फुलांसोबत काटे असतात,सुख-दु:ख सोबतीनेच असतं असं आपण म्हणतो, ऎकतो. पण फुलाचे-काट्यांचे परस्पर संबंध कसे असतात याचा क्वचितच विचार होतो. फुललेला चेहरा घेवून सगळ्यांना सदैव हसण्याचा संदेश देणारं फूल -त्याला मात्र सदैव संगत असते,ती काट्यांची. फुलाला स्पर्श करायला जावं,तर आपल्या बोटांना काटे रुततात. मग फुलांचं कसं होत असेल…त्यांना तर काट्यांचीच सोबत असते की. सदैव हसण्याचा फुलाचा संदेश हा जेवढा महत्त्वाचा;तेवढाच-किंबहुना अधिक महत्त्वाचा संदेश म्हणजे, नको असलेला,त्रासदायक असा तो सोबती-काटा; त्याच्या सोबतीने फूल गुण्यागोविंदाने रहातं… माणूस मात्र माणसासोबत राहू शकत नाही.
फूल कर लेंगे निबाह कांटो से
आदमी ही न आदमी से मिले – ‘खुमार’
खरं म्हणजे काट्यांचा हा त्रास फुलं सोसतात, त्याबद्द्ल तक्रारही करीत नाहीत; शिवाय चेहर्या वर समजूतीचं प्रसन्न असं ते हसू… त्यांना काय वाटत असतं काट्यांकडून होणार्या छळाबद्दल ? ते का शिकायत करीत नाहीत काट्यांची ? काट्यांच्या त्रासाबद्दल फूल काहीच बोलत नाही, याचं कारण असतं फुलाचा सभ्यपणा. ते नुसतं हसरा चेहरा घेवून जन्माला आलेलं नसतं,तर एक समजूतदार तबीयत घेवून ते वावरणारं असतं.काट्यांच्या उद्घटपणाकडे दूर्लक्ष करण्याइतका सोशीकपणा फुलाकडे असतो. फुलाचा हा सभ्यपणा एका शायरला जाणवला. तो म्हणतो-
गुलोंने खारोंके छेडने पर सिवा खामोशी के दम न मारा
शरीफ उलझेंगे गर किसी से तो फिर शराफत कहां रहेगी ( खार : काटा )
ही शराफत. ही केवळ सभ्य रहाण्याशी संबंधीत नाही. सभ्य माणूस जाणून असतो. वाईटाला सरळ वाईट म्हणण्यापेक्षा अशा वृत्तीचा आभ्यास त्याला आवश्यक वाटतो. म्हणूनच काट्यांचा बोचरेपणा फुलांना वेगळ्या तर्हेने जाणवतो. काट्यांच्या त्या सवयीकडे क्षमाशील वृत्तीने फूल पहातं, आणि आपल्याला सांगतं-
बेकार शिकायत है कांटो से चमनवालों
चुभते है,तो ये उन की फितरत का तकाजा है
काट्यांच्या काटेरीपणा बद्दल शिकायत काय करायची? इश्वरानेच त्यांना ते रूप दिलं आहे. ती प्रकृती दिली आहे.
त्यांचा काय दोष… त्यांच्याशी निबाह करणं यातच आपली परीक्षा असते..
please visit another blog : http://hasanyachaaakar.wordpress.com/