कलावंताला, व्यक्त होण्यासाठी त्याने निवडलेलं किंवा त्याने जोपासलेलं असं त्याचं एक माध्यम असतं. एखादा पक्षी स्वैर गात रहावा,तसा तो कलावंत आपल्या माध्यमातून सूर लावून असतो. कधी वाटतं, गवयाचं पोर सुरात रडतं, हे जे गमतीने म्हणतात,ते गंमत नसावी. पोराचं जावू द्या, कलावंताची-त्याची अशी तीव्रतर अनुभुती किंवा स्वत:चं असं जे काही प्रत्ययकारी असतं,ते सांगण्यासाठी ( नाही-जाणवण्यासाठी) त्याला त्याच्याच माध्यमाशिवाय पर्याय कुठे असतो ! काम करताना, गुणगुणावं, तसा तो कलावंत आपल्या विचारातच गुंतलेला असताना,त्याच्या माध्यमातून गुणगुणतोच. अनुभुतीचे क्षण कधी शे’र मधून रुपांतरीत होतात, अन मग तो शे’र जणू त्या कलावंताच्या त्या मन:स्थितीचा सुरेख असा फ्लॉवर पॉट होवून बसतो.
आगाह म्हणजे माहीतगार,जाणकार,सावधान असा. आगाही म्हणजे, पूर्वसूचना,जाणिव, परिचय. आणि आगही हा शब्द बहूतेक जाणिव, आत्मप्रचिती अशा अर्थानेच वापरला जात असावा. मिर्जा गालिबच्या एका गजलमध्ये मोठा सुरेख शे’र आहे-
अपनी हस्ती ही से हो,जो कुछ हो
आगही न सही, गफ्लत ही सही
एका संग्रहात या शे’रचे दोन अर्थ असे सांगितले आहेत : स्वत:ला जाणून घेणं किंवा स्वत:शीच गाफील रहाणं हे आपल्याच हिमतीवर व्हायला पाहिजे. दुसर्याची मदत नको. दुसरा अर्थ आहे, कुणाच्या सांगण्यावरून एखाद्या बद्दल मत बनविणं चुकीचं आहे. जो काही समज-गैरसमज होईल तो आपल्याचमुळे व्हावा, आपल्याच आकलनामुळे. त्याच्या वर छाप असावी ती आपलीच, दुसर्याची नको. गालिबचा हा शे’र वाचल्यावर तो आपल्या विचाराशी-स्वत:शी किती समरस होता हे लक्षात येतं. या संदर्भात इंग्रजीतलं एक कोटेशन किती समर्पक आहे पहा : when truth is discovered by someone else, it loses something of its attractiveness. गालिबचंही तर हेच म्हणणं आहे नं, वेडेपणा असू दे, पण तो मझाच हवा.
कृष्ण बिहारी ‘ नूर ‘ हा शायर असाच स्वत:च्य शोधात निघालेला असताना, त्याला त्याचं वेडही लागलं आणि त्याच्यात तो अगदी स्वैर तर्हेने गुंतून गेला आहे-
कभी जुनूं, तो कभी आगही में कैद हूं
मैं अपने जहन की आवारगी में कैद हूं. ( आवारगी : उनाडकी )
पण स्वत:चा शोध जेवढा गुंतवून टाकणारा असतो, तेवढाच गूढही असतो. या प्रवासात भान हरवण्याच्या वेळा जशा येतात, तसंच आत्मभान येवून जातं आणि वेगळी अशी जाणिव होते; एका शायरला ते लक्षात आलं आहे-
पिछे से खेंचता है कोई दामन बार बार
शायद कुछ आगे बढ गए, खुद आगही से हम
पण ही खुद आगही- स्वत:बद्दलची माहिती, आत्मप्रचिती, व्यापक अशी जाणिव काही चांगली नाही बुवा. कारण मग त्यावेळी काहीच प्रश्न शिल्लक रहात नाहीत. काहीतरी ग़ूढ अशी, मनाला गुंतवून टाकणारी ती नशाच हरवून जाते आणि मग कसा उथळपणा येतो. आपल्याला तशी खुद आगही आलेली नसल्याने त्यानंतरचा परीणाम आपण कसा सांगावा… पण शे’र मात्र अगदी उमदा आहे-
इस आगही से तो बेहतर था दौरे-बेखबरी
शुऊर आया तो, जेहनों पर छा गई पस्ती
( जेहन : बुध्दी, प्रतिभा,चित्त शुऊर : विवेक,तारत्म्य,सभ्यता पस्ती : उथळपणा, भ्याडपणा )
या जानिब-ए-मंजिल मध्ये सोलापूरचे मशहूर शाय्रर प्रा.ए.एम. कारीगर ‘ एजाज ‘ शामील झाले, दोस्त झाले. मोठ्या हौसेने त्यांनी मला मार्गदर्शन केलं. आगहीच्या संदर्भात एक लज्जतदार शे’र ऎकविला-
आगाह अपनी मौत से कोई बशर नही ( बशर : माणूस )
सामान सौ बरस का,पल की खबर नही
– ‘ जोश ‘ मलिहाबादी.
…. आपल्या मृत्यूची माहिती माणसाला नसते;मात्र शंभर वर्षांचे ‘प्रोग्रॅम’ ( बिझी ! ) त्याच्याकडे तयार असतात ! … क्षणात होत्याचं नव्हतं होवून जात असतं याची खबर त्याला नसते.
तर नसू द्या. ‘ एजाज ‘ सरांनी मोबाईलवर ऎकवलेला एक खुबसुरत शे’र मात्र मनात रेंगाळत होता…
अब इसे दिवानगी कहिए, के दिल की आगही
चुन लिया हमने उन्हे, सारा जहां रहने दिया
अपनी हस्ती ही से हो,जो कुछ हो
आगही न सही, गफ्लत ही सही
मस्त!
कुठलंही माध्यम वापरलं तरी कलावंताला खुणावणारी वाट, ’स्वत:चा शोध’ हीच आहे.
किंबहूना अंतिमत: त्याच्याशिवाय पर्याय नाही.