दैनंदिन जीवन व्यवहारात कधी कंटाळा येतो. एखादी अडचण असते,तसं पाहिलं तर क्षुल्लक प्रसंग असतो, पण संथ प्रवाह त्यामुळे थांबून रहावा, तसं होवून जातं. किरकोळ समस्या, तणाव कधी असे मोठे होवून उभे राहतात, की पुढचं काही सुचत नाही. प्रश्नाच्या सुतळीचा पाहता पाहता बाऊ होवून जातो, नागोबा होवून जातो. हे जसं वैयक्तीक घडामोडींच्या बाबतीत होतं, तसं राजकीय, सामाजिक मुद्दे उपस्थित झाले, वृत्तपत्रे,मिडिया च्या मार्फत आपल्यावर आदळू लागले, की आपण थबकतो. काळजी वाटत राहाते. आता कसं व्हावं बुवा.. असं वाटत राहतं. ‘अभिमान’ ‘स्वाभीमान्’, ‘बाणा ‘ , याचं खरं, का त्याचं… असे प्रश्न अंगावर धावून येत असतात – जादूगाराच्या त्या खेळातल्या सारखे- भिंतीला चिटकून आपण उभे असतो, अन तो जादूगार सपासप चाकू आपल्या रोखाने फेकत असतो.. ते चाकू कधी कानाच्या बाजूला, कधी डोक्याच्या वर, कधी हाताच्या बाजूला,पोटाच्या वर.. असे अंगावर येवून भिंतीवर रूतत जातात. मग खेळ संपतो. पाहणारे सुटकेचा नि:श्वास टाकतात, भिंतीशी उभा असलेला तो,( त्याच्यात मीच जावून बसलेला असतो ) तो सुध्दा मोकळा होतो. दैनंदिन समस्या आपोआप विलग झालेल्या असतात- आपल्या कोणत्याही प्रयत्नांशिवाय, सहभागाशिवाय. पण तो तणाव आठ्वून जातो. मग डॉ. इक्बाल यांची आठ्वण होते- त्यांनी सांगून ठेवलेलं असतं-
तू इसे इमरोज व फर्दा से न नाप ( इमरोज- आज. फर्दा– उद्या )
जावेदां,पैहम रवां, हरदम जवां है जिंदगी ( जावेदां – स्थायी, शाश्वत. पैहम – निरंतर. रवां – प्रवाही )
( दिवस-रात्रीच्या मोजपट्टीने आयुष्याला तू मोजू नकोस. क्षुल्लक प्रसंग, तत्कालीन अडचणींच्या अनुषंगाने मोठे निष्कर्ष काढायला जावू नकोस ( कारण,) आयुष्य – जीवन हे त्याच्याही पुढे जणारं, निरंतर, प्रवाही आहे. मोठं आहे.)
प्रसंग ओसरून गेल्यावर हे आठवतं , लक्षात येतं, पटतं; ते प्रसंग ओसरल्यावर, आधी नाही.मुळीच नाही. कारण ? आपण साधी माणसं.ना राजकारणी, ना मुत्सद्दी; ना साधू ना संत. पण काळजी ओसरल्यावर असा एखादा शे’र किती धीर देवून जातो… एका अनामिक शायरने असाच आपल्या शे’र मधून आपल्याला धीर दिला आहे-
काम रुकने का नही, अए दिले-नाही कोई ( दिले-नाही : अडविणारं, रूकून बसणारं मन. )
खुद ब् खुद गैब से हो जाएगा सामां कोई ( गैब : अप्रत्यक्ष, अपरोक्ष . सामां : उपाय )
( सतत कां कूं करत रहाणार्या, अडचणींचा बाऊ करीत राहणार्या आपल्या मनाला शायर समजावितो आहे- अरे ! कसलंच संकट थांबून राहात नसतं. कोणतंही काम खोळंबून असं राहात नसतं. तुझ्या माहितीबाहेर, तुझ्या कक्षेबाहेर असं काही परस्पर चालंत असतं आणि समस्या परस्पर
सुटूनही जात असते… चिंता का करतोस… )
किती मंत्रांसारखे वाटतात हे शेर!
धीर मिळवायला कविता / शेर यांच्याकडे जाणं किती छान आहे.
त्यांच्यावर कायम विसंबता येतं, प्रामाणिक असतात ते आपल्याशी.
काका,
दुसऱ्या शेरात आलेल्या ’सामां’ शब्दाचा अर्थ काय आहे?
– सचिन
उपाय.
apratim