अत्यंतिक संवेदनशील मन:स्थिती ही अत्यंतिक ज्वालाग्राही पदार्थासारखी होवून बसलेली असते. निमित्ताची ठिणगी उद्भवली,की क्षणार्धात संवेदनांच्या ज्वाळा पेटतात. फरक एवढाच, की ज्वालाग्राही पदार्थाने पेट घेतला,तर परिणाम खाक होण्य़ात; तर पेटलेल्या संवेदनांमुळे- मन उजळून निघतं.
अर्थात ही अत्यंतिक संवेदना असते प्रेमाची-रोमांचीत करणार्या भावनांची संवेदना. ( द्वेषाची संवेदना,ज्वालाग्राही पदार्थापेक्षा बेकार) या संवेदनेनं तरूण मन जेव्हा भारावलेलं असतं, तेव्हा तिच्या हालचाली- तिचा कटाक्ष चक्क प्रतिसाद वाटून जातो. सहसा तिच्या त्या वागण्याबोलण्यात हालचालीत कसलंही आवाहन नसतं,ना सुचविणं- ती असते स्वाभावीक चलनवलनाची हालचाल. मात्र संवेदनांच्या धुक्यातून पहाताना,त्याच तिच्या हालचाली स्वर्गिय होवून बसतात. वेड लावतात. त्याला तो चक्क प्रतिसाद वाटत असतो-आपल्या संवेदनांसाठी दिलेला.
हिंदी सिनेमातल्या प्रेमव्यवहारात एवढ्या तरल संवेदना क्वचीत पहायला मिळतात. ‘मजरूह’सारखा निष्णात शायर सिनेमाचं गाणं लिहिताना कधी ही रेशमी-मुलायम भावना अलगद शब्दांत उतरवितो आणि मग आपण नकळत त्या संवेदनांच्या हवाली होतो.
‘तीन देवियां’ (1965) या चित्रपटात देव आनंदला एका पार्टीत फर्माईश केली जाते. सिनेमातला नेहमीचा -टिपीकल असा प्रसंग. आता भळभळ भरघोस प्रेम वहाणारं गाणं ऎकायला मिळणार अशा तयारीत आपण असतो आणि रफीच्या स्वरातून-शब्दांतून अलगद प्रकट होते, ती अत्यंतिक संवेदनशील मन:स्थिती…
कहीं बे-खयाल हो कर, यूंही छू लिया किसी ने
कई ख्वाब देख डाले,यहां मेरी बेखुदी ने
समारंभात भेटीगाठी होतात.हसणं-बोलणं होतं.कधी उपचार म्हणून, कधी ओळख म्हणून ,कधी नाईलाज म्हणूनसुध्दा. अशाच वेळी झालेला तो स्पर्श असतो. अगदी अनाहूत म्हणावा असा; पण त्या स्पर्शाच्या सुताने हा संवेदनेनं भरलेला माणूस चक्क स्वर्ग गाठतो की ! (बेखुदी : धुंदी,नशा ) तेवढ्याशा स्पर्शाने स्वप्नांची गर्दी होवून जाणं-दाटी होवून जाणं…केवढ्या तीव्र संवेदना म्हणाव्या त्या !
याच सिनेमात आणखी एक एका गाण्यात अगदी अशाच तर्हेने संवेदना कशा ‘ज्वालाग्राही’ बनलेल्या आहेत पहा-( गाणं आहे- ख्वाब हो तुम या कोई हकिकत…)
धडकनों ने सुनी इक सदा पांव की
और दिल पे लहराई आंचल की छांव सी
बेखयाली
जून 1, 2011 Madhukar Dharmapurikar द्वारा
कहीं बेख़याल हो कर मुझे छू लिया किसीने,
माझं फार आवडतं गाणं..बरं वाटलं.
नंदिनी आत्मसिद्ध