आमचे दादा-आईचे वडिल परभणीला सरकारी दवाखान्यात कम्पाउंडर होते. आईची बाळंतपणं तिकडेच झाली दादांकडे. मी आईसोबत असायचो. मी असेन पाच सहा वर्षांचा. दादांचं भरलेलं घर,वाढता खर्च आणि तुटपुंजी मिळकत ही तफावत मला लक्षात यायची, पण माझं ते शाळकरी वय असल्याने तेवढी जाणवायची नाही. मनात सतत असायचं ते घरात आंबटवरणाचं जेवण. चहाचं काम दादाच करायचे. संगीत नाटक, संगीताचा छंद असलेले आमचे दादा.
नवरात्रात तर देवीच्या आरत्यांचा उरूस या घरी भरलेला असायचा. आमच्या घरचं दैवत होतं बालाजीचं-गिरी बालाजीचं.आमच्या घरी हे वातावरण नसायचं; त्यामुळे या देवीच्या सामूहीक आरत्या, हे वातावरण मला फार आवडायचं. लाकडी वेलबुट्टीदार मोठ्या आकाराचं ते जाळीदार देवघर. त्यात रेणूका माता. आरत्यांच्या तयारीत संध्याकाळपासूनच आजी,मामी वगैरे असायच्या. महातपुरीकरांच्या त्या वाड्यातली-गल्लीतली स्त्री-पुरूष मंडळी घरात जामायची. मामा,आजोबा संगितातले जाणकार असल्याने आरत्यांतून करण्यात येणार्यास त्या अवाहनांना स्वरांचं-ठेक्यांचं छान रूप लाभलेलं असायचं. पाटावर उभे राहून आरतीचं तबक घेवून दादा रेणूका मातेच्या आरत्यांत सहभागी व्हायचे आणि त्या समूह स्वरांत मी- गर्दीत वडिलांचं बोट धरून चालावं तसं दादांच्या स्वरांवर-त्यांच्या आवाजावरच लक्ष ठेवून असायचो.
-आणि दादांची मिळकत आणि वाढत्या खर्चाची ती तफावत मात्र मला त्या वेळी तीव्रतेने जाणवायची. अगदी तीव्रतेने. दादांनी आरतीतल्या ओळींचा स्वर धरलेला असायचा-
अजूनी अंबे तुजला माझी करूणा का येईना हो….
गर्दीत वडिलांचं बोट धरलेलं असताना कधी भीतीने अधिक गच्च व्हायचं,मुठीतला घाम जाणवायचा. …त्या ओळींतून दादांच्या स्वरातला ओलावा मला जाणवत रहायचा.समूह स्वरांतून एकटा-वेगळा असा त्यांचा आवाज,त्यांचं एकट्याचं ते देवीला केलेलं आवाहन. त्या दाटीतून गर्दीतून दादांच्या जवळ मी सरकायचो. मला वाटायचं,त्या आरतीतून दादा सांगत असावेत देवीला, आपल्या कर्जाबद्दल, दुकानांच्या वाढत जाणार्या उधार्यांबद्दल,पैशाच्या गरजेबद्दल,पैशा अभावी वाटत रहाणार्या अपराधी भावनेबद्दल…एकदा परभणीला ‘देव दीनाघरी धावला’ हे नाटक आलं होतं.(फिरता रंगमंच हे त्या दिवसांत अप्रूप होतं.) घरासमोरून जाहिरातीचा टांगा जात होता आणि महिन्याअखेरीच्या त्या आर्थिक विवंचनेत असलेले दादा…त्यांची चुटपुट आजही मनात भरून आहे…‘काय करावं रे.. एवढं चांगलं नाटक..’
आज दादा नाहीत. ते केव्हाच निघून गेले. आता सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती चांगली झालेली आहे. मातीची घरं जाऊन फ्लॅटमध्ये रहात आहेत सगळे. चाळीस पावरचा पिवळा बल्ब जाऊन भक्क लाईट आहेत; एवढे भक्क की घरात अंधाराचा कण-क्षण कुठे सापडणार नाही,शोधूनही.
आजही मामांकडे रूढीनुसार नवरात्रात आरत्या होतात. आजही मी एक दिवस का होईना जातो. मामांची नातवंडं आरत्यांची पुस्तकं हातात धरून उत्साहाने आरत्यांत सहभागी होत असतात-
विपुल दयाघन गरजे तव ह्रदयांबरी श्री रेणूके हो !
पण- माझ्या मनात आज- आजचे हे दिवस आणि ईश्वराचं स्मरण यांची सरमिसळ झालेली आहे. मनात करूणा आहे, पण या करूणॆत चंचलतेचा समावेश झाला आहे. विवंचना आहेत, पण या चंचलतेपायी त्या ईश्वरापुढे त्या मांडणं गैरजरूरी वाटत आहे. लहानपणात नाही का,आईनं काही विचारलं तर मी चिडून म्हणायचो तिला- अं! तुला काय माहित आहे गं- उगं गप्प बस !
आज दिवस उजेडाचे आले आहेत, महत्त्वाचं म्हणजे वडिलधार्यांचं अर्धं अधिक आयुष्य हाता तोंडाची मिळवणी करण्यातच गुजरलं, तसं आज नाही.
…म्हणून तर आज जाणवतो आहे तो शे’र… निघून गेलेले ते शायर जावेद नासेर यांचा-
अंधेरा हो तो तुझको पुकारूं यारब !
उजालों में मेरी आवाज बिखर जाती है
अंधारात,संकटात ईश्वराची तीव्रतेने आठवण व्हावी,दु:खामुळे आवाजात-आवाहनात आर्तता यावी आणि तेच आवाहन तीच, आठवण प्रकाशात केलेली असताना, भल्या दिवसांत केलेली असताना लक्ष विचलीत झालेलं… खोडकर पोराचा आभ्यास असावा तसं ते चित्त…
म्हणून तर ईश्वराचं अस्तित्त्व जाणवत रहातं –दु:खात,अंधारात.
हम्द म्हणजे स्तोत्र,स्तुती. आरत्यांमध्ये ईश्वराची,देवीची स्तुती असते. तसंच हम्दमध्ये अल्लाहची स्तुतीच असते. अशीच एक हम्द संगीतकार उषा खन्नाने स्वरबध्द केलेली आणि गायलेली आहे; मै हूं अलादिन नावाच्या चित्रपटात….
Dear madhukarrao, saprem namskar. tumache aaj dukkh..sharan wachle. mala tya head linech aarth kalala nahi, parantu tyachi janiv zali. mi ekadam lahanpanchya aathvanit gelo. barach vel tya madhun baher yeta aale nahi. lahanpani jo kanhi gharat dev dharm hot hota to aata hot nahi, tyachi pan khupach janiv zali. ok parantu ekdam manala sparshun gela. purvi gharat garibi hoti parantu pahunchar changalach hot aase,aani dev dharma suddha. ok. by. …..madan
या शिर्षकाचाही एक अनुभव आहे. नांदेडचे माझे एक मित्र- जे न्यायाधीश आहेत आणि उत्तम वाचक आहेत, श्री.महेश लव्हेकर. यांना मी एकदा हा शे’र ऎकविला. त्यांना तो अतिशय आवडला आणि पटकन त्यांना विंदा करंदीकरांच्या कवितेची आठवण झाली. त्या ओळींनी मी एवढा वॆडावलो, की त्यातलीच एक ओळ शिर्षक म्हणून घेतली. विंदांच्या कवितेतल्या त्या ओळी अशा आहेत-
दु:ख हे शरण देवा, मी न बध्द
आत्मा स्वयंसिध्द सुखापोटी.
विपुल दयाघन गरजे तव ह्रदयांबरी श्री रेणूके हो !
निजलीस कशी दीनाची चिंता सोडूनि अंतकरणी हो
यातली ”निजलीस कशी” असं म्हणण्याइतका भक्ताचा देवावरचा हक्क मला आवडायचा.
>>अंधारात,संकटात ईश्वराची तीव्रतेने आठवण व्हावी,दु:खामुळे आवाजात-आवाहनात आर्तता यावी आणि तेच आवाहन तीच, आठवण प्रकाशात केलेली असताना, भल्या दिवसांत केलेली असताना लक्ष विचलीत झालेलं…
मस्त!
म्हणूनच कुंतीने अश्रू मागीतले असतील.
जुने दिवस, ते कष्ट, दु:ख यांचं आता आठवणीत सुखंच झालेलं असतं.
तुमच्या प्रतिक्रियेतल्या ओळी वाचल्या आणि एका अनावर ओढीने आईच्या- ती जाऊन आता सात वर्षं झाली, जुन्या पोथ्या काढून आरत्यांचे ते पुस्तक काढले. त्यात किती वेळ रमून राहिलो… तुम्ही नमूद केलेल्या पहिल्या ओळीची दुसरी ओळ आहे-
पळभर नरमोराची करूणावाणी ही आयके हो ( वो)
तर दुसर्या ऑळीची पहिली ऑळ अशी आहे-
उठ लौकर जगदंबे त्रैलोक्याची तू स्वामिनी हो ( वो )
… मग तसंच त्या पुस्तकांत गुंतून गेलो. माझी आई गुरूवारी पंचपदी करायची. घरी एकटीच. डालडाच्या डब्याला दत्तात्रयाची तसबीर लावून आई प्रदक्षिणा घालायची. तिच्या आवाजाला स्वर द्यायचा दत्तात्रय. तिच्या आवाजाला साथ द्यायचा दत्तात्रय. तिला श्रोता होता दत्तात्रय… आईच्या आवाजातली पदं मी ऎकायचो, जेवताना,खेळताना, बाहेर जाताना येताना… पण आत्ता लक्षात आलं, की ती सगळी पदं मला मुखपाठ आहेत- आईच्या चालीसहित, आईच्या आवाजाच्या चढ उतारांसहित…
Wah.Apratim.
आवडलं
आरतीपासून सुरु केलेला प्रवास गझलपर्यंत कसा पोचवाल याची वाचतावाचता उत्सुकता वाटत होती.
सव्य ते अपसव्य मस्तच.
वा ! सव्य अपसव्य… किती छान शब्द किती सहजतेने, किती आपुलकीने या दोनही भाषांत, या दोनदी भक्तीमार्गांत येऊन बसला आहे….
विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही.
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये
एवढीच माझी इच्छा.
दुःखातापानं व्यथित झालेल्या माझ्या मनाचं तू सांत्वन करावंस
अशी माझी अपेक्षा नाही,
दुःखावर जय मिळवता यावा
एवढीच माझी इच्छा.
माझ्या मदतीला कोणी न आल्यास
माझं बळ मोडून पडू नये
एवढीच माझी इच्छा.
जगात माझं नुकसान झालं,
केवळ फसवणूकच वाट्याला आली
तर माझं मन खंबीर रहावं
एवढीच माझी इच्छा.
माझं रक्षण तू करावंस, मला तारावंस,
ही माझी प्रार्थना नाही,
तरुन जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं
एवढीच माझी इच्छा.
माझं ओझं हलकं करून तू माझं सांत्वन केलं नाहीस
तरी माझी तक्रार नाही.
ते ओझं वहायची शक्ती मात्र माझ्यात असावी
एवढीच माझी इच्छा.
सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ऒळखून काढीन,
दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करील
तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये
एवढीच माझी इच्छा.
————- रविंद्रनाथ टागोर.