रात्रीची रोषणाई.विविध दिवे,प्रखर दिवे,रंगीत दिवे-अंधाराची फजिती करणारे,अंधाराला पळवून लावणारी ही रोषणाई… आणि या रोषणाईच्या मदतीने सगळा अंधार उज़ळून टाकून दिल्याची माणसाची मस्ती,त्याचा तो अभिमान – वृथा अभिमान. अंधारात कितीही दिवे लावले,केवढाही प्रकाश केला तरी पहाटेच्या उजेडाची बरोबरी हा प्रकाश कसा करणार ?
गृहसौख्य,निर्मळ प्रेम,कर्तव्य भावना या सगळ्यांकडे पाठ फिरवून माणूस संपत्तीचा आधार घेतो आणि जीवनात सगळा झगमगाट करून टाकतो.अतिरिक्त श्रीमंतीमुळॆ माणूस अंधाराला हाकलून लावायच्या प्रयत्नात असतो का नेहमी… आणि खोट्या रूबाबात वावरत असतो का…
पण… उदो उदो करणारी,सभोवताली जमणारी माणसं,ती संपत्ती ओसरली की अंधारात गडप झाल्यासारखी निघून जातात. म्हणून साधेपणा, निर्मळपणा याचं मोल करताच येत नाही.
चिरागां लेके दिल बहला रहे हो दुनिया वालों
अंधेरा लाख रोशन हो,उजाला फिर उजाला है.
खरं म्हणजे अंधाराला अस्तित्त्वच नसतं. प्रकाशाचा अभाव म्हणजे,अंधार.(प्रकाशाची तिरीप येते,तशी अंधाराची तिरीप येत नसते) त्याच प्रमाणे उर्जेचा अभाव म्हणजे थंडी. थंडीला वेगळं अस्तित्त्व नाहीच.
…असं जरी असलं तरी,जुल्फोंका अंधेरा- त्याला मात्र अस्तित्त्व आहे !मनात घर करून रहाणारा घनदाट केश संभार. प्रकाशीत चेहर्याच्या आजूबाजूचा हा सावळा अंधार..ही सावली;प्रखर उष्णतेच्या प्रकाशात हाताच्या खोप्याची जशी सावली; तशी-त्यापेक्षा अधिक मोलाची. य अंधाराचे वॆड ज्याला लागले,तो प्रकाशासाठी राजी होणारच नाही की !राजेन्द्र कृष्ण यांचा, एक मुजरा आहे; ‘जहान आरा’ सिनेमातला. लता आशाने गायलेल्या या मुजर्यातला हा शे’र दोघींनी एवढा घोळवून घोळवून गायला आहे, की मनाला त्या भावनेची सुरेख कल्हई होवून जाते…अंधाराचे आकर्षण वाटत रहाते…
छाए रहे नजर में तेरी जुल्फ के अंधेरे
कई आफताब चमके,कई चांद जगमगाए
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com