जुन्या जमान्यात, जेव्हा रेल्वे-बसा, दूरध्वनी काही काही नव्हतं तेव्हा दूरवर रहाणार्या, माणसाला निरोप देणं हे मोठं कठीण काम असायचं. त्यातही प्रेमातले निरोप देणं तर कठीणही आणि त्यात कमालीची जोखिमसुध्दा. महत्त्वाचं म्हणजे, पत्राची वाट पाहणं. ‘दाग’ हा शायर तर अगदी पत्रव्यवहाराची बाधा बाळगून असलेला. ( खरं म्हणजे, त्याने स्थानिक पोरीशीच सूत जमविलं असतं तर किती चांगलं झालं असतं, नाही का…) त्या दिवसात पत्र घेऊन जाणारा- आणणारा हा देवदूत- नामाबर, कासिद अतिशय महत्त्वाचा माणूस. प्रेमाच्या भावनेनं पुरेपूर भरलेलं ते संवेदनांचे फुलपाखरू या नामाबरच्या हवाली करायचं. मनातल्या कल्लोळांचे, शब्दांच्या नक्षीने मोहरलेलं फुलपाखरू काळजीपूर्वक त्या कासिदच्या हवाली करायचं.
पण पत्र लिहून हवाली केल्यावरही निश्चिंती कुठे रहाते ? काहीतरी आठवत राहतंच. मग तोंडी निरोप सांगायची घाई होते.
‘तू सांग तिला. पत्र तर देच; पण सांग तिला माझी अवस्था. म्हणावं, झोप नाही, जेवण नाही…डोळे लाल होवून गेले आहेत.’( दाढी वाढलीय हे मात्र सांगता येणार नाही- कारण बिनादाढीचा शायर असू शकतो का…) मग ‘दाग’ काय करतो-
आई है बात बात मुझे बार बार याद
कहता हूं दौड दौड के कासिद से राह में
शिवाय, तिने माझ्याबद्दल काही तपशील विचारले, तर सांग तिला-
कोई नामो-निशां पूछे तो ए कासिद बता देना
तखल्लुस ‘दाग’ है, और आशिकों के दिल में रहते हैं
आता हे पत्र धाडलं जातं. आता हातातून तो बाण निसटलेला आहे. आता हात चोळत बसणं आलं. पण त्याच्या मनात तिच्याबद्दलच्या भावना विचारांच्या कल्लोळात आता एक नवीन भर पडलीय, ती या कासिदची- हा नामाबर; अत्यंत उपयोगी, महत्त्वाचा असा माणूस. रुग्णाने वैद्यावर जेवढे अवलंबून रहावे, त्याहीपेक्षा जास्त असं, त्या नामाबरवर हे अवलंबून रहाणं. मग तो नाराज होवू नये, विश्वासाने त्याने काम करावं म्हणून त्याची सगळी बडदास्त ठेवली जाते. इतरांपेक्षा जरा जास्त ‘खुशाली’ दिली जाते.
आणि या अतिरिक्त बडदास्तीमुळे, तो नामाबरसुध्दा बावचळतो. तोसुध्दा मग अधिक उत्साहाने बोलतो. ‘तुम्ही काही काळजी करू नका- हा गेलो, की आलोच. सांगतो त्यांना सगळं सगळं.-अगदी सविस्तर; अन उत्तर घेऊनच येतो.’
पण नामाबरच्या तशा वागण्या बोलण्याचा ‘साईड इफेक्ट’, तो निघून गेल्यावर होत राहतो. त्याच्या तशा चापलुशीमुळे, लाडीगोडीमुळे ‘दाग’ला रास्त अशी शंका येते-
नामाबर चर्ब-जबानी तो बहोत करता है
दिल गवाही नही देता, के उधर जाएगा
…आणि दिवस रात्र त्या नामाबरच्या वाटेवर डोळे लावून बसणं. शंका कुशंकानी घेरून जाणं; उलटसुलट विचारांनी हैरान होणं नशिबाला येतं अशा प्रेम वेड्या शायरच्या.
मग एके दिवशी तो नामाबर दिसतो. याला उत्साहाचे उमाळे येतात. आणलं का उत्तर, काय आणलं, काय म्हणाली ती, रागात होते, का लोभात… अरे अरे अरे ! तो कासिद येतो आहे, अन इथे हे अवखळ मन कुठे स्वस्थ बसू देतं ? एका शायरने ही अवस्था अशी सांगितली आहे-
कसिद आया है वहां से, तू जरा थम तो सही
बात तो करने दे उससे, ए दिले-बेताब मुझे
माणूस प्रत्यक्ष प्रेमाच्या व्यवहारापेक्षा या पत्रव्यवहाराने जादा हैराण होवून जातो !