Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘Uncategorized’ Category

शाळकरी वयात जेव्हा गाणी ऎकायचो, त्यावेळी ती काय सगळी बालगीतं थोडीच असायची ? छे ! उलट ती तशी गीतं आवडायची नाहीत. भक्ती गीतं,भावगीतं,चित्रपटातली गीत्ं ऎकल्या जायची. मोठ्या चवीनं ऎकल्या जायची. अर्थात त्या गाण्यांचा अर्थ समजण्याचं ते कुठं वय होतं म्हणा; पण गाणी मात्र मुखपाठ असायची.प्रश्नच नाही. मग शाळा ओलांडून जसजसं मोठं होत गेलो, तसतसं गाण्यांतल्या शब्दांचे अर्थ उजळू लागले, गाण्याचा अर्थ समजू लागला, गाणं कळू लागलं. अशी कितीतरी गाणी आहेत, जी शाळेत असताना वेगळ्या अर्थाची वाटली, त्याचा खरा अर्थ नंतर जाणवला. हिंदी गाण्यांच्या बाबतीत तर नेहमीच तारंबळ उडायची, ती शब्दांची. रेडिओवर ऎकलेलं ते गाणं- एक तर शब्द नीट ऎकायला यायचे नाहीत. नीट ऎकायला आले, तर त्याचा नेमका अर्थ समजायचा नाही.
मराठी गाण्यांच्या बाबतीत शब्दांचं तेवढं कोडं पडायचं नाही. ‘नववधू प्रिया मी बावरते..’ ( कवी : भा.रा.तांबे.)या गाण्यानं मात्र गंमत केली. शाळेत असताना हे गाणं आवडलं होतं, ते त्याच्या चालीमुळे. शिवाय आईला, मावशीला हे गाणं आवडायचं म्हणून मलाही आवडायचं. अर्थात त्या दिवसांतल्या सवयीमुळे ते गाणं मुखपाठ करून टाकलं होतंच. नव्या नवरीचं ते बावरणं, अडखळणं,लाजणं वगैरे सगळं सगळं त्यात आहे, हे शाळा ओलांडताना समजलं होतं फक्त. माहित असायचा प्रशनच नव्हता की. हे सगळं नवर्‍याला उद्देशून म्हटलेलं गाणं असून त्याच्यापुढे व्यक्त केलेल्या त्या भावना, आधारासाठी त्याने हात पुढे करावा हे आवाहन असलेलं ते गाणं जपून राहिलेलं होतं मनात. मग –
आता तूच भय लाज हरी रे
धीर देवूनी मी नवरी रे
भरोत भरतील नेत्र जरी रे
कळ पळभर मात्र खरे घर ते
हे कडवं ऎकलं की मनात चलबिचल व्हायची. काहीतरी वेगळं- उदासी ओलांडलेली हुरहुर,त्या प्रकारची अधीरता या गाण्यात आहे, हे तरूणपणात समजू लागलं. तथापि, हे कडवं तेवढं गांभीर्याने घेतलं नाही. का- कारण माझं तरूण वय आणि ती नववधू आहे, ही भावनाच एवढी तल्लख होती,की… अशावेळेस शरीरात गुंतलेल्या मनाला डोळ्यातला ओलावा जाणवत नसतो. तो कुणाचा दोष नसतो, बस- वय असतं ते.
…आजही त्या गाण्याची संगत सुटली नाही. आजही ते गाणं तितकंच आवडत आहे. मात्र त्या गाण्याच्या आवडीला आता कारण आहे माझ्या पन्नाशी ओलांडलेल्या वयाचं. ते शेवटचे कडवे जे मला फक्त समजले होते, ते आता अधिक अधिक जाणवत आहे. वय वाढू लागलं,व्याप-ताप वाढू लागले,मुलं मोठी झाली आणि कुणाच्याही लग्न समारंभाला गेलं, की आता मुलीचं ते निघणं मनात घर करू लागलं. लग्नाच्या घाईगर्दीचे साताठ दिवसांचे ते ताण तणाव, जाग्रणं, धावपळ,उत्साह, कष्ट सगळं सगळं गोळा होवून त्या निघण्याच्या वेळेला जणू पूर येवून जातो. अधीर झालेलं मन बावरून जातं….कुणाचंही लग्न असो, लग्नाच्या या शेवटच्या प्रसंगाने मनात चलबिचल होवू लागली.
दरम्यान केव्हातरी पूर्वीच या कडव्याचा अर्थ लागलेला होता.मागेच लक्षात आलं होतं,की हे गाणं ईश्वराला उद्देशून आहे. प्रियकराच्या रूपातला तो ईश्वर-तिकडेच जायचे आहे…खरं घर तेच आहे. आणि जाण्याची ओढही आहे- नदीच्या नैसर्गिक प्रवाहासारखी. आणि जाताना-निघताना होणारी थरथरही आहे. आता हे गाणं अधिक जिव्हाळ्याचं वाटू लागलं, अधिक जवळचं वाटू लागलं.
‘दिल ही तो है’ या चित्रपटातलं मन्नाडेचं गाणं अशाच नवथर तरूणीच्या अविचारी कृतीला पडलेला प्रश्न नमूद करणारं आहे-
लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे
चुनरी में दाग छुपाऊं कैसे घर जाऊ कैसे
या गाण्याचंही असंच झालं. शास्त्रोक्त संगीताचा साज-शृंगार असलेलं, लयदार,ढंगदार असं हे गाणं; या गाण्यातली पहिली ओळच तेवढी त्या वयात जाणवायची, आवडायची.चुनरीला लागलेला-बदनामीचा,लोकांच्या बोलाचा हा रंग आता कसा लपवायचा,कसा पुसयचा…
पण त्यातही गंमत अशी व्हायची,की मन्नाडेची ती ओळ ज्या तर्‍हेने म्हटल्या गेली-
वो दुनिया मेरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल
जा के बाबुल से नजरे मिलाऊं कैसे,घर जाऊं कैसे
त्याच तर्‍हेने मनात वैताग उमटून जायचा- ही कसली ओळ ? या ससुराल-बाबुलचा कुठे संबंध आला या झोकदार,रोमॅंटिक गाण्यात ? आं !
पण गाण्यातले पडलेले-पडणारे हे प्रश्न आभ्यासातल्या प्रश्नांसारखे नसतात : उत्तर दिलंस तर पास नाहीतर नापास, असे दटावणारे हे प्रश्न नसतात. आवडीच्या प्रांतात न समजणार्‍या गोष्टी,न सुटणारे प्रश्न हे सुध्दा आपलेच असतात; आपुलकीचे असतात,ते सुटले नसले तरी त्या प्रश्नांची संगत छानच वाटत असते. हिंदी गाण्यातल्या अशा कितीतरी कितीतरी अपरिचीत- न समज़लेल्या प्रश्नांच्या गाठी सोबत राहिल्या आणि पुढे आपोआप सुटून गेल्या.
साहिरची ही रचना मनात अशीच घर करून राहिली होती; त्या ससुराल-बाबुलच्या संबंधाची गाठ घेवून. पुढे वयाच्या पुढच्या टप्प्यात लक्षात आलं, हे गाणं रोमांचीत करणार्‍या भावनांचं जसं आहे, तस6 त्यात वेगळ्या जाणिवांचा वावरही आहे. आपलं आयुष्य, आपला या जगातला वावर,आपल्या आयुमर्यादेची जाणिव,आपल्यावरची जबाबदारी, आपल्याकडून अनाहूतपणे झालेल्या चुकांमुळे आता ईश्वराला- तिकडे गेल्यावर, काय सांगावे- त्याला कसं तोंड दाखवावं, या अशा भावना असलेलं हे गाणं आहे-जोरदार वाद्यवृंद आणि लयीत असलेलं.
पण गंमत आहे या दोनही गाण्यांत. लता मंगेशकरच्या त्या गाण्यात ईश्वराला नाथ म्हटलेलं आहे. तिकडेच आपल्याला नांदायचं आहे,ही जाणिव आहे. आणि मन्नाडेच्या या गाण्यात ईश्वराचं घर हे बाबूल आहे-माहेर. दोनही गाण्यत रोमांचीत करणार्‍या शारीर भावनांतून शरीरापलीकडचे जे अस्तित्त्व आहे, त्या अस्तित्त्वाची ओढ आहे.-तिकडली जाणिव आहे.
गाण्यातले-काव्यातले अर्थ आपल्याला समजतात; पण खरेदीला आलेला ग्राहक जसा आपापल्या रुचीनुसार त्यात्या दुकानांत रेंगाळतो, तसं आपल्या वयानुसार- आवडीच्या अनुरूप आपण त्यात्या शब्दांपाशी गुंतून रहातो. …पुढे दिवस बदलतात आणि तेच गाणं आपल्याला वेगळ्या स्वरूपात जाणवत रहातं. ‘फिराक’ गोरखपुरींचा एक शे’र कॉलेजला असताना वाचण्यात आला होता-
हजारबार जमाना इधर से गुजरा है
नईनई सी है कुछ तेरी राहगुजर फिर भी
अर्थ सरळच होता.प्रेमाच्या ऑळखीच्या वातावरणाचा. प्रेयसीच्या घराकडचा हा रस्ता वर्दळीचा असा. जाणारे येणारे लोक नेहमीच येत जात असतात. मीसुध्दा या रस्त्यावरून आलो-गेलेलो आहे. पण जेव्हापासून तुझी ओळख झाली आहे, तू मला आवडायला लागली आहेस, तेव्हापासून हाच रस्ता कसा नवीन वाटतो आहे….
या शे’रचा अर्थ सरळ असूनही मला तो एकदम वेगळ्या तर्‍हेने जाणवला एकदा. दवाखान्यात चार दिवसांकरीता ऍड्मिट होतो. ते सगळं तिथलं वातावरण ती औषधं, आजारपणाचे ते वातावरण आणि ती काळजी हे सगळं सगळं मी अनेक वेळा पाहिलेलं होतं. मित्रांच्या,नातेवाईकांच्या उपचारांच्या निमित्ताने. दवाखान्यात आलो होतो,मुक्कामही केला होता, काळजीही… नवीन नव्हतंच तसं काही. पण जेव्हा माझ्यावरच ही वेळ आली, जेव्हा मीच रूग्ण झालो, तेव्हा मला हाच दवखाना, हेच वातावरण, हाच परिसर कसा नवा नवा वाटू लागला.
वयाचा हा अनुभव ही अनुभुती…

Read Full Post »

कालच्या ब्लॉगवर श्री रणजित यांनी प्रतिक्रिया देताना, त्यांना ‘दो बूंदे सावन की’  या गाण्याची आठवण झाली. श्रावणात बरसलेली पावसाची दोन थेंबं… त्यांचं नशिब किती वेगळं असतं, एकाच झाडावरची दोन फुलं, आणि दोन लहानपणच्या मैत्रिणी…. दोघांना सोसावं लागलेलं वेगवेगळं आयुष्य… साहिर लुधियानवींची ही रचना असून संगितकार आहेत खय्याम.या गाण्यात आशा भोसलेंची संगत केली आहे ती बासरीने. त्या बासरीचे स्वर आणि आशाबाईंचा आवाज… दोन मैत्रिणीच या…

Read Full Post »

कुणाची प्रतीक्षा करणं म्हणजे वाढत जाणारा ज्वर सोसणं. प्रतीक्षा सुरू केव्हा होते-जेव्हा नियत वेळ ओलांडली जाते. कधी कधी ही नियत वेळ जेव्हा आपण स्वत:होवूनच अलिकडे-अगदी अलिकडे आणतो अन वाट पहायला सुरूवात करतो,तेव्हा खरं म्हणजे त्यावेळी ती प्रतीक्षा नसते बरं, ती असते अभिलाषा. उतावीळपणा,उत्सुकता. प्रतीक्षा करणार्याीची नजर वाटेकडे केंदित होवून बसलेली असते आणि त्या नजरेसोबत सगळं शरीर,सगळ्या हालचाली इतकंच काय श्वाससुध्दा तिकडे-त्या तिकडे लागून राहिलेले असतात.
आ,के मुंतजिर है बज्मे-गुलिस्तां तेरे लिए
महकी हुई है देर से सांसे गुलाब की
( मुंतजिर : प्रतीक्षा करणारा. बज्मे-गुलिस्तां : बागेची मैफल )
…बागेची ही मैफल सजलेली आहे,प्रतीक्षा करीत आहे.कुणाची प्रतीक्षा आहे बरं या उपवनाला..उपवनातले गुलाबसुध्दा अगदी उत्सुक होवून वाट पहात आहेत,त्यांचे श्वास त्या आगमनाच्या प्रतीक्षेत घमघमू लागले आहेत. कुणाची बरं असावी ही प्रतीक्षा…उपवनाला प्रतीक्षा कुणाची असणार- वसंताची;नाही का! बाग आणि बहार हे नातंच असं आहे. त्यांना एकमेकांची ओढ असणारच.
पण हा प्रतीक्षेचा ज्वर जसजसा वाढत जातो, तसतसं अस्वस्थ वाटत जातं. चुळबुळ होत रहाते. आठवणी,विचार आणि कल्पना यांची मनात जणू दंगल सुरू होते. येण्याची खात्री असल्यावर तर मग काय- तो साक्षात झाला आहे याचेच भास होत रहातात. ‘जिगर’मुरादाबादी तर गाण्यासाठी,संगीतासाठी एकदा एवढा उत्सुक झाला होता,की त्याला त्या वाद्यातून गाणं चक्क ऎकायला येवू लागलं होतं की !
गोशे-मुश्ताक की क्या बात कहूं अल्लाह अल्लाह !
सुन रहा हूं मैं वो नग्मा,जो अभी साज में है
( गोश : कान, गोशे-मुश्ताक : उत्सुक,आतूरलेले कान)
आणि माणसाची ही अशी उत्सुकता जर त्याच्या प्रिय व्यक्तीशी निगडीत असेल तर मग काय विचारता! हा जो संघर्ष आहे-प्रियतमेसोबतच्या जवळीकतेचा,दुराव्याचा; त्यात ह्रदयाचं स्पंदन हे शारिरीक चलनवलनाची कृती न रहाता भेटीच्या धडपडींची हालचाल होवून जातं-जणू आजाराची बाधा होवून जाते.मिर्जा गालिब आपल्या या ह्रदयाचा (मनाचा) समाचार घेताना ( दिले-नादां तुझे हुवा क्या है,,,) विचारतो-
हम है मुश्ताक और वो बेजार
या इलाही! ये माजरा क्या है
(बेजार: उदास,नाखुश या इलाही : हे माझ्या परमेश्वरा! माजरा: मामला,भानगड )
आम्ही एवढे उत्सुक आहोत अन ती चक्क उदासीन-आं! देवा, हा मामला काय आहे ? काय झालं?
‘मिर्जा गालिब’सिनेमात या ओळी सुरैय्याच्या तोंडी असल्याने आपली ( हो, आपलीच, गालिबची नाही ) ‘मुश्ताकी’ अधिक होवून जाते !

Read Full Post »

तीव्रता

‘अकबर’इलाहाबादी यांच्या शायरीत व्यंग असतं,विनोद असतो आणि व्रात्यपणाच्या जवळ जाणारा असा अवखळपणा असतो. शायर; अन तो सुध्दा शराबने किंवा आशिकीने एकदा का बेभान झाला की त्याच्या त्या बेभानवृत्तीला, ‘पिसाळला’ की काय ! असंही म्हणावं वाटतं. तशा कल्पना ‘अकबर’ यांच्या शायरीत उसळलेल्या असतात. आता याच शे’रचं उदाहरण पहा –
किस नाज से कहते हैं वो झुंझला के शबे-वस्ल
तुम तो हमें करवट भी बदलने नही देते

( नाज: हावभाव, नखरा    झुंझला के :वैतागून ) मिलनाच्या रात्री त्याच्य अवखळ उत्साहाची तीव्रता एवढी वाढलेली असते, की त्याच्या तशा वागण्याने वैतागून ती म्हणते,- अरे ! तू तर मला कूसही बदलू देत नाहीस !

….आणि जेव्हा नाराजी होते,माणूस मनात राग धरून असतं,तेव्हा हीच वागण्यातली तीव्रता टोकाला जाते. एवढी की त्याचा संपर्क तर दूरच राहिला,त्याच्या गल्लीतून जातानासुध्दा क्षणभर थांबायची तयारी नसते. ‘गालिब’ला अशा तीव्र नाराजीच्या वागण्याचा अनुभव आला-
पिनस में गुजरते हैं जो कुचे से वो मेरे
कंधा भी कहारों को बदलने नही देते

(पिनस : मेणा,डोली.    कुचा : गल्ली       कहार : मेणा वाहून नेणारी माणसं )
तीला जेव्हा लक्षात येतं,की आपण त्याच्या घराजवळून जातो आहोत, तर आपल्या माणसांना ती खांदा बदलायची उसंतसुध्दा घेऊ देत नाही.
-नाराजीची ही केवढी तीव्रता म्हणावी ही…

Read Full Post »

रूबाब

लताच्या एका जुन्या गाण्यात शेवटचे कडवे गाताना आवाज उंचावून ती गाते-
जो टूटता  है रूबाब, उसको टूट जाने दे
मेरे शबाब को जी भर के गीत गाने दे…

माझ्या तारूण्याच्या उत्साहाला आवर मी घालणार नाही. मी गात रहाणार. गाण्य़ाच्या साथीसाठी घेतलेला हा जो रूबाब आहे, तो तुटला तरी बेहत्तर,मी गातच रहाणार…
हा रूबाब. हे वाद्य. साथ संगतीचं वाद्य. आणि उत्साहाच्या मनाला संगत देणारं शरीर हेसुध्दा वाद्यच असतं ना. आणि रूबाब हा शब्द आणखी एका अर्थाने लागू होतोच की आपल्याला. उत्साहाने,तारुण्याने भरलेल्या शरीराचा रूबाबच वेगळा असतो.
आणखी एका अर्थाने हा शब्द लागू होतो. शरीर हे थकणारंच असतं.संपणारच असतं. मनाला आवर नसतो,मर्यादा नसते. म्हणून तर अनावर झालेलं मन शरीराची पर्वा न करता म्हणत रहातं-जो टूटता है रूबाब,उसको टूट जाने दे… शरीर जेव्हा थकायला लागतं,तेव्हा आपण म्हातारे होत चाललो,की काय अशी शंका येत रहाते; आणि एवढंच नव्हे तर ती शंका स्वस्थ बसू देत नाही. मग मागचे ते दिवस, तारूण्यातल्या त्या आठवणी येत रहातात, मन अनावर होतं; अन वाटतं, नाही….अभी तो मैं जवान हूं..
मुहंमद ‘अल्वी’हा शायर म्हणतो,
याद करता हूं पुरानी बाते
सोचता हूं,के जवां हू मै भी

पण ‘जोश’मलिहाबादी हा शायर मात्र मोठा आचंबीत झालेला आहे. त्याला आपल्या यौवनाचे ते दिवस आठवतात.ती मस्ती,तो जोम आठवतो आणि ते सगळं आत्ताच्या तबियतीच्या तुलनेत (बीपी,शूगर,कोलेस्ट्रोल?) विचार करता,एकदमच खोटं वाटून जातं- मीच होतो का तो ? छे!
‘जोश’ अब तो शबाब की बातें
ऎसा लगता है जैसे अफवा हो

गेलेल्या दिवसांच्या दु:खात सगळ्यात जास्त क्लेषकारक बाब म्हणजे- गेलेले यौवन.
अब इत्र भी मलो तो खुशबू नही आती,
वो दिन हवा हुए,जब पसिना गुलाब था

खरंच आहे ते. यौवनाचे,उभारीचे ते दिवस…त्या दिवसांचं वेगळं असं अस्तित्त्व त्यावेळेस कुठं जाणवत असतं ? ते जाणवतं,ते प्रकर्षाने लक्षात रहातं ते तो काळ सरल्यावरच.
…आणखी एक गंमत अशी,की त्यावेळ्च्या सुखामुळे आपल्याला किती छान वाटलं होतं,अन त्या वेळच्या दु:खामुळे आपण किती विचलीत झालो होतो, हे आता आठवतं.
… आज ते सुख काही एवढं मोठं नव्हतं,ते दु:ख काही एवढं घाबरून जाण्यासारखं नव्हतं हे लक्षात आलेलं असतं.
‘जज्बी’ या शायरला त्या  सुख दु:खाचाच आचंबा वाटतो-

ऎश से क्यों खुश हुए, क्यों गम से घबराया किए
जिंदगी क्या जाने क्या थी,और क्या समझा किए

….जाऊ द्या.नाईलाज को क्या इलाज ?

टीप : माझ्या या जानिबे-मंजिल बद्दल इ टिव्ही (उर्दू) चॅनल वर बातमी आली होती,
त्या बातमीचा हा अंश :

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

शायर लोकांचे प्रेमाचे व्यवहार फार जालिम असतात. सामान्य माणसासारखं त्यांचं प्रेम काही असं तसं नसतं. जीवन मरणाच्या नुसत्या बाता मारणारे ते वादे-इरादे नसतात,तर कृतीत उतरवून दाखवायची धमक त्यात असते.आणि या शायर लोकांना प्रेयस्या ( वा! काय छान अनेक वचन आहे !) तशाच अगदी जालीम-अगदी जीवघेण्या असतात. एका शायरच्या नशिबाला अशीच एक जीवघेणी प्रेयसी लाभली. तिच्या, ‘निघून जा !’अशा सांगण्याचा एवढा असर त्याच्यावर झाला,की दुसर्याज दिवशी मोठ्या बाका प्रश्नाला उत्तर द्यायची वेळ त्याच्यावर आली-
जनाजा रोक कर मेरा,कुछ इस अंदाज से वो बोले
गली तो हमने कही थी,तुम तो दुनिया छोडे जाते हो
आता हा प्रश्न आपल्यासाठी हसण्याचं निमित्त होतो,त्याच्यासाठी जिव्हारी लागणारा असा.(पण जीवच गेला तर जिव्हार कुठे रहाणार..) आणि माणसाचं जाणं-निघून जाणं असंच तर असतं-सांगणारा असतो,ऎकणारा मात्र निघून गेलेला असतो. ‘अमर’मध्ये म.रफीने गायलेलं एक आर्त असं गाणं आहे-‘ओ दूर के मुसाफिर हमको भी साथ ले ले..’ शकील बदायुनीच्या या गीतामध्ये सुरूवातीला एक शे’र आहे-
चले आज तुम जहां से,हुई जिंदगी पराई
तुम्हे मिल गया ठिकाना,हमे मौत भी ना आई
आलेला माणूस हा जाणारा असतोच. बुलावा आला की त्याला निघावं लागतं,जावं लागतं. पण हे त्याचं जाणं केव्हा असतं-जेव्हा त्याला बोलावणं आलेलं असतं तेव्हा.
पण जवळचा माणूस जातो,तेव्हा आपल्याला का कोण जाणे वाटत रहातं, त्याने इतक्या लौकर जायला नको होतं.त्याने जायची घाई केली…जसं काही त्याला बोलावणं आलं नव्हतं,तोच निघून गेला.आपण होवून निघून गेला.रुग्णाची विचारपूस करायला आपण जातो.त्याच्याशी बोलतो.त्याला बरंही वाटतं. चार सुख दु:खाच्या गोष्टी होतात. प्रकृतीबद्द्ल सांगताना तो सांगून जातो,की फार अशक्त वाटतं आहे, उठायलासुध्दा होत नाही,तेवढी शक्तीच नाही राहिली.त्याला धीर देवून आपण त्याचा निरोप घेतो.
आणि सकाळी निरोप येतो, तो गेल्याचा. आपण सुन्न होतो. कालची विचारपूस आठवत रहाते. आपलं एक मन मग राहून राहून त्याला उद्देशून म्हणत असतं-
कल तो कहते थे,के बिस्तर से उठा जाता नही
आज दुनिया से निकल जाने की ताकत आ गई…

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

2010 in review

The stats helper monkeys at WordPress.com mulled over how this blog did in 2010, and here’s a high level summary of its overall blog health:

Healthy blog!

The Blog-Health-o-Meter™ reads Wow.

Crunchy numbers

Featured image

A Boeing 747-400 passenger jet can hold 416 passengers. This blog was viewed about 7,800 times in 2010. That’s about 19 full 747s.

 

In 2010, there were 59 new posts, growing the total archive of this blog to 61 posts. There were 29 pictures uploaded, taking up a total of 12mb. That’s about 2 pictures per month.

The busiest day of the year was March 8th with 155 views. The most popular post that day was तेरा हाथ हाथ में आ गया.. .

Where did they come from?

The top referring sites in 2010 were mail.yahoo.com, marathiblogs.net, hasanyachaaakar.wordpress.com, Private networks, and mr.wordpress.com.

Some visitors came searching, mostly for madhukar dharmapurikar, jaanibemanzil.wordpress.com, jaanibemanzil, and http//jaanibemanzil.wordpress.com.

Attractions in 2010

These are the posts and pages that got the most views in 2010.

1

तेरा हाथ हाथ में आ गया.. March 2010
6 comments

2

तू हो जमीं पे और तेरी सदा आसमानों में… February 2010
16 comments

3

About October 2007
1 comment

4

नातेसंबंधातली शुगर May 2010
9 comments

5

दिवाना ! May 2010
9 comments

Read Full Post »

शरीफ

फुलांसोबत काटे असतात,सुख-दु:ख सोबतीनेच असतं असं आपण म्हणतो, ऎकतो. पण फुलाचे-काट्यांचे परस्पर संबंध कसे असतात याचा क्वचितच विचार होतो. फुललेला चेहरा घेवून सगळ्यांना सदैव हसण्याचा संदेश देणारं फूल -त्याला मात्र सदैव संगत असते,ती काट्यांची. फुलाला स्पर्श करायला जावं,तर आपल्या बोटांना काटे रुततात. मग फुलांचं कसं होत असेल…त्यांना तर काट्यांचीच सोबत असते की. सदैव हसण्याचा फुलाचा संदेश हा जेवढा महत्त्वाचा;तेवढाच-किंबहुना अधिक महत्त्वाचा संदेश म्हणजे, नको असलेला,त्रासदायक असा तो सोबती-काटा; त्याच्या सोबतीने फूल गुण्यागोविंदाने रहातं… माणूस मात्र  माणसासोबत राहू शकत नाही.
फूल कर लेंगे निबाह कांटो से
आदमी ही न आदमी से मिले
– ‘खुमार’

खरं म्हणजे काट्यांचा हा त्रास फुलं सोसतात, त्याबद्द्ल तक्रारही करीत नाहीत; शिवाय चेहर्‍या वर समजूतीचं प्रसन्न असं ते हसू… त्यांना काय वाटत असतं काट्यांकडून होणार्‍या  छळाबद्दल ? ते का शिकायत करीत नाहीत काट्यांची ? काट्यांच्या त्रासाबद्दल फूल काहीच बोलत नाही, याचं कारण असतं फुलाचा सभ्यपणा. ते नुसतं हसरा  चेहरा घेवून जन्माला आलेलं नसतं,तर एक समजूतदार तबीयत घेवून ते वावरणारं असतं.काट्यांच्या उद्घटपणाकडे दूर्लक्ष करण्याइतका सोशीकपणा फुलाकडे असतो.  फुलाचा हा सभ्यपणा एका शायरला जाणवला. तो म्हणतो-
गुलोंने खारोंके छेडने पर सिवा खामोशी के दम न मारा
शरीफ उलझेंगे गर किसी से तो फिर शराफत कहां रहेगी
( खार : काटा )

ही शराफत. ही केवळ सभ्य रहाण्याशी संबंधीत नाही. सभ्य माणूस जाणून असतो. वाईटाला सरळ वाईट म्हणण्यापेक्षा  अशा वृत्तीचा आभ्यास त्याला आवश्यक वाटतो. म्हणूनच काट्यांचा बोचरेपणा फुलांना वेगळ्या तर्‍हेने  जाणवतो. काट्यांच्या त्या सवयीकडे क्षमाशील वृत्तीने फूल पहातं, आणि आपल्याला सांगतं-

बेकार शिकायत है कांटो से चमनवालों
चुभते है,तो ये उन की फितरत का तकाजा है

काट्यांच्या काटेरीपणा बद्दल शिकायत काय करायची? इश्वरानेच त्यांना ते रूप दिलं आहे. ती प्रकृती दिली आहे.
त्यांचा काय दोष… त्यांच्याशी निबाह करणं यातच आपली परीक्षा असते..

please visit another  blog :       http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »

मर्दूमशुमारी-खानेसुमारी,जनगणना ही राजाची गरज असते,राज्याची गरज असते. सामाजिक जीवनाचा एकंदर आवाका ध्यानात येण्यासाठी संख्याबळ जाणणं गरजेचं असतं. मग प्रशासन कामाला लागतं. माणूस माणूस मोजला जातो, त्याची स्थिती गती, अवस्था याचा आढावा घेतल्या जातो. त्याच्या भल्यासाठी ज्या काही योजना करायच्या असतात त्याची तयारी करता येते.
पण माणूस – तो कितपत तयार असतो अशा खानेसुमारीच्या कार्यवाही साठी ? लोकशाहीत माणूस स्वतंत्र असतो. त्याला त्याचं मत मांडण्याची मुभा असते. त्यावेळी असा माणूस प्रशासनाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागीही होतो, मतही मांडतो.
पण जिथे लोकशाहीचं राज्य नाही, जिथे राजा बोले-दळ  हाले, अशी अवस्था असते, जिथे आणीबाणी सदृश्य स्थिती असते, तिथे सामान्य माणूस- त्याला स्वत:चं मत जाहीर करायला भीती वाटत असते. अशा स्थितीत मर्दूमशुमारीच्या कार्यवाहीत तो आपल्याबद्द्ल अशी माहिती देतो-

अब के मर्दूमशुमारी मे मैंने
बेजूबानी, जूबान लिखवाई
नाव-गाव-पत्ता देताना, जेव्हा भाषा-मातृभाषा विचारली जाते, तेव्हा नकळतपणे तोंडातून निघून जातं : जूबां ?…बेजूबानी…

जातीय तणाव,मतभेद द्वेष असं वातावरण असेल तर मग माणसाचं वैयक्तिक जीवन विचारूच नका. भयाने
माणूस गारठलेला असतो.एकमेकांवरचा विश्वास खलास झाल्याने, स्वत:ची ओळख द्यायला कचरतो. अशा स्थितीचं वर्णन ‘हरजीत’हा शायर कसा करतो पहा-
फसाद जब से हुए, हमने नही देखी है
किसी के नाम की तख्ती यहां मकानों में

निदा फाजली या शायरला मात्र या मर्दूम शुमारीचा वेगळाच अनुभव आला आहे. या शायरचा प्रस्ताव जर  का प्रशासनाकडे ठेवला, तर प्रशासन चांगलेच अडचणीत येणार यात शंकाच नाही :

हर आदमी में होते हैं,दस बीस आदमी
जिसको भी देखना हो, कई बार देखना

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

बियाबानी

बियांबा,दश्त,जंगल… उर्दू शायरीत वावरणारे हे शब्द .आणि शब्दांची संगत घेवून जंगलाची सततची ओढ मनात बाळगणारा मिर्जा गालिब. संवेदनशील माणसाला अगदी दाट अशा जंगलात स्वत:ला हरवून टाकण्यात कोणतं बरं …काय बरं मिळत असावं… सुख,समाधान,आनंद वगैरे शब्द तिथे लागू होत नसतात. हे शब्द व्यवहारातले,दैनंदिन अनुभवातले-मतलब जाहीर करणारे शब्द आहेत. जंगलाची ओढ असणार्‍या माणसाला गूढ असं स्वत:बद्द्ल वाटत असतं, ते पडताळून पहाण्यासाठी तर तो तिथे रमत नसावा. नाही…  काहीच सांगणं-बोलणं नको. डोहात शिरत जाण्याची ती एक अनुभुती असते,बस.

पण घर सोडून आलेला माणूस-जबाबदारी,संसाराकडे पाठ करून आलेला माणूस… त्याला जंगलात वावरताना कधी अस्वस्थ वाटतं. तो तसा मुक्त थोडाच असतो,योग्यासारखा… जंगलातलं नि:शब्द   वातावरण बघून माणसाला परत घराची आठवण व्हावी,हा कसा पेंच आहे पहा-

कोई विरानी-सी-विरानी है
दश्त को देख के घर याद आया

या मिर्जा गालिबचा  आपल्याला सतत  हेवा वाटतो, ते त्याच्या विवंचनेच्या आयुष्यात त्याने जोपासलेल्या तल्लख गमतीदार-वृत्तीचा. (नाहीतर आपण विवंचनामुळे वैतागून गेलेलो असतो- गोमाशांमुळे हैरान होणार्‍या माकडासारखे. आपल्याला हसण्यासाठी आधी सुखाची गरज असते, मगच आपण हसायला तयार होतो…) जंगलाची सैर करून गालिब  एकदा घरी परतला, आणि त्याने पाहिले-घराच्या भिंतीवर,दारांवर  पावसामुळे ठिकठिकाणी गवत उगवलेलं ! गालिबला त्याचीही गंमत वाटते-

उग रहा है, दरो-दिवार से सब्जा ‘गालिब’,
हम बियाबां मे है,और घर में बहार आई है

हाच शायर जेव्हा मनातली घालमेल-अस्वस्थता याचा विचार करतो, तेव्हा मनाच्या तशा स्थितीची अपरिहार्यता त्याला पटते. तो सांगतो,

घर हमारा जो न रोते भी तो विरां होता
बहर अगर बहर न होता तो बियाबां होता
( बहर : समुद्र. )
( गालिबला कुणी विचारलं असावं : अरे बाबा तू सतत का रडतोस, बघ रडून रडून तू घराची काय दशा करून टाकली आहेस ! तेव्हा गालिबने हे उत्तर दिलं असावं.)

पण म्हणतात ना,घराला माणसामुळेच घ्ररपण येत असतं. अगदी तसंच जंगलात सतत वारणार्‍या माणसामुळे जंगलातसुध्दा एकप्रकारचा जीव आलेला असतो. माणसाला जंगल जवळ घेतं,त्याला आधार देतं हे जसं खरं,तसंच माणसामुळे त्या अरण्यालासुध्दा एक प्रकारचा विरंगुळा असतो. म्हणूनच लैला,लैला करीत जंगलात भटकणारा मजनू जेव्हा निघून जातो,तेंव्हा जंगलसुध्दा उदास होवून जातं…

हर इक मकां को है, मकीं से शरफ  ‘असद’     ( शरफ : प्रतिष्ठा  मकीं : घरात रहाणारा  )
मजनू जो मर गया,जंगल उदास है..

लता मंगेशकरने गालिबची एक गजल गाताना, ‘कोई विरानी सी विरानी है..’ ही ओळ एवढ्या आर्ततेनं म्हटलेली आहे, की ‘बियाबानी’ ( जंगलातली भटकंती) करण्याची मनाला ओढ लागते…

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

« Newer Posts - Older Posts »