डॉ.इक्बाल यांनी म्हटलं आहे-
तू इसे पैमान:-ए-इमरोज व फर्दां से न नाप
जावेदां,पैहम रवां, हरदम जवां है जिंदगी
( पैमान: – मोजमाप,इमरोज : आज, फर्दां : उद्या, पैहम : निरंतर, र वां : प्रवाही )
दैनंदिन घटना, समस्या, काळजी ( आजाराची-मृत्यूची ?) अशा बाबीं कधी घ्रेरून येतात आणि मग गोमाशांनी एखादं जनावर त्रस्त होवून जावं तसं होवून जातं. काही खरं नाही गड्या.. असं वाटत जातं. कधी चिंतेचे एवढे काळे कुट्ट ढग जमा होतात, की वाटतं सरला आता खेळ सगळा, खल्लास ! हे खल्लास होणं केवळ शरीरानेच नाही तर अनेक अर्थांनी असतं. काही सुचत नसतं,संपून गेल्याची जाणिव अगदी रिकामं करून टाकीत असते.आयुष्याची निरर्थकता वगैरे तत्त्वांची आपण बडबड करीत असतो. अशा वेळेस डॉ.इक्बाल सारखे विचरवंत आपल्याला समजावितात, की केवळ दिवस व रात्रीच्या फुटपट्टीने तू आयुष्याची लांबी-रूंदी मोजू नकोस…आयुष्य हे निरंतर आहे, प्रवाही आहे,सतत चालणारं आहे.
पण होतं असं, की हे पटून तर जातं मात्र मनात ती उदासी निर्थकता भरलेली असल्याने मनाला आलेला ओशटपणा काही जात नाही. हा ओशटपणा जातो, ते एखादं वडिलधारी माणूस जेव्हा तोच आशय सुरातून सांगतो, समोर येवून सांगतो तेव्हा. दिन और रात के हाथों नापी नापी एक उमरिया साँस की डोरी छोटी पड़ गई लम्बी आस डगरिया भोर के मन्ज़िल वाले उठ कर भोर से पहले चलते ये जीवन के रस्ते… ‘आशीर्वाद’ मधल्या या गीताचे गीतकार आहेत,गुलजार. दिवस-रात्रीच्या हातांनी हे आयुष्य मोजलं. श्वासाची दोरी तोकडी पडली. दीर्घप्रवास चालूच आहे… अशोक कुमारसारखा दिर्घ आयुष्याचा धनी, अभिनयाचा धनी हे सांगतो, आणि सांगता सांगता निघूनही जातो, तेव्हा आयुष्याचा हा प्रदीर्घ प्रवास आपल्याला जाणवत रहातो आणि दम खावून आपणही त्या प्रवासाची नव्याने तयारी करीत जातो. हे असं चालतच रहातं… डॉ.इक्बाल यांनी हे सांगितलं, ते 1938 मध्ये गेले ,तेव्हा गीतकार गुलजार यांच्या आयुष्याची पहाट झालेली होती;त्यांचा जन्म 1934 चा.
please visit another blog : http://hasanyachaaakar.wordpress.com/