एकदा माणसाच्या लोभीपणाबद्दल बोलताना,मित्र वैतागाने सांगत होता-‘अरे,माणसाचं काही खरं नाही. बेडवर अगदी मरायला टेकला असला, अन समजा फर्शीवर चिल्लर पडली,
तर पटकन उठून पाहील-कुणाचे पैसे पडले!’
ही माणसाची अत्यंत स्वाभावीक प्रकृती. ती लोभीवृत्ती असेलच असे नाही. मात्र एवढे खरे,की काही हातचं सुटू नये, नुकसान होवू नये, लाभाचेच व्यवहार असावेत अशी त्याची आणखी एक स्वाभावीक तबीयत. पैसे पडल्यावर पटकन पाहणं (आपले तर नाही पडले?),हा मनापेक्षा शरीराच्या सवयीचा भाग म्हणता येईल- तोंडासमोर अचानक आवाज झाल्यावर पापण्यांची उघडझाप व्हावी तसा. पण फायदा हुंगणार्यांचं तसं नसतं. त्याचं सदैव लक्ष असतं लाभाकडे. प्रत्येक व्यवहारात,प्रत्येक कृतीत,कुणाशीही संबंध ठेवायचा झाल्यास त्याच्या मनाचा मुनीम आधी विचारतो- यातून तुला काय मिळणार आहे? विनाकारणच की…मग असा माणूस प्रेम कसं करणार ? कारण प्रेमात तर त्याच्या हिशोबाने नफा कमी (क़िंवा नफा नाहीच) अन गुंतवणूक तर केवढी- वेळेची, पैशाची, शरीर-मनाची !
‘फिराक’गोरखपुरीच असावेत बहूतेक; त्यांनी अशा माणसांना एक प्रश्नच विचारला आहे-
पूछते हैं,फायदा क्या इश्क से
पूछिए,क्या फायदे से फायदा
खरंच,प्रत्येक गोष्टीत लाभ शोधणार्याने असा कधी विचार केला असावा का,की लाभाचा काय लाभ असतो बरं… लाभ-हानीच्या विचाराने मनाला जो ओशटपणा आलेला असतो,त्यामुळे वेगळा विचार निसटून जात असतो. कळत नसतं. एकदा का हे मन स्वच्छ होवून गेलं तरच ते सगळं-ते सगळे व्यवहार शुभ्र होतात. नफा-नुकसानीपेक्षा वेगळं असं काही व्यवहारात असतं हे कळायला लागतं. केव्हा –प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येतेच येते. सुख-दु:खाचे अनुभव घेवून त्यातून निवृत्त होताना मनाची उभारी तर असते,पण त्या तशा भावना काहीशा बालिश वाटत असतात. (कारण सुख-दु:ख असं ज्याला तो म्हणत आलेला होता,ते फारच जुजबी होतं,किंवा फार जुजबी लाभ-हानीच्या मुद्द्यांत आपण जीव गुंतविला होता,हे त्याच्या ध्यानात यायला यायला लागलेलं असतं)
अशा माणसाच्या मनात मग सकाळचं सोनेरी उन ओसरीवर पडावं तसा विचार येवून जातो-
हर चीज का खोना भी बडी दौलत है
बेफिकीरी से सोना भी बडी दौलत है
पैशाच्या साठ्यावर लक्ष असलं,तर साठा होतो पण मनाची एक बाजू बधीर` होवून जाते;ती म्हणजे संवेदनेची. अशा माणसाचा आवाजच मोठा होवून बसलेला असतो. मग असा माणूस सहानुभुती दाखवितो तेव्हा, मदत करतो तेव्हा ‘मी करतो’चा तो आवाज असतो. आस्था,संवेदना,सह-अनुभुती,संवाद असं काही जर माणसात राहिलं नाही,तर ,मग आर्थिक सुबत्ता काय कामाची? आपले आडाखे नेहमी बरोब्ररच असायला पाहिजेत, आपल्याला नुकसान शक्यच नाही असं वाटणार्यााला नियतीचा विसर पडलेला असतो. कलावंताला अशा ‘फायदेदार’माणसाची करूणा वटत असते.मग तो कलावंत अशा माणसासाठी ईश्वराला साकडं घालतो-
दो और दो का मेल हमेशा चार कहां होता है
सोच समझ वालों को थोडी नादानी दे मौला…
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com
प्रतिक्रिया व्यक्त करा