हम अपने अहद की खुशियां खरीदते कैसे
हमारे पास पुरानी सदी के सिक्के थे
( अहद : क़ाळ,कारकीर्द, सत्ता )
हा शे’र वाचण्यात आला आणि सुरूवातीला सर्वसाधारणपणे शे’रचा मोह ज्या कारणामुळे पडतो, त्याच कारणामुळे या शे’रचा मोह पडला.’अहद’ – वर्तमान आणि ‘पुरानी सदी’ या परस्पर विरोधी शब्दांचा संकोच (स्पार्किंग?) हे ते कारण. पुढे अर्थाच्या नादाला लागलो.आजच्या जमान्यातली खुशी -आनंद आम्हाला खरेदी कसे करता येणार…आमच्या हाती तर जुन्या जमान्यातली-आता बाद झालेली नाणी आहेत.
म्हणजे, आज काळ बदलला आहे.रिती-रीवाज,मान-अपमान,सभ्यता,रहन सहन याबाबत सगळेच नियम,संकेत -ते मागचे,राहिले नाहीत. किंवा ते एवढ्या झपाट्याने बदललेले आहेत,की कालची गोष्ट आज जुनी झालीय.रद्द झालीय. आज तुम्हाला जगायला हवं, तर आजचंच चलन हवंय,नाही का? (‘नाही का?’ असं आपण म्हणतो-‘जुन्या नाणी’ वाले; आजचे लोक विचारतात-‘माहिताय का?’ )
तर गडबड अशी झाली आहे, की मागच्या पिढीला ही जाणिव झाली आहे,की आमच्याकडे आमच्या पिढीच्या संवेदना आहेत;त्या संवेदना घेवून आम्ही आनंदाची खरेदी करण्यासाठी आजच्या पिढीच्या बाजारात फिरलो आणि हात हलवीत परतलो. आज ती उत्कटता नाही, ती सवड नाही,त्या संवेदना नाहीत,श्रध्दा नाहीत. म्हणून आम्हाला खुशियां लाभल्या नाहीत.
पण गंमत अशी,की तुम्हाला खुशियां पाहिजे असतील तर तुम्ही आजच्या युगानुसार तुम्हाला दुरूस्त करून घ्यावं नाही का लागणार ? जुनी नाणी ‘एक्स्चेंज’ करून रूपांतरीत करून घ्यायला काय हरकत आहे ? आपला ताठा आणि हट्ट सोडला,तर आजच्या युगातल्या आनंदाचे क्षण आपल्याला स्वस्तात मिळतील.
पण आणखी एक गंमत अशी आहे, की ‘पुरानी सदी के सिक्के’, जे आपण मनात बाळगतो, ती नेमकी कोणती सदी असते? आपल्याकडे खरेदीसाठी जी नाणी आहेत, त्याचा नेमका कोणता ‘जमाना’ असतो?
आपल्यापुरतं सांगायचं झालं, तर आपल्याच वयाची ही सदी असते. आपलं वय काय असतं- सत्तर एक वर्षं. तर ही जाणिव वयाच्या अंतीम ट्प्प्याला थोडीच होते- ती होते अर्धं वय ओसरल्यावर; म्हणजे, पन्नाशीला आल्यावर. त्यातून ‘नासमझीची’ पंचवीस वर्षं काढली, तर किती उरणार- पंचवीस. मग ते तर वय ‘चालू’ असतं, ‘काळ’ ही चालू असतो. आपण त्या काळातली नाणी घेवून त्याच काळातल्या खुशियां खरीदलेल्याही असतात; मग ती पंचवीस वर्षंही वजा केल्यावर पुरानी सदी ही कुठे रहाते? नेमकी कोणती सदी म्हणावी ही ?
मला वाटतं,ही पुरानी सदी म्हणजे, मनातले आपले पूर्वगृह; आपण बाळ्गून असलेले संकल्प,अपेक्षा, इच्छा- आपल्या,अशा. या बाळगलेल्या भावना,या संवेदनांची नाणी घेवून आपण आज बाहेर जातो आणि पूर्वगृह बाळगून वावरणार्या माणसाच्या वाट्याला काय येतं ? त्याच्या चेहर्यावर कधी हसू नसतं- तणाव असतो, हा तर सार्वत्रीक अनुभव असतो. अपेक्षा ठेवून वागणार्या-बोलणार्या माणसाचे व्यवहार शेअर्सच्या गुंतवणूकीइतकेच जोखिमीचे !
बद्द झालेली नाणी आणि (पूर्वगृहांनी) बध्द झालेलं मन अशा मनाला ‘खुशियां’ बहाल होणं अशक्य असतं.
जुनी पिढी-नवी पिढी नाते संबंधातले व्यवहार यामुळेच फायद्याचे रहात नाहीत.
….कधी बाजारात,कधी समारंभात,कधी एखाद्या छायाचित्रात किंवा जाहिरातीत एखादा हसरा वृध्द दिसतो… मुलांसोबत,सुनांसोबत;नातवांसोबत -नातेवाईकांसोबत तो हसत असतो,बोलत असतो. त्याच्याकडे पाहून असं वाटतं, की त्या वृध्दाला ही खुशी लाभली आहे-तो आपल्याला सांगत आहे,
पुरानी सदी के सिक्के लेकर हमने
अपने अहद की खुशियां संवार ली है
please visit another blog : http://hasanyachaaakar.wordpress.com/
Tumacha ‘Ahad ki khushiyan’ ha lekh vachoon sukhavalo. Mala vachtaana Dr. Ompraksh Rathore yanchi Khote sikkon ka mureed’ ya kaviteteel olee athwalya. Kavi mhanto’Muze khote dekar log fasane ki kosheesh karte hain ;main vo sikke le leta hoon kyon ke muze pata hai ke khote sikkon ka bhi jamana aayega.
R.K. Deshpande
Now at PUNE
वाह !
छान!
जुनी नाणी ’एक्स्चेंज’ करून रूपांतरीत करून घ्यायला काय हरकत आहे ?
ही कल्पना आवडली.
यातली आणखी एक गंमत अशी की जुनी नाणी घेऊन आजच्या पिढीच्या बाजारात फिरलो, आनंद खरेदी करता आला नाही म्हणून ती नाणी चालली नाहीत असं नाही तर त्या नाण्यांच्या बदल्यात दु:ख, निराशा, अपेक्षाभंग असं काहीतरी मिळालंच ना? ते हवं होतं की नाही हा प्रश्नच नाही. तुमच्याकडे नाणी (जुनी वा नवी) असतील तर आपोआप कशाचीतरी खरेदी होणार!
Surekh! Absolutely new dimension. Thanks.