सचिन…तुला मॅचमध्ये पहाणं हा आनंदाचा भाग. तुझं शतक पाहाणं हा तर पुत्रप्राप्तीचा आनंद. तुला मैदानात पाहणं ,तुझं वागणं बोलणं, वावरणं पहाताना एवढा आनंद होत असतो,एवढं सुखाचं असतं ते,काय सांगावं… आमचं भाग्य आहे हे, की तुझ्या कारकिर्दीत आम्ही हयात आहोत. प्रत्येक शतकानंतर कसल्याही उत्तेजना न दाखविता तू आकाशाकडे पाहून तुझ्या तर्हेनं व्यक्त होतोस…
तू सामान्य खेळाडू नाहीस. क्षुल्लक हावभाव, क्षुल्लक टीका टिप्पणी, क्षुल्लक चमकदार पण बेजबाबदार खेळी ही तुझी तबीयत नाही. तू मोठा आहेस . तुझं स्थान कितीतरी उंचावरचं आहे-
नही तेरा नशेमन कैसर-ए-सुलतान की गुंबद पर
तू शाहीन है , कर बसेरा पहाडों की चट्टानों पर
असं डॉ. इक्बाल यांनी म्ह्टलं आहे : सम्राटांच्या घुमटांवर घरटं करून रहाणार्या साध्या सुध्या पक्ष्यांसारखा तू पक्षी नाहीस. तू तर आहेस घारीसारखा, ससाण्यासारखा मोठा, मोठी झेप असलेला रुबाबदार पक्षी. पर्वतांच्या शिखरांवर अशा पक्ष्यांचा वावर असतो, निवारा असतो. तू तसा आहेस.
आज, आत्ता तुझी दोनशे धावांची ती अविस्मरणीय खेळी पाहिली आणि भरून पावलो. तुझं बोलणं,तुझं वागणं यात कमालीचा सभ्यपणा आहे. तुझ्याकडे पाहिलं, की पटून जातं-
अच्छे बुरे का मेल ही क्या
नूर जुदा,जुल्मात अलग ( नूर : तेज, प्रकाश. जुल्मात : अंध:कार )
( शायर : मुश्ताक )
भारतीय क्रिकॆटला तू शिखरावर नेलंस. तुझ्यासारखी माणसं इतिहास घडवितात. तुझा विजय असो ! तुझा हवाला देवून आम्ही जगाला अभिमानाने सांगू-
इ न्सान नही है वो, जो हवा के साथ बद्ले
इन्सान वही है, जो हवा का रुख बदले
वा! आजचा आमचा दिवस- आमचं आयुष्य तू सार्थक केलंस.