मध्यमवर्गिय आर्थिक स्थिती- तीही दारिद्र्याकडे झुकणारी असणं फार वाईट. कुटुंब प्रमुखाला या परिस्थितीत संसाराचा गाडा ओढ्णं म्हणजे सर्कसच.हो, सर्कसच म्हणावी लागणार. कारण परिश्रम करा, महिनाभर घर चालवून दाखवायची कमाल करा आणि जी कुतरओढ होते, त्याचं हसू इतरांसाठी. कुटंबप्रमुख हा एकटा असा पडतो. त्याला साथ असते- तीही फक्त घरापुरती, ती म्हणजे त्याच्या बायकोची. दोघंही मिळून संसाराचा गाडा ओढत असतात.. विवंचना अडचाणींचा तो खडतर मार्ग- संसाराचा.
सगळं नाटक करता येतं, मात्र पैशाचा अभाव असला तर.. तर मग ते दु:ख कुणाला सांगताही येत नाही… बोलताही येत नाही. आर्थिक ओढग्रस्तीच्या या दिवसांत समज न आलेली घरातली मुलं- त्यांना या वातवरणाची कुठली जाणिव असणार ? त्यांच्या त्या बालसुलभ अपेक्षा, आपल्या आईवडिलांजवळ त्यांनी केलेला तो हट्ट..काही तरी घेवून देण्यासाठी,आणून देण्यासाठीचा त्यांचा आग्रह..
आणि त्यांना आपण काही घेवून देवू शकत नाही, त्यांचा साधा हट्ट पुरवू शकत नाही, हा विचार मात्र आईबापाला दिवस रात्र अस्वस्थ करून टाकीत असतो-
मिट्टी के खिलौने भी सस्ते न थे मेले में
घर आके बहोत रोए, मां-बाप अकेले में..
दिवस थांबून रहात नसतात. संसाराचा गाडा खडखडाट करीत का होईना, पुढे जात असतो.आता दिवस बरे आलेले असतात. वाटचाल बर्यापैकी चालू असते. श्रमाच्या प्रमाणात थोडी विश्रांतीही लाभत असते. पुढचंही दिसत असतं-पोरांचं कर्तृत्त्व , पोरींची लग्नं, नातवंडं.. पण ते सगळं थोड्या अंतरावर असतं.
या प्रवासात एक घाट रस्ता येतो. मुलं मोठी झालेली असतात, पण नोकरी व्यवसायाला लागायची असतात. पोरगी मोठी झाली असते,पण तिचं लग्न व्हायचं असतं, ती जबाबदारी झोपू देत नसते. आणि हा कुटुंब प्रमुख- आता शरीर थकत चाललेलं असतं, सेवा निवृत्तीची वेळ जवळ आलेली असते.. आणि मुलांच्या शिक्षणाचा वाढ्लेला ख्रर्च, मुलीच्या लग्नासाठीची आर्थिक तरतूद.. विवंचना शिगेला पोंचलेल्या असतात.
पुढे दिवस बदलतात, चांगले येतात.हळू हळू शक्ती भरत जावी तसं आर्थिक सुबत्ता येत जाते- पण ती पुढे; काही दिवसांनंतर, महिन्यांनंतर, कदाचित वर्षांनंतर. पण – पण त्या,त्या घाटाच्या दरम्यान, श्रमात बुडालेल्या त्या कुटुंब प्रमुखाला वयाचं, संपत आलेल्या नोकरीचं कसलंच कारण सांगता येत नसतं. त्याला चालतच रहावं लागतं…
मुझे थकने नही देता ये जरूरतों का पहाड
..मेरे बच्चे ,मुझे बूढा नही होने देते…
… मला आठवतात,माझ्या लग्नापूर्वीचे आमच्या घरचे ते दिवस, नोकरी नसलेले,बेरोजगारीचे. आज पोराच्या कारमध्ये पाऊल ठेवताना आठवते, वडिलांची, ती अंगठा दुरूस्त करून आणलेली चप्पल. आईला तर कित्येक वर्षं चप्पलच माहित नव्हती. ती सांगायची, लग्नात घेतलेली चप्पल कुठे देवळात दर्शनाला गेलं, तेव्हा हरवली. मग चप्पलच नाही. पुढे, रबराच्या चपला आल्या- तशा चपला घेतल्या, तरी त्या कुठेतरी विसरून जात. मग आईला बोलणी खावी लागायची. मग त्यानंतर तिनं चप्पल वापरलीच नाही… नोकरी संपण्यापूर्वी हाताला आलेला-कमावू लागलेला मुलगा मदतीला यावा,हे भाग्य. पण तसं झालं नाही, तर ती तगमग अस्वस्थ करणारी असते. ..आमचे, शिगेला पोचलेल्या विवंचनेचे ते दिवस आणि आमचे वडिल.. आजही आठवत रहातात, आणि आजची निकड म्हणजे चंगळ वाटत रहाते…
धोंडू मोकाशी. एक उमद्या प्रकृतीचा गृहस्थ. कवी, साहित्यिक , संगिताचा रसिक म्हणून तालुक्यात नाव कमावलेला. पण लग्नाची मुलगी, बेरोजगार तरूण मुलं अन् तुटपुंजी शेतीवाडी. काय वाटत असावं त्याच्या मनाला, हा संसार ओढताना.. अन् त्यातही ती निर्मिती प्रक्रियेची धुंदी, जिल्हा स्तरीय वर्तमान पत्र, मासिकात येणार्या त्यांच्या कविता, लेख.. ( त्यांच्या बोलण्यात महत्त्वाचं असायचं, ते नाव .’त्यात माझं नाव आलंय, माझी कविता आलीय.. ‘ ) मग त्या जुन्या पेटीतून वर्तमान पत्रांतली ,मासिकातली प्रसिध्द झालेल्या साहित्याची कात्रणं ते दाखवायचे…डिंकाने चिकटवून ठेवलेल्या कात्रणांची वही- फुगलेली, जिर्णतेचा रंग ( मोठा अशूभ वाटतो ) ,हे सगळं दाखविताना, त्यांच्या चेहर्यावर कमालीच्या संवेदना जाग्या व्हायच्या. खुशीचा तो चेहरा… पण घरात पंखा नसल्याने, कपाळावरचा घाम टिपत, पंचाने उघड्या अंगाला वारा घालीत ते बोलायचे, तेव्हा त्यांच्या आवाजातला चढ उतार तिव्रतेने जाणवायचा. प्रसिध्दीची खुशी आणि – कसल्याही मानधनाविना सांभाळावी लागणारी ती कागदपत्रं…
गजल की दाद तो मैफिल में मिल गई लेकिन,
मैं अपने बच्चोंको घर जा के क्या खिलाऊंगा..
( माझीही , एक सदैव असणारी चुटपुट : या सगळ्या , मला नाव माहित नसलेल्या शायर लोकांनी माझ्यावर केवढे उपकार केले आहेत. हिरे, माणिक-मोती खिशात भरून घ्यावेत, तसे हे शे’र लहानपणापासून गोळा करीत आलो आहे.. त्या अनाम कलावंताना माझा सलाम… )
Please visit http://hasanyachaaakar.wordpress.com/
classic….
Thanks !
अकाली शहाणं व्हावं लागलेली मुलं (अशा वातावरणातली) हाही एक स्वतंत्र विषय होऊ शकेल.
शब्दांनी चिमटीत पकडलेल परिस्थितीच वर्णन मनाला चटका लाऊन जात