..काही शब्द कधी अवचितपणे मनात रेंगळतात. त्यांना जवळ घ्यावं वाटतं. गोंजारावं वाटतं. लम्हा ( लमहे ) हा असाच शब्द. लिहिल्यानुसार त्याचा उच्चार करायच्या ऎवजी लमहा ( लमहे ) असं म्हटलं,की मोठं अल्हाददायक वाटतं.
..हे लमहे ,हे क्षण ..माणसाच्या इतके जवळ असतात- इतके जवळ की दिसू नये. सगळ्या कृती, सगळं वागणं-बोलणं क्षणांतच होत असतं.. बोलताना, बोलण्याच्या भरात क्षणांतच काही अद्वातद्वा बोलून जातं. मग त्याचा पश्चात्ताप होत रहातो. बरं, बोलणं हा काही ‘ स्क्रिन ‘ वरचा, ‘ सेव्ह ‘ न केलेला मजकूर नसतो; कि बुवा घ्या ‘ कर्सर ‘ तिकडे, चुकीच्या शब्दाला ‘ बॅकस्पेस ‘ नं ढकला, किंवा ‘डिलिट’ करा,असं. बोलून गेलेल्या शब्दांबद्द्लचा ‘ कर्सर ‘ आपल्या मनात नंतर ( अन् निरंतर ! ) स्थिरच होवून बसलेला असतो. तो डिलीट होत नाही ..वा दुरुस्त होत नाही. मनाच्या स्क्रिनवर मग चुटपुटीच्या भावना पसरून जातात. बोलून गेलेले क्षण – झोंबत रहातात. आपल्याला आणि ऎकणार्याला. हे सगळं का होतं- बोलताना आपण विचार करीत नाहीत या मुळं. माणसाचं मन ( बुध्दी ) एवढी कार्यक्षम असते, ती त्याच्या जन्मापासून सतत कार्यरत असते- अपवाद फक्त माणूस बोलत असतो, त्या वेळेचा; असं एक मजेदार कोटेशन आहे. फार वर्षांपूर्वी , अशाच पश्चात्तापदग्ध अवस्थेत, चुटपुटीच्या मन:स्थितीत मी डायरीत एक प्रश्न विचारला होता स्वत:ला –
.. त्याचं काय झालं- तू ठरविलं होतंस ना, बोलताना-बोलण्यापूर्वी क्षणभर थांबायचं,त्याचं ?
.. या प्रश्नाला अद्याप मला ना उत्तर सापडलं, ना ठरविल्यानुसार कार्यवाही होते आहे. परिणामाची जाणिव न ठेवता, बोलून टाकायची ती सवय ..
.. पण तशी,ती आठवण मनात ठेवून बसलं,की वेगळीच समस्या उभी रहाते पहा- गप्पपणाच घेरून रहातो. अडथळाच होवून बसतो. बोलणं पुढं ढ्कलल्या जात नाही. काल्पनिक विचार-समस्या-परिणाम या मध्ये घुटमळून गेलं, की वाचा थांबते. दातखिळ बसते. ही दातखिळ – अहंकाराची, अहंपणाची,अपमानीत मनाची.
.. पण आपण गप्प बसल्याने समस्या थोड्याच सुटतात ? लोकं पुढे निघून गेलेले असतात,आपल्या गप्पपणाचा भलताच अर्थ बाळगून. सगळं जग पुढे निघून गेलेलं असतं अन् आपण बसलेलो असतो आपला मुखदुर्बळपणा गोंजारीत. एका शायरने क्षणा क्षणाचा हिशोब मांडताना, त्यातलं व्यस्त प्रमाण कसं मांडलं आहे पहा-
चले तो फासला तय हो न पाया लमहोंका
रुके तो पांवोसे आगे निकल गयी सदियां
..आपण चालतो, तेव्हा आपणच चालत असतो, अशा वेडगळ समजूतीत आपण असतो. खरं म्हणजे, आपल्याला याचं भान नसतं,की –
इक पल के रुकने से दूर हो गई मंजिले
सिर्फ हम नही चलते,रासते भी चलते हैं
..म्हणजे जगण्याची ही ‘ ट्रेड मेल ‘ टेस्ट ज्याला जमते-सावरते, तो भानावर असतो.तो बदलाच्या संपर्कात असतो. माणसाने थांबू नये, आणि त्याच्या साठी कुणी थांबणार नाही.
.. बरं थांबू नये-ठीक आहे. चालू या. मग चालताना हे क्षणा-क्षणातलं अंतर एवढं दूरचं होवून बसतं, की मग पायाला मणामणाचं ओझं बांधल्यासारखं होवून जातं. विशेषत: नाते संबंधात,मैत्री संबंधात संवादाचे असे अडथळे येवून बसतात,की उच्चार थांबून जातात. मग थांबलेल्या उच्चारांचे प्रतिध्वनी उलटे उमटत जातात. मनात काळोख दाटत जातो.साचत जातो.एकमेकांबद्द्लचे राग-गैरसमज-उश्रमा हे सगळं सगळं भोवत रहातं. का ? तर बोलणं रुकल्यामुळे. ( आणि आजकाल मोबाईलमुळे संवादाला – संपर्काला एवढं जुजबी स्वरूप आलं आहे, की संवादाचं मोल खलास झालं आहे. ) आपण थांबून जातो अन् दुरावा दुप्पट वेगाने वाढत जातो.हे जे लम्हे आहेत, त्यातलं अंतर बोलण्यानेच मापायचं एवढंच नाही, चालण्यानेही-शारिरीक हालचाल,गती- याच्यानेही मापायचं असतं. जवळीक ही अशी शरीर मनाने क्षणाक्षणाला साधायची असते. वडिलधारं माणूस, जवळचा मित्र, बायको असं कुणी ; त्याने नुसतं पाठीवरून हात फिरवावा.. केवढी जवळीक वाटते… जवळीकतेचे ते क्षण..
…छे बुवा ! हे क्षणांच्या हिशोबात गुंतलं,की चिल्लर पैशांचा-नाण्यांचा गोंधळ व्हावा तसं होवून तर बसतं अन् शिवाय दिवसाचा हिशोब करता येतो,सांगता येतो. पण हे क्षण – केव्हा सरून जातात,वाळूच्या कणांसारखे निसटून जातात पहा की-
बेच डाले है दिन के लम्हे
रात थोडी बहूत हमारी है.
खरंच, दिवसभर बोलण्याच्या नादात, घुम्मेपणाच्या नादात आपण भरकटलेले असतो किंवा ठार होवून बसलेले असतो . हेवेदावे, मतभेद,व्यवहार,
लाभ-हानी,मान-अपमान यांना आपण आपले दिवसभरातले क्षण विकून टाकलेले असतात -विकून टाकलेले. हां, रात्र मात्र थोडी बहूत आपली असते. ही थोडी बहूत म्हणजे काय- झोपण्यापूर्वी, पंख जवळ घेताना, आपण आपल्या पाशी आलेले असतो. .. झोपेच्या त्या गूढ डोहात उरण्यापूर्वीचे ते क्षण . ती वेळ. त्या क्षणांत आपण ‘ जागे ‘ राहून पाहिलं,तर आपण आपल्याला दिसू- स्वच्छ.जसे आहोत तसे. अरे,अरे,पण पाय निसटतात,अन् पाहता पाहता आपण गाढ होवून जातो की. म्हणून तर मीना कुमारी म्हणते –
कई लम्हे
बरसात की सी बुंदे है
ना-काबिले-गिरफ्त
सीने पर आ के लगते है
और हाथ बढा, की इससे पहले-
फिसल कर टूट जाते है !
छान!
पण
अबोलपणे जाणारे क्षण रिकामेच असतात असं नाही.
बेच डाले है दिन के लम्हे
रात थोडी बहूत हमारी है.
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम.
farch chan
Nice. very nice, Really we often come across in the state of mind where we nither do not want to speak or even do not want to mixup with the friends, relatives or closers. In that period also we feel that I am right. Right not in the sence of right or wrong but in the sence that by remaining in isolation I may get relif. But problems remains in mind forever. There time comes to my rescue. As and when time passes the sun of darkness goes down and moon of brightness comesup.
a veyry delicately touching article.
sir i want to know
what is the difference between lamhe and pal
पल,पळ,लम्हा आणि क्षण. एकाच अर्थाचे हे शब्द. पण आता लक्षात येतं आहे,की त्या त्या शब्दांचा वावर, वापर,संदर्भ, आपलं त्यांच्याशी झालेलं वैयक्तिक असं नातं,आणि त्याच्याशी जुळलेल्या आपल्या आठवणी.. एकाच रंगाचे विविध स्तर असावेत,तशा आपल्या भावना…शब्दांशी जुळलेल्या…