‘ गुमनाम ‘ मध्ये हैदराबादी महेमूदचं एक वाक्य आहे- ‘ अरे ! सारे जहां का मातम मेरीच मजार पे नक्को ! ‘
एके दिवशी एका मित्राच्या भेटीनंतर माझ्या मनात हा ‘ डायलॉग ‘ अचानक उद्भवला . मी माझ्याच काहीतरी विवंचनेत गुंतलेलो होतो; आणि त्याचवेळेस तो मित्र माझ्याकडे येवून त्याची काही तरी अडचण -विवंचना सांगू लागला. पण त्याचं ते दु:ख ऎकून घ्यायच्या मन:स्थितीत मी नव्हतो. मी माझ्याच काळजीत गुंतलेलो असताना, त्याचं ते सांगणं चालू होतं; अन् त्याच दरम्यान वैतागाने मला वाटून गेलं, छे ! मलाच का सांगतोय हा ! आणि त्याच वेळेस त्याचा विश्वासाचा चेहरा, सांगायची तळमळ जाणवू लागली. पण पुन्हा मनाने उचल खाल्ली- ‘ अरे, पण मलाच का ! ‘
– आणि महेमूदचा तो डायलॉग आठवला.विस्मृतीत गेलेला; पण फारच आवडलेला असल्याने कुठे तरी जपून राहिलेला.
आपले काही मित्र, नातेवाईक आपल्याला आवार्जून भेटत असतात. आपलं सुखद:ख आपल्याला सांगतात. त्यांना त्यांचं हे सगळं आपल्याला सांगायची निकड वाटत असते. आणि आपणसुध्दा मोठ्या जिव्हाळ्याने ते सगळं ऎकून घेत असतो.
पण कधी कधी ऎकणारा हा स्वत:च्याच विवंचनेत गुरफटलेला असल्याने, त्या विवंचनेच्या मन:स्थितीत समोरच्या माणसाची विवंचना उभी राहिली,की त्यातून मोठा वैतग उभा रहातो.! पण विवंचना सांगणार्याला असं चिडणं अपेक्षित नसतं. तो- म्हणजे आपण- सभ्य असल्याचा लौकीक असतो.; याची आपल्याला कल्पना असते. समोरचा माणूस विश्वासाने आपलं मन मोकळं करायला आला असतो. पण ,लोड शेडींगच्या दरम्यान गर्मीनं त्रस्त झाल्यासारख्या मन:स्थितीत आपण असतो. सभ्य असलो म्हणून काय झालं, आपल्याला स्पष्ट बोलता येत नसतं तसं. पण आपलं मन वैतागून म्हणतंच- ‘ अरे, पण मलाच का सांगतोस ? ‘
मातम म्हणजे शोक . मजार म्हणजे धार्मिक माणसाची समाधी. या मजारवर – दर्ग्यात माणसं मिन्नत बोलायला येतात. महत्त्वाचं म्हणजे, आपलं दु:ख,विवंचना मांडायला येत असतात. त्याच्यामुळे त्या माणसांची मनं हलकी होतात. बरं वाटत असतं. ती मजार , कृपाशील- दयावान अशा संताची असते.
पण इथे महेमूद वैतागाने बोलतो आहे. त्या बोलण्यातला अन् त्या विधानातला वैताग मोठा मजेशीर आहे. पुष्कळवेळा आपण एखाद्याला सभ्य समजतो; किंवा आपण सभ्य आहोत, अशी प्रतिमा काही जण करून घेतात. ही ‘ सभ्य ‘ माणसं आपली प्रतिमा जपण्यासाठी इतरांच्या सुख द:खात सहभागी होतात, संवाद साधतात. आणि दु:खातल्या माणसाला तर काय ! त्याचं दु: ख भळाभळा वाहात असतं. असा दु :खी माणूस जवळच्या ‘ सभ्य ‘ माणसाला गाठतो. सांगत रहातो. अशा प्रसंगाचा एक शे’र आहे-
मर रहे है आप, अपने गम में हम
गैर के मरने का मातम क्या करें ?
( अरे, तू मरतो आहेस,ठीक आहे; पण मी इथे माझ्याच दु:खात ,विवंचनेत आहे,अन् तुझं दु:ख काय करू – आं ! )
हा शे’र बहूतेक आपलं दु: ख व्यक्त करणार्या प्रियकराला त्याच्या प्रेयसीने ‘ खडसावलेला ‘ दिसतो. तिला सध्या प्रेम वगैरे बाबींपेक्षा व्यवहारातल्या इतर बाबीं महत्त्वाच्या वाटत असतील, नाही का- तबियत ठीक नसेल, वैयक्तिक-व्यक्तीगत अशा काही विवंचना असतील, ती प्रेयसी नापासही होवून बसलेली असेल, तिचं मन लागत नसेल कुठं,कदाचित तिचं मन ‘ कुठतरी’ लावण्या च्या प्रयत्नात तिला प्रतिसाद मिळत नसेल, त्या विवंचनेत ती असेल ( किंवा तिची दाढ ठणकत असेल- असंच असेल ! ) – थोड्या असतात का विवंचना माणसाला ! अन् अशा वेळी तो- तिचा प्रियकर म्हणविणारा- समोर बसून आपलं रडगाणं गात असावा – नेहमीचंच त्याचं सांगणं- तू नाही म्हणशील तर मी मरून जाईन ! ( अरे जा की ! इथं का डोकं खातोस माझं ? )
… किंवा असंही असेल, वैयक्तिक दु:खात, वेदनेच्या मन:स्थितीत इतरांचं दु:ख करायला सवडच कुठे असते ? असं होत असतं. असे अनुभव येत असतात. मजारवर आपलं दु:ख मोकळं केल्यावर आपल्याला हलकं वाटत असतं. का? कारण ती संत व्यक्ति , स्वत:चं दु:ख विसरून दुसर्याचं दु:ख जाणणारी असते.तिथे, त्या व्यक्तिला स्वत:च्या दु:खाचा संबध नसतो,दु:खाच्या पलिकडे गेलेल्या असतात अशा संत व्यक्ति.
मी तसा नव्हतो.. तसा असल्याचं दाखवीत होतो !
पण हे जे वाक्य आहे, महेमूदने म्हटलेलं- ती कदाचित म्हणही असेल; आणि त्यातून व्यक्त होतो, ‘ दु:ख ऎकणारा ‘ म्हणवून घेणार्या माणसातला क्षुल्लक माणूस- स्वत:च्याच दु:खाला प्राधान्य देणारा.
मात्र एवढं काही लां ब जायला नको. आपल्याला ते वाक्य ऎकून हसू येतं- हे कशामुळे येतं ? सभ्यपणाचा बुरखा बाजूला होवून चिडखोरपणा प्रकट झाल्याचं ते हसू.. दु:खाला टाळून पळण्याची त्याची घांदर ट वृत्ती जाहीर झाली, त्याचं ते हसू…
असाच एक शायर, त्याला त्याच्या प्रेयसीने कधी जुमानले नाही. शायरने धीर सोडला,प्राणही सोडला. मग काय ! ‘ शोरे-मातम ‘ उठला. ( हा शब्द आपल्याला ‘ कोहिनूर ‘ मधल्या – चलेंगे तीर जब दिल पर- मध्ये भेटला आहे. ; मृत्यूचा शोक , रडणं ) तर ती भेटायला आली आहे, अन् विचारते आहे- काय झालं ? कोण गेलं ? पहा, म्हणजे तिच्या करिता शायरने प्राण सोडला , अन तिला खबर नाही ! अन् मूर्खासारखं विचारते पुन्हा, कोण गेलं म्हणून ! वा ! शायरचा आत्मा ते ऎकून ओरडतो आहे-
अब मेरे रोने वालो, खुदारा जवाब दो ( खुदारा : कृपा करून )
वो बार बार पुछते है, कि कौन मर गया