Reality is an illusion,caused by deficiency of alcohol असं ज्या सदगृहस्थानं म्हटलं आहे, (सदगृहस्थच असावा तो!) ते नेमकं केव्हा बरं म्हटलं असावं… बरोबरय, ‘नशा’ उताराला लागल्यावरच त्याला वास्तवाचे असे भान आले असावे. विचार आणि धुंदी-परस्पर विरोधातल्या या बाबी माणसाच्या मनात सदैव मुक्कामाला असणं..किती मजेदार असतो हा शेजार.
घुंदीमध्ये जे जाणवतं, ते विचार केल्यावर ( भानावर आल्यावर ) खलास झालेलं असतं. आणि ‘शहाणपणा’त जे कळालेलं असतं, ते धुंदीत लक्षात रहात नाही किंवा पटत तरी नसतं. अशावेळी माणसाला वास्तव म्हणजे काय याचं नेमकं उत्तर कसं मिळावं… आणि सौंदर्याच्या संदर्भात, प्रेमाच्या संदर्भात तर हा प्रश्न अधीक गहिरा होवून जातो. जे दिसत असतं, त्याने नशा येत असते,धुंदी येत असते हे जसं खरं तसंच,जे दिसत असतं, त्यावर विचार करायला गेलं, तर भारावून जाण्यासारखं त्यात काही नसतं, हा निर्णय होत असतो. एका शायरने म्हटलं आहे-
सोचिये तो हुस्न का फिर कुछ नही
देखिए और देखते रह जाईए..
सौंदर्याची अनुभुती ही धुंदीत अधिक होते, का भानावर अधिक होते. धुंदीतच. धुंदीतच माणसाला सौंदर्याचे अनेक विभ्रम जाणवत असतात. विचार करायला गेलं, भानावर राहून पाहिलं तर साबणाचा इंद्रधनुष्यी फुगा असतो तो, हे लक्षात येवून जातं.
उर्दू शायरीत गुल आणि बुलबुलचं प्रेम मशहूर आहे. त्यांच्या प्रेमाची अनेक उदाहरणं,हवाले नेहमी दिले जातात. बुलबुल हा पक्षी फुलावर प्रेम करतो. तो फुलावर बसून असतो, त्याच्याशिच हितगूज करीत असतो, त्याचं प्रेम हे खरं प्रेम,उदात्त प्रेम असं सगळेजण म्हणतात,त्याचा गौरव करतात.
-पण या अशा प्रेमाबद्दल खुद्द त्या गुलचं(फुलाचं) काय म्हणणं आहे, हे कुणी तपासलं आहे का… हो, मिर्झा गालिबने ही उलट तपासणी केली आणि त्याला जे जाणवलं, ते त्याने असं मांडलं..
बुलबुल के कारोबार पे है खंदा: हाए-गुल
कहते है जिसे इश्क, खलल है दिमाग का
बुलबुलच्या त्या तशा वर्तनाची फुल चक्क थट्टा-टिंगल ( खंदा: हाए-गुल ) करीत असतं; त्याचं म्हणणं असं, की ज्याला प्रेम प्रेम म्हणतात ते प्रेम नाही, चक्क विकृती असते हो !
पहा, जिच्यावर दिलो-जान कुर्बान केली तिने म्हणावं ही विकृती ( खलल ) आहे !
मग प्रेम कशाला म्हणतात ? वास्तव कशाला म्हणतात ? अन ते असतं नेमकं कुठे- इकडे का तिकडे ?
के एल सैगलने गायलेल्या गजल वेगळा अनुभव देवून जातात. काव्यातल्या भावना शायरच्या वत्तीने सैगल गावून दाखवितो.मिर्जा गालिबची एक गजल सैगलने गायली आहे,त्यात वास्तवाचं नको असं भान तर आलेलं आहे;पण त्या वास्तवालाही मोठ्या समजूतीने त्याने स्विकृती दिली आहे-
वो बादा-ए-शबाना की सरमस्तियां कहां
उठीए बस अब के लज्जत-ए-ख्वाब-ए-सहर गयी
लज्जत-ए-ख्वाब-ए-सहर…. सकाळच्या स्वप्नांची लज्जत;अन ती ही रात्रीच्या नशेचा असर असताना, वा! पण आता उठायची वेळ झालेली आहे.वास्तवात दाखल व्हायची वेळ …
चला,उठू या !
( जाता जाता: गालिबचा हा शे’र केवळ रात्र आणि सकाळ,नशाबाजीपुरता मर्यादित नाही. बहादुरशहा ‘जफर’चा तो काळ होता;मुघलांच्या वैभवाचा तो सरता काळ-सरलेलाच काळ. ते वैभव,ते दिवस, ती सरमस्तियां आणि आता हे भयाण वास्तव…)
Please visit –
http://hasanyachaaakar.wordpress.com/
प्रतिक्रिया व्यक्त करा