माणसानं आयुष्यभर जे काम केलं असतं,ते काम करत करत सरत जाणं, हे त्याचं जगण्याशी प्रामाणिक असणं म्हणावं का. .. गाणारा गात गात मूक व्हावा, वादक-वाद्याशी खेळत खेळतच थांबून जावा, बोलणारा बोलत बोलत गप्प व्हावा तर लिहिणारा लिहिता लिहिताच पूर्ण विरामाला यावा .. असंच असतं का .. असंच असायला पाहिजे का..
हे असं असणं, असं होणं म्हणजे एक प्रकाराने भान असणं. आपण संपणार आहोत, जाणार आहोत याचं भान असल्यावर मग शिकायत कशाची ? मर्यादित षटकांच्या खेळीत आणखी षटकाची इच्छा नाही,तो विचारच नसतो.;तो प्रश्नच नसतो.विचार असतो, तो एकच- शेवटचं षटक आहे हे खेळायचं ,जोरदार खेळून काढायचं.
शायरला असं मृत्यूचं भान असतं. तो तयार असतो. आपला प्राण आता आपल्या शरीराची संगत सोडणार आहे,सोडतो आहे याची जाणिव त्याला असतेच; इतकंच काय,आयुष्यभर जे साधलं नसतं, ते त्याला, आत्ता या वेळी साधलेलं असतं : एकाच वेळेस शरीर आणि प्राण या दोहोंकडे अलिप्तपणे पहाणं. हे असं पहाता येतं,ते केव्हा- यावेळी. का ? तर यावेळी आयुष्यभराच्या सर्व संवेदना तीव्रतर अवस्थेत पोंचल्या असाव्यात. म्हणूनच ‘ दाग ‘ हा शायर या वेळेला-या शेवटच्या वेळेला आपल्याला सांगतो-
होशो-हवास-ओ’ताबो-तुवां, ‘दाग ‘ जा चुके ( शुध्दी,शरीरावरचा ताबा, भान )
अब हम भी जाने वाले है, सामान तो गया..
एक शायर असा, की त्याने आपले शरीर-प्राण यांना संगिताच्या-मैफिलीच्या-वाद्यवृंदांच्या जाणिवेतूनच पाहिलेलं आहे. शरीर मनाला केवळ संगीताचा हिस्सा समजणं..केवढं वेगळ्या प्रकारचं,सुरेख असं ते जगणं असेल.. आपलं शरीर हे वाद्य आहे, ज्यातून संगीत स्त्रवणारं असतं, गाणं उमटत असतं. या स्वरांच्या,या संगीताच्या -या रागदारीच्या लोभात आयुष्याचा प्रवास त्याने केलेला असतो. गाता गाता वाट सरावी, तशा धुंदीत आयुष्याचा हा प्रवास चालतो, होतो अन् आता वेळ आलेली असते,मैफिलीच्या शेवटाची. विलंबीत लयीत सुरू झालेला आयुष्याचा हा राग आता द्रुत लयीत आलेला तर असतोच, पण अगदी विरामाच्या समीप आल्यावर तर त्या लयीने एक गती पकडलेली असते,धुंदी चढलेली असते. हातवारे, शरीर, आवाज, चेहरा सगळं सगळं त्या क्षणापाशी गोळा होवू लागलेलं असतं… तो क्षण -शेवटचा.जीवनाची मैफिल थांबविण्याचा.
हिचकीयों पर हो रहा है ,जिंदगी का राग खत्म
झटके दे कर तार तोडे जा रहे है, साज के..
प्राण जाताना येणार्या उचक्या, हातापायांच्या त्या हालचालीला कोणत्या वळणाने हा शायर घेवून जातो आहे..
..पण कलावंत माणूस,कवी माणूस मोठा भाबडा असतो. त्याला परिसराचं भान असलं तरी, त्याचे त्या निमित्ताने उद्भवणारे प्रश्न – त्याच्या शंका एवढ्या निरागस असतात, एवढ्या भाबड्या असतात, की गंमत वाटावी. ..वास्तव समजून घ्यायचे त्याचे प्रयत्न ,त्याचे निकष एकदम साधे !
…की असंही असतं का- वय झालं,म्हातारपण आलं,की सगळी हुशारी, सगळं कर्तृत्त्व ,सगळं सगळं पाटीवरून पुसून जावं अन् मनाची पाटी पुन्हा कोरी व्हावी- लहानपण यावं, असं तर नाही ना.. हा शायर असाच झाला आहे. विझता विझता लहान लहान होतो आहे.त्याला कळेना झालंय की आपल्या बिछाण्याभोवताली ही सगली जण का बरं गोळा झाली असावीत…
ये क्यूं उड चला है रंग यारब मेरे चेहरे का
ये क्यूं पिछले पहर से सब के सब हुशियार बैठे है..
टीप: माझ्या दुसर्य़ा ब्लॉगला भेट द्या इथे – http://hasanyachaaakar.wordpress.com/