जुन्या जमान्यात, जेव्हा रेल्वे-बसा, दूरध्वनी काही काही नव्हतं तेव्हा दूरवर रहाणार्या, माणसाला निरोप देणं हे मोठं कठीण काम असायचं. त्यातही प्रेमातले निरोप देणं तर कठीणही आणि त्यात कमालीची जोखिमसुध्दा. महत्त्वाचं म्हणजे, पत्राची वाट पाहणं. ‘दाग’ हा शायर तर अगदी पत्रव्यवहाराची बाधा बाळगून असलेला. ( खरं म्हणजे, त्याने स्थानिक पोरीशीच सूत जमविलं असतं तर किती चांगलं झालं असतं, नाही का…) त्या दिवसात पत्र घेऊन जाणारा- आणणारा हा देवदूत- नामाबर, कासिद अतिशय महत्त्वाचा माणूस. प्रेमाच्या भावनेनं पुरेपूर भरलेलं ते संवेदनांचे फुलपाखरू या नामाबरच्या हवाली करायचं. मनातल्या कल्लोळांचे, शब्दांच्या नक्षीने मोहरलेलं फुलपाखरू काळजीपूर्वक त्या कासिदच्या हवाली करायचं.
पण पत्र लिहून हवाली केल्यावरही निश्चिंती कुठे रहाते ? काहीतरी आठवत राहतंच. मग तोंडी निरोप सांगायची घाई होते.
‘तू सांग तिला. पत्र तर देच; पण सांग तिला माझी अवस्था. म्हणावं, झोप नाही, जेवण नाही…डोळे लाल होवून गेले आहेत.’( दाढी वाढलीय हे मात्र सांगता येणार नाही- कारण बिनादाढीचा शायर असू शकतो का…) मग ‘दाग’ काय करतो-
आई है बात बात मुझे बार बार याद कहता हूं दौड दौड के कासिद से राह में
शिवाय, तिने माझ्याबद्दल काही तपशील विचारले, तर सांग तिला- कोई नामो-निशां पूछे तो ए कासिद बता देना तखल्लुस ‘दाग’ है, और आशिकों के दिल में रहते हैं
आता हे पत्र धाडलं जातं. आता हातातून तो बाण निसटलेला आहे. आता हात चोळत बसणं आलं. पण त्याच्या मनात तिच्याबद्दलच्या भावना विचारांच्या कल्लोळात आता एक नवीन भर पडलीय, ती या कासिदची- हा नामाबर; अत्यंत उपयोगी, महत्त्वाचा असा माणूस. रुग्णाने वैद्यावर जेवढे अवलंबून रहावे, त्याहीपेक्षा जास्त असं, त्या नामाबरवर हे अवलंबून रहाणं. मग तो नाराज होवू नये, विश्वासाने त्याने काम करावं म्हणून त्याची सगळी बडदास्त ठेवली जाते. इतरांपेक्षा जरा जास्त ‘खुशाली’ दिली जाते.
आणि या अतिरिक्त बडदास्तीमुळे, तो नामाबरसुध्दा बावचळतो. तोसुध्दा मग अधिक उत्साहाने बोलतो. ‘तुम्ही काही काळजी करू नका- हा गेलो, की आलोच. सांगतो त्यांना सगळं सगळं.-अगदी सविस्तर; अन उत्तर घेऊनच येतो.’
पण नामाबरच्या तशा वागण्या बोलण्याचा ‘साईड इफेक्ट’, तो निघून गेल्यावर होत राहतो. त्याच्या तशा चापलुशीमुळे, लाडीगोडीमुळे ‘दाग’ला रास्त अशी शंका येते- नामाबर चर्ब-जबानी तो बहोत करता है दिल गवाही नही देता, के उधर जाएगा
…आणि दिवस रात्र त्या नामाबरच्या वाटेवर डोळे लावून बसणं. शंका कुशंकानी घेरून जाणं; उलटसुलट विचारांनी हैरान होणं नशिबाला येतं अशा प्रेम वेड्या शायरच्या.
मग एके दिवशी तो नामाबर दिसतो. याला उत्साहाचे उमाळे येतात. आणलं का उत्तर, काय आणलं, काय म्हणाली ती, रागात होते, का लोभात… अरे अरे अरे ! तो कासिद येतो आहे, अन इथे हे अवखळ मन कुठे स्वस्थ बसू देतं ? एका शायरने ही अवस्था अशी सांगितली आहे- कसिद आया है वहां से, तू जरा थम तो सही बात तो करने दे उससे, ए दिले-बेताब मुझे
माणूस प्रत्यक्ष प्रेमाच्या व्यवहारापेक्षा या पत्रव्यवहाराने जादा हैराण होवून जातो !
आपण दररोज आरशात पाहून भांग वगैरे पाडून कामाला लागतो; पण आपल्या चेहर्याेकडे खरंच आपलं लक्ष असतं की नाही कुणाला ठावूक ! हाताच्या रेषांचंही तसंच असतं. या हातांच्या रेषांचं गणित सोडवायचा आपला अधून मधून प्रयत्न होतो, पण केव्हा ? हतबल होवून जेव्हा हात चोळत बसायची वेळ येते तेव्हा. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, आपण आपल्या भविष्याशी निगडीत करून ठेवलेल्या आपल्या या हातच्या रेषा…आपलं भविष्य मूठीत धरून ठेवणार्याआ- आपलेच हात, आपलेच भविष्य; पण आपल्याला त्याचा पत्ता ? छे !
एखादी तीव्र इच्छा जेव्हा आपल्याला छळत असते, तेव्हा या हातच्या रेषांकडे आपण मोठ्या आशेने पाहात असतो. एक शायर म्हणतो- तूम मेरी रूह में शामिल हो, रगों में रवां हो मगर मेरी हाथों की लकिरों में कहां हो…
…माझ्या मनात- माझ्या आत्म्यात तू भरून आहेस, माझ्या नसानसात तू वाहते आहेस….पण खरंच, तू माझ्या नशिबात कुठे आहेस बरं… एखाद्या धुंदीने माणूस झपाटलं, की त्याच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने मोठं काम करून दाखवितो हा आपल्या सगळ्यांचाच अनुभव. ते काम हातून वेगळं झालं, की कधी आपल्याला आचंबा वाटतो, की अरे ! खरंच का हे आपल्या हातून झालेलं आहे…. आणि आयुष्यात असे कितीतरी प्रसंग येतात, की आपण हतबल होवून जातो. आपला आत्मविश्वास कमी होवून जातो. त्यावेळी आपल्या यशाच्या घटना आपण आठवतो…वाटून जातं- बा-अमल चूम चुके चांद सितारों की जबीं बे-अमल हाथ की रेखा में मुकद्दर देखे
बा- अमल, बे-अमल… अमल म्हणजे अधिकार, प्रभाव, परिणाम. आणि या शब्दासोबत ‘बा’ असलं की ते होतं प्रभावासहित, अधिकारवाणीने; आणि हाच अमल, बे-अमल झाला, की ती होते हाता बाहेर गेलेली- हाताच्या रेषेबाहेर गेलेली बाब. प्रभावहीन.
बा-अमल आणि बे-अमल ह्याच तर रेषा आहेत आपल्या हाताच्या आडव्या उभ्या.
प्रवचन ऎकताना आणि विशेषत: त्या प्रवचनात आपल्या वर्तणूकीबद्दल उपदेश असतील, तर त्यावेळी पुढे येऊन बसलेलं आपलं एक मन हळू हळू मागे जाऊन बसतं. पार मागे बसून राहतं. असं करण्यात आपल्या मनाची चूक किती आणि त्या प्रवचनात सांगितल्या जाणार्या उपदेशातली बडबड कोणती असते ?…’तू पापी आहेस, तू पाप कबूल कर तो तुला निश्चित क्षमा करणार’, किंवा ‘आपलं मन षडरिपूंनी भरलेलं आहे’, ‘जग हे माया आहे’ वगैरे ऎकायला मिळालं, की आपली गडबड होते. अपराधीवृत्तीने आपण विचलीत होतो आणि मागे जाऊन बसतो.;नाही का ? आपल्या पापांच्या हिशोबाने अन पुण्याच्या तणावाने आपल्या मनावरचा आपला विश्वास उडत जातो. आणि मग बर्याच कालानंतर आपण सावरून जातो. आपल्या लक्षात आलेलं असतं, की –
कही गीता का हवाला कही कुरान का था उनकी हर बात में खतरा मेरी ईमान का था
धर्मग्रंथांचे हवाले देऊन आपल्याला ताळ्यावर आणण्याचे प्रयत्न होत असतात. आपली श्रध्दा, आपल्या सच्चेपणाबद्दल ते शंका घेतात, अन खरं म्हणजे, आपण बिघडलेलोच आहोत, हा पक्का विचार ठेऊनच त्यांचे उपदेशांचे डोस चालू असतात. ईश्वराची भावना आपल्या मनात दडपन तयार करते.
आणि आयुष्यभर प्रवचनं ऎकल्यावर, पोथीपुराणं वाचल्यावर एका टप्प्यावर माणसाला कळून येतं, की एकमेकांबद्दलचा बंधुभाव हेच तर सार आहे, धार्मिक ग्रंथांचं. आणि हेच तर सांगायला हवं सगळ्या प्रवचनांतून-
चाहे गीता बाचिए, या पढीए कुरान मेरा तेरा प्यार ही, हर पुस्तक का ग्यान – निदा फाजली
हिंदी गाण्यांची आवड लहानपणापासून असली,की त्यात्या वेळी ती गाणी जशी ऎकली तशीच मनात रहातात,त्याच तर्हेने आयुष्यभर साथ देतात.तथापि, त्यावेळेस गाण्यांचे अर्थ,शब्दांचे अर्थ-आशय माहित नसतात. फक्त चाल. त्या गाण्याच्या चालीने गाणं मनात वावरत असतं.पुढे जसजसं वय वाढत जातं,समज वाढते, तसतसं गाणं समजत जातं. अर्थात सगळं गाणं समजतं असं कुठे असतं ? एखादा शब्द-एखादी ओळ समजून जाते,ते गाणं नव्याने झळाळून जातं- खुशी होते,पुढे जातो आपण.जीवन व्यवहारातील सुख दु:खाच्या अनुभवांच्या अनुषंगाने गाण्यातला अर्थ कधी जाणवतो, ते गाणं अधिक अधिक निकटचं होवून जातं.
गाण्यातले उर्दू शब्द तर या प्रवासात महत्त्वाचे धडे असतात.अर्थ माहित नसलेल्या कितीतरी उर्दू शब्दांना घेऊन आपण आपल्या तर्हेने त्याचा उच्चार करून सांभाळून ठेवलेले असतात हे शब्द! अशा एखाद्या शब्दाचा अर्थ जेव्हा आपल्याला लागतो,तेव्हा घरात दिवा लावल्यावर घर उजळून जावे तसं ते गाणं मनात उजळून जातं.
1958 चा लालारूख सिनेमा सुरूवातीला ‘है कली कली के लब पर,तेरे हुस्न का फसना’या मं.रफीच्या खुमासदार गाण्यामुळे लक्षात राहिला. त्यानंतर वयाच्या पुढच्या टप्प्यावर ‘प्यास कुछ और भी भडका दी झलक दिखला के‘ या गाण्याची ओळख झाली. मात्र ही ओळख कुणी करून दिली-त्या गाण्यातल्या लाडिक सतारीने. या सतारीनेच मला गाण्याकडे हळूवार तर्हेने आणलं. हे गाणं गायलं आहे, तलत महमूद आणि आशा भोसले यांनी; मात्र सगळ्या गाण्यात सतारीच्या सुरावटी एवढ्या लाडीक तर्हेने वावरतात,की असं वाटतं,हिवाच्या दिवसांत एखादं पाळीव गुबगुबीत मांजर आपल्या अंगाखांद्यावर रूळावं,लगट करावी असं…गाणं ज़णू काही तिघांचं आहे-तलत,आशा भोसले आणि ही सतार…
तेव्हा या गाण्याचा छंद लागला. मग उर्दू भाषेचा छंद लागला आणि जादू झाली. अर्थात ही जादू एका एका शब्दाने नशेचा खुमार वाढत जावी.गाण्यातले जूने उर्दू शब्द-त्याचे अर्थ लावायचे गाणं उजळून घ्यायचं. असं चालू झालं.
या गाण्याच्या बाबतीतही असंच झालं. गंमत अशी झाली,की पूर्ण गाणं समजून घेतलं,आवडलं;मात्र एक शब्द कसा कोण जाणे निसटून गेला आणि कसा कोण जाणे त्याची दखल न घेताच ते गाणं अनुभवलं इतकी वर्षं ,याचं राहून राहून आश्चर्य वाटू लागलं..
एकदा सकाळी हे गाणं भुले बिसरे गीत या कार्यक्रमात लागलं .नेहमी प्रमाणे त्या मांजरासारखा मी गाण्याभोवती घोटाळू लागलो… प्यास कुछ और भी भडका दी झलक दिखला के
तुझको परदा रूखे-रोशन से हटाना होगा
इतनी गुस्ताख न हो इश्क की आवारा नजर
हुस्न का पास निगाहों को सिखाना होगा
या गाण्यातले उर्दू शब्दांचे मोहरे-त्यांचे अर्थ शोधून घेऊन गोळा करून घेताना एखादी मोहर पडून जावी,राहून जावी तसं झालं होतं. हा शब्द –हुस्न का पास…राहूनच गेला होता. हुस्न म्हणजे,सौंदर्य-हे माहित होतं; पण पास…हे पास म्हणजे काय बुवा… या गोंधळात पडलो. खरं म्हणजे, या सिनेमाचं नाव विचित्र वाटल्यामुळे लक्षात राहिलं होतं-लालारूख ! लाल: -म्हणजे, लाल रंगाचे फूल. लालारुख म्हणजे, लाल व नाजूक गाल,चेहरा असलेली(अर्थात प्रेयसी !)
-आणि पास शब्दाचा अर्थ पाहिला,की गाणं उजळून निघालं ! हुस्न का पास म्हणजे, सौंदर्याची मर्यादा,संकोच,भीड. संकोच,भीड,मर्यादा हे जे सौंदर्याचे वैशिष्ट्य असते, त्याची जाणिव नजरेला (निगाह ) असणे गरजेचे आहे… असं अर्थात-तिचं सांगणं.
पडद्यामागे हा जो चेहरा तू लपविला आहेस,तो बाजूला सार,असं आर्जव तो करतो आहे आणि ती तितक्याच निग्रहाने पण संकोचाने-अंतर राखून प्रेमातल्या व्यवहारातली सभ्यता त्याला सांगते आहे. हा संवाद एवढा मोहक आहे…
चांद तारों को मयस्सर है नजारा तेरा मेरी बेताब निगाहों से ये पर्दा क्यूं है
चांद आईना मेरा तारे मेरा नक्शे-कदम गैर को आंख मिलाने की तमन्ना क्यूं है
तुझको देखा,तुझे चाहा,तुझे पूजा मैने बस यही इसके सिवा मेरी खता क्या होगी
मैने अच्छा किया घबरा के जो मूंह फेर लिया इससे कम दिल के तडपने की सजा क्या होगी
हा सगळा संवाद ही गुस्ताखी सगळं सगळं तिचा चेहरा-रूख पाहण्यासाठी आणि तिचा तो नकार. या सगळ्या गाण्यात एक प्रकारचा संकोच,भीड असं वातावरण आहे, हे सगळं ,हुस्न का पास ,या शब्दांचा टॉर्च हाती आला,आणि लक्षात आलं. एखाद्या व्यवहारात दोन फ्री गिफ्ट मिळाव्यात तसं,हे गाणं जेव्हा यू ट्यूब वर मी पाहिलं तसा अनुभव आला. एक म्हणजे, जसं हे गाणं तलत महमूद ने गायलं आहे, तसंच सिनेमात त्यानेच हे म्हटलेलं आहे. दुसरा लाभ म्हणजे, मोहक नजरेची ती नायिका-श्यामा. शारदा,बरसात की रात मधली तिची अदाकारी लक्षात राहिली आहे.
आणि दोन गफलतींचाही अनुभव मला आला. एक म्हणजे, हे गीत साहिर लुधियानवी यांचं आहे, हा माझा झालेला समज-जो चुकीचा असून या गीताचे गीतकार आहेत, कैफी आजमी. संगितकार :खैय्याम.
दुसरी गफलत माझी नाही-सिनेमातली. गाण्यात सतारीची साथ आहे,तर इथे नायकाच्या हाती, मेंडोलिनसारखं – का दिलरूबा? असं ते वाद्य आहे. ( अशीच गफलत नागीन या जुन्या सिनेमातल्या लताच्या गाण्यात सुध्दा आहे-कौन बजाएबासुरीया असं लता म्हणते,आणि वाजविललं आहे ते भलतंच वाद्य) अर्थात ही गफलत दिग्दर्शकाला माहित असणारच…पण सतार घेऊन प्रेम करणं अवघड असल्याची जाणिव त्याला असावी !
15 नोव्हेबरच्या टिपणाच्या अनुषंगाने…
बुध्दी आणि भावना यांचे द्वंद्व माणसाची फार तारांबळ करतं. हो, याला तारांबळच म्हणावी लागेल. या तारांबळीध्ये अस्वस्थाता असते,उत्तेजना असते, मात्र केवळ भावनेमुळॆ ही तारांबळ नकोशी न वाटता हवीहवीशी वाटत असते. बरं, माणसाच्या प्रकृतीत कधी बुध्दीला प्राधान्य देण्याची वृत्ती असते, तर काहीजणांच्या बाबतीत भावनेच्या आधाराने वागायची-बोलायची सवय.
…हे द्वंद्व तारूण्याच्या उंबरठ्याशी तर अधिक होऊन जातं. प्रेमाच्या व्यवहारात कधी ही बुध्दी- अक्कल आपल्याला बजावीत असते तर कधी ही ओढ….आपल्याला स्थीर राहू देत नसते. ‘ताज महल’ मध्ये साहिरच्या एका गाण्यात ती नायिक म्हणते- शर्म रोके है इधर, शौक उधर खिंचे है क्या खबर थी, कभी इस दिल की ये हालत होगी
अगदी अशीच अवस्था ‘नौ बहार’ या जुन्या चित्रपटात शैलेंद्र ने मांडली आहे. ( ताज महल आणि नौ बहार चे संगितकार आहेत रोशन.) बचपन जवानी जो मिलने लगे है मौसम बिना फूल खिलने लगे है छेडी किसीने मेरे मन की बिना- गाऊं तो मुश्किल न गाऊं तो मुश्किल
ते गाणंच आपण पाहू या…बुध्दी आणि भावना यांची सुरेख दंगल असलेलं…
तत्कालीन भावनांच्या प्रभावाखाली येवून आपण तुरंत वागतो-बोलतो. त्या भावनांचा प्रभाव आपल्या शरीर-मनावर ऍलर्जी व्हावी, तसा होतो अन आपण वागून जातो,बोलून जातो.
आणि मग अडचणीत येतो. लक्षात येवून जातं,की काहीतरी बिघडलं गड्या आपल्याकडून. असं करायला-वागायला-बोलायला नको होतं आपण. हे असं वाटायला नेमकी केव्हा सुरूवात होते-जेव्हा आपल्याला याची जाणिव होते,की आपल्या त्या कृतीचे वेगळॆ परिणाम झालेले आहेत. परीसर-वातावरण; त्यात बदल झालेले आहेत. मग आपण सांभाळतो. पण आता तर वेळ निघून गेलेली असते.
आपल्या भावनांच्या अभिव्यक्तीमुळे बिघाड झाला, याची कल्पना आली,की आपण थबकतो. आपल्या त्या भावना आवरतो. पश्चात्तापाच्या विचारांचा अंमल मग चालू होतो. आणि इथूनच चालू होतो अकलेचा प्रभाव. भावना कैद होवून जातात. अकलेनं मनाचा ताबा घेतला असतो. आपलं चुकलं नाही, असं भावना वारंवार सांगत असते-बजावत असते,पण आता परिस्थीतीचा ताबा अकलेने घेतलेला असल्याने नाईलाज होत असतो. अक्कल बजावीत रहाते,डोळे वटारते,हात उगारते-तू दोषी आहेस ! …अपराधी मन ऎकत रहातं.गप्प रहातं.
अक्कल आणि भावनांचं नातं हे असं. शाळॆतली हुशार,व्यवस्थीत गृहपाठ करणारी,पुढच्या बाकावर बसणारी,नेहमीच गणवेशात रहाणारी पोरगी जशी,तशी ही अक्कल;तर तिच्याच मागच्या बाकावर बसणारी,शहाणी,पण गणवेषाचं भान नसणारी, नियमीत आभ्यासापेक्षा इतर बाबीत रमणारी पोरगी जशी,तशी भावना.
पुष्कळदा उचंबळून आलेल्या विचारांतून भावनांचा शुभ्र फेस तयार होतो अन शरीरावर त्याचा ताबा होतो. एका धुंदीत माणूस मग वागतो,बोलतो. त्यावेळेस अकलेची ती हुशार मुलगी असतेच बरं वर्गात; ती सांगत रहाते, बजावत रहाते, पण तिचं ऎकायला चित्त ठिकाणावर पाहिजे ना !
-अन प्रेमात पडलेल्या माणसाला-तिला पत्र लिहायच्या म्न:स्थितीत तर असं वाटतं,की अकलेला वर्गातच कोंडून टाकावं,आपण मैदानावर जावं,तिथं झाडाखाली बसून मस्त पत्र लिहावं तिला-
अक्ल कहती थी,न लिख दफ्तर-ए-मजकूर उसको
शौक ने एक भी मजमून बदलने न दिया
प्रेमाचा उमाळाच एवढा दाटून आलेला असतो,भावना एवढ्या गजबजलेल्या असतात, की तिला काय लिहू कसं लिहू किती लिहू या गोंधळात हे लांबलचक पत्र तयार झालं ! खरं म्हणजे, त्याच वेळेस ही अक्कल बजावीत होती, तिचा गहजब चालू होता- उगी काही बाही लिहू नकोस,थोडं आवर. काय वाटेल तिला,काय म्हणेल ती ? वेडा म्हणेल तुला…
पण भावनांचा तो भर-त्या भरात असलेल्या मनानं एकही मसूदा-मजकुर ना संक्षेप केला त्याचा, ना त्याची कपात केली,ना पत्र आवरलं.
आणि मग प्रेमाच्या त्या चार दिवसांतले ते अपरिहार्य क्षण येतातच आपल्या वाट्याला. चुटपुटीचे,अपराधी वाटण्याचे,निराशेचे. त्यावेळी या अकलेने दिलेल्या सुचनांची आठवण येत रहाते अन मन कसं मऊ मऊ होवून जातं. गरीब गरीब होवून जातं.
पण या अपराधी अवस्थेची-हतबलतेची पर्वा न करता, कसलीही सहानुभुती न ठेवता, ती अक्कल आपल्याला अधिक अधीक दोष लावीत रहाते-
अक्ल हर चीज को इक जुर्म बना देती है बेसबब सोचना, बेसूद पशेमा होना…
अकलेचा हा स्वभावच. स्वभावातली खोडच म्हणा ना ! विनाकारणचे विचार,विनाकारणच्या भावना चुटपुट, हुरहुर, हे सगळं सगळं या मूर्ख अकलेच्या दृष्टीतून चक्क अपराध असतात-गुन्हे !
शमा परवाना यांच्या आकर्षणाच्या हकिकतींनी उर्दू शायरी उजळून गेलेली आहे. मैफिल मध्ये
शमा आहे, परिसरात अंधार आहे;त्यामुळे शमाचे भोवताल कसे उजळलेले आहे…आणि हा उजाळा परवान्यांना मोहक असं आकर्षण निर्माण करणारा आहे,आणि ते तिकडे झेप घेतातच.
तथापि उर्दू शायर लोकांनी या परवान्याला स्वत:चा नातेवाईक बनवून टाकलेले आहे. परवान्यामध्ये त्यांना आशिक-आशिकीचा खेळ दिसतो. सौंदर्याकडे झेप घ्यायची ती रोमॅंटिक वृत्ती वाटते.प्रेमाच्या व्यवहाराचे ते प्रतिक झालेले असते-परवान्याचे ते झेप घेणे. म्हणून तर एका शायरने परवान्याची पैरवी अशी केली आहे-
कुछ शमा की लौ ही में तासिरे-कशिश होगी होता नही परवाना हर आग का शैदाई
( तासिरे-कशीश : ओढून घ्यायची शक्ती शैदाई : वेडा )
शमाच्या त्या अंगठ्याभरच्या ज्योतीतच अशी काही ओढून घ्यायची शक्ती असेल,की ज्याच्या मुळे परवाना तिच्याकडेच आकृष्ट होतो-तो इतर आगीच्या आधीन होत नसतो. आकर्षीत करून घ्यायची ही जादू केवळ शमामध्येच असते, असं शायर म्हणतो.
शमा-परवाना यांच्या आकर्षणाच्या हजार गोष्टी प्रचलीत आहेत. तथापी हे आकर्षण केवळ त्यांच्याबाबतीतच नसून कला आणि कलेचे रसिक यांनाही तेवढेच लागू होते. इतकेच नाही, तर कलेचा केवळ एक रसिक नसतो,तर हजारो-लाखो रसिक कलेचे वेडे होवून गेलेले असतात. त्या कलाकृत्तीतच तशा प्रकारची ओढून घ्यायची शक्ती असते.
अर्थात चेहर्यावरचे सौंदर्य हीसुध्दा एक और बाब असते. विशेषत: सौंदर्यपूर्ण चेहरा दिसला,की त्याबद्दलचं आकर्षण-त्या आकर्षणाने बध्द होतो माणूस. अशा आपल्या सौंदर्याचा अभिमान आणि आत्मविश्वास बाळगणारी एक सौंदर्यवती तर परवान्याला आवाहन करते: रूखे-रोशन के आगे शमा रखकर ये कहते है उधर जाता है देखें,या इधर आता है परवाना
‘शगून’चित्रपटातलं जगजीत कौर हिने गायलेलं, ‘तूम अपना रंजो-गम ..’ हे गाणं ऎकताना काव्य-संगीत-आवाज यांची अनुभुती होत असतानाच मनात नकळत एक जादू होत जाते. ही जादू असते,एका अत्यंत खाजगी संवेदनांचे आपण साक्षीदार होत चालल्याची. ती आपल्या सहका-याला ( इथ पती म्हणण्यापेक्षा सहकारीच म्हणावे वाटते,एवढी उत्कटता,एवढी संवेदना त्या वातावरणात भरलेली आहे. ) त्याच्या दु:ख विवंचना आपल्याला सांगायला,त्यात सहभागी करून घ्यायला आर्जव करते आहे. तो बोलत नाही,सांगत नाही …आणि आपल्याला त्याचं तो गप्पपणा त्याचं स्वत:तच गुंतून बसलेपण जाणवत रहातं आणि आपण सुध्दा त्याच्या या सहचारीप्रमाणेच व्याकूळ होऊन जातो :
तूम अपना रंजो-गम,अपनी परेशानी मुझे दे दो तुम्हे गम की कसम, इस दिल की विरानी मुझे दे दो
मुळात तिची अवस्था कशी आहे ? नाकारलेली,टाकून दिलेली.पण तरीही,आपल्या सोबत रहाणे त्याला स्विकारावे लागले,ही जाणिव मनात ती ठेवून आहे. असे असूनही अपमान विसरून त्याचं दु:ख कमी करायला ती तयार आहे-
ये माना मै किसी काबील नही हूं,इन निगाहों में बुरा क्या है अगर, ये दुख ये हैरानी मुझे दे दो
..तुझ्या दृष्टीने माझ्यात एवढी पात्रता नसेलही…पण काय हरकत आहे,दु:खात सहभागी करून घ्यायला… कदाचीत समाजाच्या टीकेमुळे भीती,काळजीने त्याची कुचंबना झालेली असेल. अशावेळेस त्याला स्वत:बद्दल काळजी,दु:ख वाटत असते. आणि ती म्हणते-
मैं देखूं तो सही, दुनिया तुम्हे कैसे सताती है कोई दिन के लिए,अपनी निगेबानी मुझे दे दो
या गीताचे गीतकार आहेत, साहिर लुधियानवी. साहिरच्या गाण्यात उर्दू शब्दांचा चपखल वापर असतो. या ओळीतसुध्दा ‘निगेबानी’शब्दामुळे अर्थाला आकार आला आहे. (निगाह-बान : संरक्षक,काळजी घेणारा)पुष्कळ वेळा असंही असतं,की बाहेरचे विश्व, स्पर्धा,चिंता हे घरात रहाणार्या सहचरीला माहीत नसतं. तिला एवढंच कळालेलं असतं,की याला काही दु:ख आहे, चिंता आहे. मग लहान मुलाला समजवावं तसं ती म्हणते-मी आहे नं इथं.तुमची काळजी माझ्यावर सोपवा.( कधी गमतीने वाटून जातं, लहानपणात मित्रांशी भांडल्यावर आई तावातावाने बोलायची, किंवा शाळेतल्या प्रश्नांची सोडवणूक मी करते, असं काही बोलायची,ते मला फार गैर वाटायचं,गैरजरूरी वाटायचं…आणि आईची तळमळही जाणवायची. खरंच अशा वेळी तळमळीच्या माणसाला सोबत घेता न येणं…किती कुचंबना म्हणावी ही…)
गाण्याच्या शेवटच्या ओळीत नायिकेच्या स्वत:च्या दु:खाची जाणीव आपल्याला होते. हे अपमानाचं दु:ख ती केव्हाच विसरलेली आहे. उलट, तुम्हाला वाटणारा अपमान, अपराधीपणा (पशेमानी)मला द्या,असे ती म्हणते-
वो दिल जो मैने मांगा था मगर, गैरो ने पाया था बडी शै है अगर, उसकी पशेमानी मुझे दे दो
सगळ्या गाण्यात ह्रदयाला थेट भिडणारा असा एक समजूतीचा सूर आहे. जणू दु:खाची जाणीव झाल्यानंतरचे सांत्वन आहे.गाणं ऎकलं,की असं वाटतं,आता त्याने तिच्या कुशीत आपला चेहरा लपविला असावा… सिनेमाच्या कथेनुसार गाण्याची रचना असते, अर्थाचा संदर्भ असतो हे खरे; पण इथे उत्कटताच एवढी आभळासारखी दाटून आलेली आहे, की आपण तिच्या त्या सुचीत केलेल्या दु:खाच्या वैशम्याच्या अनुषंगाने चार पावलं पुढे टाकीत जातो. सिनेमाच्या कथेची तशी गरज रहात नाही….
पियानोच्या स्वरांच्या माळेत खय्यामने हे गाणं गुंफलं आहे. पियानोचा असाच वापर, सी.अर्जूनने ‘सुशीला’ या चित्रपटात केला आहे .( बे मुरव्वत बे वफा…)
जगजीत कौरचं हे गाणं असं आहे…प्रसिध्दीच्या गजबजाटापासून दूर असणारं,आपलं,खाजगी…
( माझ्या ‘गीतमुद्रा’ या शब्दालय प्रकाशनाच्या वतीने प्रसिध्द झालेल्या संग्रहातल्या एका लेखावरून. )
कोणत्याही धर्मातले धर्मगुरू खरं म्हणजे, चांगले असतात. त्यांचा आपल्याला त्रास नसतो. ते काही घरी येवून आपला कान धरून तिकडे घेवून जात नसतात प्रवचनाला. किंवा प्रवचनादरम्यान प्रश्न विचारून उत्तर नाही आलं, तर ना आपल्याला छड्या मारतात ना रागावतात ना अपमानित करतात. शिवाय ते बिचारे काही गृहपाठही देत नाहीत,आभ्यास करून येण्याबद्दल दटावतही नाहीत. ते आपापलं सांगत राहतात बिचारे- दु:ख विवंचनांना टाळण्यासाठी तो आध्यात्माचा-देवाचा रस्ता.
मग असं असताना, आपण का बरं नावं ठेवावीत ? का बरं त्यांची टिंगल करावी ? का बरं ? याचं खरं कारण म्हणजे, हा जो धर्मगुरू-ज्याला आपण हौसेने आणलेलं असतं आपणच आपल्या मनात. त्याची त्याची प्रतिष्ठापना केलेली असते उत्साहाने,उतावीळपणाने; आणि मग गणेश चतूर्थीचा उत्साह दुस-या.-तिस-या दिवशी ओसरावा अन मग दररोजच्या आरतीचे टेंशन यावे असे होवून जावे. गणपती तर निघून जातो बिचारा आठ दहा दिवसात; पण मनात बसलेला हा धर्मागुरू- धार्मिक,आध्यात्मिक भावनांची समज- ती कुठे निघून जाते ? त्याच्यासोबत रहाणं शक्य नसतं आणि मग त्याच्याबद्दलच्या तक्रारी सुरू होतात. त्याला नावं ठेवणं सुरू होतं. पहाता पहाता त्या तशा थट्टेत माणूस रमून जातो. ती थट्टा रुचकर वाटायला लागते. विशेषत: ‘संध्याकाळ’ च्या सवयीचा माणूस तर या थट्टेत अधिक आक्रमक होत असतो. कुणी तर ईश्वराचीही थट्टा करायला मागे पुढे पहात नाही. एक विनोद आहे : एक फकीर भीक (खैरात ) मागण्यासाठी मशिदीसमोर कटोरा घेऊन उभा रहातो. सगळे नमाजी निघून जातात त्याला कुणी काही टाकत नाही. मग तो फकीर मंदिरासमोर येऊन उभा रहातो. तिथेही कुणी त्याला भीक घालीत नाही. मग तो चर्चसमोर उभा रहातो. तिथेही तसाच अनुभव. मग तो शराबखान्यासमोर येऊन उभा रहातो; तर तिथून जे जे शराबी बाहेर पडतात ते त्याला काही ना काही देवून जातात. त्याचा कटोरा भरतो. फकीर मग आभाळाकडे पाहून म्हणतो- “वाह मेरे मौला ! रहते कहा हो, और पता कहा का देते हो !”
मिर्जा गालिब म्हणतो, कहां मैखाने का दरवाजा गालिब और कहां वाईज पर इतना जानते थे कल वो जाता था के हम निकले
‘अकबर’इलाहाबादी तर या शैखची गंभीरपणे थट्टा करतात शैख जी रात को मस्जिद में नही जाते है यानी डरते है के बैठा कही अल्लाह न हो म्हणजे, माणूस आणि ( धर्मगुरू ?) भुताला अन ईश्वराला रात्री भीतो की काय ?
बिघडलेला माणूस अधिकाधिक बिघडत जातो, पिन्याच्या सवयीचा होत जातो, तसतसं त्याला आतून त्याची सदसद्विवेक बुध्दी सतावीत रहाते. मग तो आपला राग या धर्मगुरूवर काढतो. त्याला शिकवायलाही कमी करीत नाही- जाहिद शराब पीने दे मस्जिद में बैठकर या वो जगह बता दे, जहां पर खुदा न हो
अशा पिण्यामुळे वाईट कृत्यांमुळे माणसाला स्वर्ग लाभत नाही, तो नरकात जातो असं तो शैख वारंवार बजावत असतो. पण शराबखान्यात बसलेला शायर काय म्हणतो
खैर दोजख में शराब मिले ना मिले शैख साहब से तो जां छूट जाएगी