत.

पण गंमत अशी,की तुम्हाला खुशियां पाहिजे असतील तर तुम्ही आजच्या युगानुसार तुम्हाला दुरूस्त करून घ्यावं नाही का लागणार ? जुनी नाणी  ‘एक्स्चेंज’ करून रूपांतरीत करून घ्यायला काय हरकत आहे ? आपला ताठा आणि हट्ट सोडला,तर आजच्या युगातल्या आनंदाचे क्षण आपल्याला स्वस्तात मिळतील.

पण आणखी एक गंमत अशी आहे, की ‘पुरानी सदी के सिक्के’, जे आपण मनात बाळगतो, ती नेमकी कोणती सदी असते? आपल्याकडे खरेदीसाठी जी नाणी आहेत, त्याचा  नेमका कोणता ‘जमाना’ असतो?

आपल्यापुरतं सांगायचं झालं, तर आपल्याच वयाची ही सदी असते. आपलं वय काय असतं- सत्तर एक वर्षं. तर ही जाणिव वयाच्या अंतीम ट्प्प्याला थोडीच होते- ती होते  अर्धं वय ओसरल्यावर; म्हणजे, पन्नाशीला आल्यावर. त्यातून ‘नासमझीची’ पंचवीस वर्षं काढली, तर किती उरणार- पंचवीस. मग ते तर वय ‘चालू’ असतं, ‘काळ’ ही चालू असतो. आपण त्या काळातली नाणी घेवून त्याच काळातल्या खुशियां खरीदलेल्याही  असतात; मग ती पंचवीस वर्षंही वजा केल्यावर पुरानी सदी ही  कुठे रहाते? नेमकी कोणती सदी म्हणावी ही ?

मला वाटतं,ही पुरानी सदी म्हणजे, मनातले आपले पूर्वगृह; आपण बाळ्गून असलेले संकल्प,अपेक्षा, इच्छा- आपल्या,अशा. या बाळगलेल्या भावना,या संवेदनांची नाणी घेवून आपण आज बाहेर जातो आणि पूर्वगृह बाळगून वावरणार्‍या माणसाच्या वाट्याला काय येतं ? त्याच्या चेहर्‍यावर कधी हसू नसतं- तणाव असतो, हा तर सार्वत्रीक अनुभव  असतो. अपेक्षा ठेवून वागणार्‍या-बोलणार्‍या माणसाचे व्यवहार शेअर्सच्या गुंतवणूकीइतकेच जोखिमीचे !

बद्द झालेली नाणी आणि (पूर्वगृहांनी) बध्द झालेलं मन अशा मनाला ‘खुशियां’ बहाल होणं अशक्य असतं.
जुनी पिढी-नवी पिढी नाते संबंधातले व्यवहार यामुळेच फायद्याचे रहात नाहीत.

….कधी बाजारात,कधी समारंभात,कधी एखाद्या छायाचित्रात किंवा जाहिरातीत एखादा हसरा वृध्द दिसतो… मुलांसोबत,सुनांसोबत;नातवांसोबत -नातेवाईकांसोबत तो हसत असतो,बोलत असतो. त्याच्याकडे पाहून असं वाटतं, की त्या वृध्दाला ही खुशी लाभली आहे-तो आपल्याला सांगत आहे,

पुरानी सदी के सिक्के लेकर हमने
अपने अहद की खुशियां संवार ली है

please visit another  blog :       http://hasanyachaaakar.wordpress.com/

रागातलं सुंदरपण

मुझको गुस्सा दिखाया जाता है
तबस्सुम को चबाया जाता है
प्रेयसीला प्रेयसीपण बहाल व्हायच्या आधीची अवस्था मोठी विचित्र असते. नायकाचा ,प्रियकर पदाचा ‘शपथविधी’झालेला असतो. पण ती तयार नसते. आणि तिला राजी करून घ्यायचा-प्रियकराचा तो कठीण काळ ! न पहाणं,प्रतिसाद देणं, यानंतर मग उतावीळ झालेल्या त्या नायकावर राग व्यक्त करणं,चिडणं आणि रागावणं असं तिच्याकडून होत जातं अन त्याला त्या सगळ्याची कमालीची मजा येत जाते.

मिर्झा गालिबचा एक शे’र आहे-
कितने शिरीन है तेरे लब के रकिब
गालियां खा के बे मजा न हुवा

शिरीन म्हणजे गोड आणि रकिब म्हणजे दुश्मन.शत्रू. इथे तिला-ती त्रास देते आहे,रागावते आहे म्हणून रकिब म्हटलेलं आहे.
हिदी चित्रपटात तर सरसकट म्हणता येईल असे प्रसंग तर हमखास असतात. नयिकेची ओळख,तिच्याशी लगट करताना होणारी चकमक आणि तिचा राग-संताप मोठा पहाण्यासारखा असतो. आणि सुंदर असलेली नायिका जेव्हा रागात येते- डोळे वटारते,ओठ मुडपते तेव्हा ती केवढी सुंदर दिसते ! तिच्या रागाचा उलटा परिणाम होवून नायकाला तिची चक्क भुरळ पडून जाते.
‘दिल ही तो है’मध्ये मुकेशने गायलेल्या गाण्यात या रागाच्या सौंदर्याचं किती छान वर्णन केलंय पहा-
गुस्से में जो निखरा है,उस हुस्न का क्या कहना
कुछ देर अभी हमसे, तुम यूं ही खफा रहना
या गाण्याचे गीतकार आहेत साहिर लुधियानवी. गद्यप्राय रचना हे त्यांच्या गाण्यांचं वैशिष्ट्य. अशा गाण्यांना चाल लावणं अत्यंत कसरतीचं असतं, पण संगीतकार रोशननं साहिरच्या अशा अनेक अवघड रचनांना मोहक चाली देवून त्या वाकवून दाखविल्या. याच गाण्यातल्या शेवटच्या ओळीतली कल्पना किती सुरेख आहे पहा-
पहले भी हसीं थीं तूम,लेकिन ये हकिकत है,
वो हुस्न मुसिबत था,ये हुस्न कयामत है

रागातलं हे सुंदरपण आणि कुणाचं- नूतनचं. वा! ‘दिल्ली का ठग’ मध्ये नूतनची छेडछाड किशोर कुमार करतो
आणि त्यामुळे नूतन तर वैतागून जात असते…आपल्याला मोह पडत असतो.

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

फायदे से फायदा…

एकदा माणसाच्या लोभीपणाबद्दल बोलताना,मित्र वैतागाने सांगत होता-‘अरे,माणसाचं काही खरं नाही. बेडवर अगदी मरायला टेकला असला, अन समजा फर्शीवर चिल्लर पडली,
तर पटकन उठून पाहील-कुणाचे पैसे पडले!’
ही माणसाची अत्यंत स्वाभावीक प्रकृती. ती लोभीवृत्ती असेलच असे नाही. मात्र एवढे खरे,की काही हातचं सुटू नये, नुकसान होवू नये, लाभाचेच व्यवहार असावेत अशी त्याची आणखी एक स्वाभावीक तबीयत. पैसे पडल्यावर पटकन पाहणं (आपले तर नाही पडले?),हा मनापेक्षा शरीराच्या सवयीचा भाग म्हणता येईल- तोंडासमोर अचानक आवाज झाल्यावर पापण्यांची उघडझाप व्हावी तसा. पण फायदा हुंगणार्‍यांचं तसं नसतं. त्याचं सदैव लक्ष असतं लाभाकडे. प्रत्येक व्यवहारात,प्रत्येक कृतीत,कुणाशीही संबंध ठेवायचा झाल्यास त्याच्या मनाचा मुनीम आधी विचारतो- यातून तुला काय मिळणार आहे? विनाकारणच की…मग असा माणूस प्रेम कसं करणार ? कारण प्रेमात तर त्याच्या हिशोबाने नफा कमी (क़िंवा नफा नाहीच) अन गुंतवणूक तर केवढी- वेळेची, पैशाची, शरीर-मनाची !
‘फिराक’गोरखपुरीच असावेत बहूतेक; त्यांनी अशा माणसांना एक प्रश्नच विचारला आहे-
पूछते हैं,फायदा क्या इश्क से
पूछिए,क्या फायदे से फायदा

खरंच,प्रत्येक गोष्टीत लाभ शोधणार्‍याने  असा कधी विचार केला असावा का,की लाभाचा काय लाभ असतो बरं… लाभ-हानीच्या विचाराने मनाला जो ओशटपणा आलेला असतो,त्यामुळे वेगळा विचार निसटून जात असतो. कळत नसतं. एकदा का हे मन स्वच्छ होवून गेलं तरच ते सगळं-ते सगळे व्यवहार शुभ्र होतात. नफा-नुकसानीपेक्षा वेगळं असं काही व्यवहारात असतं हे कळायला लागतं. केव्हा –प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येतेच येते. सुख-दु:खाचे अनुभव घेवून त्यातून निवृत्त होताना मनाची उभारी तर असते,पण त्या तशा भावना काहीशा बालिश वाटत असतात. (कारण सुख-दु:ख असं ज्याला तो म्हणत आलेला होता,ते फारच जुजबी होतं,किंवा फार जुजबी लाभ-हानीच्या मुद्द्यांत आपण जीव गुंतविला होता,हे त्याच्या ध्यानात यायला यायला लागलेलं असतं)
अशा माणसाच्या मनात मग सकाळचं सोनेरी उन ओसरीवर पडावं तसा विचार येवून जातो-
हर चीज का खोना भी बडी दौलत है
बेफिकीरी से सोना भी बडी दौलत है

पैशाच्या साठ्यावर लक्ष असलं,तर साठा होतो पण मनाची एक बाजू बधीर` होवून जाते;ती म्हणजे संवेदनेची. अशा माणसाचा आवाजच मोठा होवून बसलेला असतो. मग असा माणूस सहानुभुती दाखवितो तेव्हा, मदत करतो तेव्हा ‘मी करतो’चा तो आवाज असतो. आस्था,संवेदना,सह-अनुभुती,संवाद असं काही जर माणसात राहिलं नाही,तर ,मग आर्थिक सुबत्ता काय कामाची? आपले आडाखे नेहमी बरोब्ररच असायला पाहिजेत, आपल्याला नुकसान शक्यच नाही असं वाटणार्यााला नियतीचा विसर पडलेला असतो. कलावंताला अशा ‘फायदेदार’माणसाची करूणा वटत असते.मग तो कलावंत अशा माणसासाठी ईश्वराला साकडं घालतो-
दो और दो का मेल हमेशा चार कहां होता है
सोच समझ वालों को थोडी नादानी दे मौला…

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

गरज

परस्परांवरचा विश्वास कमी झाला, की पहिलं नुकसान होतं,ते निर्मळ हसू-मोकळी थट्टा निघून जाण्याचं. चेहर्‍यावर सदा संशय, तणाव,राग मुक्कामाला येतात. परस्परांचा द्वेष व्हायला सुरूवात होते.अशात कुणी थट्टाही केली,तर ऎकणारा प्रतिसाद द्यायच्या ऎवजी शंका घ्यायला सुरूवात करतो- याने असं का म्हटलं? याचा हेतू आपली टिंगल करण्याचा आहे, की काय वगैरे… हसणं हरवून बसलेला समाज कलहाकडे वळतो. कटकटी-समस्यांनी घेरून जातो. एखाद्या कलावंताला या सामाजीक परिस्थितीची जाणिव होते;त्याला त्याचं महत्त्व कळतं, तो निदान करतो-
लोग तारीक के औराक में कल ढूंढेंगे
कौन से दौर में इन्सा को हसी आई थी
( माणूस कोणत्या कालावधीत हसला असावा बरं, याचा शोध उद्या इतिहासांची पानं ढूंडाळून घ्यावा लागेल !)
खरंच आज जर माणूस हसण्यापेक्षा विनोद कोण केला आहे,त्याचा हेतू काय तो कोणत्य समाजाचा आहे,त्यातून आपल्या धर्माला-आपल्या नेत्याच्या प्रतिमेला धक्का बसला काय हेच जर शोधू लागला, तर हसणं कुठे राहिल? द्वेषाने कडू कडू झालेली माणसं आज दिसतात ते याच भावनांच्या प्रभावामुळे. म्हणून आज गरज आहे हसण्याची. निर्मळ होवून रहाण्याची. पण या हसण्याच्या नादाला लागून थोडा धोका होवू शकतो,त्यापासून आपण सांभाळायला पाहिजे-
हसो,के आज हसी की बहूत जरूरत है
मगर किसी के लबों से न छीन कर लावो
….

दुसर्‍याला दु:ख देवून मिळविलेलं हसू विषासारखं असतं.

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

संवेदनांचा अंमल

हवेची हलकीशी झुळूक असते.तसं पाहिलं तर तिचं अस्तित्त्व ते काय-महत्त्व काय-काहीच तर नाही की. कसल्याच जड वस्तूंना या झुळका जाणवतही नसतात, त्यांना पत्ताही लागत नसतो.
पण शेतातली डुलणारी रोपं-गहू,साळ किंवा मोहरीची रोपं जेव्हा आपल्या बहराला घेवून उभी असतात,त्यावेळी हवेची झुळूक त्यांच्यावरून गेली,की पाहता पाहता सगळ्या रोपांचा एकत्रित पिसारा होतो,डुलायला लागतो.त्यांच्या त्या हलण्या डुलण्यात ना शब्द असतात,ना स्वर असतो. एक तेवढी लहर सगळ्या रानावरून फिरते अन सगळ्या पिकावर मोहोर उठतो,रोमांच उठतात. कसल्याही’बाह्य’ घटनेशिवाय होणार्याक या हालचाली,ही अस्वस्थता.
आतूरलेल्या मनांचंही तसंच असतं. त्यांना ना शब्दांची गरज ना संवादाची आवश्यकता असते. त्याशिवाय कधी स्थिती अशी येते,की ना शारीर-जवळीकीची मुभा असते ना साद प्रतिसादाचं स्वातंत्र्य असतं. अशावेळी सूक्ष्म संवेदनांची लहर येवून जाते अन केवढी अंदोलनं निर्माण होतात !

बज्म-ए-अगियार में हरचंद वो बेगाना रहे
फिर भी हात मेरा आहिस्ता दबा कर छोडा
चार लोकांसमोर ओळख दाखविता येत नाही. नजरेनेसुध्दा काही सूचीत करता येत नाही,सगळ्यांचं लक्ष असतं. अशा वेळेस सगळ्यांशीच हात मिळवणी करता करताच आपल्या माणसाने आपल्याशी हात मिळविताना, तो हलकासा दाबून धरल्यावर संवेदनांचं जे आदान-प्रदान होतं- त्याची खबर कुणालाही नाही,ही जाणिव आणि संवेदनांचा तो ‘निरोप’ यामुळे सगळ्या शरीरावर केवढे रोमांच उठतात… पण उदासीच्या संवेदना फार अस्वस्थ करणार्‍या असतात-

वक्त-ए-रुखसत,’अल्विदा’लफ्ज कहने के लिए
वो तेरे नाजूक लबोंका थरथ्रराना याद है…
निरोपाची ती सगळी भावना शब्दांपेक्षा थरथरणार्‍या  ओठांत जी समावलेली होती, ती कायम मनात कोरून ठेवलेली असते.
असा निरोप फार बेचैन करून जात असतो. आपण निघून तर गेलेलो असतो,पण निघताना संवेंदनांचं जे आदान प्रदान झालेलं असतं, त्यामुळे ताटातूट होण्यापेक्षा माणूस एकजीव होवून जातो.
…आणि अशा एकजीव झालेल्या माणसाचं कशात म्हणता कशातच लक्ष लागत नाही…

हर मंजिले-हयात से गुम कर दिया मुझे
मुड मुड के राह में वो तेरा देखना मुझे


Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

दिल की त’आसिर.

क़ॅनडा येथे अंतरराष्ट्रीय प्रदर्शन व्हायचे,त्या प्रदर्शनातले हे एक परकीय व्य़ंगचित्र. साध्या रेषांनी इथे एक माणसाचा आकार तयार झालेला आहे. हा माणूस धावतो आहे. याच आकाराच्या मध्ये आणखी एक आकार आहे, तो माणसाचाच आहे, तोही धावतोच आहे-मात्र उलट्या दिशेने धावतो आहे. त्याच्यातही एक माणूस-धावणारा;पण तो सुलट्या दिशेने…
शरीराच्या आकाराकडे थोडं थांबून ( म्हणजे आपण !) पाहिलं,की लक्षात येतं,हा एकच माणूस आहे. शरीराने एका दिशेने,तर मनाने दुसर्‍या दिशेने धावणारा. परस्पर विरोधी विचार-भावनांचा कल्लोळ बाळगून अस्थीर झालेला माणूस…आपण सर्वजण.
म्हटलं तर ही समस्या,म्हटलं तर ही प्रकृती. या स्थितीकडे गमतीनेही पहाता येतं,गांभीर्यानेही. डॉ.इक्बाल आणि मिर्झा गालिब;उर्दू शायरीतले हे महान कवी. माणसाच्या मनतली चलबिचल अस्वथता,याचा शोध घेवून अर्थ लावणारे डॉ.इक्बाल,तर ती स्थिती स्विकारून त्याकडे गमतीने पहाणारा गालिब.
डॉ.इक्बाल म्हणतात

ढूंडता फिरता हूं मै ऎ ‘इक्बाल’अपने आपको
आप ही गोया मुसाफीर,आप ही मंजील हूं मै
( गोया : जसं काही…)

… आणि मिर्झा गालिब चा शे’र आहे-

खुदाया ! जज्बा-ए-दिल की मगर त’आसिर उलटी है
के जितना खेंचता हूं,और खिंचता जाए है मुझसे
( जज्बाए दिल :ह्रदयाचे आकर्षण,प्रेम तासीर : गुणधर्म, प्रभाव )

…काय सांगावी या प्रेमाची गंमत ! सगळंच उलटं होतं आहे, इथे. तिच्यापासून दूर जाण्याचा मी जेवढा प्रयत्न करतो आहे, तेवढाच ओढ्ल्या चाललो आहे की तिच्या कडे !

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

एखाद्या कलावंताची निर्मिती त्याने(अन त्यानेच )मांडली तर त्याच्या सांगण्या-बोलण्या-वागण्याला एक सूर येतो;त्याला हवा असणारा.त्याला अभिप्रेत असणारा सूर. पण त्याची निर्मिती इतरांकडून अभिव्यक्त झाली तर…. वानरीचे मूल तिच्या हातून दुसरी वानरी हिसकावून घेते;त्याचा लाड-प्यार करतानाच तिसरी वानरी ते मूल तिच्याकडून हिसकावून घेते-गोंजारण्यासाठी, कुरवाळण्यासाठी.अशा तर्‍हेने  वानरीचे ते मूल झाडावरच्या अनेक वानरींकडून प्रेमाने,कौतूकाने हाताळल्या जातं.कुरवाळल्या जातं.
कलावंताची निर्मिती ही अशीच. विशेषत: त्याची गीत रचना. शब्दांमध्ये जादू बांधून तो कलावंत निघून गेलेला असतो आणि वेगवेगळ्या पिढीतला माणूस, स्त्री, गायक, संगीतकार, वादक असे कितीतरी जण ते शब्द घेवून मिरवीत असतात. आपल्या भावना, आपली सुख दु:खं,त्या शब्दांच्या आधारे जुळवून घेत रहात असतात. सुख दु:खाचे स्वरूप तेच असले तरी, पिढी निहाय, वयनिहाय्,स्वभावनिहाय त्या सुख दु:खाची अभिव्यक्ती विविध तर्‍हेने  होत जाते आणि आपण जरा बाजूला उभं राहून पाहिलं,तर या मिरवणूकीचा वेगळा असा अनुभव आपल्याला लाभतो.
मोठ्या कवींच्या रचना हे त्याचं ठळक उदाहरण. मिर्जा गालिबची एक गजल आहे-
आह को चाहिए इक उम्र असर होने तक
कौन जीता है तेरी जुल्फ के सर होने तक

(आह… एक इच्छा-साधी उसाशाएवढी;पण ती ‘असरदार’होण्यासाठी-परिणामकारक होण्यासाठी एक आयुष्य खर्ची घालावं लागतं,असं माझं नशीब;मग तुला वश करून घेण्यासाठी-तेवढा कालावधी माझ्या आयुष्यात कुठे आहे…शिवाय-
हम ने माना के तगाफुल न करोगे लेकिन
खाक हो जाएंगे हम तुमको खबर होने तक
(मान्य आहे,तू मला नाही म्हणणार नाहीस;पण माझ्या प्रेमाची जाणिव तुला होईपर्यंत मी खलास होवून जाईल,त्याचं काय !)
आता गंमत पहा, ही गजल ‘मिर्जा गालिब’या मालिकेत जगजीत सिंहने कशी पेश केली आहे,आणि हिच गजल ‘मिर्जा गालिब’या चित्रपटात( वर्ष: ) सुरैय्याने कोणत्या ढंगात पेश केली आहे. मग गमतीचा प्रश्न असा पडतो,की गालिब आज असता,तर तो कुणाच्या बाजूने राहिला असता-विशेषत: या शे’रच्या संदर्भात-
गमे-हस्ती का ‘असद’,किससे हो जुज मर्ग इलाज
शमा हर रंग मे जलती है सहर होने तक
( दु:खाच्या आयुष्याला इलाज आहे तो केवळ मृत्यूचाच. (त्या मृत्यूची) सकाळ होईपर्यंत शमा वेगवेगळ्या रंगात-ढंगात जळत रहाते-नाही,त्याशिवाय तिला दुसरा उपाय तरी कुठे असतो..)
जगजीत सिंहचा तो गंभीर स्वर, गांभिर्याने,सावकाश गायलेली ही गजल आणि सिनेमातली ती तवायफ-सुरैय्या;तिने याच गजलला दिलेला खेळीमेळीचा, समजूतीचा फुलोरा… शब्द तेच,आशय तोच; पण अभिव्यक्तीच्या तर्हाा वेगळ्या,
रंग वेगळे.( अर्थात इथे नसरूद्दीन शहा,सुरैय्या यांच्या अभिनयाचा-चित्रीकरणाचा मुद्दा विचारात घेतला नाही,ती अभिव्यक्ती हा आणखी स्वतंत्र आणि मह्त्त्वाचा भाग आहे)

जाता जाता : ‘लोलक’ हा शब्द ‘लोला’पासून तयार झाला असावा. ‘लोलक’म्हणजे, दागिण्यातला लोंबता मणी;आणि ‘लोला’म्हणजे, घंटेमधला लंबक. भक्ताच्या सुख दु:खाची तीव्र-कोमल अवस्था,मंदिरात प्रवेश करताना, त्याच्या हातून-घंटेच्या नादस्वरातून जाहीर होत असते.
एखादी गजल, गाणारा-सांगणारा-अभिव्यक्त करणारा,आपल्या तर्हे’ने जेव्हा सादर करतो, तेव्हा-गजल तीच असते पण- त्या गजलमधले ध्वनी तसतशा तर्‍हेने उमटत जातात- आपल्या मनाच्या गाभार्‍यात…

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com