दाट हिवाचे दिवस असतात. सोनेरी,कोवळं अन् उष्ण असं उन पडलेलं तर असतं,पण हातापाय़ांची घडवंची आवळलेली असते. मान आखडून घेतलेली असते. समोरच्या उन्हात हिरवळीवर वावरणारं मांजर पाहून असं वाटतं, मांजर होवूनच रहावं.बाग़डावं.
माणसाच्या मनात असं मांजर असतंच. सभ्यपणा, संकेत-संस्कृतीने आवळून बसलेले आपण; अशावेळेस मनात उद् भवणार्या व्रात्य-चावट-बालिश विचारांचं ते मांजर मात्र लबाडीच्या हिरवळीवर मस्त उन खात असतं, बागडत असतं. अर्थात ‘बाहेरच्या’ वर्दळीची चाहूल आली आली, (-बरेवाईटपणाच्या विचारांची,फजीती-बदनामी-आक्षेप यांची ती वर्दळ ) की, ते मांजर बावरून जातं. पळून जातं.
मिर्झा असदुल्ला खां ‘ गालिब’, याने आपल्या मनात तसं मांजर पाळलेलं होतं. आपल्याही मनात अशा प्रकारचं मांजर असतंच; पण आपला कल त्याला-‘छीर ! ‘ म्हणून ओरडण्याकडेच जादा असतो !
सुरेख,तरल आणि व्रात्य-चावट अशा हलक्या विचारांचं ते गुबगुबीत मांजर, हलक्याश्या तरल अशा विनोदवृतीसहीत पाळावं लागतं. त्या तशा अद्भुत वृत्तीचा गालिब हा हकदार होता. रास्त हकदार.
आता व्रात्य विचार ;आणि तो ‘ तिच्या ‘ बद्दल असू नये असं कसं शक्य आहे ? आपल्या बायकोबद्द्ल थोडंच कुणी व्रात्त्य होतं ? हे चांगलं नाही,-वाह्यात आहे, अशा साखळीला झुगारण्याची धडपड तर मजेशीर असते नं…मग विचारात रमून लबाडीच्या त्या हिरवळीवर चावटपणाचं उन चाखायला काय हरकत आहे ? मनातल्या मनातच हे वावरणं असल्याने, कुणी पहातही नसतं की…
झोपलेल्या आपल्या प्रेयसीकडे पहाताना, कुणाच्या मनात काय विचार येतील,सांगता येत नाही ; पण गालिबचा ‘ सभ्य व्रात्यपणा ‘ एवढा मजेशीर आहे, की आपणही लबाड होवून जातो –
ले तो लूं सोते में उसके पांव का बोसा मगर
ऎसी बातों से वो काफिर बद् गुमां हो जाएगा
ती झोपलेली आहे..अशावेळेस तिच्या सुरेख पावलांवर ओठ टेकवायची ( बोसा ) अनावर इच्छा होते आहे… पण त्यामुळे तिचा गैरसमज ( बद् गुमा ) होईल की काय याची भितीसुध्दा वाटते आहे. लबाडीचं हे एक लक्षण- हिंमत होत नसते !
हा लोभ. मनाला अनावरही करीत असतो. बेशरमही करतो आणि त्याच बरोबर शर्मिंदगीसुध्दा होत रहाते. पण गंमत पहा- तिने आता कूस बदललेली आहे. तो तिथे जवळच बसलेला आहे, याची तिला कल्पनाही आहे. आणि ( बहूतेक अर्धवट झोपेत, थोडं कण्ह्त – थोडं छान वाटण्यासाठी ) तिने त्याला आपले हात पाय दाबून देण्यासाठी सांगितलं आणि गालिबच्या मनातलं ते मांजर हिरवळीवर चक्क बाग़डू लागलं की !
‘ असद ‘ खुशी से मेरे हाथ पांव फूल गए
कहा जो उसने, मेरे हाथ पांव दाब तो दे
(आपल्या काव्यात गालिबने आपलं नाव तीन वापरलं आहे- ‘असद ‘ ‘ असदुल्ला खां ‘ आणि ‘ गालिब ‘)
पण ही जी आहे, तिला आपण म्हणतो त्याची प्रेयसी ; गालिबलाही ती आपली प्रेयसी आहे – असावी असं वाटत आहे ; पण ( हात पाय दाबून देण्याच्या ) पुढे प्रेमाची गाडी जाईच ना झालीय की ! तिच्याबद्दलच्या प्रेमाचा इजहार केव्हा करावा- आता की उद्या,करावाच की नाही…आणि लबाड विचारांच्या संगतीने आत्मविश्वास डळमळलेला असल्याने,गालिब सांगतो-
काम उससे आं पडा है, के जिस का जहान में
लेवे न कोई नाम, ‘सितमगर’ कहे बगैर !
सगळा इलाखाच तिला निष्ठूर म्हणून ओळखतो ( सुंदर पोरीच निष्ठूर का असतात बरं ? ) कुणाचीच गय न करणारी, सडेतोड, तापट, रागीट वगैरे वगैरे ती आहे, अशी तिची प्रसिध्दी अन् ( आता काय करावं बुवा ! ) आपलं ‘ काम ‘ तर तिच्याशीच पडलं आहे की. अशा मांजरीच्या गळ्यात प्रेमाची घंटा बांधायची आणि तीही आपल्यालाच .( सितमगर : जुलूम करणारा, अत्त्याचारी ) पण मनात लबाडीचं मांजर पाळणारा गालिब कमालीचा सभ्य आहे. आपल्या मर्यदा-संस्कृतीच्या बंधनाला तो ओलांडणारा नाही. चावटपणा-वाह्यातपणा त्याने कधीही केला नाही.
मग… मग काय ! सुंदर झाली-निष्ठूर असली म्हणून काय झालं, केव्हातरी तिचं डोकं ठिकाणावर येतंच. तिला प्रेमाची महती कळते. खर्या प्रेमाची. गाढ अशा भक्त्तीची. आणि ती खुश होते. एवढी, की काय पाहिजे ते माग, एवढं असं ( ओपन ! ) त्याला सांगून टाकते !
पण गंमत पहा- गालिबच्या मनातलं ते लबाड मांजर पुन्हा उसळी घेतं. लोभ अनावर झालेला असतो अन् अशा वेळी जे पाहिजे ते सगळंच मिळाल्यावर आता केवढा आनंद व्हायला पाहिजे ! पण लबाडीचं गणित मोठं फसवं असतं. आता ‘ मागायला ‘ काहीच शिल्लक नाही याची ‘ शरमिंदगी ‘ बाळगून ते मन मग वावरत असतं. ( भ्रष्ट माणसाला पाहिजे तेवढे पैसे ताबडतोब दिले,तर त्याचाही चेहरा असाच होत असावा ! )
दोनों जहान दे के वो समझे ये खुश रहा
यां आ पडी ये शर्म की तकरार क्या करें
हा शे’र जेवढा प्रेयसी साठी लागू आहे, तेवढाच ईश्वरासाठी-ईश्वरभक्ती च्या संदर्भात लागू आहे. उत्तम काव्याचं हे लक्षण आहे.
तेव्हा आपल्या मनातल्या त्या मांजराला बागडण्यासाठी आपण लबाडीची हिरवळ राखून ठेवायला काय हरकत आहे..( राखून- म्हणजे ‘मेंटेन ‘की ‘ रिझर्व्ह ‘ हे ज्या त्या लबाडाने ठरवायचे ! )
आपल्यातल्या अंतर्गत विनोदवृत्तीला चेतवीत ठेवणारी ती सवय- स्वत:ची, स्वत:साठीच.
Peculiar Ghalib at his best again… really fantastic…
खूपच छान!!
wah.Farach chhan.