परभणी जिल्ह्यातले कै.गोपाळराव वांगीकर हे त्यांच्या जमान्यातले एक उत्तम कवी,विडंबनकार होते. तो काळ स्वातंत्र्याच्या पूर्वीचा. अर्थात मराठवाड्याचे हे जिल्हे हैद्राबादशी-निजामी अंमलचे होते. त्या पिढीतल्या माणसांचे शिक्षण उर्दू माध्यमातून होणे, पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाशी संवंधीत असणे हे स्वाभवीकच असायचं.
तर हे गोपाळराव वांगीकर, यांनी उर्दू भाषेचा वापर करून काही मराठी कविता एवढ्या सुरेख केल्या आहेत, की आपण म्हणावं- लाजवाब !
सप्टेंबर 1993 मध्ये औरंगाबाद च्या दै. तरूण भारत मध्ये गोपाळराव वांगीकरांबद्दल माहिती आणि त्यांच्या काही रचना प्रसिध्द झाल्या होत्या. तो लेख मला एवढा आवडला होता, की एका रचनेचा तेवढा कागद कापून मी माझ्या जवळ अद्याप बाळगून आहे. त्यातली एक रचना – रचनेची गंमतम्हणून त्या गमतीदार रचनेचा समावेश मी या ठिकाणी करीत आहे.
जर समर्थ रामदास स्वामी निजामी अमदानीत असते, तर त्यांच्या, मनाच्या श्लोकांचं स्वरूप कसं उर्दू मिश्रित झालं असतं, ही कल्पना करून वांगीकरांनी ते श्लोक अशा तर्हेने मांडले आहेत –
प्रभाते मनी राम चिंतीत जावा / पुढे वैखरी राम आधी वदावा
अलसुबह राम खयालात घ्यावा / आगे राम कबलज जबानी पढावा
( कब्ल : पहिला, आधी )
सदाचार हा थोर सांडू नये तो / जनीं तोचि तो मानवी धन्य होतो
सदाचार तो यार तरकू नये तो / मुबारक बशर तोच दुनियेत होतो
( तर्क : सोडून देणे बशर : माणूस )
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें / तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे
शरीफे दिला भक्ती राहेची जावे / पुढे श्रीहरी खुदबखुद राजि पावे
जनीं निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे / जनीं वंद्य ते सर्व भावे करावें
जहांला पसंद नाच तरकून द्यावे /जहांला पसंद तहेदिलाने करावे
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी / मना सज्जना हेचि क्रीया धरावी
झाल्यावरी फौत शोहरत उरावी /शरीफे दिला रीत हेचि धरावी
( फौत : मृत्यू शोहरत : प्रसिध्दी ,कीर्ती )
मना चंदनाचे परी तां झिजावे / परी अंतरी सज्जना निववावें
दिला संदलाचे परी त्वा घिसावे /शरीफे दिला त्वा बहेलवावे
समर्थाचिया सेवका वक्र पाहे / असा सर्व भूमंडळी कोण आहे
तिरछा गुलामे-समर्थास पाहे / असा कोण कमबख्त दुनियेत आहे
जयाची लिळा वर्णिती लोक तीन्ही / नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
जयाचा करिश्मा तिन्हीलोक गाती / न भुलो कभी रामदास उसके जो साथी
आणि लक्षात आलं, की ईश्वराबद्दल ठाम श्रध्दा असल्यावर आणि माणसाला तीव्र विनोदबुध्दी असल्यावर माणूस भक्तीमार्गात किती छान तर्हेने गमतीचे कारंजे उडवू शकतो !
थट्टा करणार्या माणसाचंही तसंच असतं. त्याच्या मनात एखाद्याबद्दल आस्था असली, प्रेम असलं तर अशा माणसाची थट्टा ही निर्मळ होते. ती ऎकावी वाटते. त्या माणसाबद्दल, त्या विषयाबद्द्ल जिव्हाळा तयार होवून जातो. आजही मराठवाड्यात निजामी अंमलाचा परिणाम बोलीभाषेत जाणवतो, तो म्हणजे, बोलण्यात येणारा हिंदी-उर्दू भाषेचा असर. माणूस सहजच बोलून जातो – ‘फारच परेशानी झाली बुवा !’ किंवा ‘त्याची हैसियतच काय ?’ वगैरे. कार्यालयीन व्यवहारात तर पेशकार, इजलास, दाखल करणे, दाखला असे कितीतरी शब्द रूढ आहेत. आणि मग खरंच वाटून जातं,की रामदास स्वामी त्या जमान्यात असते, तर त्यांच्या भाषेत अशी गंमत झाली तर ? किंवा सर्वसाधारण जनतेला समजावं म्हणून त्यांनी अशा भाषेचा वापर करून काव्य रचले तर… ते स्वाभावीकच होईल की- अर्थात ही सगळी गंमतच. गमतीनेच पहायचं असतं याकडे.
याच निमित्ताने या विषयाशी संबंधीत वसंत सरवटे यांचे एक व्यंगचित्र आठवले. साप्ताहिक ‘माणूस’ मध्ये वर्ष 1968-70 या काळात सरवटे यांच्या व्यंगचित्रांचे सदर रहायचे. त्यात एकदा रामदास स्वामींबद्दल अनावश्यक वाद उपस्थित झाले होते, या घटनेची गंमत सरवटे यांनी उडवून दिली होती. ते व्यंगचित्र हे होते-( संदर्भ : रेषालेखक -वसंत सरवटे/ संपादन : दिलीप माजगावकर-मधुकर धर्मापुरीकर / राजहंस प्रकाशन,पुणे )