‘साहिर’ लुधियानवी आणि ‘शकील’बदायुनी. उर्दू भाषेतले हे उत्तम कवी,साहित्त्यिक. मग ते सिनेसृष्टीत आले. सिमेमांसाठी त्यांनी गाणी लिहिली. असं गाणं लिहिताना, शायरपेक्षा थोडी वेगळी तबियत पाहिजे असते, ती त्यांनी आत्मसात केली. प्रसंगानुरुप, संगीत-चालीच्या अनुरूप शब्द रचना करताना, त्यांच्यातला शायर थोडा नाराजही होत असावा, त्याला गंमतही वाटली असावी.
सिनेमात मुजरा हा गाण्याचा प्रकार लोकप्रिय असतो. कोठीवर नायक आलेला असतो,नशेत असतो, त्या नशेत त्याला संसाराच्या विवंचना,अपराधी भावना अधिक भडक तर्हेने जाणवत असतात. आणि याच भडक संवेदनांना घेवून मुजर्याची शब्द रचना-संगीत रचना आयोजीत केलेली असते. आयुष्यातल्य़ा सुख दु:खाचा तो एक बाजारच मांडलेला असतो- रंजनाच्या,करमणुकीच्या रुपात.
आता आयुष्याबद्द्ल भाष्य करायचं तर असतं,पण ते कवितेच्या-नज्मच्या स्वरूपात न करता त्याला सादरीकरणाचं रूप द्यायचं असतं. अशावेळेस जातीवंत शायरला शब्दांची एकप्रकारची नशा चढते आणि तो व्यक्त होतो. एका अर्थाने सांगायचं झाल्यास सुख दु:खाचा झणझणीत रस्सा असलेलं हे गाणं असतं. सारंगी आणि तबल्याचा ठेका ही वाद्यं तर त्या तवायफसोबत असणार्या गडीमाणसांसारखी असतात. सुख दु:खाला सहमतीची, होकार-नकाराची संगत करणारी ही वाद्यं म्हणजे मुजर्याचे जीव प्राण.
‘गंगा जमुना’मध्ये शकीलने ‘माणूस’कसा धोकेबाज असतो, ते सांगितलं आहे-
जहां मे हो जिसे जीना, वो तुझसे दूर रहे,
जो मरना चाहे, वो आकर तेरे हुजूर रहे
आणि ‘बहूबेगम’मधल्या मुजर्यातली ही आर्तता पहा-
बरबादे वफा का अफसाना,हम किससे कहें और कैसे कहे
खामोश है लब, और दुनिया को अश्कों की जुबां मालूम नही
एवढं असलं तरी आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य लाभलेलं असतं या मुजर्याला-
मनात तीव्रतेने दाटून आलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी जोरदार तरीकाच हवा असतो. त्याच सोबत त्या दु:खाकडे हसून पहायची बेमुर्वत धुंदी.
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com
प्रतिक्रिया व्यक्त करा