हिंदी गाण्यांची आवड लहानपणापासून असली,की त्यात्या वेळी ती गाणी जशी ऎकली तशीच मनात रहातात,त्याच तर्हेने आयुष्यभर साथ देतात.तथापि, त्यावेळेस गाण्यांचे अर्थ,शब्दांचे अर्थ-आशय माहित नसतात. फक्त चाल. त्या गाण्याच्या चालीने गाणं मनात वावरत असतं.पुढे जसजसं वय वाढत जातं,समज वाढते, तसतसं गाणं समजत जातं. अर्थात सगळं गाणं समजतं असं कुठे असतं ? एखादा शब्द-एखादी ओळ समजून जाते,ते गाणं नव्याने झळाळून जातं- खुशी होते,पुढे जातो आपण.जीवन व्यवहारातील सुख दु:खाच्या अनुभवांच्या अनुषंगाने गाण्यातला अर्थ कधी जाणवतो, ते गाणं अधिक अधिक निकटचं होवून जातं.
गाण्यातले उर्दू शब्द तर या प्रवासात महत्त्वाचे धडे असतात.अर्थ माहित नसलेल्या कितीतरी उर्दू शब्दांना घेऊन आपण आपल्या तर्हेने त्याचा उच्चार करून सांभाळून ठेवलेले असतात हे शब्द! अशा एखाद्या शब्दाचा अर्थ जेव्हा आपल्याला लागतो,तेव्हा घरात दिवा लावल्यावर घर उजळून जावे तसं ते गाणं मनात उजळून जातं.
1958 चा लालारूख सिनेमा सुरूवातीला ‘है कली कली के लब पर,तेरे हुस्न का फसना’या मं.रफीच्या खुमासदार गाण्यामुळे लक्षात राहिला. त्यानंतर वयाच्या पुढच्या टप्प्यावर ‘प्यास कुछ और भी भडका दी झलक दिखला के‘ या गाण्याची ओळख झाली. मात्र ही ओळख कुणी करून दिली-त्या गाण्यातल्या लाडिक सतारीने. या सतारीनेच मला गाण्याकडे हळूवार तर्हेने आणलं. हे गाणं गायलं आहे, तलत महमूद आणि आशा भोसले यांनी; मात्र सगळ्या गाण्यात सतारीच्या सुरावटी एवढ्या लाडीक तर्हेने वावरतात,की असं वाटतं,हिवाच्या दिवसांत एखादं पाळीव गुबगुबीत मांजर आपल्या अंगाखांद्यावर रूळावं,लगट करावी असं…गाणं ज़णू काही तिघांचं आहे-तलत,आशा भोसले आणि ही सतार…
तेव्हा या गाण्याचा छंद लागला. मग उर्दू भाषेचा छंद लागला आणि जादू झाली. अर्थात ही जादू एका एका शब्दाने नशेचा खुमार वाढत जावी.गाण्यातले जूने उर्दू शब्द-त्याचे अर्थ लावायचे गाणं उजळून घ्यायचं. असं चालू झालं.
या गाण्याच्या बाबतीतही असंच झालं. गंमत अशी झाली,की पूर्ण गाणं समजून घेतलं,आवडलं;मात्र एक शब्द कसा कोण जाणे निसटून गेला आणि कसा कोण जाणे त्याची दखल न घेताच ते गाणं अनुभवलं इतकी वर्षं ,याचं राहून राहून आश्चर्य वाटू लागलं..
एकदा सकाळी हे गाणं भुले बिसरे गीत या कार्यक्रमात लागलं .नेहमी प्रमाणे त्या मांजरासारखा मी गाण्याभोवती घोटाळू लागलो…
प्यास कुछ और भी भडका दी झलक दिखला के
तुझको परदा रूखे-रोशन से हटाना होगा
इतनी गुस्ताख न हो इश्क की आवारा नजर
हुस्न का पास निगाहों को सिखाना होगा
या गाण्यातले उर्दू शब्दांचे मोहरे-त्यांचे अर्थ शोधून घेऊन गोळा करून घेताना एखादी मोहर पडून जावी,राहून जावी तसं झालं होतं. हा शब्द –हुस्न का पास…राहूनच गेला होता. हुस्न म्हणजे,सौंदर्य-हे माहित होतं; पण
पास…हे पास म्हणजे काय बुवा… या गोंधळात पडलो. खरं म्हणजे, या सिनेमाचं नाव विचित्र वाटल्यामुळे लक्षात राहिलं होतं-लालारूख ! लाल: -म्हणजे, लाल रंगाचे फूल. लालारुख म्हणजे, लाल व नाजूक गाल,चेहरा असलेली(अर्थात प्रेयसी !)
-आणि पास शब्दाचा अर्थ पाहिला,की गाणं उजळून निघालं ! हुस्न का पास म्हणजे, सौंदर्याची मर्यादा,संकोच,भीड. संकोच,भीड,मर्यादा हे जे सौंदर्याचे वैशिष्ट्य असते, त्याची जाणिव नजरेला (निगाह ) असणे गरजेचे आहे… असं अर्थात-तिचं सांगणं.
पडद्यामागे हा जो चेहरा तू लपविला आहेस,तो बाजूला सार,असं आर्जव तो करतो आहे आणि ती तितक्याच निग्रहाने पण संकोचाने-अंतर राखून प्रेमातल्या व्यवहारातली सभ्यता त्याला सांगते आहे. हा संवाद एवढा मोहक आहे…
चांद तारों को मयस्सर है नजारा तेरा
मेरी बेताब निगाहों से ये पर्दा क्यूं है
चांद आईना मेरा तारे मेरा नक्शे-कदम
गैर को आंख मिलाने की तमन्ना क्यूं है
तुझको देखा,तुझे चाहा,तुझे पूजा मैने
बस यही इसके सिवा मेरी खता क्या होगी
मैने अच्छा किया घबरा के जो मूंह फेर लिया
इससे कम दिल के तडपने की सजा क्या होगी
हा सगळा संवाद ही गुस्ताखी सगळं सगळं तिचा चेहरा-रूख पाहण्यासाठी आणि तिचा तो नकार. या सगळ्या गाण्यात एक प्रकारचा संकोच,भीड असं वातावरण आहे, हे सगळं ,हुस्न का पास ,या शब्दांचा टॉर्च हाती आला,आणि लक्षात आलं. एखाद्या व्यवहारात दोन फ्री गिफ्ट मिळाव्यात तसं,हे गाणं जेव्हा यू ट्यूब वर मी पाहिलं तसा अनुभव आला. एक म्हणजे, जसं हे गाणं तलत महमूद ने गायलं आहे, तसंच सिनेमात त्यानेच हे म्हटलेलं आहे. दुसरा लाभ म्हणजे, मोहक नजरेची ती नायिका-श्यामा. शारदा,बरसात की रात मधली तिची अदाकारी लक्षात राहिली आहे.
आणि दोन गफलतींचाही अनुभव मला आला. एक म्हणजे, हे गीत साहिर लुधियानवी यांचं आहे, हा माझा झालेला समज-जो चुकीचा असून या गीताचे गीतकार आहेत, कैफी आजमी. संगितकार :खैय्याम.
दुसरी गफलत माझी नाही-सिनेमातली. गाण्यात सतारीची साथ आहे,तर इथे नायकाच्या हाती, मेंडोलिनसारखं – का दिलरूबा? असं ते वाद्य आहे. ( अशीच गफलत नागीन या जुन्या सिनेमातल्या लताच्या गाण्यात सुध्दा आहे-कौन बजाए बासुरीया असं लता म्हणते,आणि वाजविललं आहे ते भलतंच वाद्य) अर्थात ही गफलत दिग्दर्शकाला माहित असणारच…पण सतार घेऊन प्रेम करणं अवघड असल्याची जाणिव त्याला असावी !
Faarch chaan. Itke divas he gaane nuste aikt hoto tyaachya n-visarta yenaarya chaalicha, doghancya gaanayatil haluwar gappancha anand geth hotl. he vaachun matra doghanchya khajgi gappat tyanchya n-kalat sahabhagi zalayachya anand hoto ahe.