माणसाचं जीवन हे क्षणभंगूर असतं. आयुष्य त्याच्या हाती नसल्याने तो एका अर्थाने पाहिलं तर क्षुल्लकच की.पण माणूस स्वत:च्या सुखदु:खात गुंतून जातो, अन हैरान होतो.
रात्री आपल्याला झोप येत नसते,अवेळी जाग येते,अस्वस्थ होतं याची अनेक कारणं असतात. या अनेक कारणांपैकी एक असतं,मृत्यूच्या भयाचं कारण. झोपणं म्हणजे,संपून जाणं असं वाटतं की काय कोण जाणे, माणूस झोपायला तयार होत नसतो, अन म्हणतो,की झोप का बरं येत नाही ?
अस्वस्थता असली,की झोप येत नसते-अस्वस्थता का येते-परिणामाची निश्चित माहिती नसते,नेमकं काय होणार आहे, कसं-कधी होणार आहे याचं उत्तर आपल्या विचारांच्या कक्षेबाहेर गेलं,की अस्वस्थता येते आणि-
झोप हरवते.
पण मिर्जा गालिबचं म्हणणं असं,की माणसाचा मृत्यू हा निश्चितच आहे. जावं तर लागणारच निर्विवाद; मग असं (आणि असंच) असल्यावर आता वाद कशाला ? निश्चिंत का रहाता येत नाही,झोप का बरं येत नाही…
मौत का एक दिन मुअय्यन है
निंद क्यूं रात भर नही आती
खरं म्हणजे, आपल्याला माहित असतं- त्याची स्पष्ट जाणिव असते,की आयुष्याचा हा कालावधी ठरलेलाच असतो,मर्यादितच असतो. आपल्याला मरायचं आहेच,मरणारच आहोत आपण. तो मृत्यू नको म्हटलं तरी येणार,ये म्हटलं तरी येणार. त्याचं स्वागत केलं तरी येणार,हाकलून लावलं तरी नाही जुमानणार. मग त्याला का भ्यावं बाबा… एक ना एक दिवस आपल्या घरात आपल्या मृत्यूचा तो ‘सोहळा'(हंगामा) होणारच आहे.
उम्र फानी है तो, फिर मौत से डरना कैसा ( फानी : नाशिवंत )
इक न इक रोज ये हंगामा हुवा रख्खा है
पण ते वेगळं.आज आत्ता या क्षणाला-मत्यू आलेला नसतो.तो असतो काही अंतरावर. आपल्याला तशी एका अर्थाने ( आणि एकाच अर्थाने )खात्री असते,की आज तरी आपण मरणार नाहीत- खात्री नाही,आपला हिशोब म्हणा. मग आज जे आपण अस्वस्थ झालो असतो,ते आयुष्यातल्या असंख्य विवंचना,काळज्या,चिंतांनी. हा सगळा कोलाहल शरीर-मनात उद्भवतो. आपण हतबल होतो, हे सगळे त्रास संपून जायची इच्छा करतो अन शेवटी मृत्यूचाच आधार घेतो-
ये सब झगडे हैं जाने-नातवां तक ( जाने-नातवां : दुबळ्या जीवाचं अस्तित्त्व)
रहेगा दम कहां तक,गम कहां तक
( हे दु:खांनो-)मला तुम्ही त्रास देता नं,द्या. केव्हापर्यंत तुम्ही मला त्रास द्याल…या दूर्बळ जीवाच्या अंतापर्यंतच ना?
…एकदा का दम निघून गेला, तर गम राहिलच कुठे…
Please visit :http://hasanyachaaakar.wordpress.com/
sir aap ki urdu dosti ne hamhe bahot mutasir kiya hai .
bhausaheb patankar yanchi mrutyuvar surekh marathi shayari aahe. ata ek sher aathavto. .janmabhar tond maze navhate kadhi me lapavile, melyavari sampurna tyanni vastraat majalaa zaakale, aalaa asaa raag ,kaahich pan kartaa na ye, hoti amhaa jaaneev me melo ataa bolu naye..