नातजूर्बा हूं,खतावार नही मैं यारो
आफताब को तूफां का आगाज समझ बैठा
बाद जाना,के दस्तक थी मसिहा ने दी
मैं जिसे मौत की आवाज समझ बैठा था
…ह्या ओळी वाचण्यात आल्या,आणि त्या ‘मै’च्या विचारात गुंतून गेलो. मी अननुभवी हे तो सांगतो आहे,.माझी चूक नाही-मी दोषी नाही,माझ्याकडून नकळत घडलं आहे, हे तो सांगतो आहे. काय घडलं होतं त्याच्याकडून-सूर्याचं तळपणं,ती प्रखरता पाहून त्याला ती वादळाची-संकटाची ती सुरूवात आहे असं वाटलं. खरं म्हणजे दारावर जी थाप पडलेली होती, ती मसिहाची (उपचार करणारा,आयुष्य देणारा ) होती, मला मदत करायला तो आला होता,हे नंतर कळलं..आधी मला ती माझ्या मृत्यूचीच चाहूल वाटली होती.
हे वाचलं.त्या निर्दोष अशा निराशावादी माणसाची गंमत वाटली अन मनात एकानंतर एक असे ‘निरपराध निराशावादी’गोळा होवू लागले.हा त्याचा एक भाऊ पहा-
Pessimist is the man
Who complaint about the opportunity-
knocking the Door !
पहिला तो जो होता,तो निराशावादी होता,पण त्याला आपल्या चुकीची कल्पना होती. पण हा जो दुसरा आहे,त्याच्याही दाराशी संधी चालून आलेली आहे; संधी दार ठोठावते आहे अन हा गडी चक्क त्या आवाजाने वैतागला आहे-च् ! काय कटकट आहे ! निराशावादी माणसाचं हे व्यवच्छेदक लक्षण आहे म्हणा ना!
‘रिडर्स डायजेस्ट’ मध्ये आलेला अशाच माणसाचा एक छोटा विनोद पहा :
पुराने वेढलेल्या घराच्या दारावर थाप देण्यात येते.
‘ कोण ?’ आतून विचारल्य़ा जातं.
‘आम्ही आहोत रेडक्रॉसची माणसं ! दार उघड !’
‘मी रेडक्रॉसची वर्गणी गेल्याच महिन्यात दिली !’आतून सांगितल्या जातं !
रेडक्रॉसचे लोक-सेवाभावी संस्थेचे लोक नेहमी येतात, ते निधी-वर्गणी मागायला येतात हे माहित असल्याने,ते आता संकटातून सुटका करण्यासाठी,मदतीसाठी आली आहेत(हे संस्थेचं उद्दीष्ट्य असतं,पण मोठी संकंटं क्वचित येत असल्याने-)हे आतल्या माणसाच्या घ्यानातही नाही. तोसुध्दा ‘नातर्जूब’च म्हणायला हवा.
निराशावादी आणि आशावादी यांची तबियत जाहीर करणारा हा शे’र पहा:
नामुराद को तो सूरज है सिरदर्द की वजह
जानेवाले को तो जुगनुसे पता मिलता है
आशावादी माणसाने विमानाचा,तर निराशावादी माणसाने पॅराशूटचा शोध लावला असं म्ह्टल्या जातं (गमतीने!) हे जाहीर आहे. पण यातून एक गोष्ट जगजाहीर होते, ती तीव्र इच्छाशक्तीची. आशा-निराशेतही कार्यान्वित रहाणारी माणसाची तीव्र इच्छाशक्ती-उठावाची,बचावाची.
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com