हिमतीचा माणूस वेगळ्या अशा रुपाचा असतो. मरगळ, कंटाळा,न्यूनत्त्व अशा गुणांची धूळ त्याच्या चेहर्यावर कधीही नसते- अगदी स्नान केलेलं नसलं तरी, दीर्घ प्रवासाहून परतलं तरी. हिमतीच्या माणसाच्या वागण्या बोलण्याची तर्हाही निराळी असते. सामान्य माणसासारखा तो हेतूंनी लडबडलेला नसतो. सर्वसामान्य माणूस ईश्वरापुढे झुकतो,ते सहसा स्वत:ची शिफारस करण्यासाठी. स्वत:साठी काही मागण्यासाठी. पण हा हिमतीचा माणूस – तो भक्त असतो, ईश्वरावर त्याची श्रध्दा असते. मग तो सर्वसामान्यांपेक्षा वेगळा कुठे असतो ?
सिजदों के एवज फिर्दौस मिले, ये मुझे मंजूर नही
बेलौस इबादत करता हूं, बंदा हूं तेरा मजदूर नही
( सज्द :- डोके टेकणे, मस्तक नमविणे .फिर्दौस : स्वर्ग . बेलौस : नि:स्वार्थी,अपेक्षा न ठेवणारा )
ईश्वरापुढे झुकून त्याची प्रार्थना करतानाच ईश्वराला ठणकावणारा असा भक्त पाहून क्षणभर ईश्वरही गडबडून जावा.
माणसाला जगण्यासाठी काय काय करावं लागतं,काय काय मिळवावं लागतं ! त्याच्या एकट्याच्या हातून होत नसलं, मिळविता आलं नाही की तो दुसर्याची मदत घेतो. ईश्वर हा त्यासाठी सर्वात जवळचा. त्याला मागाय़चं आणि संसार चालवायचा,एवढं सोपं काम.
पण हा हिंमतवाला निडर माणूस. त्याला गरजा असतात, पण तो शर्मिंदा नसतो. पाहिजे त्या गोष्टी मिळविण्याचे दोन मार्ग असतात-एक लाडीगोडीचे, दुसरा मार्ग हिमतीचा. हिंमतवाला माणूस सांगतो-
बंदगी से नही मिलती, इस कदर जिंदगी नही मिलती ( बंदगी : प्रणाम,पूजा, गुलामी )
लेने से तख्तो-ताज मिलते है,मांगने से भीक भी नही मिलती
आपल्या आयुष्याचे जबाबदार आपण आहोत.आपणच आपलं भलं कमवायचं असतं. हे जगणं काही प्रार्थना करून मिळत नसतं.
वो खुद अता करे,तो जहन्नुम भी है बहिश्त
मांगी हुवी नजात मेरे काम की नही
( अता :प्रदान . बहिश्त : स्वर्ग. नजात : मोक्ष,मुक्ती,सुटका )
असा माणूस.हिमतीने वागणारा-बोलणारा-वावरणारा. त्याच्याबद्दल पहाता क्षणी वाटून जातं, की हा उर्मट आहे,उध्दट आहे. हे असं वाटायचं कारण,अभिमान आणि अहंकार यातली तफावत आपण लक्षात घेतलेली नसते. ( आपल्या हिशोबाने नेहमीच,’आपला तो अभिमान,दुसर्याचा तो अहंकार! ‘ असा व्यवहार असतो. ) हिमतीचा माणूस उध्दट नसतोच. काळा-गोरा,कुरूप-सुरूप कसाही असला,तरी हिमतीच्या माणसाचं देखणेपण हजारात उठून दिसणारं असतं. कारण त्याच्या चेहर्यावर आत्मविश्वासाची झळाळी सदैव असते.
अहसास-ए-अमल की चिंगारी,जिस दिल में फरोजां होती है
उस दिल का तबस्सुम हिरा है, उस दिल का तबस्सुम मोती है.
( अहसास-ए-अमल : आत्मविश्वास. फरोजां : प्रज्ज्वलीत,प्रकाशमान. तबस्सुम : हास्य )
अशा माणसावर तर ईश्वरही फिदा असतो. म्हणून तर कहावत प्रसिध्द् आहे-
हिंमते-मर्दा,मददे-खुदा !