Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘फलासिफ :-ए-जिंदगी’ Category

गरज

परस्परांवरचा विश्वास कमी झाला, की पहिलं नुकसान होतं,ते निर्मळ हसू-मोकळी थट्टा निघून जाण्याचं. चेहर्‍यावर सदा संशय, तणाव,राग मुक्कामाला येतात. परस्परांचा द्वेष व्हायला सुरूवात होते.अशात कुणी थट्टाही केली,तर ऎकणारा प्रतिसाद द्यायच्या ऎवजी शंका घ्यायला सुरूवात करतो- याने असं का म्हटलं? याचा हेतू आपली टिंगल करण्याचा आहे, की काय वगैरे… हसणं हरवून बसलेला समाज कलहाकडे वळतो. कटकटी-समस्यांनी घेरून जातो. एखाद्या कलावंताला या सामाजीक परिस्थितीची जाणिव होते;त्याला त्याचं महत्त्व कळतं, तो निदान करतो-
लोग तारीक के औराक में कल ढूंढेंगे
कौन से दौर में इन्सा को हसी आई थी
( माणूस कोणत्या कालावधीत हसला असावा बरं, याचा शोध उद्या इतिहासांची पानं ढूंडाळून घ्यावा लागेल !)
खरंच आज जर माणूस हसण्यापेक्षा विनोद कोण केला आहे,त्याचा हेतू काय तो कोणत्य समाजाचा आहे,त्यातून आपल्या धर्माला-आपल्या नेत्याच्या प्रतिमेला धक्का बसला काय हेच जर शोधू लागला, तर हसणं कुठे राहिल? द्वेषाने कडू कडू झालेली माणसं आज दिसतात ते याच भावनांच्या प्रभावामुळे. म्हणून आज गरज आहे हसण्याची. निर्मळ होवून रहाण्याची. पण या हसण्याच्या नादाला लागून थोडा धोका होवू शकतो,त्यापासून आपण सांभाळायला पाहिजे-
हसो,के आज हसी की बहूत जरूरत है
मगर किसी के लबों से न छीन कर लावो
….

दुसर्‍याला दु:ख देवून मिळविलेलं हसू विषासारखं असतं.

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

क़ॅनडा येथे अंतरराष्ट्रीय प्रदर्शन व्हायचे,त्या प्रदर्शनातले हे एक परकीय व्य़ंगचित्र. साध्या रेषांनी इथे एक माणसाचा आकार तयार झालेला आहे. हा माणूस धावतो आहे. याच आकाराच्या मध्ये आणखी एक आकार आहे, तो माणसाचाच आहे, तोही धावतोच आहे-मात्र उलट्या दिशेने धावतो आहे. त्याच्यातही एक माणूस-धावणारा;पण तो सुलट्या दिशेने…
शरीराच्या आकाराकडे थोडं थांबून ( म्हणजे आपण !) पाहिलं,की लक्षात येतं,हा एकच माणूस आहे. शरीराने एका दिशेने,तर मनाने दुसर्‍या दिशेने धावणारा. परस्पर विरोधी विचार-भावनांचा कल्लोळ बाळगून अस्थीर झालेला माणूस…आपण सर्वजण.
म्हटलं तर ही समस्या,म्हटलं तर ही प्रकृती. या स्थितीकडे गमतीनेही पहाता येतं,गांभीर्यानेही. डॉ.इक्बाल आणि मिर्झा गालिब;उर्दू शायरीतले हे महान कवी. माणसाच्या मनतली चलबिचल अस्वथता,याचा शोध घेवून अर्थ लावणारे डॉ.इक्बाल,तर ती स्थिती स्विकारून त्याकडे गमतीने पहाणारा गालिब.
डॉ.इक्बाल म्हणतात

ढूंडता फिरता हूं मै ऎ ‘इक्बाल’अपने आपको
आप ही गोया मुसाफीर,आप ही मंजील हूं मै
( गोया : जसं काही…)

… आणि मिर्झा गालिब चा शे’र आहे-

खुदाया ! जज्बा-ए-दिल की मगर त’आसिर उलटी है
के जितना खेंचता हूं,और खिंचता जाए है मुझसे
( जज्बाए दिल :ह्रदयाचे आकर्षण,प्रेम तासीर : गुणधर्म, प्रभाव )

…काय सांगावी या प्रेमाची गंमत ! सगळंच उलटं होतं आहे, इथे. तिच्यापासून दूर जाण्याचा मी जेवढा प्रयत्न करतो आहे, तेवढाच ओढ्ल्या चाललो आहे की तिच्या कडे !

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

एखाद्या कलावंताची निर्मिती त्याने(अन त्यानेच )मांडली तर त्याच्या सांगण्या-बोलण्या-वागण्याला एक सूर येतो;त्याला हवा असणारा.त्याला अभिप्रेत असणारा सूर. पण त्याची निर्मिती इतरांकडून अभिव्यक्त झाली तर…. वानरीचे मूल तिच्या हातून दुसरी वानरी हिसकावून घेते;त्याचा लाड-प्यार करतानाच तिसरी वानरी ते मूल तिच्याकडून हिसकावून घेते-गोंजारण्यासाठी, कुरवाळण्यासाठी.अशा तर्‍हेने  वानरीचे ते मूल झाडावरच्या अनेक वानरींकडून प्रेमाने,कौतूकाने हाताळल्या जातं.कुरवाळल्या जातं.
कलावंताची निर्मिती ही अशीच. विशेषत: त्याची गीत रचना. शब्दांमध्ये जादू बांधून तो कलावंत निघून गेलेला असतो आणि वेगवेगळ्या पिढीतला माणूस, स्त्री, गायक, संगीतकार, वादक असे कितीतरी जण ते शब्द घेवून मिरवीत असतात. आपल्या भावना, आपली सुख दु:खं,त्या शब्दांच्या आधारे जुळवून घेत रहात असतात. सुख दु:खाचे स्वरूप तेच असले तरी, पिढी निहाय, वयनिहाय्,स्वभावनिहाय त्या सुख दु:खाची अभिव्यक्ती विविध तर्‍हेने  होत जाते आणि आपण जरा बाजूला उभं राहून पाहिलं,तर या मिरवणूकीचा वेगळा असा अनुभव आपल्याला लाभतो.
मोठ्या कवींच्या रचना हे त्याचं ठळक उदाहरण. मिर्जा गालिबची एक गजल आहे-
आह को चाहिए इक उम्र असर होने तक
कौन जीता है तेरी जुल्फ के सर होने तक

(आह… एक इच्छा-साधी उसाशाएवढी;पण ती ‘असरदार’होण्यासाठी-परिणामकारक होण्यासाठी एक आयुष्य खर्ची घालावं लागतं,असं माझं नशीब;मग तुला वश करून घेण्यासाठी-तेवढा कालावधी माझ्या आयुष्यात कुठे आहे…शिवाय-
हम ने माना के तगाफुल न करोगे लेकिन
खाक हो जाएंगे हम तुमको खबर होने तक
(मान्य आहे,तू मला नाही म्हणणार नाहीस;पण माझ्या प्रेमाची जाणिव तुला होईपर्यंत मी खलास होवून जाईल,त्याचं काय !)
आता गंमत पहा, ही गजल ‘मिर्जा गालिब’या मालिकेत जगजीत सिंहने कशी पेश केली आहे,आणि हिच गजल ‘मिर्जा गालिब’या चित्रपटात( वर्ष: ) सुरैय्याने कोणत्या ढंगात पेश केली आहे. मग गमतीचा प्रश्न असा पडतो,की गालिब आज असता,तर तो कुणाच्या बाजूने राहिला असता-विशेषत: या शे’रच्या संदर्भात-
गमे-हस्ती का ‘असद’,किससे हो जुज मर्ग इलाज
शमा हर रंग मे जलती है सहर होने तक
( दु:खाच्या आयुष्याला इलाज आहे तो केवळ मृत्यूचाच. (त्या मृत्यूची) सकाळ होईपर्यंत शमा वेगवेगळ्या रंगात-ढंगात जळत रहाते-नाही,त्याशिवाय तिला दुसरा उपाय तरी कुठे असतो..)
जगजीत सिंहचा तो गंभीर स्वर, गांभिर्याने,सावकाश गायलेली ही गजल आणि सिनेमातली ती तवायफ-सुरैय्या;तिने याच गजलला दिलेला खेळीमेळीचा, समजूतीचा फुलोरा… शब्द तेच,आशय तोच; पण अभिव्यक्तीच्या तर्हाा वेगळ्या,
रंग वेगळे.( अर्थात इथे नसरूद्दीन शहा,सुरैय्या यांच्या अभिनयाचा-चित्रीकरणाचा मुद्दा विचारात घेतला नाही,ती अभिव्यक्ती हा आणखी स्वतंत्र आणि मह्त्त्वाचा भाग आहे)

जाता जाता : ‘लोलक’ हा शब्द ‘लोला’पासून तयार झाला असावा. ‘लोलक’म्हणजे, दागिण्यातला लोंबता मणी;आणि ‘लोला’म्हणजे, घंटेमधला लंबक. भक्ताच्या सुख दु:खाची तीव्र-कोमल अवस्था,मंदिरात प्रवेश करताना, त्याच्या हातून-घंटेच्या नादस्वरातून जाहीर होत असते.
एखादी गजल, गाणारा-सांगणारा-अभिव्यक्त करणारा,आपल्या तर्हे’ने जेव्हा सादर करतो, तेव्हा-गजल तीच असते पण- त्या गजलमधले ध्वनी तसतशा तर्‍हेने उमटत जातात- आपल्या मनाच्या गाभार्‍यात…

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

‘नातेसंबंधातली शुगर’या टिप्पणीवर ज्या प्रतिक्रिया आल्या,त्या सगळ्यांचं मला अप्रूप आहे. केवढा धीर वाटतो आहे.

निमित्तावाचूनच्या बंधुत्त्वाची आस अधून मधून लागते.( हे अधूनमधून केव्हा असतं-जेव्हा मनातले हेतू निर्मळ झालेले असतात. हे हेतू अधूनमधूनच का निर्मळ होतात- कारण शंभर टक्के आरोग्य संपन्न माणूस मिळणं जसं कठीण; तसं कायम निर्मळपण असणं-माझ्यापुरतं तरी-कठीणच. आणि ना घ देशपांडे यांच्या ओळी-

अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले
एकदा जे वाटले,ते प्रेम आता आटले

ह्यासुध्दा अनुभुतीच्याच ओळी आहेत की. म्हणजे, शुगर होत असतेच. मैत्रीत जेव्हा जाणिवपूर्वक व्यवहार ठेवलेले असतात,ती मैत्री सरली, तर दोघांनाही त्याचं सुतक रहात नाही;मात्र मैत्रीत व्यवहार नसताना मैत्री का आटून जात असावी, हाच प्रश्न आहे.

पण गंमत अशी, की ज्या अर्थी मैत्री आटून गेली,त्या अर्थी त्या मैत्रीत व्यवहार होते हे स्पष्टच असतं का… हे व्यवहार म्हणजे, मी ‘तुझा-तू माझा’,’तू चांगला-मी छान’ अशा प्रकारचे अपेक्षा-व्यवहार. ( ही मैत्री म्हणजे, केवळ मित्रांतलीच मैत्री नसून सगळ्या  नाते संबंधाला हिशोबात घेवून मी सांगतो आहे. लहानपणी एकाच ताटात जेवणारे भाऊ मोठेपणात एकमेकांच्या जेवण-पध्दती,आवडी-निवडीवर टीका-टिप्पणी करतात हे शुगरचंच लक्षण,नाही का… अर्थात मोठेपणातही एकाच ताटात जेवावं अशी बालिश अपेक्षा इथे नाहीच.)

गावाकडच्या घरी जावून आता राहणं शक्य नसतं;पण ते घर आठवलं- कधी पाहून घेतलं तर मोठ्या उत्कट भावना दाटून येतात. चलबिचल होते. ती तेवढी चलबिचल जशी मनात येत-जात रहाते, तीच चलबिचल न उरलेल्या मैत्रीबद्दल राहिली, तर शुगर नियंत्रणात राहिल असे वाटते.

शिवाय, एकमेकांबद्द्ल आशा-अपेक्षा, उश्रमा-सुश्रूशा, हे सगळंच ठेवायला काय हरकत आहे… त्याच्यामुळेच का होईना, संबंध तर आबाधीत राहातील ना ! अर्थात महत्त्वाची गोष्ट अशी, की भान ठेवून-तारतम्य ठेवून एकमेकांचा राग लोभ ठेवला, तर तोही एक इलाजच होईल…नाही का.

एखाद्या पाटाचं पाणी वळवून आपला वाफा भिजवून घ्यावा, तसं गालिबनं आपल्या प्रेयसीसाठी जे म्हटलं आहे, ते आपल्यासाठी तात्पुरतं वळवून घ्यायला काय हरकत आहे-

कत’अ किजे न त’अल्लुक हम से ( कत’अ : कापणे, तुकडे करणे त’अल्लुक :संबंध,संपर्क )
कुछ  नही है तो, अदावत ही सही ( अदावत : वैर )

Read Full Post »

हिमतीचा माणूस वेगळ्या अशा रुपाचा असतो. मरगळ, कंटाळा,न्यूनत्त्व अशा गुणांची धूळ त्याच्या चेहर्‍यावर कधीही नसते- अगदी स्नान केलेलं नसलं तरी, दीर्घ प्रवासाहून परतलं तरी. हिमतीच्या माणसाच्या वागण्या बोलण्याची तर्‍हाही निराळी असते. सामान्य माणसासारखा तो हेतूंनी लडबडलेला नसतो. सर्वसामान्य माणूस ईश्वरापुढे झुकतो,ते सहसा स्वत:ची शिफारस करण्यासाठी. स्वत:साठी काही मागण्यासाठी. पण हा हिमतीचा माणूस – तो भक्त असतो, ईश्वरावर त्याची श्रध्दा असते. मग तो सर्वसामान्यांपेक्षा वेगळा कुठे असतो ?

सिजदों के एवज फिर्दौस मिले, ये मुझे मंजूर नही
बेलौस इबादत करता हूं, बंदा हूं तेरा मजदूर नही

( सज्द :- डोके टेकणे, मस्तक नमविणे .फिर्दौस : स्वर्ग . बेलौस  : नि:स्वार्थी,अपेक्षा न ठेवणारा )
ईश्वरापुढे झुकून त्याची प्रार्थना करतानाच ईश्वराला ठणकावणारा असा भक्त पाहून क्षणभर ईश्वरही गडबडून जावा.

माणसाला जगण्यासाठी काय काय करावं लागतं,काय काय मिळवावं लागतं ! त्याच्या एकट्याच्या हातून होत नसलं, मिळविता आलं नाही की तो दुसर्‍याची मदत घेतो. ईश्वर हा त्यासाठी सर्वात जवळचा. त्याला मागाय़चं आणि संसार चालवायचा,एवढं सोपं काम.
पण हा हिंमतवाला निडर माणूस. त्याला गरजा असतात, पण तो शर्मिंदा नसतो. पाहिजे त्या गोष्टी मिळविण्याचे दोन मार्ग असतात-एक लाडीगोडीचे,  दुसरा मार्ग हिमतीचा. हिंमतवाला माणूस सांगतो-

बंदगी से नही मिलती, इस कदर जिंदगी नही मिलती ( बंदगी : प्रणाम,पूजा, गुलामी )
लेने से तख्तो-ताज मिलते है,मांगने से भीक भी नही मिलती
आपल्या आयुष्याचे जबाबदार आपण आहोत.आपणच आपलं भलं कमवायचं असतं. हे जगणं काही प्रार्थना करून मिळत नसतं.

वो खुद अता करे,तो जहन्नुम भी है बहिश्त
मांगी हुवी नजात मेरे काम की नही
( अता :प्रदान .    बहिश्त : स्वर्ग.     नजात : मोक्ष,मुक्ती,सुटका )

असा माणूस.हिमतीने वागणारा-बोलणारा-वावरणारा. त्याच्याबद्दल पहाता क्षणी वाटून जातं, की हा उर्मट आहे,उध्दट आहे. हे असं वाटायचं कारण,अभिमान आणि अहंकार यातली तफावत आपण लक्षात घेतलेली नसते. ( आपल्या हिशोबाने नेहमीच,’आपला तो अभिमान,दुसर्‍याचा तो अहंकार! ‘ असा व्यवहार असतो. ) हिमतीचा माणूस उध्दट नसतोच. काळा-गोरा,कुरूप-सुरूप कसाही असला,तरी हिमतीच्या माणसाचं देखणेपण हजारात उठून दिसणारं असतं. कारण त्याच्या चेहर्‍यावर आत्मविश्वासाची झळाळी सदैव असते.

अहसास-ए-अमल की चिंगारी,जिस दिल में फरोजां होती है
उस दिल का तबस्सुम हिरा है, उस दिल का तबस्सुम मोती है.

( अहसास-ए-अमल : आत्मविश्वास.   फरोजां : प्रज्ज्वलीत,प्रकाशमान.   तबस्सुम : हास्य )

अशा माणसावर तर ईश्वरही फिदा असतो. म्हणून तर कहावत प्रसिध्द् आहे-
हिंमते-मर्दा,मददे-खुदा !

Read Full Post »

माणसानं आयुष्यभर जे काम केलं असतं,ते काम करत करत सरत जाणं, हे त्याचं जगण्याशी प्रामाणिक असणं म्हणावं का. .. गाणारा गात गात मूक व्हावा, वादक-वाद्याशी खेळत खेळतच थांबून जावा, बोलणारा बोलत बोलत गप्प व्हावा तर लिहिणारा लिहिता लिहिताच पूर्ण विरामाला यावा .. असंच असतं का .. असंच असायला पाहिजे का..
हे असं असणं, असं होणं म्हणजे एक प्रकाराने भान असणं. आपण संपणार आहोत, जाणार आहोत याचं भान असल्यावर मग शिकायत कशाची ? मर्यादित षटकांच्या खेळीत आणखी षटकाची इच्छा नाही,तो विचारच नसतो.;तो प्रश्नच नसतो.विचार असतो, तो एकच- शेवटचं षटक आहे हे खेळायचं ,जोरदार खेळून काढायचं.
शायरला असं मृत्यूचं भान असतं. तो तयार असतो. आपला प्राण आता आपल्या शरीराची संगत सोडणार आहे,सोडतो आहे याची जाणिव त्याला असतेच; इतकंच काय,आयुष्यभर  जे साधलं नसतं, ते त्याला, आत्ता या वेळी साधलेलं असतं : एकाच वेळेस शरीर आणि प्राण या दोहोंकडे अलिप्तपणे पहाणं. हे असं पहाता येतं,ते केव्हा- यावेळी. का ? तर यावेळी आयुष्यभराच्या सर्व संवेदना तीव्रतर अवस्थेत पोंचल्या असाव्यात.  म्हणूनच   ‘ दाग ‘ हा शायर या वेळेला-या शेवटच्या वेळेला आपल्याला सांगतो-

होशो-हवास-ओ’ताबो-तुवां, ‘दाग ‘ जा चुके ( शुध्दी,शरीरावरचा ताबा, भान )
अब हम भी जाने वाले  है, सामान तो गया
..

एक शायर असा, की त्याने आपले शरीर-प्राण यांना  संगिताच्या-मैफिलीच्या-वाद्यवृंदांच्या जाणिवेतूनच पाहिलेलं आहे. शरीर मनाला केवळ संगीताचा हिस्सा समजणं..केवढं वेगळ्या प्रकारचं,सुरेख असं ते जगणं असेल.. आपलं शरीर हे वाद्य आहे, ज्यातून संगीत स्त्रवणारं असतं, गाणं उमटत असतं. या स्वरांच्या,या संगीताच्या -या रागदारीच्या लोभात आयुष्याचा प्रवास त्याने केलेला असतो. गाता गाता वाट सरावी, तशा धुंदीत आयुष्याचा हा प्रवास चालतो, होतो अन्  आता वेळ आलेली असते,मैफिलीच्या शेवटाची. विलंबीत लयीत सुरू झालेला आयुष्याचा हा राग आता द्रुत लयीत आलेला तर असतोच, पण अगदी विरामाच्या समीप आल्यावर तर त्या लयीने एक गती पकडलेली असते,धुंदी चढलेली असते. हातवारे, शरीर, आवाज, चेहरा सगळं सगळं त्या क्षणापाशी गोळा होवू लागलेलं असतं… तो  क्षण -शेवटचा.जीवनाची मैफिल थांबविण्याचा.

हिचकीयों पर हो रहा है ,जिंदगी का राग खत्म
झटके दे कर तार तोडे जा रहे है, साज के..

प्राण जाताना येणार्‍या उचक्या, हातापायांच्या त्या हालचालीला कोणत्या वळणाने हा  शायर घेवून जातो आहे..
..पण कलावंत माणूस,कवी माणूस मोठा भाबडा असतो. त्याला परिसराचं भान असलं तरी, त्याचे त्या निमित्ताने उद्भवणारे प्रश्न – त्याच्या शंका एवढ्या निरागस असतात, एवढ्या भाबड्या असतात, की गंमत वाटावी. ..वास्तव समजून घ्यायचे त्याचे प्रयत्न ,त्याचे निकष एकदम साधे !
…की असंही असतं का- वय झालं,म्हातारपण आलं,की सगळी हुशारी, सगळं कर्तृत्त्व ,सगळं सगळं पाटीवरून पुसून जावं अन् मनाची पाटी पुन्हा कोरी व्हावी- लहानपण यावं, असं तर नाही ना.. हा शायर असाच झाला आहे. विझता विझता लहान लहान होतो आहे.त्याला कळेना झालंय की आपल्या बिछाण्याभोवताली ही सगली जण का बरं गोळा झाली असावीत…

ये क्यूं उड चला है रंग यारब मेरे चेहरे का
ये क्यूं पिछले पहर से सब के सब हुशियार बैठे है..

टीप: माझ्या दुसर्‍य़ा ब्लॉगला भेट द्या इथे – http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »

बहोत मुश्किल है दुनिया का संवरना
तेरी जुल्फों का पेचो-खम नही है.
.       ( पेंचो-खम : केसांच्या बटा  )
– ‘ मजाज  ‘

प्रेम करणं, आशिक होणं, कविता करणं, तिच्या मागे लागणं-आठवणीत रहाणं हे सगळं सगळं भरल्या पोटानंतरच्या गोष्टी आहेत. माणूस भुकेनं जेव्हा हैराण  असतो, तेव्हा त्याला  कसली आली शायरी सुचायला ;अन कसलं आलंय प्रेम बिम, आं ! ते सगळं सुरक्षीत झाल्यावरचं, पोट भरल्यावरचं प्रकरण असतं.माणसाला यश जसं मिळतं, तसंच विवंचनाही असतात.कष्ट असतात. आजूबाजूला भोवताली जी जगण्याची धडपड चालू असते, ते पाहून संवेदनशील माणूस अस्वस्थ होतो. आयुष्याच्या खडतर वाटचालीत माणूस बेभान होतो,हातातोंडाची गाठ पडायची मारामार होते. त्या वेळी या सगळ्या प्रेमींबद्द्ल तो जणू वैतागून म्हणतो –

कहां के वो हिज्र-ओ-विसाल, कहां के वो हुस्न-ओ-इश्क
यहां तो लोग तरसते है, जिंदगी के लीए ..
.
( हिज्र : विरह .      विसाल : मिलन    हुस्नो-इश्क : सौंदर्य,प्रेम )

मिर्झा गालिबला, एकाने आपल्या पुस्तकासाठी  ( अर्थात कविता संग्रह असणार ) प्रस्तावना लिहायची विनंती केली होती. त्या वेळी गालिबचे दिवस मोठे कठीण होते. आर्थिक विवंचना- आजार, कौटुंबीक समस्या चालू होत्या. शायरी वगैरे बाजूला राहिली होती. अशा मन:स्थितीत काय प्रस्तावना लिहिणार ? या प्रस्तावनेच्या संदर्भात त्याने आपल्या मित्राला एका पत्रात ( 2 जून 1855 ) वैतागाच्या दोन ओळीच लिहिल्या-

गया हो जब अपना ही जेवडा निकल
कहां की रुबाई, कहां की गजल

( या ‘जेवडा ‘ शब्दाचा काही अर्थच मिळेना. ना शब्दकोषात, ना कुण्या मित्राकडे. पण काही तरी शारिरीक व्याधीमुळे कलाम पेश करायला अडचण यावी असं काहीसं ते प्रकरण असावं असं वाटतं.एका मित्रानं सांगितलं, जीव – प्राण याच्याशी संबंधीत हा शब्द आहे.  )

‘ दिदी ‘ सिनेमात साहिरची रचना गाताना सुधा मल्होत्रा म्हणते- तूम मुझे भूल भी जाओ, तो ये हक है तुमको / मेरी बात और है, मैने तो मुहोबत की है
आणि मुकेश तिला वास्तवाची एक वेगळी जाणिव करून देतो- वास्तवाकडे तिचं लक्ष वेधतो-

जिंदगी सिर्फ मुहोबत नही कुछ और भी है
जुल्फ-ओ-रुख्सार की जन्नत नही, कुछ और भी है
भूक और प्यास  की मारी हुवी इस दुनिया में
इश्क ही एक हकिकत नही कुछ और भी है

तरूणपणात आपल्या कोषातून बाहेर पडल्यावर वास्तवाची-प्रखर वास्तवाची जाणिव होते. समाजातली सुख दु:खं,विवंचना-कष्ट या सगळ्यांची जाणिव करून घेताना मनातल्या त्या रोमांचाचे क्षण-तप्त जमिनीत पाण्याचे थेंब विरावेत तसे विरून जातात.
मात्र अशा तल्खीच्या वातावरणात निकटची स्त्री;तिचा सहवास,तिच्या संवेदना सावली सारख्या वाटतात.
या दोनही भावना, हे दोनही अनुभव प्रत्ययकारी तर्‍हेने या गाण्यात उतरले आहेत.
सुधा मल्होत्रा- अत्यंत गुणी गायिका-संगीतकार.

* [निमंत्रण :  नवीन ब्लॉगच्या भेटीचे –http://hasanyachaaakar.wordpress.com/] *

Read Full Post »

ऎसे तो ये जहान कहीं डूब जाएगा
हर शख्स कह रहा है, के बस नाखुदा हूं मैं
( शख्स : व्यक्ती,माणूस    नाखुदा : नावाडी, कर्णधार )

सगळ्याच पक्षांचं एकमेव उद्दीष्ट असतं – जनतेचं कल्याण. सगळ्याच नेत्यांच्या तोंडी असतं, देशाचं भलं- जनतेचं भलं. मग असं ज्रर पक्कं असेल, तर भोळ्या जनतेला असं वाटणं स्वाभावीक आहे, की बुवा मग सगळेच एक का होत नाहीत ? बरं,  नाही झाले एक तरी हरकत नाही; पण ही भांडणं का ? आरोप-प्रत्यारोप, चिखलफेक –  हंगामा ! ( हा खमंग शब्द आता गुलाम अलीच्या तोंडातून निघून राज्य सभेत जावून बसला आहे. तिखट होवून बसला आहे !)  का बरं; अन् ती ही आमचा हवाला देवून-जनतेचा ? आमच्या कल्याणाचं, कळवळ्याचं प्रयोजन पुढे करून ? बरं, प्रत्येकाचा आवेश,ती बोलण्याची तर्‍हा,ते वक्तृत्त्व अन् आमच्या अत्यंत खाजगी असलेल्या श्रध्देचा वारंवार उल्लेख करून तणाव उत्पन्न करायची त्यांची ती हातोटी पाहून थक्क व्हायला होतं.आपली अवस्था विचीत्र होवून जाते-

कदम कदम पे जहां बेशुमार राहबर है ( बेशुमार : असंख्य     राहबर : मार्गदर्शक  )
मुसाफिरों को वहां कैसे ऎतबार आए.. ( ए’अतिबार : विश्वास,भरवसा  )

मार्गदर्शक- पथप्रदर्शक. आपण लहानपणापासून त्याच्याबद्द्ल वाचलं आहे. गुरू असतो तो – मार्ग दाखविणारा. यशाकडे घेवून जाणारा. आपणही त्याच्यावर श्रध्दा ठेवून त्याच्या मागे जाणारे.. अशा प्रकारचे काहीसे चित्र शाळकरी वयात मनात जपलेलं असतं. मग जीवनात पुढे एक एक अनुभव येत जातात, मतदानाचा हक्क प्राप्त होतो अन् ध्यानात येतं,की कुणी तरी तेज:पुंज (!) व्यक्ती आपल्याला मार्ग दाखविते आहे.. गुळगुळीत दाढी केल्यासारखा तो छान वळणदार रस्ता,मग तो डोंगर,तो सूर्योदय,ते मंदिर,तो ध्वज.. आ रा रा रा , असं काही नसतं, तसं काही समजणं हे बावळटपणाचं आहे हे आपल्याला ताबडतोब लक्षात आलेलं असतं. कारण-आपल्याला आलेले खडतर अनुभव. कारण आपल्या भोवती पावला पावला वर वाढलेल्या – असुरक्षिततेची हवा तयार करून सुरक्षेची खात्री देणार्‍या मार्गदर्शकांची संख्या. त्यांचा उपदेश.. नाही तर.. धमकी.
अशावेळेस भानावर यायला पाहिजे ते आपणच. आपणच निर्णय घ्यायला पाहिजे.
सय्याद म्हणजे पारधी,शिकारी.तो माणूसच. जमिनीवर चालणारा. आणि तो शिकार करतो आभाळात वावरणार्‍या पक्ष्यांची. कसं शक्य आहे ते. किती विचित्र. जमिनीवरच्या माणसाला-ज्याला पंख नसतात,त्याला आभाळातल्या, पंख सर्सावून उडणार्‍या पक्ष्यांना पकडता कसं येणार… पण कठोर वास्तव असतं- कटू, पण सत्य अशी स्थिती असते.. आणि पक्षी शिकार होवून जातो, त्या सय्यादची.  सय्याद  सगळीकडेच असतात- सगळ्याच क्षेत्रात असतात, जाळी लावून बसलेले, भुलविणारे.. दोष त्यांचा नाही, आपला आहे- पक्ष्यांचा. आपली प्रकृती आकाशात भरारी घेण्याची. तिथे सय्याद पोंचूच शकत नाही. .. मात्र आपली भरारीच जर कमी झाली, आपणच रेंगाळू लागलो, वेंधळ्यासारखे प्रभावीत होवू लागलो, सारासार विचारशक्तीचे पंख जवळ घेवू लागलो, तर…
‘ असगर ‘ हा शायर म्हणतो-

यहां कोताही-ए-जौके-अमल है खुद गिरफ्तारी (कोताही -ए- जौके -अमल : तीव्र इच्छा शक्तीची मर्यादा )
जहां बाजू सिमटते है, वही सय्याद होता है.
‘असगर्’ गौंडवी.

आपली इच्छा शक्ती प्रखर असायला हवी- तीच क्षीण झाली, की मग भरारीला मर्यादा येणार, मलूलपणा येणार. आणि असा रेंगाळणारा गोंधळणारा पक्षी- सय्याद तर त्याच्यासाठीच ट्पून बसलेला असतो.
… म्हणून परिस्थीतीचे,  वास्तवाचे  भान ठेवणारा तरून जातो. अशा माणसाची निर्णय शक्ती शाबूत असते. आपलं स्वत:चं भलं बुरं याची त्याला  स्पष्ट जाण असल्याने तो गोंधळून जात नाही. आणि त्याला मार्गदर्शकांच्या गर्दीशी काही घेणं-देणं नसतं. .. ना त्यांच्यामुळे त्याची उत्तेजना वाढते.

अपनी मंजील के जो खुद राहनुमा होते हैं
राह से उनको भटकते कभी देखा न सुना

आपल्या कामावर ज्याची निष्ठा आहे, तो स्वत:च स्वत:चा मार्गदर्शक असतो. तो कधीही भरकटत  नाही. त्याला तारतम्य येतं.अशा माणसाची राहनुमाई कोण करतं ? कशाच्या आधारे तो निर्णय घेत असतो ? अशा माणसाचं लक्ष परिणामाकडे असतं.त्याला परिणाम लक्षात येतात,आणि तो सावध होतो-

भली राहनुमाई है, भली नाखुदाईयां है
वही रुख करार पाया, जो बता दिया हवा ने
( -‘ हफिज ‘ मेरठी )

Read Full Post »

« Newer Posts