आयुष्यात कधी असे अनुभव येतात,की आपण चक्रावून जातो. गोंधळतो,निराश होवून जातो. आभाळ दाटून यावं तसं निराशा दाटून येते.जिकडे तिकडे कसं मळभ साचून राहिल्यासारखं वाटतं. मग आपलंच हे शरीर आपलाच हा चेहरा आपल्या नेहमीच्या हालचाली- त्यावरही कशी मरगळ येऊन जाते. इतकंच काय, परिसरातल्या -निसर्गातल्या नेहमीच्या गोष्टी- आभाळ,चंद्र,चांदणे,रात्र हे सगळं सगळंच अपयशी – अपेशी वाटत रहातं,अशूभ वाटत रहातं.. केवळ आपणच नाही तर सगळी सगळीच जण एका दु:खाच्या निराशेच्या लाटेत सापडली आहेत असं होतं…
चांद इक बेवा की चूडी की तरहा टूटा हुवा हर सितारा, बेसहारा सोच में डूबा हुवा गम के बादल इक जनाजे की तरहा ठहरे हुए, हिचकियों के साज पर कहेता है दिल रोता हुवा..
दु:खाचे आभाळ दाटून आल्यावर चंद्राची कोर विधवेच्या फुटलेल्या कांकणासारखी वाटावी-दिसावी, नेहमी चमचमणारे सितारे आता कसे वेगवेगळे-एकटे विचारात बुडून गेल्यासारखे वाटावेत एखादी प्रेतयात्रा थांबावी तसे ते ढग थांबलेले वाटावेत…दु:खाचा केवढा परिणाम होवून गेला आहे हा.. .
हसरत जयपुरी यांनी शब्दबध्द केलेलं हे दु:ख अभिनेता दिलीप कुमार,गायक तलत महमूद आणि संगितकार शंकर जयकिशन यांनी तेवढ्याच उत्कटतेनं मांडलं आहे…जणू एखादा जनाजा चालला आहे…ही सगळी जण शोकमग्न होवून त्यात शामील झालेली आहेत…
आमचे दादा-आईचे वडिल परभणीला सरकारी दवाखान्यात कम्पाउंडर होते. आईची बाळंतपणं तिकडेच झाली दादांकडे. मी आईसोबत असायचो. मी असेन पाच सहा वर्षांचा. दादांचं भरलेलं घर,वाढता खर्च आणि तुटपुंजी मिळकत ही तफावत मला लक्षात यायची, पण माझं ते शाळकरी वय असल्याने तेवढी जाणवायची नाही. मनात सतत असायचं ते घरात आंबटवरणाचं जेवण. चहाचं काम दादाच करायचे. संगीत नाटक, संगीताचा छंद असलेले आमचे दादा.
नवरात्रात तर देवीच्या आरत्यांचा उरूस या घरी भरलेला असायचा. आमच्या घरचं दैवत होतं बालाजीचं-गिरी बालाजीचं.आमच्या घरी हे वातावरण नसायचं; त्यामुळे या देवीच्या सामूहीक आरत्या, हे वातावरण मला फार आवडायचं. लाकडी वेलबुट्टीदार मोठ्या आकाराचं ते जाळीदार देवघर. त्यात रेणूका माता. आरत्यांच्या तयारीत संध्याकाळपासूनच आजी,मामी वगैरे असायच्या. महातपुरीकरांच्या त्या वाड्यातली-गल्लीतली स्त्री-पुरूष मंडळी घरात जामायची. मामा,आजोबा संगितातले जाणकार असल्याने आरत्यांतून करण्यात येणार्यास त्या अवाहनांना स्वरांचं-ठेक्यांचं छान रूप लाभलेलं असायचं. पाटावर उभे राहून आरतीचं तबक घेवून दादा रेणूका मातेच्या आरत्यांत सहभागी व्हायचे आणि त्या समूह स्वरांत मी- गर्दीत वडिलांचं बोट धरून चालावं तसं दादांच्या स्वरांवर-त्यांच्या आवाजावरच लक्ष ठेवून असायचो.
-आणि दादांची मिळकत आणि वाढत्या खर्चाची ती तफावत मात्र मला त्या वेळी तीव्रतेने जाणवायची. अगदी तीव्रतेने. दादांनी आरतीतल्या ओळींचा स्वर धरलेला असायचा- अजूनी अंबे तुजला माझी करूणा का येईना हो….
गर्दीत वडिलांचं बोट धरलेलं असताना कधी भीतीने अधिक गच्च व्हायचं,मुठीतला घाम जाणवायचा. …त्या ओळींतून दादांच्या स्वरातला ओलावा मला जाणवत रहायचा.समूह स्वरांतून एकटा-वेगळा असा त्यांचा आवाज,त्यांचं एकट्याचं ते देवीला केलेलं आवाहन. त्या दाटीतून गर्दीतून दादांच्या जवळ मी सरकायचो. मला वाटायचं,त्या आरतीतून दादा सांगत असावेत देवीला, आपल्या कर्जाबद्दल, दुकानांच्या वाढत जाणार्या उधार्यांबद्दल,पैशाच्या गरजेबद्दल,पैशा अभावी वाटत रहाणार्या अपराधी भावनेबद्दल…एकदा परभणीला ‘देव दीनाघरी धावला’ हे नाटक आलं होतं.(फिरता रंगमंच हे त्या दिवसांत अप्रूप होतं.) घरासमोरून जाहिरातीचा टांगा जात होता आणि महिन्याअखेरीच्या त्या आर्थिक विवंचनेत असलेले दादा…त्यांची चुटपुट आजही मनात भरून आहे…‘काय करावं रे.. एवढं चांगलं नाटक..’
आज दादा नाहीत. ते केव्हाच निघून गेले. आता सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती चांगली झालेली आहे. मातीची घरं जाऊन फ्लॅटमध्ये रहात आहेत सगळे. चाळीस पावरचा पिवळा बल्ब जाऊन भक्क लाईट आहेत; एवढे भक्क की घरात अंधाराचा कण-क्षण कुठे सापडणार नाही,शोधूनही.
आजही मामांकडे रूढीनुसार नवरात्रात आरत्या होतात. आजही मी एक दिवस का होईना जातो. मामांची नातवंडं आरत्यांची पुस्तकं हातात धरून उत्साहाने आरत्यांत सहभागी होत असतात-
विपुल दयाघन गरजे तव ह्रदयांबरी श्री रेणूके हो !
पण- माझ्या मनात आज- आजचे हे दिवस आणि ईश्वराचं स्मरण यांची सरमिसळ झालेली आहे. मनात करूणा आहे, पण या करूणॆत चंचलतेचा समावेश झाला आहे. विवंचना आहेत, पण या चंचलतेपायी त्या ईश्वरापुढे त्या मांडणं गैरजरूरी वाटत आहे. लहानपणात नाही का,आईनं काही विचारलं तर मी चिडून म्हणायचो तिला- अं! तुला काय माहित आहे गं- उगं गप्प बस !
आज दिवस उजेडाचे आले आहेत, महत्त्वाचं म्हणजे वडिलधार्यांचं अर्धं अधिक आयुष्य हाता तोंडाची मिळवणी करण्यातच गुजरलं, तसं आज नाही.
…म्हणून तर आज जाणवतो आहे तो शे’र… निघून गेलेले ते शायर जावेद नासेर यांचा-
अंधेरा हो तो तुझको पुकारूं यारब ! उजालों में मेरी आवाज बिखर जाती है
अंधारात,संकटात ईश्वराची तीव्रतेने आठवण व्हावी,दु:खामुळे आवाजात-आवाहनात आर्तता यावी आणि तेच आवाहन तीच, आठवण प्रकाशात केलेली असताना, भल्या दिवसांत केलेली असताना लक्ष विचलीत झालेलं… खोडकर पोराचा आभ्यास असावा तसं ते चित्त…
म्हणून तर ईश्वराचं अस्तित्त्व जाणवत रहातं –दु:खात,अंधारात.
हम्द म्हणजे स्तोत्र,स्तुती. आरत्यांमध्ये ईश्वराची,देवीची स्तुती असते. तसंच हम्दमध्ये अल्लाहची स्तुतीच असते. अशीच एक हम्द संगीतकार उषा खन्नाने स्वरबध्द केलेली आणि गायलेली आहे; मै हूं अलादिन नावाच्या चित्रपटात….