Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Posts Tagged ‘तबस्सुम’

उर्दू शायरीमघ्ये, प्रेम झाल्यापेक्षा,  प्रेम न झालेलं अधिक चांगलं असतं; अर्थात आपल्यासाठी.  शायरीतला प्रेमी आपलं अर्धं अघिक आयुष्य तिची वाट पहाण्यात किंवा ती भेटून गेली,  तर त्या आठवणी काढून पुन्हा तिची वाट पहाण्यात घालवतो. तिनं होकार दिला, लग्न झालं बुवा त्यांचं ( किंवा चांगला एन्ड करायचा झाला, तर नाही झालं ),  असं कधी झालंच नाही. तिची वाट पहाण्यात, शमा आणि शराब यात त्यांचे हजारो रुपये खर्च झाले असतील !( तुम्ही म्हणाल शायर लोकांकडे एवढे पैसे आले कुठून ? तर तसं नाही म्हणायचं मला- हजारों शायर लोकांचे मिनिमम तेवढेच हिशोबात घेतले तर ? ) असो.

महत्त्वाचं  म्हणजे, रात्रं दिवस तिचा विचार करीत , तिची वाट पहात रहाणारा हा शायर एका विचीत्र मानसिकतेचा बळी होवून जातो- साईड इफेक्टच म्हणा ना  ! सतत वाट पहाण्याने अन सतत विचार केल्याने त्याच्यातली कृतीशिलताच खलास होवून जाते ; आणि मग जेव्हा ती प्रत्यक्ष भेटते,  तेव्हा त्याला
काही सुचतच नाही की !

तूम मुखातीब भी हो, और करीब भी
तुमको देखूं, की तुमसे बात करूं..            (‘फिराक’ गोरखपुरी)

आणि खरंच आहे की-  जिच्या दर्शनासाठी ( दीदार ) एवढे दिवस वाट पाहिली ( एवढे दिवस –  चेहरा विसरून जायची वेळ आली, भलतीच आवडून जाईल की काय असं वाटायची वेळ आली. कारण मनातल्या मनात चेहर्‍याची उजळणी करून करून मनाची पाटी पांढरट होवून गेलेली ! ) , तिचं दिसणं एवढं मोलाचं झालेलं होतं, की ती दिसली – भेटायला आली, की डोळ्यावर विश्वासच बसत नाही. गडबड होवून जाते. मनाचं वारू बावरून जातं. तिला  पहात राहावं वाटत असतं आणि काय काय बोलू, काय नको हे अजिबात सुचत नाही. भेटीचा पहिला बहर सरला, तरी तो असर उतरलेला नसतो. तिला पहात बसावंही वाटतं,
आणि महत्वाचं म्हणजे, इतके दिवस मनात  साठवून ठेवलेला, घोळून घोळून तोंडाला पाणी सुटलेला तो मुद्दा- माझं तुझ्यावर प्रेम आहे हा – सांगायचाही असतो. … पण पहात बसणं सोपं हो ! त्याला काय लागतं नजर लावून रहायचं , तिचं लक्ष गेलं तर, रागात वाटली तर नजर वळवायची; शिवाय पहाणं म्हणजे काय डोळ्याला डोळे लावून पहाणं असं थोडंच असतं ! बाक़ी शरीर नसतं का !बोलणं मात्र मोठं अवघड !  तर मुख्य मुद्दा काही सांगितल्या जात नाही.  उलट –

लब पे आया न हर्फ-ए-मुद्दआ लेकिन,
इधर उधर से सुनाए हजार अफसाने

बरोबरच आहे. उजळणी करून करून आत्मविश्वास खलास झाला असतो . शिवाय प्रेमाचा इजहार तिच्या माघारी करण्याएवढी सोपी गोष्ट नसते. तिच्या समोर मात्र हिंमत होत नसते. महत्त्वाची  भिती अशी, की ती जर ‘नाही’  म्हणाली तर – आली का मग आफत ! शिवाय-  शिवाय संकोच, भय, धडधड या बाबी एवढ्या कार्यरत झालेल्या असतात, की त्यामुळे मुख्य मुद्दा रहातो बाजूला अन इकड्चं- तिकडचंच  सांगितल्या जातं, बोलल्या जातं. अप्रस्तूत असं ते वागणं बोलणं असतं.  अन मग ती निघून  गेली, की पुन्हा चुटपुट वाटत राहाते.. ( पुन्हा जाग्रणं ! )

एका शायरची प्रेयसी उत्सूक होती. तीने विचारलंही होतं त्याला ..’ कुछ कहना चाहते है क्या आप ? ‘ पण हा मुखदूर्बळ !  तो म्हणून गेला-
अब आ गए है आप, तो आता नही है याद
वर्ना हमें कुछ आप से.. कहना जरूर था

आता बोला !

‘ अकबर ‘ इलाहाबादी हा एक मजेदार शायर होता. उत्तम व्यंग रचना कशी असावी , ते या शायर कडून शिकावं. एरवी शायर- कवी लोक एवढे संवेदनाक्षम (हायली इनफ्लेमेबल  ! ) असतात, की ते विनोदामुळे- थट्टेमुळे चक्क दुखावले जात असतात. असो. तर या अकबर इलाहाबादीने एका शे’र मध्ये हकिकत सांगीतली आहे, एका शैखची- धर्मगुरूची. आता धर्मगुरू झाला,  तरी माणूसच आहे ना तो. अन त्यातही  तो तरूण ; मग त्याला प्रेम करायला काय हरकत आहे ? तर त्याचं प्रेम बसलं एका तरुणीवर. तिनं त्याला भेटायलाही बोलावलं आहे, एवढी प्रगती झाली त्यांच्या प्रेम संबंधात. आता भेटीत बोलणं, गप्पा-गोष्टी, थट्टा-मस्करी पाहिजे ना- महत्त्वाचं म्हणजे, रोमांचीत करणार्‍या त्या गप्पा हव्यात. आता हा तरूण  पडला धर्मगुरू; धर्म – प्रवचन, पाप-पुण्याशी संबंधीत.  त्याचा तोच व्यासंग, तीच आवड.  मग तेच त्याच्या बोलण्यात येणार; नाही का ?  ज्याची जी आवड तीच त्याची भाषा . तर परिणाम काय झाला त्या भेटीचा पहा-

निकाला शैख को उसने ये कहकर
ये बेवकूफ है, मरने का जिकर करता है
.

आणि तिचंही कुठं चुकलं सांगा ना, माणसाला जन्म आहे तसाच मृत्यूही आहे, त्याने पुण्य कर्म करावं,पापं करू नयेत हे सगळं सगळं अगदी खरं आहे, हे मान्य; पण हे सगळं सांगायची ही वेळ आहे का,  ही जागा आहे का, आं ! सांगा की…प्रेमाच्या वेळी, प्रेयसीच्या सानिध्यात… एकांतात..मुका आठवावा की मृत्यू ?

Read Full Post »