माणसाला नेहमीच गंभीर-उदात्त अशा विचारात रहाता येत नसतं, असं मी वाटून घेतो याचं कारण मला तसं रहाता येत नाही. पुष्कळदा मनाची अशी हलकी फुलकी स्थिती तयार होते, त्यावेळी सोनेरी उन्हात खेळणार्या कुत्र्या-मांजरासारखी तबीयत होते. मग त्यावेळी ज्याची त्याची थट्टा करावी वाटते. हसावं वाटतं खुदुखुदु;कुणी सहभागी झालं तरी, नाही झालं तरी. ही सुचलेली थट्टा सहसा गंभीर-उदात्तपणाबद्दलची असते. मला जाणिव असते,पोराने बाबांच्या मिशा धरून ओढाव्यात, त्यांच्या नाकाचा शेंडा धरून ठेवावा-हसावं, तसं माझंही होत आहे- मोठ्यांच्या विचारांना आपण ओढत आहोत,तसं आपण करीत आहोत. पण नाईलाज असतो. मनात थट्टेचं सोनेरी उन पडलं असतं ना ! ज्या गोष्टींनी प्रभावीत झालो, हमखास त्याच गोष्टींकडे गमतीच्या नजरेने पाहताना मजाही येत असते आणि गांभीर्याचा अतिरीक्त असर हलका झालेला असतो,दडपन कमी झालेलं असतं.
डॉ.इक्बाल याचा एक शे’र आहे :
तू ने ये क्या सितम किया,मुझको भी फाश कर दिया
मैं ही तो एक राज था, सिना-ए-कायनात में.
आक्रोड फोडून गर खावा तसं हे अवघड उर्दू शोधून मी अर्थ समाऊन घेतला. कवी ईश्वराला उद्देशून म्हणतो, की तू मला प्रकट केलंस (जन्माला घातलंस ) हा केवढा अन्याय केलास; (कारण ) मी जगात आलो नसतो, तर या विश्वाच्या रहस्याचाच एक भाग बनून राहिलो नसतो का ! अशाच आशयाचा गालिबचाही एक शे’र आहे. तर हे शे’र अतिशय आवडलेले. त्यांचा प्रभाव मनात बाळगलेला.
एकदा मनात थट्टेचं ते सोनेरी उन पडलं होतं, त्या उन्हात मी खेळत असताना, या शे’रवर माझी नजर पडली. आणि या शे’रच्या अनुषंगाने मी चक्क एक व्यंगचित्रच काढलं की ! या व्यंगचित्रात काळा कुट्ट अंधारातला एक रस्ता दाखविला आहे. त्या रस्त्यावर लाईटचा खांब,तेवढ्या लाईटच्या प्रकाशात रस्त्याचा तेवढा भाग उजळलेला. या उजेडात एक पोलीस एका चोराला हाथकडी ठोकून घेऊन चाललेला. चोराचा टिपीकल पट्ट्या पट्ट्याचा टी शर्ट,टिपीकल गॉगल वगैरे… मागे अंधार गुडूप आणि हा चोर त्या पोलीसाकडे पाहून म्हणतो आहे-काय ? हाच शे’र; डॉ.इक्बालचा. खरंच की, पकडल्या जाईपर्य़ंत प्रत्येक चोर हा विश्वाच्या रहस्याचाच एक भाग बनलेला असतोच ना ! अशाच अर्थाचं एक कोटेशनसुध्दा वाचण्यात आहे- ए जंटलमन इज जंटलमन, अंटील ही मीट्स पोलीसमन !
माझी आणखी एक सवय: कोणतंही गाणं मनात म्हणताना, मी स्वत: रफी असतो,मुकेश असतो, धर्मेंद्र असतो, देव आनंदही.ते गाणं म्हणताना माझ्याच वतीने मी त्या हिरोईनला आवाहन करीत असतो. ईश्वराला उद्देशून केलेली कोणतीही रचना म्हणताना, माझा असा आव असतो, की मीच ईश्वराला खुलासा विचारीत आहे. …डॉ.इक्बाल यांच्या शे’रच्या थट्टेतून मी व्यंगचित्र तर काढलं; पण आता त्यानंतर मी जेव्हा जेव्हा हा शे’र उच्चारीत असतो, तेव्हा मला आतून कुठेतरी जाणवत असतं- मी डॉ.इक्बाल नाही, चित्रातला तो चोर आहे..लबाड.
डॉ.इक्बाल यांचाच आणखी एक शे’र आहे-
ढुंडने वाला सितारों की गुजरगाहोंका
अपनी अफकार की दुनिया में सफर कर ना सका.
…नक्षत्रांचे मार्ग शोधणारा माणूस स्वत:च्या मनात वावरू शकला नाही,आत्मपरीक्षण करू शकला नाही,असा या शे’रचा मतलब.थट्टेच्या उन्हात मी या शे’रच्या अनुषंगाने एक व्यंगचित्र काढलं : भली मोठी दुर्बीन घेवून तो शास्त्रद्न्य आकाशात नजर लावून बसला आहे आणि त्याच्या पाठीमागेच खुंटीला अडकविलेल्या त्याच्या पॅंटीतून त्याची बायको पैसे काढून घेते आहे-चोरते आहे; त्याला खबर नाही !
…अर्थात कोवळ्या उन्हात शिल्पकृती चमकून जावी तसं विसंगतीच्या नजरेतून इक्बाल यांच्या शे’रमधले आशय मनात भक्कम झालेले आहेत. त्या काव्याचं मोल ध्यानात आलं आहे.
******
Archive for the ‘तंज-ओ-मिजाह् !’ Category
थट्टेचं सोनेरी उन
Posted in तंज-ओ-मिजाह् ! on ऑक्टोबर 1, 2011| 4 Comments »
तस्बीह
Posted in तंज-ओ-मिजाह् ! on जून 15, 2011| 3 Comments »
तस्बीह म्हणजे जपमाळ. ईश्वराचे स्मरण करण्यासाठी हाताशी असणारी मण्यांची माळ. अंगठा आणि तर्जनी यात धरून असलेली ती माळ- कधी डॉळे बंद असतात कधी अर्धवट उघडे असतात आणि मुंगी धावते तसा तो अंगठा मण्यांवरून सरकत रहातो. एकेक मणी तर्जनीवरून उतरत जातो,जपाचा संकल्प पुरा होत रहातो. ईश्वरनामाच्या आवर्तनाची संख्या जसजशी वाढत जाते-भक्तीभावाने मन ओथंबून जातं..एकेका मण्याच्या-क्षणाच्या मापाने ईश्वराच्या जवळीकीची भावना दाटत जाते.
पण माळ घेवून नाम जपताना मन तल्लीन असतंच असं नाही. मनातल्या त्या उच्चारांना कधी यांत्रिक स्वरूप येतं. आरती म्हणताना अन टाळ्या वाजवीत असताना नजर फिरत रहाते तसं आपलं मन त्या मण्यांवरून घरंगळून विचारांत-इतर विचारांत केव्हा नादाला लागतं पत्ता लागत नाही.
‘कामील’शुत्तारीचं मन असंच. माला जपताना त्याच्या मनात विचार येतो. पण हा विचार भलताच नसतो. अंगठ्याने मणी मागे मागे सारताना त्याच मार्गाने त्याचं मन पुढे धावतं आणि त्याला आचंबा वाटतो. स्वत:वर तो रागावतो अन् हे काय- हातातली माळ चक्क तोडून टाकतो !
‘कामील’ने इस खयाल से तस्बीह तोड दी
क्यूं गिन के उसका नाम ले, जो बेहिसाब दे
ईश्वर,जो आपल्याला भरभरून देतो-देताना कसला संकोच करीत नाही,काय दिलं,किती दिलं याचा हिशोब करीत नाही त्या ईश्वराचं आपण नाम घेतो, ते मात्र एकशे आठ, हजार आणि अशाच आकडेवारीच्या सहाय्याने ! तो देणारा दोन्ही हातांनी देतो अन् आपण त्याच्या नामाची मोजदाद करून हिशोबाने रहातो-केवढी विसंगती ही !
ईश्वर भक्तीमध्ये लबाडीची सरमिसळ फार बेमालूमपणाने कधी होत असते.लबाडी-चावटपणाला भक्तीच्या बेगडाचे वेष्टण लावून बसणारा एखादा बुवा ईश्वराला पुढे करून ‘मतलब’साधणारा असतो. भक्तीमार्गात स्त्रियांची दाटी असते आणि सुरेख चेहरे समोरून एकेकाने सरकत जाताना एकेकाने सरकत जाणार्या बोटांतल्या मण्यांवरून ईश्वर स्मरण आपोआप निसटून जातं…चेहर्यावर मन स्थीर झालेलं असतं आणि देवाच्या नावाच्या उच्चारांत लाडीगोडी आलेली असते-
तस्बीह की मूंगे होती है ये हसीन सूरत वाले
नजर से गुजरते जातें हैं,इबादत होती जाती है
( तस्बीह की मूंगे : माळेचे मणी इबादत : उपासना,आराधना )
अशीच एक घटना आहे सिनेमतली :…तिच्या पायातलं घुंगरू वाजावं आणि माळेतल्या मण्यात गडबड होऊन जावी अशी घटना चित्रलेखा या चित्रपटात घडलेली आहे-ब्रह्मचारी असलेल्या महेमूदच्या बाबतीत.
मनाचे श्लोक आणि दिलाचे श्लोक !
Posted in तंज-ओ-मिजाह् ! on मे 1, 2011| 6 Comments »
परभणी जिल्ह्यातले कै.गोपाळराव वांगीकर हे त्यांच्या जमान्यातले एक उत्तम कवी,विडंबनकार होते. तो काळ स्वातंत्र्याच्या पूर्वीचा. अर्थात मराठवाड्याचे हे जिल्हे हैद्राबादशी-निजामी अंमलचे होते. त्या पिढीतल्या माणसांचे शिक्षण उर्दू माध्यमातून होणे, पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाशी संवंधीत असणे हे स्वाभवीकच असायचं.
तर हे गोपाळराव वांगीकर, यांनी उर्दू भाषेचा वापर करून काही मराठी कविता एवढ्या सुरेख केल्या आहेत, की आपण म्हणावं- लाजवाब !
सप्टेंबर 1993 मध्ये औरंगाबाद च्या दै. तरूण भारत मध्ये गोपाळराव वांगीकरांबद्दल माहिती आणि त्यांच्या काही रचना प्रसिध्द झाल्या होत्या. तो लेख मला एवढा आवडला होता, की एका रचनेचा तेवढा कागद कापून मी माझ्या जवळ अद्याप बाळगून आहे. त्यातली एक रचना – रचनेची गंमतम्हणून त्या गमतीदार रचनेचा समावेश मी या ठिकाणी करीत आहे.
जर समर्थ रामदास स्वामी निजामी अमदानीत असते, तर त्यांच्या, मनाच्या श्लोकांचं स्वरूप कसं उर्दू मिश्रित झालं असतं, ही कल्पना करून वांगीकरांनी ते श्लोक अशा तर्हेने मांडले आहेत –
प्रभाते मनी राम चिंतीत जावा / पुढे वैखरी राम आधी वदावा
अलसुबह राम खयालात घ्यावा / आगे राम कबलज जबानी पढावा
( कब्ल : पहिला, आधी )
सदाचार हा थोर सांडू नये तो / जनीं तोचि तो मानवी धन्य होतो
सदाचार तो यार तरकू नये तो / मुबारक बशर तोच दुनियेत होतो
( तर्क : सोडून देणे बशर : माणूस )
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें / तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे
शरीफे दिला भक्ती राहेची जावे / पुढे श्रीहरी खुदबखुद राजि पावे
जनीं निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे / जनीं वंद्य ते सर्व भावे करावें
जहांला पसंद नाच तरकून द्यावे /जहांला पसंद तहेदिलाने करावे
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी / मना सज्जना हेचि क्रीया धरावी
झाल्यावरी फौत शोहरत उरावी /शरीफे दिला रीत हेचि धरावी
( फौत : मृत्यू शोहरत : प्रसिध्दी ,कीर्ती )
मना चंदनाचे परी तां झिजावे / परी अंतरी सज्जना निववावें
दिला संदलाचे परी त्वा घिसावे /शरीफे दिला त्वा बहेलवावे
समर्थाचिया सेवका वक्र पाहे / असा सर्व भूमंडळी कोण आहे
तिरछा गुलामे-समर्थास पाहे / असा कोण कमबख्त दुनियेत आहे
जयाची लिळा वर्णिती लोक तीन्ही / नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
जयाचा करिश्मा तिन्हीलोक गाती / न भुलो कभी रामदास उसके जो साथी
आणि लक्षात आलं, की ईश्वराबद्दल ठाम श्रध्दा असल्यावर आणि माणसाला तीव्र विनोदबुध्दी असल्यावर माणूस भक्तीमार्गात किती छान तर्हेने गमतीचे कारंजे उडवू शकतो !
थट्टा करणार्या माणसाचंही तसंच असतं. त्याच्या मनात एखाद्याबद्दल आस्था असली, प्रेम असलं तर अशा माणसाची थट्टा ही निर्मळ होते. ती ऎकावी वाटते. त्या माणसाबद्दल, त्या विषयाबद्द्ल जिव्हाळा तयार होवून जातो. आजही मराठवाड्यात निजामी अंमलाचा परिणाम बोलीभाषेत जाणवतो, तो म्हणजे, बोलण्यात येणारा हिंदी-उर्दू भाषेचा असर. माणूस सहजच बोलून जातो – ‘फारच परेशानी झाली बुवा !’ किंवा ‘त्याची हैसियतच काय ?’ वगैरे. कार्यालयीन व्यवहारात तर पेशकार, इजलास, दाखल करणे, दाखला असे कितीतरी शब्द रूढ आहेत. आणि मग खरंच वाटून जातं,की रामदास स्वामी त्या जमान्यात असते, तर त्यांच्या भाषेत अशी गंमत झाली तर ? किंवा सर्वसाधारण जनतेला समजावं म्हणून त्यांनी अशा भाषेचा वापर करून काव्य रचले तर… ते स्वाभावीकच होईल की- अर्थात ही सगळी गंमतच. गमतीनेच पहायचं असतं याकडे.
याच निमित्ताने या विषयाशी संबंधीत वसंत सरवटे यांचे एक व्यंगचित्र आठवले. साप्ताहिक ‘माणूस’ मध्ये वर्ष 1968-70 या काळात सरवटे यांच्या व्यंगचित्रांचे सदर रहायचे. त्यात एकदा रामदास स्वामींबद्दल अनावश्यक वाद उपस्थित झाले होते, या घटनेची गंमत सरवटे यांनी उडवून दिली होती. ते व्यंगचित्र हे होते-( संदर्भ : रेषालेखक -वसंत सरवटे/ संपादन : दिलीप माजगावकर-मधुकर धर्मापुरीकर / राजहंस प्रकाशन,पुणे )
प्रेमातलं वेंधळेपण
Posted in तंज-ओ-मिजाह् ! on नोव्हेंबर 11, 2010| 1 Comment »
प्रेम आंधळं असतं हे दुनियाला ठावूक आहे; पण प्रेम हे वेंधळंही ( किंवा वेंधळंच ) असतं याचे बरेच पुरावे आहेत. एक पुरावा पहा –
सरनामा मेरे नाम का और खत रकीब का
जालिम तेरे सितम के है उन्वां अजब अजब
(सरनाम: -पत्रावरील पत्ता. सितम : जुलूम,अत्त्यचार . उ न्वान : शैली,पध्दती . रकीब : शत्रू,अर्थात प्रेमातला प्रतिस्पर्धी )
…लिफाफ्यावर पत्ता तर माझा आहे. (त्याच्यामुळेच तर पत्र मला मिळालं ना ?) आणि आत उघडून पाहातो, तर काय ! च्यायला, ते तर माझ्या दुष्मनाच्या नावे लिहिलेलं ! म्हणजे,एकाच वेळेस दोन जुलूम झाले माझ्यावर- एक तर तिला दुसरा प्रेमी आहे हे कळालं आणि आता ते पत्र वाचावं तर त्यातला मजकूर वाचता वाचता असं वाट्त आहे, की उन उन पदार्थ-अन तो पण तिखट आग !म्हणजे, ती भेटलीच समजा आणि समजा तिथेच तो ‘रकिब्या’ असला तर ती पाहणार माझ्याकडे अन बोलणार त्याच्याशी ? वा रे वा !
पण हे असं वागणं वेंधळेपणाचं नाही का ? आधीच पत्राची वाट पहाणं म्हणजे अस्वस्थ करणारी बाब ; त्यात असं पत्र ?
मिर्जा गालिब आपल्या प्रेयसीच्या या वेंधळेपणाचा चतुराईने कसा उपयोग करून घेतो पहा –
जिस खत पे ये लगाई, उसका मिला जवाब
इक मुहर मेरे पास है, दुश्मन के नाम की (मुहर :शिक्का,छाप ,सील )
म्हणजे वेंघळेपणाचा उपयोग-माणूस चतूर असेल तर किती चांगल्या तर्हेने करून घेतो पहा. रकीबच्या नावाचा शिक्का करून घ्यायचा,तो लिफाफ्यावर मारायचा अन द्यायचं पत्र पाठवून -आय लव्ह यू ! आणि गंमत म्हणजे त्या पत्राला भरभरून उत्तर मिळालं की !
पण या दोनही शे’र मधून एक दुसरीच खबर मिळते. तिच्या वेंधळेपणाचा इथे संबंध नाही खरं म्हणजे; आणि अर्थात ते पत्र याला आहे, का याच्या रकीबला याचा ही संबंध नाही इथे. प्रेम कुणावर-याच्यावर का त्याच्यावर, छे! नाही हो.
मुळात तिच्या मनात प्रेमच एवढं अपार भरून आहे, की ती पत्रातून धो धो व्यक्त होत असते. तिला काही तरी मनातलं लिहावं वाटतं, ती उत्तेजीत अवस्था मांडण्याची अनिवार ओढ आहे तिच्यात… मग तो वाचणारा कोण – हा मुद्दा किती किरकोळ -नाही का !
please visit another blog : http://hasanyachaaakar.wordpress.com/
तत्त्वाची थट्टा !
Posted in तंज-ओ-मिजाह् ! on ऑक्टोबर 11, 2010| 2 Comments »
वर्गात शिकविणारे एखादे शिक्षक जरबेचे असतात.त्यांच्या विद्वात्तेचा,त्यांच्या शिकविण्याचा प्रभाव आपल्यावर असतो,त्यांच्याबद्दलचा आदर सदैव मनात भरून असतो. पण एक ढ आणि व्रात्य पोरगा आपल्या मनात सदैव मागच्या बाकावर बसलेला असतो.धडा समजून थेन्यापेक्षा न घेण्याकडेच त्याचा कल असतो. ..अतिरिक्त प्रभावाच्या दडपणापासून सुटका मिळविण्याची त्याची ही धडपड.समोरची मुलं अध्ययानात मग्न झालेली असताना,मागच्या बाकावरचा हा व्रात्य पोरगा अंगवळणी पडलेल्या त्याच्या सवयीत मश्गुल असतो-विडंबनाची त्याची सवय.
डॉ.इक्बाल यांची भरदार शायरी,भक्कम उपदेश,शब्दांतला तो दरारा त्याचबरोबर वर्गाताल्या मुलांबद्दल असावा, तसा ‘माणसा’बद्दल असलेला जिव्हाळा.त्यांच्या काव्याचा प्रभाव जीवनभर साथ देणारा. पण ते एवढ काव्य समजायला- पेलायला,’जज्ब’व्हायला आपली क्षमता तोकडी पडते की काय अशा भावनेचा अंमल कधी चढतो आणि मग त्याच वेळेस मनाच्या मागच्या बाकावर बसलेल्या त्या व्रात्त्य पोराच्या चाळ्यांकडे लक्ष जातं.
तरूण वयात तत्त्वांबद्दल-उपदेशांबद्द्लचं जे आकर्षण असतं,त्यात रोमांच असतो,तसा माझ्यातही होताच. त्याच दिवसांत डॉ.इक्बाल यांचे शे’र वाचून विलक्षण असा थरार मनात उमटायचा.त्या भरात,त्यांचे अवघड शब्दांचे अर्थ-अक्षरश: आक्रोड फोडून गर खावा,तसं शोधून घेवून समजावून घेतले-
तू ने ये क्या सितम किया मुझको भी फाश कर दिया
मैं ही तो एक राज था, सिना-ए-कायनात में
इक्बाल यांची ईश्वराबद्द्लची तक्रार मशहूर आहे. ईश्वराला उद्देशून ते म्हणतात, ‘ तू हा काय माझ्यावर अन्याय (सितम) केलास-मलासुध्दा प्रकट (फाश) केलंस !(जन्माला घातलंस !) या विश्वाच्या उदरातलं रहस्य म्हणून मीच होतो. (तू जन्माला घातलं नसतंस, तर विश्वाच्या रहस्याचाच एक भाग बनून मी राहिलो नसतो का?)
तरूणपणातल्या त्या दिवसांत जीवनव्यवहाराचे ट्क्के टोणपे खाण्यापूर्वीच मला या तत्त्वांचा परिचय झाला आणि कुशाग्र पोराच्या चेहर्यावर कधी मूढता वाढते, तसं झालं.तो-तो व्रात्य पोरगा.त्याच्या उच्छादाकडे लक्ष गेलं.त्याच्याबद्द्ल अजिबात तक्रार नसते. सत्त्याचं रूप थट्टेच्या अंगानं पाहिल्यावर हुशारीची ती अतिरीक्त मूढता कुठल्या कुठे पळून जाते. या शे’रची थट्टा मी नेहमीच ‘एंजॉय’करतो :
याच दिवसांत मला व्यंगचित्रं काढायचा छंद लागला होता. एकदा या ‘फाश’वाल्या शे’रसाठी मी एक व्य़ंगचित्र काढलं होतं- अंधाराची पार्श्वभूमी. रस्ता -त्यावर लाईटचा खांब,हॅट घातलेला बल्ब अन त्या प्रकाशात एक पोलीस एका चोराला हातकड्या घालून घेवून जातो आहे…नाराज झालेला तो चोर, ( बहुदा इक्बाल यांचा वाचक असावा) हा शे’र ऎकवितो आहे त्या पोलीसाला !मध्य रात्रीचं वातावरण, अंधारात चोरी करून पळून जाणार्या त्या चोराला या पोलीसाने पकडून ‘प्रकाशात’आणले आहे,आणि चोराची ही नाराजी !
मी काढलेल्या या व्यंगचित्रामुळे मला त्या शे’रचा खरा अर्थ समजला,आणि कायम लक्षात राहिला.
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com
रागातलं सुंदरपण
Posted in तंज-ओ-मिजाह् ! on सप्टेंबर 1, 2010| 3 Comments »
मुझको गुस्सा दिखाया जाता है
तबस्सुम को चबाया जाता है
प्रेयसीला प्रेयसीपण बहाल व्हायच्या आधीची अवस्था मोठी विचित्र असते. नायकाचा ,प्रियकर पदाचा ‘शपथविधी’झालेला असतो. पण ती तयार नसते. आणि तिला राजी करून घ्यायचा-प्रियकराचा तो कठीण काळ ! न पहाणं,प्रतिसाद देणं, यानंतर मग उतावीळ झालेल्या त्या नायकावर राग व्यक्त करणं,चिडणं आणि रागावणं असं तिच्याकडून होत जातं अन त्याला त्या सगळ्याची कमालीची मजा येत जाते.
मिर्झा गालिबचा एक शे’र आहे-
कितने शिरीन है तेरे लब के रकिब
गालियां खा के बे मजा न हुवा
शिरीन म्हणजे गोड आणि रकिब म्हणजे दुश्मन.शत्रू. इथे तिला-ती त्रास देते आहे,रागावते आहे म्हणून रकिब म्हटलेलं आहे.
हिदी चित्रपटात तर सरसकट म्हणता येईल असे प्रसंग तर हमखास असतात. नयिकेची ओळख,तिच्याशी लगट करताना होणारी चकमक आणि तिचा राग-संताप मोठा पहाण्यासारखा असतो. आणि सुंदर असलेली नायिका जेव्हा रागात येते- डोळे वटारते,ओठ मुडपते तेव्हा ती केवढी सुंदर दिसते ! तिच्या रागाचा उलटा परिणाम होवून नायकाला तिची चक्क भुरळ पडून जाते.
‘दिल ही तो है’मध्ये मुकेशने गायलेल्या गाण्यात या रागाच्या सौंदर्याचं किती छान वर्णन केलंय पहा-
गुस्से में जो निखरा है,उस हुस्न का क्या कहना
कुछ देर अभी हमसे, तुम यूं ही खफा रहना
या गाण्याचे गीतकार आहेत साहिर लुधियानवी. गद्यप्राय रचना हे त्यांच्या गाण्यांचं वैशिष्ट्य. अशा गाण्यांना चाल लावणं अत्यंत कसरतीचं असतं, पण संगीतकार रोशननं साहिरच्या अशा अनेक अवघड रचनांना मोहक चाली देवून त्या वाकवून दाखविल्या. याच गाण्यातल्या शेवटच्या ओळीतली कल्पना किती सुरेख आहे पहा-
पहले भी हसीं थीं तूम,लेकिन ये हकिकत है,
वो हुस्न मुसिबत था,ये हुस्न कयामत है
रागातलं हे सुंदरपण आणि कुणाचं- नूतनचं. वा! ‘दिल्ली का ठग’ मध्ये नूतनची छेडछाड किशोर कुमार करतो
आणि त्यामुळे नूतन तर वैतागून जात असते…आपल्याला मोह पडत असतो.
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com
निराशेची थट्टा !
Posted in तंज-ओ-मिजाह् ! on जून 21, 2010| 5 Comments »
नातजूर्बा हूं,खतावार नही मैं यारो
आफताब को तूफां का आगाज समझ बैठा
बाद जाना,के दस्तक थी मसिहा ने दी
मैं जिसे मौत की आवाज समझ बैठा था
…ह्या ओळी वाचण्यात आल्या,आणि त्या ‘मै’च्या विचारात गुंतून गेलो. मी अननुभवी हे तो सांगतो आहे,.माझी चूक नाही-मी दोषी नाही,माझ्याकडून नकळत घडलं आहे, हे तो सांगतो आहे. काय घडलं होतं त्याच्याकडून-सूर्याचं तळपणं,ती प्रखरता पाहून त्याला ती वादळाची-संकटाची ती सुरूवात आहे असं वाटलं. खरं म्हणजे दारावर जी थाप पडलेली होती, ती मसिहाची (उपचार करणारा,आयुष्य देणारा ) होती, मला मदत करायला तो आला होता,हे नंतर कळलं..आधी मला ती माझ्या मृत्यूचीच चाहूल वाटली होती.
हे वाचलं.त्या निर्दोष अशा निराशावादी माणसाची गंमत वाटली अन मनात एकानंतर एक असे ‘निरपराध निराशावादी’गोळा होवू लागले.हा त्याचा एक भाऊ पहा-
Pessimist is the man
Who complaint about the opportunity-
knocking the Door !
पहिला तो जो होता,तो निराशावादी होता,पण त्याला आपल्या चुकीची कल्पना होती. पण हा जो दुसरा आहे,त्याच्याही दाराशी संधी चालून आलेली आहे; संधी दार ठोठावते आहे अन हा गडी चक्क त्या आवाजाने वैतागला आहे-च् ! काय कटकट आहे ! निराशावादी माणसाचं हे व्यवच्छेदक लक्षण आहे म्हणा ना!
‘रिडर्स डायजेस्ट’ मध्ये आलेला अशाच माणसाचा एक छोटा विनोद पहा :
पुराने वेढलेल्या घराच्या दारावर थाप देण्यात येते.
‘ कोण ?’ आतून विचारल्य़ा जातं.
‘आम्ही आहोत रेडक्रॉसची माणसं ! दार उघड !’
‘मी रेडक्रॉसची वर्गणी गेल्याच महिन्यात दिली !’आतून सांगितल्या जातं !
रेडक्रॉसचे लोक-सेवाभावी संस्थेचे लोक नेहमी येतात, ते निधी-वर्गणी मागायला येतात हे माहित असल्याने,ते आता संकटातून सुटका करण्यासाठी,मदतीसाठी आली आहेत(हे संस्थेचं उद्दीष्ट्य असतं,पण मोठी संकंटं क्वचित येत असल्याने-)हे आतल्या माणसाच्या घ्यानातही नाही. तोसुध्दा ‘नातर्जूब’च म्हणायला हवा.
निराशावादी आणि आशावादी यांची तबियत जाहीर करणारा हा शे’र पहा:
नामुराद को तो सूरज है सिरदर्द की वजह
जानेवाले को तो जुगनुसे पता मिलता है
आशावादी माणसाने विमानाचा,तर निराशावादी माणसाने पॅराशूटचा शोध लावला असं म्ह्टल्या जातं (गमतीने!) हे जाहीर आहे. पण यातून एक गोष्ट जगजाहीर होते, ती तीव्र इच्छाशक्तीची. आशा-निराशेतही कार्यान्वित रहाणारी माणसाची तीव्र इच्छाशक्ती-उठावाची,बचावाची.
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com
इकडे का तिकडे…
Posted in तंज-ओ-मिजाह् ! on मे 31, 2010| Leave a Comment »
Reality is an illusion,caused by deficiency of alcohol असं ज्या सदगृहस्थानं म्हटलं आहे, (सदगृहस्थच असावा तो!) ते नेमकं केव्हा बरं म्हटलं असावं… बरोबरय, ‘नशा’ उताराला लागल्यावरच त्याला वास्तवाचे असे भान आले असावे. विचार आणि धुंदी-परस्पर विरोधातल्या या बाबी माणसाच्या मनात सदैव मुक्कामाला असणं..किती मजेदार असतो हा शेजार.
घुंदीमध्ये जे जाणवतं, ते विचार केल्यावर ( भानावर आल्यावर ) खलास झालेलं असतं. आणि ‘शहाणपणा’त जे कळालेलं असतं, ते धुंदीत लक्षात रहात नाही किंवा पटत तरी नसतं. अशावेळी माणसाला वास्तव म्हणजे काय याचं नेमकं उत्तर कसं मिळावं… आणि सौंदर्याच्या संदर्भात, प्रेमाच्या संदर्भात तर हा प्रश्न अधीक गहिरा होवून जातो. जे दिसत असतं, त्याने नशा येत असते,धुंदी येत असते हे जसं खरं तसंच,जे दिसत असतं, त्यावर विचार करायला गेलं, तर भारावून जाण्यासारखं त्यात काही नसतं, हा निर्णय होत असतो. एका शायरने म्हटलं आहे-
सोचिये तो हुस्न का फिर कुछ नही (अधिक…)
आजची पोरं !
Posted in तंज-ओ-मिजाह् ! on मे 24, 2010| 3 Comments »
आजच्या पोरांना- तरूण पिढीला नावं ठेवायची सवय पिढ्या न पिढ्या चालूच असते. आपल्या पिढीचा हवाला देवून आजच्या पिढीला नावं ठेवणं किंवा आजच्याच पिढीची माणसं-त्यांनी पुढे जाणार्या पिढीची थट्टा करणं चालूच असतं. ‘आज कल के जंटलमैन, रहते है हरदम बेचैन !’ असं’ला रा ल प्पा’गर्ल म्हणते,तर एकीची धमकी असते-‘हम से नैन मिलाना बी. ए.पास कर के !’ 1963च्या सुमारास ‘दिल्लगी’सिनेमातलं उषा मंगेशकरचं असंच एक गाणं गाजलं होतं-‘ए आज कल के लडके,लिखते ना पढते हैं’. पुढे भारतीय संस्कृतीचा ‘ऑथराईज्ड डिलर’झालेल्या मनोज कुमारने नव्या पिढीवर चांगलीच छ्डी उगारली होती.
पण त्याही पूर्वी,नवीन पिढीबद्दल तक्रार म्हणा किंवा त्यांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्याच होत्या. या प्रतिक्रीया कधी थट्टेने, कधी तळमळीने दिल्या जातात-पिढ्यान पिढ्या…
अकबर इलाहाबादी या शायरने लहान मुलांबद्द्ल अगदी खरी खुरी प्रतिक्रीया ( म्हणजे वस्तूस्थितीची थट्टा ) दिली होती-
तिफ्ल में बू आए क्या मां बाप के अतवार की
दूध है डिब्बे का, तो ता’लीम है सरकार की
( तिफ्ल : शिशू,मूल. बू : लक्षण,चिन्ह. अतवार:पध्द्ती,ढंग,राहाणीकरणी)
आजच्या मुलांमध्ये आईवडिलांच्या संस्कारांची चिन्हं, पध्दती कुठून बरं येणार…(कारण त्यांना) ड्ब्यातलं दूध; तर शिक्षण(पध्दती)हे इंग्रजांकडून मिळतंय ना !’इंग्रजाळलेल्या’त्या काळातल्या वातावरणावर एवढी झणझणीत प्रतिक्रिया याशिवाय कोणती असणार ! इंग्रजांचं शिक्षण आणि डब्यातलं दूध असल्यावर जन्म दिलेल्या मातापित्यांचे संस्कार-त्यांची प्रकृती उतरायला आता मुलांच्या आयुष्यात जागाच कुठे उरली ?
पण कितीही नावं ठेवा,प्रत्येक पिढीची नवी पोरं जुन्या पिढीपेक्षा अधिक हुशार,अधिक बुध्दीमान होत जाणारी;विशेषत: प्रत्येक गोष्ट बुध्दीच्या निकषावर पारखून घेणारी आहे. ( आपलं तसं नव्हतं. वडिलधार्यांनी सांगितलं किंवा शास्त्रात सांगून ठेवलेलं असलं,की पटकन आपण ‘हो’म्हणणार-आपली श्रध्दा बसणार.)
एक हम थे जो हकीकत से बहल जाते थे
आज के बच्चे हकीकत को परखना चाहें ( हकीकत : सत्य,वास्तविक स्थिती,मूलतत्त्व)
आमची पिढी जे आहे त्याचा स्विकार करणारी होती. वस्तूस्थितीला स्विकारून चालणारी होती. श्रध्दाचं सामर्थ्य जाणणारी होती. आजची पोरं वस्तूस्थिती स्विकारण्यापूर्वी त्याची पडताळणी, त्याची पारख करीत बसणारी आहे. श्रध्देच्या बाबतीत तर त्यांचा हट्ट तर काळजी वाटावी ( अर्थात आपल्याला) एवढा विपरीत असतो.
पण ही पारख-मोठी धोक्याचीही असते.श्रध्दा एकदमच बाजूला सारून केवळ तर्क,केवळ विचारांनी भारावलेली पिढी भावनाशून्य केव्हा होवून बसते, त्याची खबर त्यांनाही लागत नाही. श्रध्दा-भावना-आस्था विरहित या तरूण पिढीबद्दल मग मागची पिढी मोठ्या तळमळीने विचारते–
ये किस ने छिन ली, बच्चों के हाथ से मिट्टी
जो कल खिलौने बनाते थे, बम बनाने लगे
… निर्मितीच्या नादातली पिढी जेव्हा विध्वंसाच्या मार्गाने जावू लागली,तर केवढी आफत होईल…
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com