मधुमेह हा असा आजार असतो, जो एकदा का उद्भवला,की आयुष्यभर कमी होत नाही. कितीही औषधोपचार करा,काहीही करा- समूळ नष्ट होणार नाहीच. मधुमेह नुकताच ‘डिटेक्ट्’झालेला माणूस आणि मधुमेहात रुळलेला माणूस,दोघांत एक मजेदार फरक असतो : नवीन मधुमेही स्वत:च्या सुतकात किमान महिनाभर तरी असतोच असतो. स्वत:चा मातम (शोक) करताना अर्थात त्याला आयुष्याच्या ( म्हणजे आपल्या )संक्षेपाची जाणिव एवढी तीव्रतेने होत असते, की काही विचारू नका.
सुतक सरल्यावर मग तो सावरतो. आजकाल बर्याच लोकांना हा आजार असतो, आपल्याला तर जास्त नाही,आपण व्यायाम करू,आहार नियंत्रण करू काही प्रॉब्लेम नाही असं बजावून मग ‘जगायला’लागतो.मनात सतत शुगरची जाणिव असते. जशी शरीरातून ही शुगर जातच नसते, तसंच मनातूनही ही शुगरची जाणिव कधी हरपून नाही जात.
शरीर जसं शुगरसाठी अनुकुल होवून गेलेलं असतं-अन शुगर होते, मनाचंही अगदी तस्संच असतं. लहानपणापासून मोठेपणापर्यंत नातेवाईकांचा-मित्रांचा सहवास आपल्याला असतो. त्यांच्याशी संबंध ठेवताना कधी घट्ट,मैत्रीपूर्ण असे संबंध ( गोड,गुळचिट्ट) झालेले असतात,तर कधी भांडंण होवून संबंध खलास झालेले असतात. या खलास झालेल्या संबंधाबद्द्ल आपल्याला ना खंत असते ना वैताग.आणि एका तर्हेने पाहता, ते ठीकही आहे.
खरी अडचण आपली होते,ती मैत्रीपूर्ण संबंधात बाधा आल्यावर. वयाचा परिणाम म्हणा, कंटाळा म्हणा…नाही, खरं म्हणजे एकमेकाबद्द्लचा विश्वासच तो… अचानक- का कोण जाणे (?) खल्लास होवून जातो, आणि मैत्रीपूर्ण संबंधात-नातेसंबंधात शुगर ‘डिटेक्ट’ होते. ही शुगर भांडणाची नसते, वैर नसतं त्यात. त्यात असते एक प्रकारची उदासी, एक प्रकारचा कंटाळा. कधी काळी जो आपल्या अगदी निकटचा असतो, ज्याच्याबद्द्ल आपल्याला अत्यंत जिव्हाळा असतो, तो आता नकोसा होतो..का बरं… आपला अहंकार कारणीभूत असतो का त्याला, का आपलं वय, का आपली परिस्थिती, का आपल्या बदलत गेलेल्या आवडी निवडी,आस्थाविषय, का आपल्या सवयी….का आपली अनुवंषिकता-मूळ स्वभावच… शुगर होण्यासाठी जेवढी कारणं, तेवढीच कारणं-हे मैत्रीसंबंध आटून जाण्यासाठी.
मग काय राहून जातं आता या मैत्रीत ? वैर तर नसतं,संबंध तोडून टाकण्याइतपत. आणि मैत्री-छे! ती तर शुष्क झालेली असते.काही केल्या ती मैत्री,ते संबंध जुळत नसतात. मग शुगर ‘मेंटेन’ करणंच जसं आपल्या हाती असतं,तसंच इथेही होवून जातं. मैत्रीसंबंध-नाही, संबधच केवळ जसे आहेत-तसेच ठेवून रहाण्याचे. ..एवढंच आपल्या हाती असतं…
तिर्हाईत तर्हेने विचार केला तर (आणि तिर्हाईत तर्हेनेच विचार केला तर ) या प्रकृतीतली सर्वात दु:खदायक बाब कोणती असेल तर ही, की आपल्याला या उदासिनतेचं दु:खच होत नसतं ! कसलीच संवेदना उरली नसते. शुगरची प्रकृती जशी माणसाला वातड करून टाकते, तसंच मनही वातड होवून जातं.
काशान: …मोठा सुरेख शब्द आहे उर्दू भाषेतला. घर,झोपडी/काचेचे घर (श्रीमंतांचे हिवाळ्यात रहाण्याचे)/घरटे असे अर्थ आहेत या शब्दाचे. एका शायरने सांगितलं आहे-
खिजां के बाद जरूर आएगी बहार मगर
उजड के बस ना सकेंगे दिलों के का’शाने.. ( खजां : पानगळ )
पण या नातेसंबंधातल्या शुगरचा आजार कमी होण्याची एक शक्यताही आहे बरं…त्याचीच चूक आहे, माझ्या मनात तसं काही नाही-नव्ह्तं, उगिच्या उगिचंच बोलत नाही तो,अशा बाष्कळ बाता काही कामाच्या नसतात;यातून आपला मूर्खपणाच जाहीर होत असतो,मूर्खपणा ! नातेसंबंध , माणूस-माणूसपण याबद्दल आपल्या संवेदना जेवढ्या तीव्र-तीव्रतर होत जातील त्या प्रमाणात मूळ चर्चा,मूळ उत्साह, मूळ जिव्हाळा,मूळ आस्था (ते पूर्वीचे उबदार दिवस..)पुन्हा मनात उगवेल. ( खरंच,उगवेल का…)
Read Full Post »