‘शगून’चित्रपटातलं जगजीत कौर हिने गायलेलं, ‘तूम अपना रंजो-गम ..’ हे गाणं ऎकताना काव्य-संगीत-आवाज यांची अनुभुती होत असतानाच मनात नकळत एक जादू होत जाते. ही जादू असते,एका अत्यंत खाजगी संवेदनांचे आपण साक्षीदार होत चालल्याची. ती आपल्या सहका-याला ( इथ पती म्हणण्यापेक्षा सहकारीच म्हणावे वाटते,एवढी उत्कटता,एवढी संवेदना त्या वातावरणात भरलेली आहे. ) त्याच्या दु:ख विवंचना आपल्याला सांगायला,त्यात सहभागी करून घ्यायला आर्जव करते आहे. तो बोलत नाही,सांगत नाही …आणि आपल्याला त्याचं तो गप्पपणा त्याचं स्वत:तच गुंतून बसलेपण जाणवत रहातं आणि आपण सुध्दा त्याच्या या सहचारीप्रमाणेच व्याकूळ होऊन जातो :
तूम अपना रंजो-गम,अपनी परेशानी मुझे दे दो
तुम्हे गम की कसम, इस दिल की विरानी मुझे दे दो
मुळात तिची अवस्था कशी आहे ? नाकारलेली,टाकून दिलेली.पण तरीही,आपल्या सोबत रहाणे त्याला स्विकारावे लागले,ही जाणिव मनात ती ठेवून आहे. असे असूनही अपमान विसरून त्याचं दु:ख कमी करायला ती तयार आहे-
ये माना मै किसी काबील नही हूं,इन निगाहों में
बुरा क्या है अगर, ये दुख ये हैरानी मुझे दे दो
..तुझ्या दृष्टीने माझ्यात एवढी पात्रता नसेलही…पण काय हरकत आहे,दु:खात सहभागी करून घ्यायला… कदाचीत समाजाच्या टीकेमुळे भीती,काळजीने त्याची कुचंबना झालेली असेल. अशावेळेस त्याला स्वत:बद्दल काळजी,दु:ख वाटत असते. आणि ती म्हणते-
मैं देखूं तो सही, दुनिया तुम्हे कैसे सताती है
कोई दिन के लिए,अपनी निगेबानी मुझे दे दो
या गीताचे गीतकार आहेत, साहिर लुधियानवी. साहिरच्या गाण्यात उर्दू शब्दांचा चपखल वापर असतो. या ओळीतसुध्दा ‘निगेबानी’शब्दामुळे अर्थाला आकार आला आहे. (निगाह-बान : संरक्षक,काळजी घेणारा)पुष्कळ वेळा असंही असतं,की बाहेरचे विश्व, स्पर्धा,चिंता हे घरात रहाणार्या सहचरीला माहीत नसतं. तिला एवढंच कळालेलं असतं,की याला काही दु:ख आहे, चिंता आहे. मग लहान मुलाला समजवावं तसं ती म्हणते-मी आहे नं इथं.तुमची काळजी माझ्यावर सोपवा.( कधी गमतीने वाटून जातं, लहानपणात मित्रांशी भांडल्यावर आई तावातावाने बोलायची, किंवा शाळेतल्या प्रश्नांची सोडवणूक मी करते, असं काही बोलायची,ते मला फार गैर वाटायचं,गैरजरूरी वाटायचं…आणि आईची तळमळही जाणवायची. खरंच अशा वेळी तळमळीच्या माणसाला सोबत घेता न येणं…किती कुचंबना म्हणावी ही…)
गाण्याच्या शेवटच्या ओळीत नायिकेच्या स्वत:च्या दु:खाची जाणीव आपल्याला होते. हे अपमानाचं दु:ख ती केव्हाच विसरलेली आहे. उलट, तुम्हाला वाटणारा अपमान, अपराधीपणा (पशेमानी)मला द्या,असे ती म्हणते-
वो दिल जो मैने मांगा था मगर, गैरो ने पाया था
बडी शै है अगर, उसकी पशेमानी मुझे दे दो
सगळ्या गाण्यात ह्रदयाला थेट भिडणारा असा एक समजूतीचा सूर आहे. जणू दु:खाची जाणीव झाल्यानंतरचे सांत्वन आहे.गाणं ऎकलं,की असं वाटतं,आता त्याने तिच्या कुशीत आपला चेहरा लपविला असावा… सिनेमाच्या कथेनुसार गाण्याची रचना असते, अर्थाचा संदर्भ असतो हे खरे; पण इथे उत्कटताच एवढी आभळासारखी दाटून आलेली आहे, की आपण तिच्या त्या सुचीत केलेल्या दु:खाच्या वैशम्याच्या अनुषंगाने चार पावलं पुढे टाकीत जातो. सिनेमाच्या कथेची तशी गरज रहात नाही….
पियानोच्या स्वरांच्या माळेत खय्यामने हे गाणं गुंफलं आहे. पियानोचा असाच वापर, सी.अर्जूनने ‘सुशीला’ या चित्रपटात केला आहे .( बे मुरव्वत बे वफा…)
जगजीत कौरचं हे गाणं असं आहे…प्रसिध्दीच्या गजबजाटापासून दूर असणारं,आपलं,खाजगी…
( माझ्या ‘गीतमुद्रा’ या शब्दालय प्रकाशनाच्या वतीने प्रसिध्द झालेल्या संग्रहातल्या एका लेखावरून. )