‘बिसवी सदी’. एक गाजलेलं उर्दू मासिक. आताही ते प्रसिध्द होतं. त्या दिवसात,ज्यावेळी मी कॉलेजला होतो,त्यावेळी हे मासिक वाचनालयात आवार्जून पहायचो. र ट प करीत मी ती उर्दू लिपी वाचायचो. त्यावेळी छापील उर्दूची जेवढी मासिकं/वर्तमान पत्रं पहाण्यात यायची, त्यात या ‘बिसवी सदी’तलं उर्दू टाईप मला फार आवडायचं. एक लाडिक असं वळण त्या लिपीचं मला तिथे जाणवायचं.
या ‘बिसवी सदी’त मी वाचायचो ते मुखपृष्ठाच्या मागचं आणि मलपृष्ठाच्या अलिकडचं पान. काळ्या पांढर्या रंगाचं ते तरूण स्त्रीचं छायाचित्र असायचं. विशेष हे,की ते नटीचं नसायचं. आणि त्या तरुणीच्या दिसण्या-असण्याशी, तिच्या चेहर्यावरच्या भावनेशी संबंधीत असा एक दिमाखदार शे’र,त्या छायाचित्राच्या खाली मोठ्या-गडद अशा टाईपमध्ये मुद्रित झालेला असायचा. मोठा टाईप असल्याने मला तो वाचायला सोपा व्हायचा, शे’र असल्याने खुमासदार वाटायचा आणि त्या सोबत त्या अनोळखी चेहर्यामुळे लज्जतदार होवून जायचा. किती तरी शे’र त्या चेहर्यांच्या संगतीनेच लक्षात राहिलेले. मासिकं अर्थात विकत घेतलेली,बाळगलेली नसायची.
एकदा,एक जवळून दिसणार्या चेहर्याच्या सोबत हा शे’र वाचायला मिळाला होता-
(तसल्सुल म्हणजे,निरंतरता; शृंखलाबध्दता . तनहाई म्हणजे एकलेपण,एकांत.)
उफ ! ये यादों का तसल्सुल,ये खयालों का हुजूम
छीन ली आप ने मुझ से मेरी तनहाई भी..
छायाचित्रातली ती तरूणी उदास चेहर्याने झाडाखाली उभी असल्याचे दिसत होते. तो शे’र,ते छायाचित्र मनात कोरून राहिलेलं होतं. पुढे सिनेमातल्या नायिकांवर फिदा होण्याचे दिवस आले. काही छान असं दिसलं,की कापून वहीवर लावायचं,सांभाळून ठेवायचं अशी आदत लागली. एकदा मिनाक्षी शेषाद्रीचं सुरेख छायाचित्र एका साप्ताहिकात पाहिलं आणि ते काढून माझ्या डायरीच्या कव्हरच्या आतल्या बाजूला चिटकविलं. पहात बसलो, आणि दूरवरून एखादा वाटसरू शोधत शोधत येवून आपल्याला भेटावा तसा तो शे’र मनात उदभवला…
जाड निबची पेन खास विकत घेतली. पुढे मागे पाहून, आता आपल्याला कुणी ‘डिस्टर्ब’ करणार नाही, ही खात्री करून वळणदार अक्षरांत मिनाक्षीच्या छायाचित्राखाली हा शे’र मोठ्या भक्तीभावाने लिहून काढला.पहात बसलो… ( आवडलेल्या ओळी स्वत:च्या अक्षरांत लिहिण्याची मोठी खुशी असते. त्या निर्मितीच्या अगदी जवळ गेल्याची ती खुशी असते का…)
…अस्वस्थ करणार्या आठवणींत माणूस (विशेषत:स्त्री) जेव्हा गुंतून पडतं,तेव्हा आठवणींच्या लाटा अंगावर येत असतात, साखळदंडानी बध्द व्हावे तसे आपण त्या स्मृतीत बध्द होतो.. आणि विचारांची-उलट सुलट विचारांची-किती दाटी झालेली असते !
एकटं असूनही निवांतपण हरवलेली ती अस्वस्थता …
Please visit my other blog http://hasanyachaaakar.wordpress.com/