( ते तिच्या जीवाचे फूल / मांडीवर होत मलूल / तरी शोके पडूनि भूल /वाटतची होते तिजला,राजहंस माझा निजला ….सिडनी प्राणीसंग्रहालयात आपल्या गतप्राण पिल्लाला सोमवारपासून कवटाळलेल्या गोरिला मातेने या भावनेचाच प्रत्यय दिला आहे. )
…किती वर्षं झाली त्याला. वर्तमान पत्रातलं हे छायाचित्र पाहिलं आणि त्यासोबतच्या मजकुराने लक्ष वेधून घेतलं होतं. गोरिला मादी आपल्या पिल्लाला घेवून आहे, एवढंच दिसलं होतं; पण मजकुर वाचला,आणि आजवर त्या छायाचित्रातून बाहेर निघालो नाही. दि.3 एप्रिल 1998 च्या वर्तमानपत्रातलं हे छायाचित्र कापून, त्याला चोपडं-टिकावू आवरण चढवून ते मी बाळगतो आहे… तसंच, जसं ती आई आपल्या पिलाला बाळगून आहे.
मी एकदोन ठिकाणी वाचलं होतं,दूरदर्शनवर पाहिलंही होतं, वानरीला आपलं मूल गेल्याचं कळत नसतं म्हणे. ती त्याला तसंच एकदोन दिवस बाळगून असते…
या छायाचित्रासोबतचा मजकूर वाचला आणि पिलाची ती निष्प्राण नजर अस्वस्थ करून गेली. माणूस-प्राणी कसाही असो,कुठल्याही रंगाचा-पंथाचा-स्तराचा वा प्रकृतीचा ; प्रत्येकाला आपलं मूल राजहंसासारखं वाटतं. मृत झालेल्या त्या पिलाला जवळ घेवून बसलेल्या त्या आईच्या चेहर्याकडे पाहून वृत्तपत्राच्या त्या माणसाला या ओळींची अनावरपणे आठवण यावी,हे किती स्वाभावीक… राजहंस माझा निजला.
कितीदा तरी विचार येतो मनात, की माझी नजर,माझ्या भावना एवढ्या कालावधीतही खिळून राहिलेल्या आहेत, गुंतून राहिलेल्या आहेत त्या नेमक्या कशात… शब्दांत का दृश्यात… अनावर अशा भावना शब्दांतून व्यक्त होतात- का बरं. शब्दांची गरज का भासावी ? वाटून जातं,की अगतीक भावना, व्याकूळ भावना अनावर असतात, त्या धडपडतात शब्दांच्या आधारासाठी. कुठंतरी थांबण्यासाठी.म्हणून माणसाला शब्द पाहिजेत.
…पण नाही. तसंही म्हणणं एकेरीच असावं. रेबरच्या या व्यंगचित्रात तर शब्दांचा वापरही नाही; ना शब्दांतून उतरलेल्या त्या भावना. एक वृध्दा बसलेली आहे. एकटीच अशी. स्वत:तच मग्न झालेली,गुंतून गेलेली,विचाररहीत गाढ भावनांत उतरलेली. तिच्या शेजारी, तिचंच असं मांजर जवळ तर बसलेलं आहे, पण अंग मुडपून, स्वत्:तच गुंतून. शेजारी वृध्देचाच तो पोपट आहे ; पण तो सुध्दा स्वत:तच मश्गूल होवून-स्थीर होवून बसलेला आहे. या तिघांच्याही गप्पपणाला संदर्भ आहे, तो भिंतीवरच्या तसबिरीतल्या भरगच्च परिवाराचा. हा परिवार – या वृध्देचा परिवार.कुठे गेलाय तो.. कुठं गेलीत ती सारी माणसं,कुठं हरवलं ते गोकुळ… आज कुणीही नाही इथे. जी आहेत,माणूस -प्राणी ती निश्चल झालेली आहेत स्वत:मध्ये. भरलेलं घर होतं;आता ते रिकामं आहे- राजहंसांचा तो थवा निघून गेला आहे. निवासाची आता पोकळी झालेली आहे. मनात त्या गोकुळाच्या-त्या अपत्यांच्या स्मृती शेष आहेत.
पण आयुष्य थोडंच थांबणार आहे… आपल्याला जगावं लागतं.जगावं लागणार आहे. मात्र निकटच्या अशा आप्ताशिवाय जगत रहाणं म्हणजे…
गुजर ही जाएगी तेरे बगैर भी लेकिन
बहोत उदास, बहोत बेकरार गुजरेगी..
छायाचित्रात आणि व्यंगचित्रात…दोन्ही ठिकाणी एक प्रकारची विषण्णता
एक प्रकारची उदासी भरून आहे…आप्तांच्या दुराव्याची,अगतीकतेची.