प्रेम; आणि तक्रार नाही,हे असं कसं होईल ? प्रेमात तक्रार तर असतेच शिवाय या शिकवा-शिकायत मध्ये एक प्रकारची अवीट गोडीही असते.
पण हे कुणाला लागू होतं? जेव्हा दोघंही एकमेकांवर अगदी फिदा असतात त्यांनाच.
सहसा प्रेम हे एकतर्फी असतं. आणि मग अशा स्थितीत तक्रार करायला गेलं, की ऎकून तर घेतल्या जातच नाही,शिवाय नाराजी वाढत रहाते. अबोला बाळगल्या जातो. मग तो प्रियकर दिवस रात्र बेचैन होतो, ती भेटली की तेच तेच सांगत रहातो.तिला त्याच्या सांगण्याबोलण्यावर भरवसा रहात नाही आणि मग हळू हळू प्रेमाचं रुपांतर एका दाहक अशा अनुभवामध्ये होतं. त्याला गप्पपणा घेरतो. तो मग तिला म्हणतो-
हश्र के दिन मेरी चुप का माजरा,
कुछ न कुछ तुमसे भी पुछा जाएगा
त्याला ही खात्री आहे, की प्रलयाच्या दिवशी-ज्या वेळी पापा पुण्याचा हिशोब होईल, माणसाच्या कृत्यांचा जेव्हा पाढा वाचल्या जाईल, तेव्हा ‘हा का बरं गप्प आहे ?’ असा प्रश्न तुला विचारला जाईल. नक्कीच.
आयुष्यभर जिने त्याचं अजिबात ऎकलंच नाही, तो शेवटी आयुष्यातूनच निघून जातो. आणि ती जेव्हा त्याच्या अंत्यदर्शनाला येते, तेव्हा त्याच्या निष्प्राण चेहर्यावर जणू हेच उमटलेलं असतं-
सुने जाते न थे तुम से मेरे दिन रात के शिकवे
कफन सरकाओ,मेरी बेजूबानी देखती जाओ..
पण आता तिला याचा पश्चात्ताप होतो आहे. त्याला आपण प्रतिसाद दिला नाही याचं प्रचंड दु:ख सोसत ती आयुष्य काढते. तिचाही अंत होतो, आणि जगाचाही अंत होतो. मग प्रलयाचा दिवस (महशर) येतो. या दिवशी सर्व मृतात्म्यांच्या पापापुण्याचा हिशोब होतो. जीवनभराच्या कृत्यांचा हिशोब लावून त्या त्या नुसार माणसाला स्वर्गात पाठवायचं का नरकात-याचा निवाडा केल्या जातो.
पण हे काय ? ती इथे चक्क गप्प बसून आहे. इतकंच नाही, तर तिच्या चेहर्यावर प्रचंड अपराधीपणा दिसतो आहे.पश्चात्ताप ( पशेमानी ) दिसतो आहे. नेहमीच आनंदाने रहाणारी ती-आता अशा अवस्थेत पाहून तिचा तो प्रियकर-ज्याच्या सांगण्या बोलण्याला तिने आयुष्यभर जुमानले नाही- कमालीचा अस्वस्थ होतो. तिथेच तो एक ठरवून टाकतो-
अपने सर ले ली महशर में खताएं उनकी
मुझसे देखा न गया उनका पशेमां होना
निस्सीम प्रेम याहून काय उत्कट असू शकतं…
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com