लेखन व्यवहार हा कष्टाचा असतो.कष्टाचाच असायला पाहिजे. पण हे कष्ट घेताना-ते घेतल्यावर किती हलकं हलकं वाटतं,हे ते कष्ट घेतल्यावर लक्षात येतं. निर्मीती प्रक्रीया जेवढी गूढ असते;तेवढीच- म्हटली तर छान,म्हटली तर गमतीदार असते. यातला गमतीचा भाग म्हणजे, प्रसिध्दी प्रक्रीया. आपलं लेखन प्रसिध्द होणं-पुस्तक प्रसिध्द होणं, या आनंदाला पुत्रप्राप्तीच्या आनंदाशिवाय दुसरा शब्द नाही. नवोदीत लेखकाची ती तारांबळ केवढी अवखळ असते… सापडलेली शंख शिंपलं पटकन मुठीत धरून पोराने चटकन आईबाबांना आणून दाखवावेत,तशीच घाई नव्या मार्गाच्या लिहिणार्याला असते..
लेखन प्रसिध्द होत जातं. ते शंभरांनी वाचल्याची खात्री ठेवून वावरावं अन् ते वाचलेलं असतं दहाएक जणांनी -हे नंतर कळत जातं. त्याची मग सवयही होत जाते. ‘ मी अगदी आतून सुचलं तरच लिहितो ’, ‘उगिच्या उगिचंच लिहिणं-पाट्या टाकणं ,तसं मी लिहित नाही-दुसर्या सारखं ’, ‘ माझं लेखन स्वत:साठी- प्रसिध्दीत मला रुची नाही’ हे असं सगळं बोलणं भ्रमांना जपण्यासारखं. खरं म्हणजे, प्रसिध्दीची/ प्रतिसादाची जाणिव न ठेवता लेखन करीत रहाणं,
हे अविवाहीत रहाण्याइतकंच अनैसर्गिक.
आपलं लेखन हे ‘ अक्षर साहित्य ’ आहे,कायम आहे -उत्तम आहे, या भावनांचे दगड गोटे मग आपल्या झोळीत जमा होतात.हे लेखनाच्या पुढच्या टप्प्याचे अनुभव. लेखनाबद्दल- मह्त्त्वाचं म्हणजे प्रसिध्दीबद्दल – लोकप्रियतेबद्दल आडमूठ ठामपणा,आडमूठ अपेक्षा,आडमूठ धुंदी वगैरे ठेवत ठेवत लिहिणारा माणूस स्वत:कडे केव्हा तोंड करून बसतो,त्यालाही खबर रहात नाही. आपलं नाव- आपली ओळख-आपलं छापून आलेलं लेखन साहित्य, याबद्दल त्याची जेवढी आग्रही भावना-स्वत:ला गोंजारणारी,अपरिहार्य अशी- तयार होते, ती एका अर्थाने मोठया कारूण्याची असते.
थडग्यावर-कबरीवर मृताचे नाव, त्याचा जन्म-मृत्यू वा अन्य माहिती कोरून ठेवायची जी प्रथा आहे, त्याबद्दल ‘रवां ‘या शायरने स्वत:लाच म्हटले होते-
है संगे-मजार पे तेरा नाम ‘ रवां ‘
मर कर भी उम्मीदे-जिंदगानी ना गयी
खरंच की… आपण गेल्यावर आपली स्मृती रहावी,ही इच्छा जगण्याच्या लोभातून निर्माण झालेली असते,का आणखी काही असतं त्याला कारण…
तर ते असो. ब्लॉगवर लेखन सुरू झालं आणि माझी अवस्था कशी झाली,हे सांगण्याची अनिवार इच्छा होते आहे; खरं म्हणजे कशी झाली हे वाटून घ्यायची इच्छा होते आहे.. कागदावरचे शब्द आता कागदाशिवाय व्यक्त होत आहेत… उन्हात वाळत घातलेल्या कुरड्या पापड्यांचे कापड मग संध्याकाळी ओसरीवर घेवून त्यावर पाठीमागून पाण्याचे सपकारे मारतात. मग खरपूस वाळलेल्या त्या कुरड्या पापड्या सुट्या होतात. दुरडीत जमा होतात. … माझे शब्द कागदावरून संगणकात जमा होताना मी पहातो आणि हे आठवत रहातं. दोन बोटांत लेखणी धरून होणार्या लेखनाला,धावता धावता पंख फुटून जमिनीवरून उचलल्या जावं, तसं, दहा बोटांचे पंख लाभले . वाचकाला-प्रसिध्दीला-कौतूकाला चिकटून बसलेले हे शब्द आता अवकाशात झेपावले. वाचणारे इथेही आहेत, बरंवाईटाची नोंद इथेही आहे; पण ज्या तर्हेने यात गुंतून होतो, ते आता कुठं आहे… नाहीच की. सुचलेल्या कल्पनांचा आकार करून ब्लॉगवर नोंदविणं हे, कागदी होडी करून पाण्याच्या प्रवाहावर सोडण्यासारखंच आहे.ही होडी कुठे कुठे जाईल,डुलत डुलत जाईल का बुडत बुडत जाईल, सांगता नाही येणार. आपली खुशी त्या कल्पनेची-त्या कल्पनेला अधांतरी केल्याची. नाही तरी ,आपलं लेखन छातीशी कवटाळून बसणं हा एका तर्हेनं पाहिलं तर हट्टीपणाच. मिर्जा गालिब हा शायर- टीकाकाराच्या, निंदकाच्या वागण्याने आचंबीत झाला आहे.त्याला सांगायचं आहे, की मी काही शाश्वताचा आग्रह धरून आलो नाही,ना माझा तसा दावा माझ्या साहित्याबद्दल आहे. मी जाणारच आहे,रहाणार नाही. मग असं असताना, माझ्याबद्दल कोणती भीती ठेवून तुम्ही माझ्याशी असं वागता बरं-
यारब! जमाना मुझको मिटाता है किस लिए
लोहे-जहान पे हर्फ-ए-मुकर्रर नही हूं मै…
या कायमस्वरूपी-लोखंडी अशा दुनियेवर कोरून ठेवलेल्या शब्दासारखा मी थोडाच आहे…
असो. आपल्या अखत्यारीत काही न ठेवता,आपल्या कल्पना अंतराळाच्या हवाली करणं हा रम्य अनुभव असतो. गुलजार यांनी आपल्या शब्दांतून अशीच एक गुफ्तगू केली आहे- ‘ दो दुनी चार ‘ मध्ये,किशोर कुमारच्या मार्फत…
हवाओं पे लिख दो, हवाओं के नाम
हम अनजान परदेसीयों का सलाम
साहित्यिकांचे सिमीत वर्तूळ, ओळखीचा परिसर,नावं ठेवणं-दूर्लक्ष करणं, अतिरिक्त कौतूक,भाबड्या भावना या सगळ्यांशी विरहीत अशी ही ब्लॉगची निर्मिती संवेदना… हा ब्लॉग- निर्मिती प्रक्रियेला उत्तेजना देणारा,नव्या रूपात मांडणारा. ( खरं म्हणजे, ब्लॉगचं साहित्य हे मुद्रीत साहित्यापेक्षा जादा कायम- हर्फ ए मुकर्रर; पण असं असलं तरी,ते बाळगता येत नाही,मिरविता येत नाही ही किती मजेदार बाब आहे ! ) ‘ग्लोबल’ भाषेत सांगायचं झाल्यास परसदारातल्या शेवग्याला आंतरराष्ट्रीय बाजार पेठ मिळवून देणारा. ही बाजार पेठ अभिव्यक्तीची- धंद्याचे, नफा नुकसानीचे व्यवहार, हिशोब न ठेवणारी.
ब्लॉगला पर्यायी शब्द मराठीत नाही. अद्याप नाही. आणि इंग्रजीतही त्याचा स्पष्ट अर्थ तसा नाही. ‘ वेब-लॉग ‘ या शब्दाचा तो संकोच असून दहा बारा वर्षांपूर्वी ब्लॉगचा जन्म झाला असे समजले. स्वत:साठीच लिहिलेली दैनंदिनी आणि प्रसिध्दीसाठी पाठविलेलं साहित्य; या दोहोंच्या दरम्यान या ब्लॉगचं अस्तित्त्व आहे, त्याची जागा अन त्याचं महत्त्व शोधायला पाहिजे . अभिव्यक्तीसाठी एकाच वेळी शब्द- दृश्य-चित्र-श्रवण अशा चोहू बाजूंनी उपलब्ध असलेल्या या अद्भुत माध्यमाला,तूर्त ‘चौफेर ‘ असं म्हणायला काय हरकत आहे ?
… किशोर कुमारने ते गाणं अशा पध्दतीने म्हटलं आहे, की तो जणू हवेत ब्लॉग लिहितो आहे-
ये किस के लिए है,बता किस के नाम
ओ पंछी तेरा ये, सुरीला सलाम …
लिहिलेल्या शब्दांचं मोल आबाधीत रहाणार आहेच; तेव्हा एखाद्या वेळी वही सोडून ‘वेब’चा आधार घ्यावा,
आपलं जडत्त्व कमी करावं…
काय हरकत आहे…