माणसाचे बाहू म्हणजे त्याच्या कर्तृत्त्वाचे मह्त्त्वाचे साधन. या बाहूंचं बळ ( जोरे-बाजू) माणसाला,त्याचं ध्येय मिळवून देतं; यश मिळवून देतं. पण हे जे बाहू असतात-जोमदार बैलांसारखे, त्यांना सावरणारा ,हांकणारा गाडीवान तेवढाच जोमदार हवा. मनच भक्कम नसेल तर बाहूंकडे हात चोळण्याशिवाय दुसरं काय रहाणार ? एखादे संकट आले-अडचणींच्या पिंजर्यात कधी आपण बंदिस्त झालेलो असतो; तेव्हा जोरे-दिल,जोरे-बाजू व्यवस्थितरित्या कार्यरत राहिले नाहीत तर आयुष्य कठीण होवून बसतं. माणूस पायाने कमी चालतो,मनाने जादा. बंदिस्त(सवयीचा?) माणूस तर स्वातंत्र्याच्या अफाट कल्पना करतो. विजयाच्या-उन्मादांच्या भावनांनी बेभान होतो, पण बसल्या बसल्याच. बसून केलेली अशी बगावत (बंड) निष्प्रभ असते.
खामोश बगावत से कटती नही जंजीरे
जुगनू से शबिस्तां का जादू कभी टूटा नही ( शबिस्तां : रात्री रहाण्याचे ठिकाण, शयनागार)
इथं,आपल्या मर्यादेच्या विचारांत एकदा का गुंतून पडलं,की आपल्या क्षमतांचा विसर पडत जातो. मागे पुढे पहाणे,काल्पनीक पराभवाच्या शंकेने मग नशिबाला दोष लावणे, तक्रार करणे-प्रार्थना करणे या चक्रात माणूस सापडतो.मान्य आहे संकट कठीण आहे ; पण त्याबद्दल तक्रार करायच्या ऎवजी जरा प्रयत्न करून पहा .आपल्या बाहूतलं बळ काय,हे तर आजमावून पहा गड्या-
जोरे-बाजू आजमां,शिकवा न कर सय्याद से
आज तक कोई कफस टूटा नही फर्याद से
मग या मन:स्थितीच्या-परिस्थितीच्या रेट्यातून असे काही क्षण येतात,त्यावेळी आपले बाहू फुरफुरतात ( पराभव-अन्यायाच्या कल्पनेत केलेल्या विचारांचा दाह असह्य होवू लागला तेव्हा) मग आपल्याकडून प्रयत्न केले जातात.या प्रयत्न-संघर्षात एक नाजूक वेळ येते. क्षणिक पराभवाची. जोरदार शत्रूला मारलेली धडक-पहिलीच धडक कामियाब कशी होईल ? फक्त छन्न ! आवाज होईल-हातोडा मागेच उचलला जाईल. पण इथे, ‘जमत नाही गड्या’असं म्हणणं मूर्खपणाचं नाही का? अहो,बंदूकीची प्रत्येक गोळी,धनुष्याचा प्रत्येक बाण हा लक्ष्याला लागावाच असा आग्रह धरणं,तो नाही लागला तर आयुध फेकून देणं… आततायीपणाचं नाही का ?
ये लाजमी नही के सभी तीर हो खता
फेंकी है अपने हाथ से तू ने कमान क्यूं
please visit another blog : http://hasanyachaaakar.wordpress.com/
प्रतिक्रिया व्यक्त करा